सोमवार, १ जुलै, २०२४
खरीप 2024 साठी एक रुपयात पिक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन · सीएसीसी चालकांना प्रती विमा अर्ज एक रुपयापेक्षा जास्त रक्कम देऊ नये
खरीप 2024 साठी एक रुपयात पिक विमा योजना
अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागातर्फे आवाहन
· सीएसीसी चालकांना प्रती विमा अर्ज एक रुपयापेक्षा जास्त रक्कम देऊ नये
अमरावती, दि. 1 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये घेतला आहे. गतवर्षी खरीप-2023 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी 1 कोटी 70 लाख विमा अर्जाद्वारे या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला आहे. खरीप हंगाम-2024 करिता 30 जूनपर्यंत 40 लाख विमा अर्जांची नोंद झाली आहे. यावर्षी सुध्दा विभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.
विमा अर्जाबाबत महत्वाची माहिती :
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना प्रति विमा अर्ज रुपये एक प्रमाणे योजनेतील सहभाग शासनाने देऊ केला आहे.
विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी पुढीलप्रमाणे पर्याय आहेत :
शेतकरी स्वतः केंद्र सरकारच्या विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर ऑनलाईन अर्ज करु शकतात. शेतकऱ्याचे ज्या बँकेमध्ये बचत खाते आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तो विमा अर्ज भरू शकतो. कर्जदार शेतकऱ्याने विमा मुदत संपण्याच्या किमान सात दिवस आधी विमा योजनेत सहभाग घ्यायचा असल्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेस कळविल्यास त्या संस्थेमार्फत त्याचा विमा हप्ता जमा करुन त्यांना सहभागी करुन घेण्यात येते. केंद्र सरकारने नियुक्त केलेले विमा प्रतिनिधी यांच्यामार्फतही विमा योजनेत सहभागी होता येईल. तसेच सीएससी केंद्र चालकामार्फत अर्ज करता येऊ शकतो.
सीएससी केंद्र चालकांना प्रति शेतकरी रुपये 40 प्रमाणे शुल्क केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. सदर शुल्क संबंधित विमा कंपनी ही सीएससी चालकांना अदा करणार आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य शुल्क सीएससी चालक घेऊ शकत नाहीत. मात्र, शेतकऱ्याने जमीनीचा 7/12, 7-अ स्वत: काढून दिला पाहिजे. किंवा शासकीय शुल्क भरून ऑनलाईन 7/12 सातबारा प्राप्त करून घ्यावा.
राज्यात काही ठिकाणी काही सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्याकडून प्रति अर्ज एक रुपये पेक्षा अधिक रक्कम घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यानुषंगाने अशा प्रकारची घटना कुठे घडत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा सीएससी प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्यास त्याची दखल घेऊन संबंधित सीएससी केंद्रचालकावर कडक कारवाई केली जाईल.
विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे ?
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पिककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनादेखील या विमा योजनेत सहभाग घेता येईल. मात्र, त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजनेत भाग घेण्याच्या अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस अगोदर संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतक-याने आपला 7/12 चा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र सादर करुन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने विमा योजनेत सहभाग घेता येवू शकतो. तसेच यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊन योजने त सहभागी होता येईल.
योजनेत सहभागासाठी अंतीम मुदत दि. 15 जुलै, 2024 आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.
0000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा