बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन

 

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन

 

अमरावती, दि. 25: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीकरीता जारी केलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सुचना (केंद्र हिस्सा निधी वितरण पद्धती) राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय नुसार  १७ मार्च, २०२२ नुसार लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक (अ) केंद्र शासनाच्या ६० टक्के च्या हिश्याचे वितरण पद्धती नमूद केलेली असून त्यानुसार भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती निधीचे वितरण विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर नोदणीकृत केलेल्या अर्जानुसार आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये केंद्र शासनाकडून थेट डी बी टी तत्वावर पी एफ एम एस प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येत आहे. सदर केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांस अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरीत महाविद्यालयास देय असलेली रक्कम (शिक्षण शुल्क व इतर शुल्क) विद्यार्थ्यांने पुढील सात दिवसाच्या आत महाविद्यालयास जमा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत महाविद्यालयांने त्यांच्याकडून विहित नमुन्यात हमीपत्र घ्यावे असे नमूद केलेले आहे. परंतू केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर सुद्धा महाविद्यालयास देय असलेली रक्कम काही विद्यार्थी महाविद्यालयास भरणा करत नसल्याबाबत विभागातील महाविद्यालय व शिक्षण संघटना यांचेकडून जिल्हा कार्यालयास व या कार्यालयास तक्रारी,निवेदन प्राप्त होत आहे.

शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीच्या ६० टक्के हिश्यापैकी महाविद्यालयास देय असलेली रक्कम महाविद्यालयाकडे दिलेल्या विहित जमा करणे विद्यार्थ्यांस बंधनकारक आहे. तरी केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा ६० टक्के हिस्सा ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी सात दिवसामध्ये महाविद्यालयास देय असलेली रक्कम महाविद्यालयाकडे भरणा करून त्याची रितसर पावती  महाविद्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन विभागातील विद्यार्थी व पालक यांना समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, यांनी  केले आहे.  

000000

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’चा विभागीय आयुक्तालयात शुभारंभ ; स्वच्छता हा जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनवा -उपायुक्त संजय पवार

 

‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’चा विभागीय आयुक्तालयात शुभारंभ

स्वच्छता हा जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनवा

                         -उपायुक्त संजय पवार









 

अमरावती, दि. 17 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, 2 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा म्हणून विभागात सर्वत्र राबविण्यात येणार असून मोहिमेचा आज विभागीय आयुक्तालयात शुभारंभ करण्यात आला. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता हा केवळ सरकारी मोहिमेचा भाग नाही, तर तो नागरिकांच्या जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनला पाहिजे, असे प्रतिपादन महसूल उपायुक्त संजय पवार यांनी केले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त गजेंद्र बावणे, नगरपालिका प्रशासनचे सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, सहाय्यक आयुक्त गिता वंजारी, वैशाली पाथरे, तुकाराम टेकाडे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य शाखांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

            श्री. पवार म्हणाले की, स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करुन स्वच्छता हा जीवनशैलीचा भाग होण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘स्वच्छ भारत मोहिम’ राबविण्यात येते. आजही अनेकांकडून अजाणतेपणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जाते. यासंबंधी अधिक गंभीर होवून स्वच्छता हा सवयीचा भाग होणे आवश्यक आहे. परदेशात तेथील जनता व सरकार स्वच्छतेसंबंधी अधिक सजग असून तसे नियमच त्या देशात तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील नद्या, सरोवर, रस्ते, परिसर, बाजारपेठा, नागरि वसाहती ह्या स्वच्छ व सुंदर आहेत. आपल्याकडेही त्याचप्रमाणे सार्वजनिक व घरेलू स्वच्छता होण्यासाठी तसे संस्कार व सवय स्वत:सह इतरांनी अंगिकारणे आवश्यक आहे. स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सर्वांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी सांगितले.

 

            ‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’बाबत श्री. मस्के यांनी यावेळी प्रास्ताविकातून माहिती दिली. वर्ष 2017 पासून स्वच्छतेच्या पंधरवड्याला सर्वत्र सुरुवात झाली आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही यावेळेची थीम असून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दि. 17 सप्टेंबर म्हणजे आजपासून या पंधरवड्याचा शुभारंभ होत आहे. प्लॉस्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट करताना घ्यावयाची काळजी व त्याचा पुनर्वापर, सुर्याच्या अतीनिल किरणापासून बचाव होण्यासाठी कार्बनडायऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी करणे, ग्लोबल वार्मिंगबाबत जनजागृती करणे, टाकावू पासून टिकावू आदी महत्वपूर्ण घटकांसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपले घर, कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शंभर तास द्यावेत. तसेच संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा वसा कायमरित्या टिकवावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

             ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती श्रीमती वंजारी यांनी यावेळी दिली. या मोहिमे अंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत कार्यालय व परिसर स्वच्छ करावयाचे असून टाकावू पासून टिकावू या संकल्पनेवर आधारित कचऱ्यापासून विविध वस्तूंची निर्मिती करावयाची आहे. निर्माण केलेल्या वस्तूंचे 1 ऑक्टोबरला प्रदर्शन लावण्यात येणार असून त्यातील विजेत्यांना 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी ‘सेल्फी विथ थैला’ ही संकल्पना सुध्दा राबविण्यात येणार, अशी माहिती श्रीमती वंजारी यांनी यावेळी दिली.

 

            दररोज विभागीय आयुक्त कार्यालय व परिसर स्वच्छ करणाऱ्या महिला-पुरुष स्वच्छताकर्मींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव यावेळी करण्यात आला. दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करुन स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करण्याबाबतची ‘स्वच्छतेची शपथ’ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करुन श्रमदान केले.

00000

 

 

 

 

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अमरावती, दि. 17 : केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त संजय पवार यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

        यावेळी उपायुक्त गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, राहुल टेकाडे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

0000


रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

राज्यातील 434 आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे थाटात लोकार्पण ; संविधान मंदिर : राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतिक -खासदार डॉ. अनिल बोंडे

                    

              राज्यातील 434 आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे थाटात लोकार्पण

              















संविधान मंदिर : राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतिक

                             -खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. 15 : सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारतीय संविधानातून मिळत असल्यामुळे, राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण आज झाले, ही अत्यंत गौरवाची बाब असून महत्वाचा प्रसंग आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समानता व बंधुता या मुलभूत घटकांविषयी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संविधान मंदिर हे राज्यघटनेबाबत जागृतीचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या एल्फिन्‍स्टन तांत्रिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राज्यातील 434 आयटीआयमध्ये स्थापित संविधान मंदिरांचेही उपराष्ट्रपतींच्या हस्ते एकाचवेळी आभासी पध्दतीने लोकार्पण झाले. मुंबई येथील कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विभागाचे सचिव गणेश पाटील तर अमरावतीच्या आयटीआयमधील कार्यक्रमात आमदार सौ. सुलभाताई खोडके, महसूल सह आयुक्त संजय पवार, प्रभारी उपंसचालक संजय बोरकर यावेळी उपस्थित होते.

 

यावेळी मुंबईच्या एल्फिन्‍स्टन तांत्रिक विद्यालय येथील संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रक्षेपित करण्यात आले.

डॉ. बोंडे म्हणाले की, सन 1947 ला देश स्वतंत्र झाल्यावर लोकांना त्यांचे कर्तव्य, अधिकार यासंबंधी व्यवस्थापन तसेच सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना भारतीय संविधान वाचून त्यातील मूल्य, अधिकार आणि कर्तव्य, न्यायव्यवस्था, घटनेतील कलमे आदी संदर्भात माहिती करुन घ्यावी. तसेच त्याचा वापर लोकहितासाठी कसा करता येईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. भारत हा लोकशाहीप्रदान देश असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी योगदान देणे आवश्यक आहे. देश सुरक्षित करावयाचा असल्यास देशाच्या चर्तुसीमा सुरक्षित करणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुण-तरुणींनी भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवा करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

आयटीआयमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटने विषयी इंतभूत माहिती व्हावी, यासाठी संविधान मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश करतेवेळी राज्यघटनेतील उद्देशिकेचे नियमितपणे वाचन करावे. त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेवून तो आचरणात आणावा. राज्यघटनेतील महत्वाच्या पैलूंवर सौ. खोडके यांनी प्रकाश टाकला. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन आमदार सौ. खोडके यांनी यावेळी केले.

 

राज्यातील प्रत्येक आयटीआयमध्ये संविधान मंदिराची निर्मिती करणे, ही अतिशय सुंदर संकल्पना असून विद्यार्थ्यांनीही आपले करिअर करताना त्याचा उपयोग करुन घ्यावा. अशा कार्यक्रमातील महत्वाच्या वक्त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन योग्य मार्ग निवडून चांगले भविष्य घडवावे, असे मार्गदर्शन सह आयुक्त श्री. पवार यांनी केले.

 

विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे नियमित वाचन करुन त्यातील स्वातंत्र्य, समानता व बंधूता या घटकांचा आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोग करावा. विद्यार्थी दशेत असताना चांगल्या गुणांचा अंगिकार करुन मिळालेल्या संधीच सोन करावं, उत्तम करिअर घडवावे, असे मार्गदर्शन प्र. उपसंचालक श्री. बोरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.

संविधान मंदिराचे लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्वांनी भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती पल्लवी वैद्य यांनी केले तर निलेश रोंघे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिल्प निदेशक, शिक्षक वृंद-कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

 

 

 

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी संविधान मंदिराचे लोकार्पण

 

           उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी संविधान मंदिराचे लोकार्पण

 

अमरावती, दि. 12 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या एल्फिन्‍स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे रविवार, दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित कार्यक्रमात संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे.

 

जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन होत असून राज्यातील 434 आयटीआयमध्ये 15 सप्टेंबरला, सकाळी 10.30 वाजता संविधान दिन लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव गणेश पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतिश सुर्यवंशी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे आयुक्त प्रदीप डांगे यांच्यासह विभागाचे अन्य वरीष्ठ अधिकारी या महत्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

 

या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाव्दारे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राज्यातील सर्व नागरिकांना समाजमाध्यमांवर लाईव्ह पाहता येईल, असेही विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

 



0000

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी ; आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी

                             

                       


                     

                           ‘मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी

आतापर्यंत 1 लाख 20 हजाराहून अधिक उमेदवारांची नोंदणी

 

         मुंबई दि.12 : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. उद्या शुक्रवार दि.१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

00000

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेला 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

 


‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेला 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

सप्टेंबर 10, 2024

 

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेला 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

अमरावती, दि. 1 : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  ही स्पर्धा  जाहीर केली आहे. महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ होती. या स्पर्धेत सहभागासाठी मुदतवाढ देण्यात आली असून ही तारीख आता १५ सप्टेंबर २०२४ अशी करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्र माझा‘ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जलसंधारण, जलसंपदा, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील.

निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच रिल्स आणि लघुपटांना शासनाच्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची, प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.

स्पर्धेची नियमावली

छायाचित्रण स्पर्धा :

* छायाचित्रे १८x३० इंच HD च्या मानक आकाराची असावीत.

* छायाचित्राची संकल्पना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुचविलेल्या संकल्पनेशी सुसंगत असावी.

* छायाचित्र ही स्वतःची सर्जनशीलता असावी.

* छायाचित्रांमध्ये कोणतेही अनुचित दृश्य नसावेत.

* कोणतीही कॉपीराईट सामग्री वापरली जाऊ नये.

* छायाचित्राचे तपशीलवार वर्णन अपेक्षित आहे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.

रिल्स स्पर्धा :

* रिल्ससाठी वेळ मर्यादा कमाल १ मिनिटांपर्यंत असावी.

* असभ्य भाषा, आक्षेपार्ह शब्द याचा वापर यामध्ये करता येणार नाही.

* कोणतेही स्वामित्व अधिकारांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* स्पर्धा १८ वर्षे आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असेल.

* मानक रिल्स स्वरूप अपेक्षित आहे.

* रिल्स नवीन असणे आवश्यक आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केले पाहिजे.

* स्पर्धेत भाग  सादर केलेल्या रील्सचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.

लघुपट स्पर्धा :

* लघुपटाचा अवधी किमान ३ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे इतका असावा.

* या स्पर्धेत १८ वर्षावरील कुणीही भाग घेऊ शकतात.

* लघुपट नवीन असणे आवश्यक आहे. लघुपट विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केलेला असावा.

* अभद्र भाषा, हिंसा, आक्षेपार्ह अपशब्द वापरला जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.

* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या संकल्पना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे लघुपट सादर करणे आवश्यक आहे.

* कोणतेही स्वामित्व अधिकाराचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* मानक व्हिडिओ स्वरूप MP४ HD १९२० * १०८० अपेक्षित आहे. स्वतंत्र YouTube स्वरूप / X स्वरूप असावे.

* लघुपट मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत बनवला आहे, याची खात्री करावी.

* लघुपट HD format मध्ये सबमिट करावा.

 भाग घेतलेल्यांचे लघुपटांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे असतील.

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत  स्पर्धेनुसार छायाचित्र, रिल्व किंवा लघुपट पाठवावीत. सोबत आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर आणि छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे, याची माहिती देणे आवश्यक आहे.

00000

 

 

कपाशीवरील आकस्मिक मररोग नियंत्रणासाठी उपाययोजना

 





                                      
                                      कपाशीवरील आकस्मिक मररोग नियंत्रणासाठी उपाययोजना


अमरावती, दि. 10 : कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत.

सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पि‍कास पावसाचा तान बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. 

आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते.

आकस्मिक मर : उपाययोजना : कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पि‍कास प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे.  शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.आकस्मिक मर या विकृतीचे लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालील पैकी आळवणी करावी. यासाठी खालील पैकी एका बुरशीनाशकाचा वापर करावा. कॉपर ऑक्सीक्लोराइड (२५ ग्रॅम) किंवा कार्बेंन्डाझीम (१० ग्रॅम) + युरिया (२०० ग्रॅम)/ १० लीटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रती झाडास २५०-५०० मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी.  त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ % डीएपी (२०० ग्रॅम /१० लि. पाणी) याची आळवणी करून लगेच हलके पाणी द्यावे.  

0000

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम ; नोंदणीसाठी www.mahayojanadoot.org संकेतस्थळ उपलब्ध

 


‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन

येत्या 13 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार

नोंदणीसाठी www.mahayojanadoot.org  संकेतस्थळ उपलब्ध


 

अमरावती, दि. 9 :  शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 7 सप्टेंबर 2024 पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या 13 सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

असे आहेत निवडीचे निकष

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

00000

‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन, राज्यात 46 हजार तर अमरावती विभागात 5 हजार 786 उमेदवारांची नोंदणी

                                         ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्यात 46 हजार तर अमरावती विभागात 5 हजार 786 उमेदवारांची नोंदणी

योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन

येत्या 13 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार

नोंदणीसाठी www.mahayojanadoot.org  संकेतस्थळ उपलब्ध

 

अमरावती, दि. 9 :  शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण 50 हजार योजनादूत नेमण्यात येणार असून सोमवार (ता. 9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 46 हजार तर अमरावती विभागात 5 हजार 786 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 7 सप्टेंबर 2024 पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या 13 सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये दि. 9 सप्टेंबर रोजी, सकाळी 11 वाजेपर्यंत 5 हजार 786 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात 1527 उमेदवारांनी, अकोला जिल्ह्यातील 788,  यवतमाळ जिल्ह्यातील 1343, बुलडाणा जिल्ह्यातील 1288, वाशिम जिल्ह्यातील 840 उमेदवारांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.

असे आहेत निवडीचे निकष

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

00000