मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

वैयक्तिक व्यवस्थापन व सेवा देखभाल संदर्भात वित्त विभागाची भूमिका महत्वपूर्ण -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





वैयक्तिक व्यवस्थापन व सेवा देखभाल संदर्भात

वित्त विभागाची भूमिका महत्वपूर्ण

                         -जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 31 : अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक व्यवस्थापन तसेच वेतन, भत्ते व प्रदानेंची  अदायगी आदी सेवा विषयक महत्वाचे कामकाज लेखा व कोषागारे विभागाव्दारे पार पाडल्या जात असल्यामुळे वित्त विभागाची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

 प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी-2), नागपूर व वरिष्ठ कोषागार अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शुक्रवारी (ता. 30 ऑगस्ट) रोजी आयोजित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची कार्यशाळा व पेंशन अदालतीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, लेखा व कोषागारे सहसंचालक प्रिया तेलगोटे, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, कोषागार अधिकारी अमोल ईखे, प्रदीप भुयार, महालेखाकार विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी आर.वाय. शेलुकर, सहाय्यक लेखाधिकारी विनय गजभिये, लेखापाल रंजनकुमार सिंग आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. कटियार म्हणाले की, वित्त विभागाच्या अधिनस्त असलेल्या लेखा व कोषागारे विभागाव्दारे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी तसेच कार्यालयाचे आर्थिक व्यवहाराबाबतचे कामकाज हे अधिक पारदर्शक व गतीने होत आहे. वेतन, भत्ते व इतर प्रदाने या सेवा विषयक बाबींचे ऑनलाईन बिलींग पध्दती अवलंबविल्यामुळे प्रत्येक गोष्टीची नोंद होण्यासह गतीने कामे होत आहे. कर्मचाऱ्यांनीही नवीन तंत्रज्ञान अवलंबविताना त्याबाबत नकारार्थी न राहता त्याचा स्वखुशीने स्विकार करुन उपयोग आणावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

            व्हीपीडीए (आभासी स्वियप्रपंजी लेखा कार्यपध्दती) या ई प्रणालीमुळे एकंदरीत वसूलीच्या रकमा ऑनलाईन पध्दतीने महसूल जमा होत असून त्यात पारदर्शकता आली  आहे. डीबीटी व बीडीएस प्रणालीमुळे वित्तीय अनियमिततेवर नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले आहे. यामुळे आर्थिक व्यवहारात मानवी हस्तक्षेप टाळता आला आहे. ई- पीपीओ, ई सीपीओ, ई जीपीओ या ई प्रणालीमुळे निवृत्तीधारकांचे निवृत्तीवेतन, उपदान तसेच इतर प्रदाने यासंबंधीचे कामकाज गतीने पूर्ण होत आहे, असे महापालिका आयुक्त श्री. कलंत्रे यांनी यावेळी सांगितले.

            श्रीमती तेलगोटे म्हणाल्या की, शासकीय कार्यालयातील अनुदान प्राप्ती, वितरण, बीडीएस काढणे आदी वित्तीय बाबी पूर्ण करताना आहरण व संवितरण अधिकाऱ्याची भूमिका महत्वाची आहे. वित्तीय खर्चावर नियंत्रण व देखभाल ठेवणे ही कामे त्यांच्यामार्फत होत असते. शासकीय कार्यालयाच्या खर्चावर वित्तीय नियंत्रण  ठेवण्यासाठी विविध ई प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत. वित्तीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन डीडीओंना मिळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

             व्हीपीडीए (व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट) सारख्या ई-प्रणालीच्या माध्यमातून विभाग स्तरावरील अखर्चित निधी शासनाला परत करणे सोयीचे झाले आहे. यामुळे अशा खात्यांचे लेखांकन, कॅशबुक नोंदी तसेच प्रदाने करणे सोयीचे झाले आहे. बीडीएस, सेवार्थ, ई कुबेर व ई बील प्रणालीमुळे कार्यालयीन बिलांचे ऑनलाईन जनरेशन तसेच नोंदी अचूक होऊन बील पास लवकर होत आहे, असे श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले.

            नागपूर महालेखाकार कार्यालयाचे वरिष्ठ लेखाधिकारी श्री. शेलुकर यांनी निवृत्तीवेतन, पेंशन, उपदान यााबाबत विभागाव्दारे निर्मित करण्यात आलेल्या ई पीपीओ, सी पीपीओ, जी पीपीओ या पेंशन संदर्भातील ई प्रणालींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महालेखाकार कार्यालयाव्दारे निवृत्तीवेतनधारकांसाठी विकसित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधा संकेतस्थळ, मदत कक्षा विषयी त्यांनी माहिती दिली. पेंशन अदालतीमध्ये निवृत्तीवेतन धारकांच्या विविध शंका व अडचणींचे निराकरणाबाबत श्री. गजभिये व श्री. सिंग यांनी मार्गदर्शन केले. सन -2005 पूर्वी शासकीय नोकरीत लागलेल्या कर्मचाऱ्या संदर्भात त्यांचे डिसीपीएस /एनपीएस मधून जीपीएफमध्ये रुपांतर त्यानुषंगाने पेंशन लाभाविषयी कोषागार अधिकारी श्री. ईखे, श्री. भुयार, श्री अजय काकडे यांनी सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले.

            या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी तसेच लेखा विषयक कामकाज सांभाळणारे लिपीक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा