दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 5 रुपये
शासकीय अनुदान योजनेस 10 मार्चपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 6 : राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर रु. 5 अनुदान देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या कानातील बिल्ल्याशी संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अमरावती महसूल विभागातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, गाईच्या दुधासाठी (3.5-8.5) या गुणप्रतीच्या संकलीत केलेल्या दुधास प्रतिलिटर रु. 5 अनुदान देण्याच्या योजनेस अटी व शर्तीच्या अधीन राहून 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या रु. 5 प्रतिलिटर दुधास अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी संघांनी व खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र व फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) आदींनी विहीत नमुन्यात अर्ज आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास विभाग, मुंबई यांचेकडे अर्ज सादर करण्याची अंतीम दि. 20 जानेवारी ही निश्चित करण्यात आलेली होती. विहीत मुदतीत अर्ज केलेल्या पात्र सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना सादर योजनेच्या अंमलबजावणीकरीता शेतकऱ्यांचे डाटा अपलोड करण्यासाठी लॉगिंन आयडी व पासवर्ड देण्यात आलेले आहे. या योजनेचा कालावधी 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्यात शासनाची मान्यता मिळाली होती.
अमरावती महसूल विभागातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, गाईच्या दुधासाठी (3.5-8.5) या गुणप्रतीच्या संकलीत केलेल्या दुधास प्रतिलिटर रु. 5 अनुदान देण्याच्या योजनेस अटी व शर्तीच्या अधीन राहून पुढील दि. 11 फेब्रुवारी 2024 ते 10 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांनी ते दूध पुरवठा करीत असलेल्या सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र, फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) यांचेमार्फत आपला डाटा अपलोड करुन घ्यावा व त्याप्रमाणे प्रतिलिटर 5 रु. प्रमाणे शासकीय अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, तसेच सहकारी संघ, खाजगी दूध प्रकल्प, दूध शितकरण केंद्र, फार्मर प्रोड्युसर कंपनी (दुग्धव्यवसायाशी संबंधित) यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल याकरिता प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी सचिन गं. यादव यांनी केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा