मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’चा विभागीय आयुक्तालयात शुभारंभ ; स्वच्छता हा जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनवा -उपायुक्त संजय पवार

 

‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’चा विभागीय आयुक्तालयात शुभारंभ

स्वच्छता हा जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनवा

                         -उपायुक्त संजय पवार









 

अमरावती, दि. 17 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, 2 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा म्हणून विभागात सर्वत्र राबविण्यात येणार असून मोहिमेचा आज विभागीय आयुक्तालयात शुभारंभ करण्यात आला. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता हा केवळ सरकारी मोहिमेचा भाग नाही, तर तो नागरिकांच्या जीवनशैलीचा मुलभूत सिद्धांत बनला पाहिजे, असे प्रतिपादन महसूल उपायुक्त संजय पवार यांनी केले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थित शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त गजेंद्र बावणे, नगरपालिका प्रशासनचे सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, सहाय्यक आयुक्त गिता वंजारी, वैशाली पाथरे, तुकाराम टेकाडे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य शाखांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

 

            श्री. पवार म्हणाले की, स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करुन स्वच्छता हा जीवनशैलीचा भाग होण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘स्वच्छ भारत मोहिम’ राबविण्यात येते. आजही अनेकांकडून अजाणतेपणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जाते. यासंबंधी अधिक गंभीर होवून स्वच्छता हा सवयीचा भाग होणे आवश्यक आहे. परदेशात तेथील जनता व सरकार स्वच्छतेसंबंधी अधिक सजग असून तसे नियमच त्या देशात तयार करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील नद्या, सरोवर, रस्ते, परिसर, बाजारपेठा, नागरि वसाहती ह्या स्वच्छ व सुंदर आहेत. आपल्याकडेही त्याचप्रमाणे सार्वजनिक व घरेलू स्वच्छता होण्यासाठी तसे संस्कार व सवय स्वत:सह इतरांनी अंगिकारणे आवश्यक आहे. स्वच्छता ही सेवा या मोहिमेत सर्वांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी सांगितले.

 

            ‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’बाबत श्री. मस्के यांनी यावेळी प्रास्ताविकातून माहिती दिली. वर्ष 2017 पासून स्वच्छतेच्या पंधरवड्याला सर्वत्र सुरुवात झाली आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही यावेळेची थीम असून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात येणार आहे. दि. 17 सप्टेंबर म्हणजे आजपासून या पंधरवड्याचा शुभारंभ होत आहे. प्लॉस्टीक कचऱ्याचे व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट करताना घ्यावयाची काळजी व त्याचा पुनर्वापर, सुर्याच्या अतीनिल किरणापासून बचाव होण्यासाठी कार्बनडायऑक्साईड वायूचे उत्सर्जन कमी करणे, ग्लोबल वार्मिंगबाबत जनजागृती करणे, टाकावू पासून टिकावू आदी महत्वपूर्ण घटकांसंबंधी जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपले घर, कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शंभर तास द्यावेत. तसेच संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छतेचा वसा कायमरित्या टिकवावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

             ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती श्रीमती वंजारी यांनी यावेळी दिली. या मोहिमे अंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत कार्यालय व परिसर स्वच्छ करावयाचे असून टाकावू पासून टिकावू या संकल्पनेवर आधारित कचऱ्यापासून विविध वस्तूंची निर्मिती करावयाची आहे. निर्माण केलेल्या वस्तूंचे 1 ऑक्टोबरला प्रदर्शन लावण्यात येणार असून त्यातील विजेत्यांना 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी ‘सेल्फी विथ थैला’ ही संकल्पना सुध्दा राबविण्यात येणार, अशी माहिती श्रीमती वंजारी यांनी यावेळी दिली.

 

            दररोज विभागीय आयुक्त कार्यालय व परिसर स्वच्छ करणाऱ्या महिला-पुरुष स्वच्छताकर्मींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव यावेळी करण्यात आला. दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करुन स्वच्छतेचा संकल्प पूर्ण करण्याबाबतची ‘स्वच्छतेची शपथ’ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमानंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसराची स्वच्छता करुन श्रमदान केले.

00000

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा