गुरुवार, ४ जुलै, २०२४

धबधबे, पर्यटन स्थळ व गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंधित उपाययोजना राबवा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

धबधबे, पर्यटन स्थळ व गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंधित उपाययोजना राबवा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय अमरावती, दि. 3 : लोणावळा येथील भुशी धरणाच्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील पाचजणांचे कुटुंब वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. तसेच उत्तरप्रदेश राज्यातील हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत शेकडो व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दोन्ही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने आपापल्या जिल्ह्यात सर्तकता बाळगून धबधबे, मंदिर, मस्जिद, प्रार्थना स्थळ, पर्यटन स्थळ आदी गर्दीच्या ठिकाणी पोलीसांचा व बचाव पथकांचा चोख बंदोबस्त ठेवून प्रतिबंधित उपाययोजना राबव्याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले. विभागीय आयुक्तांच्या दालनात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी भुशी धरण व हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांच्या जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार, पुनर्वसन विभागाचे उपायुक्त गजेंद्र बावने बैठकीला उपस्थित होते. डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजुला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला असे पाचजण वाहून गेले. तसेच उत्तर प्रदेशच्या हाथरसच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारची घटना किंवा प्रसंग आपल्या विभागात कुठेही घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी व पर्यटनस्थळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवावा. त्याठिकाणी बचाव पथके सुध्दा सर्व साहित्यानिशी तैनात ठेवावी. धबधबे, नदी, तलाव काठ सारख्या पर्यटनस्थळी, प्रार्थना स्थळी अशा गर्दींच्या ठिकाणी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना व सुरक्षिततेसंबंधीच्या सूचना दर्शनी भागात लावाव्यात. अमरावती विभागात कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्ताहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीबाबत व उपाययोजनांबाबत नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी केल्या. 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा