विद्यापिठाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना
तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणार
- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
अनुकंपा तत्वावर सात उमेदवारांना
पालकमंत्र्यांच्या हस्ते नोकरीच्या आदेशांचे वितरण
अमरावती, दि. 9 : राज्य शासकीय
कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही तीन
लाभांच्या (दहा-वीस-तीस) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत
वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी
ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्ष्ण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिली. विद्यापीठातील
शिक्षक- शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हिताचे सर्व प्रश्न राज्य शासनाकडून
सोडविण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
संत गाडगेबाबा अमरावती
विद्यापीठाच्या परिसरातील दृक-श्राव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात सात
उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते आज वितरीत
करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण
पोटे-पाटील, आमदार प्रताप अडसळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.
मिलींद बारहाते, प्र. कुलगुरु प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, उच्च व
तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. उमेश काकडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे
अध्यक्ष अजय देशमुख यांच्यासह विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित
होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले
की, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना
अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत आहे, ही चांगली गोष्ट विद्यापीठ प्रशासनाकडून
होत आहे. यामुळे मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार मिळणार आहे.
यापुढेही विद्यापीठाच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हिताचे प्रश्न राज्य
शासनाकडून तत्परतेने सोडविण्यात येईल. तसेच अनुकंपा तत्वाचे प्रलंबित आठ प्रकरणे व
वयोमर्यादा ओलांडलेली चार प्रकरणे विशेष बाब म्हणून विचार करुन त्यांचा मंत्रालय
स्तरावर निर्णय घेण्यात येईल. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी या मागण्या पूर्ण
करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, नवीन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यापीठाने सुध्दा आपल्या कार्यात गतीमानता
आणावी. परीक्षांचे निकाल घोषित केल्यानंतर पदवी प्रदानासाठी अधिक कालावधी न घालवता
डिजिटल स्वाक्षरीची पदवी डिजी लॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल,
यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताची कामे
स्वनिधीतून पूर्ण करावीत. आगामी काळात विद्यापीठ व महाविद्यालयातील 2 हजार 100 पद
भरती करण्यात येईल. तसेच 2001 पूर्वीच्या सर्व महाविद्यालयांना अनुदानही उपलब्ध
करुन देण्यात येईल. खूप अंतर असलेल्या धारणी व बुलडाणा येथील विद्यार्थ्यांसाठी
विद्यापीठाचे स्वतंत्र उपकेंद्र निर्मितीसाठी शासनाकडून मदत करण्यात येईल, असेही
पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले की,
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने स्थापनेपासूनच अनेक यशाची मोठी शिखरे गाठली
आहेत. नुकताच विद्यापीठाला पी.एम. उषा योजनेंतर्गत 20 कोटी रुपये, इन्क्युबेशन
सेंटरला पाच कोटी रुपयाचे अनुदान शासनाकडून प्रदान करण्यात आले आहे.
विद्यापीठामध्ये आदिवासी विद्यार्थीनींकरीता वसतीगृहाचे बांधकाम सुरू असून अनेक
इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. विद्यापीठांतर्गत पाच जिल्ह्यांचे
विद्यार्थी शैक्षणिक सुविधा घेतात, परंतू, बुलडाणा व धारणी सारख्या अधिक अंतर
असलेल्या विद्यार्थ्यांना लवकर शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी उपकेंद्र निर्मितीसाठी
शासनाने मंजूरी द्यावी, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांना यावेळी केली.
अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश
प्राप्त करणारे उमेदवार :
अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश कु.
नेहा देवानंद रॉय. श्री अनजर खान अयुब खान, श्री अब्दुल तौसिफ अब्दुल तसलीम, श्री
ऋषिकेश विनोद कांडलकर, श्री अभिषेक गणेश देशमुख, कु. अदिती दत्ता वाबळे व कु.
अदिती दिपक मोहोड यांना कनिष्ठ लिपिक पदाचे शासनादेश पालकमंत्री चंद्रकांतदादा
पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा