गुरुवार, १८ जुलै, २०२४

प्रधानमंत्री पिक विमा योजना ; 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पिक विमा योजना ; 31 जुलैपर्यंत मुदतवाढ अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी मंत्र्यांकडून आवाहन · ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.pmfby.gov.in संकेतस्थळ उपलब्ध अमरावती, दि. 18 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये घेतला आहे. राज्यात या योजनेंतर्गत 95 टक्के पेक्षा अधिक विमा अर्ज हे सामुहिक सुविधा केंद्र (कॉमन सर्विस सेंटर) च्या माध्यमातून भरण्यात येतात. परंतू, ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा कमी असणे, त्याचा वेग कमी असणे तसेच शासनाने नव्याने सुरु केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’ अंतर्गत भरल्या जाणारे अर्ज अशाप्रकारे पिक विमा येाजना व लाडकी बहीण योजना असे दोन्ही अर्ज कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून भरावयाचे असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे. उपरोक्त समस्यांमुळे जे शेतकरी पिक विमा योजनेत सहभागी होण्यापासून वंचित राहीले आहेत, अशांना योजनेत सहभागी होता यावे, यासाठी पिक विमा योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्यात खरीप 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येत आहे. खरीप 2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर www.pmfby.gov.in थेट ऑनलाईन स्वरुपात विमा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून 31 जुलै अंतीम मुदत देण्यात आली आहे. राज्यात 15 जुलैपर्यंत या योजनेंतर्गत 1 कोटी 36 लाख विमा अर्ज नोंदणीच्या माध्यमातून साधारणत: 90 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. गतवर्षी म्हणजे खरीप 2023 मध्ये पिक विमा अर्ज संख्या 1 कोटी 70 लाख होती व विमा संरक्षित क्षेत्र 1 कोटी 13 लाख हेक्टर होते, अशी माहिती कृषी संचालक पुणे यांच्याव्दारे देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे. 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा