लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

                                 








लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा

                                                      -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

* दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांशी संवाद

* लोकसभा निवडणुकीचा आढावा ; नियंत्रण कक्षाची पाहणी

बुलडाणा, दि. 18 : सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, तृतीयपंथी आदी सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे. तसेच मतदानासाठी इतरांनाही प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पाण्डेय यांनी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मतदान करण्यासंदर्भात जनजागृती करुन मतदान करण्यासाठीची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, समाजकल्याण सहायक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी यावेळी उपस्थित होते.

            श्रीमती पाण्डेय यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास भेट दिली. मतदार हेल्पलाईन, सी-व्हिजील, सीसीटीव्ही यंत्रणा आदींबाबत त्यांनी माहिती घेतली. मतदार हेल्पलाईनवर येणाऱ्या दूरध्वनीबाबत कॉलसेंटरप्रमाणे उपस्थित कर्मचारी यांनी आपली ओळख द्यावी. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही माहिती देताना नम्रपणे ही माहिती देण्यात यावी. निवडणुकीच्या कालावधीत नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका बजावित असतो. या कक्षाने इतर नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. जिल्ह्याला इतर राज्याची सिमा आहे. याठिकाणी असलेल्या चेकपोस्टवरील यंत्रणा सक्षमपणे सुरू ठेवावी.

            लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. महिला मतदारांची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत त्यांनाही सहभागी करून घ्यावे. ही‍ निवडणूक मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती पाण्डेय यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध घटकांशी संवाद साधून त्यांचा सहभाग नोंदवून घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज श्रीमती पाण्डेय यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्तांची नियंत्रण कक्षाला भेट

            विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी कार्यालात स्थापित लोकसभा निवडणूक नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी हेल्पलाईनवरील नोंदीची पाहणी केली. तसेच दूरध्वनी, सी-व्हीजील ॲपवरील तक्रारींची माहिती घेतली. निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्थीर सर्व्हेक्षण पथकाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिरत्या पथकांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यावेळी त्यांनी थांबलेल्या पथकांशी संपर्क साधून माहिती घेतली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct) - लेख

विभागातील विविध प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू