बुधवार, २५ जानेवारी, २०२३

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 


‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर परिसंवाद

 

अमरावती, दि. 24 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर आयोजित परिसंवाद कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या सभागृहात जयंती कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.ए.एम. महल्ले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे, प्रा. टि.सी. भगत, प्रभारी अधिकारी प्रा. ए. एम. मुकादम, प्रा. एन.जी. गाडगे तसेच सर्व शाखांचे व्दितीय वर्षाचे विद्यार्थी व एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रारंभी श्री. बुरंगे यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विद्यार्थ्यांनी ‘एकता स्वतंत्रता समानता रहे’ हे देशभक्ती गीत गायले.

आजच्या युवकाला जर चांगली शिकवण दिली तर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांसारखा देश घडू शकतो. संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून ते सध्या भारतीय नागरी सेवेमध्ये सेवा बजावत आहेत. अशा यशस्वी कर्तबगार विद्यार्थ्यांकडून संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी प्रेरणा घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर श्री. राजेश बुरांगे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तरुणांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेत त्यांचे विचार आचरणात आणावे. राष्ट्रीय सेवा योजनेचे रक्तदान हे मुख्य काम असून रक्तदानातून अनेक गरजू व्यक्तिंचे प्राण वाचविल्या जाऊ शकते, यासाठी सर्वांनी नियमित रक्तदान करावे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटाला होईल यादृष्टीने प्रयत्न करावे,  असेही श्री. बुरांगे यांनी यावेळी सांगितले.

संस्थेव्दारे आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कु. आचल तराळे या विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौरभ महाजन यांनी केले.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा