शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५
‘जागतिक महिला दिनानिमित्त’ 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत
‘जागतिक महिला दिनानिमित्त’
'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास', कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची मुलाखत
मुंबई दि. 28: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात 'जागतिक महिला दिनानिमित्त' महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 6, शुक्रवार दि. 7, शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालय समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.
एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
समाजाच्या विकासात महिलांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. महिलांना समान हक्क मिळणे तसेच त्यांच्या अधिकारांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिवस' जगभरात साजरा केला जातो. याअनुषंगानेच महिला सबलीकरण, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली शासन सातत्याने प्रयत्न करित आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' या आणि अशा अनेक योजना, धोरणात्मक निर्णय आणि विविध उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येत आहेत. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजना आणि निर्णयांबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी 'जय महाराष्ट्र' आणि 'दिलखुलास' कार्यक्रमात माहिती दिली आहे.
ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी फिनटेक, ‘एआय’ स्टार्टअपला गती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · मुंबई टेक वीक 2025 चे उद्घाटन · व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि नॉलेज ‘एआय’ हब संदर्भात सामंजस्य करार · उद्योजक संग्रहालय संग्रहालयाची स्थापना करणार · ‘एनसीसीआय’ला जागतिक मुख्यालय उभारणीसाठी भूखंड प्रदान
ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी फिनटेक, ‘एआय’ स्टार्टअपला गती
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· मुंबई टेक वीक 2025 चे उद्घाटन
· व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि नॉलेज ‘एआय’ हब संदर्भात सामंजस्य करार
· उद्योजक संग्रहालय संग्रहालयाची स्थापना करणार
· ‘एनसीसीआय’ला जागतिक मुख्यालय उभारणीसाठी भूखंड प्रदान
मुंबई, दि. 28 : फिनटेक आणि ‘एआय’ क्षेत्रातील स्टार्टअप्सला गती देण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून देशात महाराष्ट्र राज्य स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. जेव्हा आपण ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहतो, तेव्हा तंत्रज्ञान हा विकासाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बीकेसी येथे मुंबई टेक वीक 2025 चा शुभारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जियो कन्वेंशन सेंटर येथे मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. एम.एम.आर.डी.ए.ने एन.पी.सी.आय.ला मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या जागतिक मुख्यालयाच्या उभारणीसाठी भूखंड प्रदान केला. आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि मेटा यांच्यामध्ये तसेच कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. त्याचबरोबर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक संग्रहालयाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वॉररूममुळे प्रकल्पांच्या निर्णय प्रक्रियेला वेग मिळला आहे. पूर्वी मुंबईत एखादा प्रकल्प सुरू करण्यासाठी 18 विविध सरकारी यंत्रणांची परवानगी घ्यावी लागायची, त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. वॉररूमच्या माध्यमातून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणून त्वरित निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामुळे मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यासारख्या प्रकल्पांना गती मिळाली, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर हा प्रकल्प एकंदरीतच राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हे बंदर सध्याच्या जे.एन.पी.टी. पेक्षा तीनपट मोठे असून, 20 मीटर खोल असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर परिसरात एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील. विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा आणि गोदावरी नदीजोड प्रकल्प हाती घेतले जात आहेत. या प्रकल्पांमुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेती उत्पादन वाढणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना
राज्यातील सायबर सुरक्षा उपाययोजना संदर्भात श्री.फडणवीस म्हणाले की, जगभरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. भविष्यात 70% गुन्हे हे सायबर गुन्हे असतील. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भारतातील सर्वात आधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारले आहे. सर्व बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 2000 ते 2014 दरम्यान महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गुंतवणूक कमी झाल्यामुळे अनेक आयटी कंपन्या बंगळुरू आणि हैदराबादकडे वळल्या. मात्र, अटल सेतूसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबई आता एक नवे तंत्रज्ञान केंद्र बनत आहे. मुंबईच्या भविष्यातील विकास आराखड्यावर भाष्य करताना श्री.फडणवीस यांनी सांगितले की, आजच्या मुंबईत व्यावसायिक जागांची कमतरता असल्यामुळे नवी मुंबई, नवीन ठाणे आणि वाढवण येथे नवीन शहरे उभारली जाणार आहे. त्यामुळे उद्योगांना अधिक जागा उपलब्ध होईल आणि मुंबईवरील भार कमी होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५
अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी 28 मोबाईल लॅब - मंत्री नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचा विभागीय आढावा
अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी 28 मोबाईल लॅब
- मंत्री नरहरी झिरवाळ
अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागाचा विभागीय आढावा
अमरावती, दि. 27 : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी अमरावती विभागात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादेत करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिले.
श्री. झिरवाळ यांनी आज अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर आयुक्त रामदास सिद्धभट्टी, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहआयुक्त सचिन केदारे, मिलिंद काळेश्वरकर, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रमोद पाटील, देवानंद वीर, गजानन हिरके, तहसीलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा काकडे उपस्थित होते.
श्री. झिरवाळ म्हणाले, अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी लवकरच मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाची तपासणी करण्यास गती येईल. अन्न प्रशासन विभागाने अन्न परवाना आणि नोंदणीची तपासणी करावी. औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा वेळोवेळी तपासावा. त्यासोबतच दुधातील भेसळ रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात. दुधाच्या गुणवत्तेचे निकष ठरविण्यासाठी पशुपालकांकडील दुधाचे नमुने तपासण्यात यावे. पशुपालक ते दुधाची विक्री या साखळीमध्ये भेसळ होत असल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करावी. जनावरांच्या चाऱ्यातील विविधता तपासावी. चाऱ्यामुळे दुधातील स्निग्धतेच्या प्रमाणात फरक पडत असल्यास उत्कृष्ट चाऱ्याच्या लागवडीवर भर देण्यात यावा. दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी. अन्न सुरक्षेसाठी अंगणवाडी सेविका, तसेच शाळेत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना फोस्टॅक या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या वसतिगृहांना 'हायजिन रेटिंग' प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्हा शासकीय रुग्णालय व पीडीएमसी, तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरांमध्ये ‘इट राईट कॅम्पस’ दर्जा मिळवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. सौंदर्य प्रसाधनात वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या दर्जा तपासणीवर भर द्यावा. दैनंदिन वापरात असणाऱ्या महिलांच्या टिकल्या व धार्मिक कार्यात वापरण्यात येणारे कुंकू यांची गुणवत्ता योग्य राखली जाईल याची दक्षता घ्यावी. यासंदर्भातील उपायोजनांबाबत त्वरीत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
समाज कल्याण विभागाने लाभार्थ्यांना थेट लाभ पोहोचवताना येणाऱ्या अडचणींवर त्वरीत कार्यवाही करावी. लाभार्थ्यांच्या मोबाईल आधारकार्डशी लिंक झाले नाहीत, यातील अडचणी तपासून लाभ मिळवून द्यावा. तसेच पारधी समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'पारधी कॅम्प' आयोजित करावा. विविध संस्थांच्या मदतीने पारधी वस्तीमध्ये जनजागृती करावी असे निर्देश दिले.
मंत्री श्री. झिरवाळ यांनी बडनेरा येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
00000
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान नागपूरच्या बुटीबोरी येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन क्षेत्रात १ हजार ७४० कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली.
‘ह्युसंग कंपनी नागपूरच्या बुटीबोरी येथे नवीन अध्याय सुरू करत असून, कंपनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर सोबतच आता नागपुरात आपल्या कार्याचा विस्तार करत असल्याचे पाहून आनंद होत आहे. महाराष्ट्रात यापुढेही अनेक प्रकल्प गुंतवणूकीसाठी पुढे येत राहतील, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य करार प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, ह्युसंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी इयान ली, वरिष्ठ सल्लागार कॅप्टन शिवाजी महाडकर, संचालक मनोजित साह, उपव्यवस्थापक नीरज हांडा उपस्थित होते.
'दिलखुलास' कार्यक्रमात संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखत
'दिलखुलास' कार्यक्रमात संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखत
मुंबई दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'फलोत्पादन विभागाच्या योजना व अंमलबजावणी' या विषयावर फलोत्पादन विभागाचे संचालक, डॉ. कैलास मोते, यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 1, सोमवार दि. 3, मंगळवार दि. 4 आणि बुधवार दि.5 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात कृषि क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विविध फळपिके, भाजीपाला यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ झाली आहे. ही उत्पादने नाशवंत असून त्यांची तात्काळ विक्री होणे आवश्यक असते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तसेच ग्राहकांनाही वाजवी दरात शेतीमाल उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्याला फलोत्पादन क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. मोते यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात माहिती दिली आहे.
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५
#ऐतिहासिक_निर्णय
#ऐतिहासिक_निर्णय
#अनादी_मी_अनंत_मी अवध्य मी भला, मारिला रिपू जगति असा कवण जन्मला…..!
या स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी लिहिलेल्या #मराठी प्रेरणा गीतास यंदाचा #छत्रपती_संभाजी_महाराज_महाराष्ट्र_प्रेरणा_गीत पुरस्कार जाहीर ! 🏆
▶️ पुरस्कार स्वरुप : दोन लाख रुपये, मानपत्र
रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५
विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे
विद्यार्थ्यांनी पारंगत होऊन समाजाच्या विकासासाठी कार्यरत रहावे
-राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन
* दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा
* मुलींच्या वसतीगृहाचे भूमिपूजन
अमरावती, दि. २३ : पदवी पूर्ण होणे ही विद्यार्थ्याच्या आयुष्याची सुरुवात आहे. पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांनी जगभरातील ज्ञानशाखांमध्ये पारंगत होऊन संपादन करावे. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा, तसेच राष्ट्र निर्माणासाठी अविरत कार्यरत रहावे, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 41वा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आदी उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी, विद्यापीठ स्थापनेपासून विद्यार्थ्यांना परवडणारे उच्च शिक्षण देत आहे. दर्जेदार शिक्षण देऊन विद्यापीठाने नागरिकांचे जीवनमान बदलण्यात आणि संपूर्ण प्रदेशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता विद्यापीठाने पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स या प्रगत क्षेत्राचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील गुणवत्तेसोबतच खेळामध्येही प्राविण्य मिळवावे. आजच्या घडीला खेळाडू सर्वांधिक मानधन घेत आहेत. त्यामुळे खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणासाठी पाठिंबा देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवावेत.
केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मराठी भाषेतून विपूल लेखन आणि उपदेश केले आहे. मातृभाषा ही प्रत्येकाच्या हृदयस्थानी असते. त्यामुळे भाषेला अभिजात दर्जा मिळणे गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनीही जगातील विविध भाषा शिकून प्रगती करावी. भाषेसोबतच विविध बोलींचा अभ्यास आणि तिचे जतन करावे. त्यासोबतच इतर भाषांमधील ज्ञान मराठीत भाषांतरित केल्यास त्याचा सामान्यांना फायदा होईल. भाषेसोबतच विद्यापीठाने उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील असे अभ्यासक्रम तयार करावेत. स्टार्टअप इकोसिस्टम आणि इनक्युबेशन केंद्रांमुळे स्थानिक उद्योगांना पुरक वातावरण तयार होईल. उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने संशोधन आणि विकासासाठी सहकार्य करावे. रोजगारक्षम मनुष्यबळ तयार करताना काम आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोनही येणे गरजेचे आहे. या सर्व प्रयत्नांतून प्रधानमंत्र्यांचे 2047मधील विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार होईल.
न्यायमुर्ती श्री. गवई म्हणाले, जिल्ह्याला संतांची महान परंपरा लाभली आहे. त्यांनी समाजाचे प्रबोधन करून मत परिवर्तन केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. आजच्या काळात शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती बाळगून शिक्षणातून प्रगती करावी, तसेच शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा. आत्मसात केलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून नवा भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीवर आहे. सक्षम विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी विद्यापिठाने ओळखून कार्य करावे. सर्वदूर आणि सर्वस्तरातील घटकांना शिक्षण मिळावे, यासाठी विद्यापीठाने कार्य करावे. प्रामुख्याने ग्रामीण विकास मोहिम राबवून ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यास मदत करावी. विद्यार्थ्यांनीही समाजाच्या विकासासाठी अविरत संघर्ष करून अभावग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींच्या वसतीगृह आणि विस्तारीत इमारतीचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. बारहाते यांनी स्वागतपर भाषण केले. तसेच अहवालाचे वाचन केले. सुरवातीला राज्यपाल यांना राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. दीक्षांत समारंभात शितल पांडव, निकिता देवचे, अनिकेत पांडे, राधा चमेडिया, हर्षाली हटवार, उत्कर्षा वानरे, धनश्री सरकळे, लक्ष्मी चौधरी, प्राची बोरगावकर, शेख इक्रा अदीबा मोहमंद मुश्ताक यांचा सत्कार करण्यात आला.
000000
शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे विमानतळावर स्वागत
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे विमानतळावर स्वागत
अमरावती, दि. २३ : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक डॉ. अजय लाड आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राज्यपाल समवेत राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ए.डी.सी. अभयसिंह देशमुख यांचेही आगमन झाले.
यावेळी राज्यपाल महोदयांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
0000000
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५
मराठी साहित्य संमेलनांची समृद्ध परंपरा
मराठी साहित्य संमेलनांची समृद्ध परंपरा
साहित्य हे ललित कलांमधील अतिशय महत्त्वाचे निर्मितीमाध्यम होय. साहित्याचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजाचे प्रतिबिंब जसे त्यात उमटत असते, तसेच व्यक्ती आणि समाजाच्या भावना आणि विचारांना वळण देण्याचे कार्यही साहित्य निर्विवादपणे करीत असते. एकप्रकारे साहित्याने आजवर मानवी समाजाचे अंतरंगच अभिव्यक्त केले आहे. विवेक आणि विकारांच्या नाना तऱ्हा आणि त्यांचे कालपरत्वे बदलते संदर्भ साहित्याने अधोरेखित केले आहेत. त्यामुळेच मानवी सभ्यता अनेक पातळ्यांवर अधिक परिणामकारक बनली. मराठी साहित्य संस्कृतीची आजवरची परंपराही यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची एक समृद्ध परंपरा आहे. अलीकडेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. भारतीय भाषांमध्ये आजवर संस्कृत, तामीळ, मल्याळम, कानडी, तेलगू आणि उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. मराठी भाषेची प्रदीर्घ परंपरा असल्याचे अनेक पुरावे रंगनाथ पठारे समितीने केंद्र सरकारकडे सादर केले होते. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यात पुढाकार घेतला आणि तिचे अभिजातपण शिक्कामोर्तब केले, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
मराठी साहित्याची पायाभरणी ही चक्रधर स्वामी आणि एकूण महानुभव साहित्यिक आणि संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, मुक्ताबाई, संत तुकाराम, संत चोखाबा आणि त्यांचा परिवार इत्यादींच्या लेखनातून झाली. या साहित्यातूनच व मराठी भाषेतून खरे म्हणजे वैश्विकता अभिव्यक्त होत आली आहे. सर्व भेदाभेदांना अमंगळ ठरवून विश्वाच्या कल्याणासाठीचे 'पसायदान' मराठी भाषेतून अभिव्यक्त झाले आहे. तसेच कवी नरेंद्र आणि इतर अनेक कवींच्या कवितेतून मराठी बाणेदारपणाही व्यक्त झाला आहे.
मध्ययुगीन, आधुनिक आणि समकाळात विविध प्रकारे मराठीमधून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, कौंटुबिक जाणिवांची अभिव्यक्ती होत आली आहे. शिवाय वर्गीय, वर्णीय, लिंग जाणिवांसोबत परिघाबाहेरील व आदिम ठरवल्या गेलेल्या समुहजाणिवा देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्णतेने मराठी साहित्यात प्रतिबिंबित झाल्या आहेत. प्राचीन परंपरा कवेत घेत जागतिकीकरणकरणाचा वेध घेत मराठी साहित्य समृद्ध अशी वाटचाल करीत आहे. या परंपरेविषयी निश्चितच आपल्या अभिमान आहे.
आज बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा उच्चरवाने उद्घोष सुरू असतानाच जगाच्या विविध भागांमधील अनेक भाषा मृतप्राय ठरत आहेत. तर काहींची स्थिती चिंताजनक असल्याचे अनेक अभ्यास पुढे येत आहेत. अशा काळात भाषांचा गौरव, मातृभाषांविषयीची जबाबदारी अशा बाबींना प्रकर्षाने महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थात आपल्या भाषेविषयी आदर आणि अभिमान बाळगत असतानाच तिच्या अस्तित्त्वाबाबत आणि भवितव्याबाबतची सजगता बाळगून भविष्यवेधी कृतिशील क्रिया-प्रक्रियांना वेग आणणे, ही त्या त्या भाषेतील साहित्यिक, भाषा अभ्यासक आणि पर्यायाने एकूणच संपूर्ण भाषिक समाजाची जबाबदारी असते. त्यादृष्टीने जे विविध प्रयोग आणि कृती करावयाच्या असतात. त्याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षांपासून संपन्न होणारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने होत.
या संमेलनाची सुरुवात १८७८ सालापासून झाली.आजवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून ९८ वे संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी,२०२५ या कालावधीत दिल्ली येथे संपन्न होणार आहे. संत साहित्य, नाट्यशास्त्र आणि लोकसाहित्य या विषयांच्या गाढ्या अभ्यासक असणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. विविध चर्चासत्रांतून अनेक मान्यवर साहित्यिक सहभागी होणार आहेत. विविध आयामांनी दिल्ली - महाराष्ट्राचे नाते अधोरेखित केले जाणार आहे.
एकूणच मराठी साहित्याच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकता मराठी भाषिक समाजातील पूर्व परंपरा, देशीयता आणि वास्तवाचे संदर्भ अभिव्यक्त होत असतातच जागतिक पातळीवर बदलत चालेलेल्या वैश्विक जाणिवांना सुद्धा व्यक्त करणे आवश्यक असते. शिवाय जागतिकीकरणाच्या काळात प्रदेशाच्या सीमा रेषा गळून पडल्या असून मराठी भाषिक व्यक्ती विविध राज्यांत आणि विविध देशात आज आपले शौर्य, पराक्रम आणि कर्तृत्व गाजवत आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा पार्श्वभूमीवर दिल्ली येथे संमेलन आयोजित होत आहे,ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. संमेलनांच्या माध्यमातून तेथील मराठी भाषिक समूहाला आपलेपणाची अनुभूती देणे, त्यांच्या भावविश्वाला आणि विचार विश्वाला साद घालणे, हे महत्त्वाचे कार्य साध्य करता येणार आहे. त्यांची आव्हाने समजून घेत त्यांना आपले अनुभव व्यक्त करण्यास प्रेरणा व संधी उपलब्ध करून देणे, हे देखील अशा संमेलनातून शक्य होणार आहे. विविध चर्चासत्र, कविसंमेलन या माध्यमातून अभिव्यक्त करण्यास एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. महाराष्ट्राबाहेर राज्यात संमेलन आयोजित होत असताना त्या राज्यातील भाषेतील साहित्यिक विविध प्रवाहांमध्ये नेमके काय लिहीत आहेत, मराठी व इतर भाषेतील साहित्य अभिव्यक्तीत कुठली समानता वा न उमटलेल्या बाबी जाणवतात का? किंवा कुठले भाषिक प्रयोग सुरू आहेत, यांबाबत देखील चर्चा अपेक्षित आहे. त्यातून साहित्यिक मूल्य आणि प्रतिभा यांवरही चर्चा करता येण्यास वाव मिळू शकतो, असे वाटते.
मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आज विविध साहित्य प्रकारात उत्तम लेखन होत आहे. महाराष्ट्रातील जीवन जाणिवा त्यातून प्रकर्षाने व्यक्त होत आहेत. काही साहित्यकृती त्या पलीकडील अनुभवविश्वसुद्धा अभिव्यक्त करीत आहेत. मात्र, अद्यापही वैश्विक पटलावर सर्वांना आपलेपणाचा अनुभव देणारी, वैश्विक जाणिवा व्यक्त करण्यासाठी लिहित्या लोकांना भरपूर अवकाश खुला आहे, हे भान निश्चितच मराठी लेखकांना येण्यास मदत होईल, असे प्रकर्षाने वाटते.
रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी ज्या प्रकारचा अवकाश आणि चिंतन मांडते, ते आजच्या काळात महत्त्वाचे आहे. विविध सामाजिक ओळखींमध्ये स्वत:चे अस्तित्त्व शोधून व्यक्ती आपल्या मानवी सभ्यतेच्या विशालपटाकडे नजरअंदाज करतो. त्याच्या सर्व अस्मिताकेंद्री आविर्भावाच्या पलीकडे जाऊन त्याने विचार केला तर माणसाला दुसऱ्या माणसाशी आपले असणारे अतूट नाते जोडता येऊ शकते, याची एक जाणीव ही कादंबरी व्यक्त करते. वृथा अभिमानाच्या पलीकडे असणारे माणूसपणाचे दर्शन घडवते. या कादंबरीतील समाज-संस्कृतीतील संदर्भ वगळून सुद्धा आपल्याला त्यातील वैश्विक जाणिवा जाणवतात. वर्तमान काळातील व्यक्तीच्या अस्तित्त्वाचे विविध संदर्भ हे मर्यादित न राहता वैश्विक मानवी सभ्यता आणि संघर्षाचे नाट्यरूप अभिव्यक्त करत असल्याची जाणीव विविध साहित्यातून होत असल्याची चर्चा या संमेलनाच्या निमित्ताने निश्चित होईल.
मात्र, तरीही मराठीतील साहित्यिक अभिव्यक्तीला समकालीन बदलांचे संदर्भ टिपण्यात अद्यापही मर्यादा असल्याचे नोंदविणे गरजेचे वाटते.जागतिक बाजारपेठ, विज्ञान-तंत्रज्ञान, सांस्कृतिक बहुविधता अशा अनेक पातळ्यांवर बदल होत आहेत. त्याचा अनुभव अलीकडील पिढी घेत आहे. मात्र त्याचे प्रभावी चित्रण मराठी साहित्यातून अद्याप फारसे आलेले नाही. त्यांच्या जीवनानुभवांना भिडेल असे साहित्य निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तरच मराठी साहित्य या नव्या पिढीला आपलेसे वाटेल. शिवाय ते जेव्हा अन्य भाषांमध्ये जाईल तेव्हा इतरांही त्यात आपले माणूसपण सापडेल.
आशिया खंडातील जपान आणि दक्षिण कोरिया ज्या प्रकारे आपले दर्जेदार साहित्य इंग्रजीमध्ये नेण्यासाठी विशेष काळजी आणि कष्ट घेतात, त्याप्रमाणे मराठीतील साहित्य जागतिक पातळीवर जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे. अलीकडे दक्षिण कोरियातील हान कांग यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या कादंबऱ्या महत्त्वाच्या आणि दर्जेदार आहेतच पण सोबत त्यांच्या देशातून भाषांतरावर देण्यात येणारा भर देखील महत्त्वाचा आहे. म्हणून मराठीतील साहित्याची गुणवत्ता अधिक परिणामकारक करणे, त्यातून वैश्विकता अभिव्यक्त करणे हे जसे साहित्यिकांचे काम आहे, तसेच त्यांचे साहित्य जागतिक पटलावर भाषांतरांद्वारे सहज उपलब्ध करून देण्यात समाज आणि राज्यसंस्थांचे कामही महत्त्वाचे आहे. साहित्यिकांना राजाश्रय मिळाला तर या बाबींना निश्चितच वेग येईल, असा विश्वास वाटतो. मात्र त्याबाबतीत उदासीनता आणि कूपमंडूकता आपल्याला ग्रासली आहे का, याबाबत मराठी भाषेचे चाहते म्हणून आपण चिंतीत होणे आवश्यक आहे.
जागतिक पातळीवर जे साहित्य वैश्विक जाणिवा व्यक्त करते, त्यातील बरेच साहित्य हे संबंधित लेखकांनी आयुष्यभर केलेल्या साधनेचे फळ आहे. बरेच साहित्यिक कमी लिहितात. ज्या विषयवर लिहायचे आहे, त्याविषयावर सखोल अभ्यास करतात, चिंतन करतात. नोट्स काढतात. अनुभव घेतात. निरीक्षण करतात. केवळ प्रतिभा आहे म्हणून एकटाकी लिहित नाही. प्रतिभेसोबत अभ्यास आणि सरावसुद्धा साहित्यात महत्त्वाचा आहे. प्रतिभेच्या लहरीवर लेखन करून ते थांबत नाहीत. प्रतिभा जेवढी महत्त्वाची तेवढीच साधनासुद्धा महत्त्वाची असते. त्यादृष्टीने मराठी साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून वैश्विक जाणिवा अभिव्यक्त करण्यासाठी वेळ द्यावा, अभ्यास करावा, हे आवश्यक आहे.
मराठी साहित्यात यादृष्टीने बदल होण्याची आवश्यकता जशी आहे, तशीच भाषेचा आलेल्या नवनव्या माध्यमांमधून आणि नवनवीन प्रयोगांतून अभिव्यक्ती सशक्त करणे देखील आवश्यक आहे.
तंत्रज्ञान विकासाच्या गती बरोबर आपल्या भाषेला साजेसे अद्ययावत तंत्रज्ञानाकुल करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठीचे गंभीर प्रयत्न फारसे सुरू नाहीत. मराठी भाषिक आज जगभरात विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्वतःच्या उद्योग व्यवसायात सहभागी आहेत. मात्र ते सुद्धा भाषिक जबाबदारी विसरून जात आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आपल्या ज्ञान कौशल्याचा स्वत:च्या मातृभाषेसाठी उपयोग त्यांनी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. भाषेच्या आणि साहित्याच्या विकासाची जबाबदारी ही केवळ साहित्यिकांची नाही. त्यांनाच त्याचा कंत्राट दिला आहे, असे समजून इतर मराठी जण आपल्या भौतिक संपन्नतेसाठी स्पर्धात्मक जीवनाची कास पकडून भाषिक जोखीम टाळून जे बेजबाबदारपणे वागतात, आणि केवळ साहित्यिकांकडून अपेक्षा ठेवतात, ते योग्य वाटत नाही. करिता प्रत्येक मराठी भाषिकाने आपला भौतिक विकास करण्यासोबत आपल्या ज्ञान कौशल्यांचा, उपलब्ध साधनांचा आपल्या भाषेसाठी उपयोग करणे, तोही जाणीवपूर्वक नि अत्यावश्यक असल्याचे जाणवते.
भाषा शिक्षणाबाबत आणि भाषेचा वारसा पुढील पिढीत जाण्याबाबत आपण सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ‘शिवाजी महाराज जन्माला यावेत, मात्र ते दुसऱ्यांच्या घरात’, अशी जी वृत्ती वाढत आहे, ती आपल्या भाषेच्या स्वाभिमानाबाबत आणि त्याबाबतच्या आपल्या पोटतिडकीबाबतही खरी म्हणावी अशी आपली स्थिती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मराठी भाषिक नव्या पिढीने नव्या जगात वावरताना आपल्याला भाषिक वारशात सर्व काही परिपूर्ण तयार बाबी मिळाव्यात, अशा अपेक्षा ठेवणे सुद्धा फारसे योग्य वाटत नाही. त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील वेळ आणि श्रम देऊन भाषेला जपले पाहिजे. तिचे पोषण नवीन पर्यावरणात केले पाहिजे. आपल्या भाषेच्या गौरवशाली इतिहासाचे कथन करण्यापेक्षा नव्या भाषिक आव्हानांमध्ये त्यांची स्थिती ओळखून स्वकष्टाने तिला घडवले पाहिजे.
समाजमाध्यमे आणि इतर अन्य प्रकारांमध्ये नवथर तरुणाईला रुचेल, पचेल, झेपेल अशा स्वरुपात भाषिक उपयोग करण्यासाठी लेखन केले जावे. त्यादृष्टीने नवनवीन प्रयोग केले जावेत. त्यासाठी हे साधने हाताळणाऱ्या तरुणाईने पुढकार घेऊन अभिव्यक्ती करावी. जुन्या पिढीने अशा नव्या पिढीतील प्रयत्नांकडे सकरात्मक प्रतिसादातून बघितले पाहिजे. त्यासाठी स्वत:ची सत्तास्थाने सोडून नव्या पिढीला मुक्त अवकाश उपलब्ध दिला पाहिजे.
मराठी साहित्य, चित्रपट, संगीत इत्यादींमधून काही चांगले प्रयत्न खचितच होत आहेत, मात्र तरीही त्यांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. मराठीतील लिहिणारी नवी पिढी आता जागतिक आहे. त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल आणि समृद्धच असणार आहे, याची खात्री वाटते. त्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची पायाभरणी करणारीच म्हणावी लागतील. संमेलनातून भाषेच्या विकासाबाबत व तिला ज्ञानभाषेत परिवर्तित करण्याबाबत या व विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या विविध मराठी साहित्य संमेलनातून चर्चा व्हावी आणि मराठी भाषिक समुहाला प्रेरणा मिळून त्याचे कार्यकृतींमध्ये परिवर्तन घडावे, ही अपेक्षा आहे.
ज्ञानदेव साहित्याचे अंतिम ध्येय अधोरेखित करताना मायमराठीला आशीर्वाद मागतात....
म्हणोनि अंबे श्रीमंते | निज जनकल्पलते |
आज्ञापी माते | ग्रंथनिरुपणीं |
नवरसीं भरवी सागर | करवी उचित रत्नांचे आगर|
भावार्थाचे गिरिवर | निपजवी माये|
साहित्यसोनियाचिया खाणी | उघडवी देशियेचिया क्षोणी|
विवेकवल्लीची लावणी | हों देइ सैंघ ||
संवाद फळनिधानें | प्रमेयाची उद्यानें |
लावी म्हणे गहनें | निरंतर ||
पाखांडाचे दरकुटे | मोडी वाग्वाद अव्हांटे|
कुतर्कांची दुष्टे | सावजे फेडी ||
ये म-हाटीचिये नगरीं | ब्रह्मविद्येचा सुकाळ करी|
घेणें देणें सुखचि वरी| होतं देई या जगा ||
आपल्या देशाचे जबाबदार नागरिक होण्याला उपयुक्त अशा भावार्थ विषयांना अत्यंत रसाळपणे आपल्या साहित्यकलेने लोकांसमोर ठेवण्याचा अट्टाहास बाळगाणाऱ्या ज्ञानदेवांची अभिलाषा सर्व साहित्यिकांना लाभो आणि वाचकांनाही याच परतत्त्वाचा स्पर्श लाभो,ही ईश्वरचरणी प्रार्थना करते !
-डॉ सौ. मोना मिलिंद चिमोटे
भ्र.क्र. (९४२२१५५०८८)
प्राध्यापक व विभागप्रमुख तसेच
अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
(संकलन- विभागीय माहिती कार्यालय, अमरावती)
विभागीय आयुक्तालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
विभागीय आयुक्तालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
अमरावती, दि. 20: आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त श्र्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त संतोष कवडे, राजेंद्र फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५
माय मराठीला अभिजात दर्जा; भाषिक आणि वाड्:मयीन परंपरेचा मागोवा
माय मराठीला अभिजात दर्जा;
भाषिक आणि वाड्:मयीन परंपरेचा मागोवा
सुमारे अडीच हजार वर्षाचा समृद्ध वारसा लाभलेल्या मायमराठीचे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराया -
‘माझा मराठीचे बोलू कवतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।'
असे यथार्थ वर्णन करतात. विमलसुरीचे 'पौमचरियम', भद्रबाहुचे 'आवश्यक निर्युक्ती', कालिदासाचे 'शाकुंतल', प्रवरसेनाचे 'सेतुबंध,' शूद्रकाचे 'मृच्छकटिक' आणि 'पाणिनीच्या कालखंडापासूनचा मराठी भाषेच्या रुपकांचा समृद्ध इतिहास असलेल्या या भाषेच्या प्राचीनत्वाची आणि अभिजाततेची महती सांगावी तेवढी थोडीच आहे. इ.स.780 च्या सुमारास लिहिलेल्या उद्योतनसुरी यांच्या 'कुवलमाला ' ग्रंथातील मराठी माणसाचे वर्णन करणारी
‘दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य |
दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्ठे|’
अर्थात बळकट, ठेंगण्या, धडमुट, काळ्यासावळ्या रंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, सहनशील, कलहशील व ' दिण्णले' (दिले) 'गहिल्ले' (घेतले) असे बोलणाऱ्या मरहठ्यास त्याने पहिले ही मराठीची पाऊलखुण असो की इ.स.वि.सन 1116-17 सालची श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पायथ्याशी घडवलेल्या शिलालेखातील -
'श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले’
हा उल्लेख असो अथवा बाराव्या शतकातील मुकुंदराज स्वामी यांनी लिहिलेला विवेकसिंधु हा मराठी आद्य काव्यग्रंथ किंवा महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींचे शिष्य नागदेवाचार्य आणि म्हाईंभट्ट यांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेचा केलेला खणखणीत पुरस्कार या सगळ्यातून मराठीचा अभिजात, प्राचीन समृद्ध वारसा ठळकपणे अधोरेखित होतो. कोणतीही भाषा काही एकाएकी प्रगल्भ होत नाही. ती तशी होण्यासाठी प्रवाही असावी लागते, त्यासाठी अनेक शतकांचा कालखंड जावा लागतो. मराठीत आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ 'गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षे जुना आहे, शिवाय शेकडो शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे मराठीच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात.
मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असे नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे: पुढे कालिदास, म्हाईंभट्ट, नागदेवाचार्य, ज्ञानोबा-तुकारामांसह सर्व संत महात्म्यांनी मराठी भाषेला सुयोग्य वळणे दिली. त्यापुढे मराठीतील अनेक शब्दरत्नाकारांनी फारसी अरबी शब्दांचा मऱ्हाठीत मेळ घालून लिहिल्या गेलेल्या बखरींचा दस्तावेज, पोवाडे, लावण्या, लोकवाङ्मय आणि केशवसुतांनी फुंकलेली तुतारी असा मराठी भाषेचा बदलत गेलेला अविष्काराचा प्रवास प्रवाही व संपन्न राहिलेला आहे. अशा या प्रवाही मराठी साहित्यातील अनेक सारस्वतांनी आपल्या साहित्य साधनेतून, शब्दसामर्थ्यातून या भाषेला सजविले, फुलविले व मोठे करुन मराठीचा वेलू गगणावरी नेला.
यादरम्यान मराठी भाषकांच्या महाराष्ट्रात कैक राजवटी आल्या आणि गेल्या. समाज बदलला, जगणे बदलले त्याप्रमाने मराठीही बदलत गेली. रीत बदलली पण अभिजाततेचा पोत मात्र तोच राहिला आहे.
मुळातच जातिवंत अभिजाततेच्या बळावर हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा निर्माण करणारी मायमराठी तामीळ, संस्कृत, तेलगू, उन्नड, मल्याळम, उडिया या भाषांच्या बरोबरीने अभिजाततेच्या संगतीत व पंगतीत मागील वर्षापर्यंत बसली नव्हती. ही सल मराठीजणांच्या मनात कायम होती. यासाठी शासन, प्रशासन आणि भाषाप्रेमींच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरू होते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 10 जानेवारी 2012 रोजी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीत प्रा.पठारे यांच्या समवेत प्रा.हरी नरके व अन्य सन्माननिय सदस्य होते. समितीने 52 बोली भाषेपासून नटलेल्या मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करुन प्राचीन व अभिजाततेचे वस्तुनिष्ठ पुरावे गोळा केले. तसा अहवाल 12 जुलै 2013 रोजी साहित्य अकादमी आणि केंद्र सरकारला सादर केला, या समितीने आपल्या 500 पानी अहवालातून माय मराठीच्या अभिजातता आणि प्राचीनत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक गैरसमजाचे परिमार्जन केले.
हा अहवाल आणि मराठी भाषाप्रेमींच्या तीव्र मागणीची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्र सरकारने दिनांक 03 ऑक्टोंबर 2024 ला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. शासनस्तरावरून मायमराठी अभिजात असल्याची शिक्के कट्यारीसह मान्यता मिळाली.
अभिजाततेच्या कसोट्यांवर उतरलेल्या आतापर्यंत भारतातील मराठीसह (2024), तामिळ (सन 2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलगू (2008), मल्याळम (2013), उडिया (2014), पाली (2024), पाकृत (2024), आसामी (2024), बंगाली (2024) या 11 वैशिष्ट्यपूर्ण भाषांना अभिजाततेचा दर्जा केंद्र सरकारद्वारे दिला गेला आहे.
भाषेला जेव्हा अशा प्रकारचा दर्जा मिळतो, तेव्हा त्या भाषेची नुसती प्रतिष्ठाच वाढत नाही, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संबधित भाषेसंदर्भात अनेक अनुकूल दुरगामी परिणाम होतात. त्या भाषेच्या संवर्धनासाठी अधिक चालना मिळते. केंद्र सरकारकडून त्या भाषेच्या विकासकार्यासाठी त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. यातून मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन आणि साहित्य संग्रह प्रकाशित करणे, प्राचीन दुर्मीळ अभिजात ग्रंथ अनुवाद करणे, त्यांचे प्रकाशन करून प्रचार-प्रसार करणे, ग्रंथालयांना बळकट करणे, भाषेचा उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी यांना भरीव मदत करणे इत्यादी भाषासंवर्धनासाठीची कामे केली जातात. यामुळे सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
अभिजात भाषांच्या पंगतीत बसण्याचे रीतसर अहोभाग्य आपल्या मायमराठीला नुकतेच प्राप्त आले असले, तरी भाषा म्हणून मराठी ही अभिजात होती आणि आहेच. मराठीची ही अभिजातत्ता तोलामोलाने टिकून राहायला हवी असेल, तर तिच्या अभिवृद्धीचा गोवर्धन उचलून धरणे की आपल्या सगळ्या मराठी जणांची जबाबदारी आहे.
श्रीमती रुपाली उगे
लेखालिपिक,
माहिती व जनसंपर्क कार्यालय,
नागपूर
अभिजात मराठी आणि दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अभिजात मराठी आणि दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत होणार अशी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यात केली. यापूर्वी 1954 मध्ये 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. आता होऊ घातलेले संमेलन अनेकप्रकारे ऐतिहासिक आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ मिळाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर आता 70 वर्षांनी नवी दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीत संमेलन होणार अशी घोषणा झाल्यानंतर ‘यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा’ मिळणार आहे का?" याविषयी दोन्ही बाजूंनी चर्चा झडायला लागल्या आणि केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. याचे कारण काही का असेना, प्रा. रंगनाथ पठारे यांच्यासह अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती ती पूर्ण झाली. आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.
तसे पाहिले तर दिल्लीसह महाराष्ट्राबाहेर अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. इंदूर, ग्वाल्हेर, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, पणजी, बडोदे आणि घुमान ही ती शहरे. ही शहरे महाराष्ट्राबाहेर असली तरी या प्रत्येक शहराचा आणि मराठी माणसाचा, संस्कृतीचा अतिशय निकटचा संबंध आहे. शहाजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे मराठी दक्षिणेत गेली. शिवाजी महाराज, त्यांचे सरदार, पेशवे, विशेषतः पानीपतच्या युद्धासाठी अनेक मराठी माणसे उत्तरेत गेली आणि युद्धानंतर त्या भागातच थांबली. तेलंगणातही मराठी माणूस महाराष्ट्रातून चौदाव्या शतकापासून जातो आहे. स्थायिक होतो आहे. तिथे अनेक शतकांपासून मराठी वस्ती आहे. तिथल्या भजन-कीर्तनात अनेक मराठी अभंग गायले जातात. चारशे वर्षांची मराठी लेखनाची परंपरा आहे. दखनी भाषा तर मराठीच्या सांगाड्यावर उभी राहिली आहे असे प्रतिपादन डॉ. श्रीधरराव कुलकर्णींनी केले आहे. यामुळे मराठीचा आणि ज्याला आपण साकल्याने ‘महाराष्ट्र धर्म’ म्हणतो त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. त्यामुळे या प्रदेशांना मराठी भाषा तशी नवीन नाही. त्यामुळे संमेलन कुठेही असले तरी मला ’माझी मायबोली आज आली माहेराला। सभोवती साहित्यिक सुपुत्रांचा मेळा॥ ही सोपानदेव चौधरींची कविता मला आठवते. सोपानदेव चौधरींनी फार सुंदर वर्णन केले आहे या कवितेते मराठी भाषेचे! डॉ. ना.गो.नांदापुरकरांनीही मराठी भाषा कशी घडत गेली, विकसित होत गेली, जनसामान्यांतून राजदरबारी कशी पोहचली याविषयी फार लोभस शब्दांमध्ये लिहिले आहे.
‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे’, असे कवी कुसुमाग्रजांनी लिहून ठेवले आहे. आपण मात्र दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करुन भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. मराठी भाषेचे संमेलन जसे नियमितपणे होते तसे इतर भाषांचे होत नाही. याबाबत अनेक मराठीएतर साहित्यिकांनी कौतुकोद्गारच काढले आहेत. गैर-मराठी भाषकांनीही मराठीत उत्तम साहित्यनिर्मिती केली आहे. मराठीपासून दूर गेलेल्या आणि परभाषिक संस्कृतीच्या प्रभावात येणार्यांना मराठीशी पुन्हा जोडून घेण्याची हे संमेलन ही एक उत्तम संधी आहे. पंजाबमधील घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तेव्हा पंजाब आणि महाराष्ट्राच्या सातशे वर्षे जुन्या सांस्कृतिक समन्वयाला उजाळा मिळाला. तसेच दिल्ली येथेही घडेल. इतिहासातच नव्हे तर आजही दिल्ली आणि महाराष्टाचे राजनैतिक, सांस्कृतिक संबंध आहेतच.
मराठी ही प्राकृत भाषांमधील श्रेष्ठ भाषा आहे असा बहुमान कवी दंडीने केला आहे. असे असले तरी अगदी इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांच्या काळापासूनच मराठी लयाला जाते आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मराठीचे स्थान राजदरबारी आणि समाजातही अवनत होत होते. तेव्हा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीही चिंता व्यक्त केली होती. आता ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याने राजदरबारी तरी तिची हेळसांड होणार नाही अशी आशा आहे. समाजाने मात्र तिला अधिक मान देण्याची गरज आहे. त्यामुळे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठीला तिचे खरे स्थान तेव्हाच मिळेल जेव्हा ती ज्ञानभाषा होईल असे बहुतांश अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र, मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यास समर्थ नाही, असा विचार करणारेही अनेक आहेत. मराठी भाषा सिद्धांत, विचार, व्याख्या, संज्ञा समर्थपणे मांडू शकते म्हणून ती ज्ञानभाषाही होऊ शकते. प्राचीन मराठीत असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामध्ये ज्ञानविचार आहेत, अनेक ग्रंथ असे आहेत जे व्यापार पद्धती, देशात होणारे व्यापार, देशाबाहेर जाणार्या व्यापाराची, व्यापारी मार्गांची माहिती देतात, त्यातून त्यावेळची अर्थव्यवस्था, समाजजीवन, संस्कृती, रीतीभाती या सगळ्यांची माहिती होते, मार्गदर्शन मिळते. ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती देणारे ग्रंथ आहेत. हे ज्ञानच नव्हे का? तेव्हा, गरज आहे ती आपण, सामन्य माणसांनी हे स्वीकारण्याची आणि तसा प्रचार-प्रसार करण्याची. असे केल्यास रोजगाराच्या संधीही आपोआप निर्माण होतील. तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, विज्ञान या ज्ञानशाखांचे लेखनही मराठीत आहेच. म्हणून, अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अजून मौलिक ज्ञान निर्माण होण्याची शक्यता मला दिसते आहे. अनुवादाचे कार्यही मराठीत मोठ्या प्रमाणावर होते आहे. मराठी भाषेतील साहित्याचा इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावा यासाठी मात्र आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.
काळ बदलला की भाषा बदलते हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. प्रत्येक काळात भाषा टिकवणे आणि तिचा उत्कर्ष साधणे यापूढे बरीच आव्हाने असतात. त्या आव्हानांमध्ये तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या ओघात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता या अचंबित करणाऱ्या आणि तेवढेच विचार करायला भाग पाडणाऱ्या तंत्रज्ञानाशी आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात तर आपल्या मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करायलाच हवे. इतर भाषांमधले शब्द स्वीकारले की किंवा शब्दांची नवनिर्मिती होत असली की भाषा प्रवाही राहाते असे अभ्यासक म्हणतात. मराठीनेही अनेक भाषांमधील अनेक शब्द सहज स्वीकारले आहेत. पण कोणत्याही तंत्रज्ञानाने भाषा गिळंकृत करू नये याची काळजी मात्र आपणच घ्यायला हवी. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून सगळ्या आव्हानांना तोंड देत मराठीला आणखी पुढे घेऊन जाण्याचे बळ आपल्याला मिळेल अशी मला खात्री आहे.
प्रदीप दाते
अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ, नागपूर
मोबाईल नं. 9422144817
सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमित्त विशेष लेख :
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमित्त विशेष लेख :
सारे काही मराठीसाठी…
यावर्षी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी नवी दिल्ली येथे 72 वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात 54 वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा, महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती, आणि अ. भा. मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या 54 व्या साहित्य संमेलनाचे उद्धाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आणि स्वागताध्यक्ष होते काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे ते यंदाच. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.
केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.
अशा या विशेष संमेलनानिमित्त ‘मराठी भाषेच्या समृध्दतता व संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थाविषयी’ माहिती देणारा लेख...
मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था अशी 4 कार्यालये कार्यरत आहेत. या चार कार्यालयांकडून मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या सर्व उपक्रमांना गती देण्यात आली आहे.
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई.
पुस्तकांचे गाव भिलार या प्रकल्पांतर्गत सुरुवातीस 25 घरांमधून प्रत्येकी 500 पुस्तके वाचक/पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. लोकसहभागातून सुरू केलेल्या या प्रकल्पास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने घरांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. सध्या येथे साहित्यिक व भाषिक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता वाचकांसाठी निवास व्यवस्था, रस्ते, वाहनतळ, सार्वजनिक प्रसाधनगृह तसेच खुले प्रेक्षागृह इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
राज्य मराठी विकास संस्थेकडून अमराठी भाषिकांसाठी अध्यापन साधने विकसित करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या पुढाकाराने 'मायमराठी' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सन 2018 मध्ये 38 लाख रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आले होते. या अनुदानात सद्यस्थितीत भरीव वाढ करण्यात आली आहे.
मराठी बोलींचे प्रतिमांकन हा प्रकल्प डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या साहाच्याने हाती घेण्यात आला असून यामध्ये 60 बोली भाषेचा समावेश करण्यात आला आहे.
दासोपंतकृत गीतार्णव शब्दार्थ- संदर्भकोश : नाथपंचकातील एक महत्वाचे कवी दासोपंत यांनी लिहिलेली गीता टीका म्हणजेच ‘गीतावर्ण’ हा ग्रंथ होय. या साहित्यकृतीची माहिती मराठी वाचकांना व्हावी, याकरिता हा प्रकल्प हाती आला आहे.
भाषा संचालनालय, मुंबई
भाषा संचालनालयाने दैनंदिन प्रशासन व न्याय व्यवहारात सातत्याने उपयोगी होणाऱ्या अ) कार्यदर्शिका ब) प्रशासन वाक्यप्रयोग क) शासन व्यवहार कोश ड) न्याय व्यवहार कोश या भ्रमणध्वनी ॲपचे काम पूर्ण केले असून वरील चार कोषांमध्ये सुमारे 86 हजार मराठी/इंग्रजी शब्दांचा समावेश आहे.
परिभाषा कोश अद्यावतीकरण करण्याचे काम सातत्याने सुरू असते. शासन व्यवहार कोश, कृषिशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र तसेच शिक्षणशास्त्र परिभाषा कोश या कोषांच्या अद्यावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सुमारे 34 परिभाषा कोश/शब्दकोश तसेच शासन मार्गदर्शक पुस्तकांची निर्मिती केली आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
नवीन लेखन प्रकल्प
मराठी भाषेत मौलिक व वैचारिक विषयांवर नाविन्यपूर्ण लिखाण करण्याकरिता मंडळाकडून 20 नवीन लेखन प्रकल्प हाती घेतले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. 1) नाट्य संज्ञाकोष, 2)मराठी नाटक आणि रंगभूमीचा समग्र इतिहास 3) महाराष्ट्राच्या सामाजिक- सांस्कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास 4) महाराष्ट्र दृश्यात्मक कलांच्या परंपरांचा आढावा- बृहद्ग्रंथ प्रकल्प 5) 19 व्या व 20 व्या शतकातील अध्यात्म मार्गदर्शकाचा बोध, 6) मराठी सारस्वतांचे चित्रचरित्र 7) सत्यशोधकांचे अंतरंग 8) गुरुवर्य कृ. अ. केळुसकर यांचे समग्र वाङमय, 9) सुफी तत्वज्ञान सखोल विश्लेषण- बृहद्ग्रंथ 10) भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची ऐतिहासिक वाटचाल- एक दृष्टिक्षेप 11) महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांच्या कामगिरीचा समग्र आणि सम्यक इतिहास, 12) अभंगसेतू- संत वचनांचे अनुवाद, 13) अक्षर बालवाङमय : संहिता शोध व बृहद् संदर्भग्रंथ, 14) नक्षत्र निलनभीचे - समग्र बालकवी, 15) महाराष्ट्राच्या प्रयोगात्मक लोककला : परंपरा आणि नवता (1850 ते 2016), 16) कविवर्य नामदेव ढसाळ यांचे समग्र वाङमय- बृहद्प्रकल्प, 17) नागेश विनायक बापट यांचे समग्र वाङमय, 18) मराठीतील बालसाहित्य : इतिहास लेखन आणि समीक्षा संपादन, 19) आधुनिक महाराष्ट्र : अन्वेषणात्मक कालपट, 20) महाराष्ट्रातील नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त, गाणपत्य, चैतन्य, लिंगायत, आनंद व अन्य संप्रदायांच्या मध्ययुगीन वाङमयातील अप्रकाशित व असंग्रहित स्फुट कवितांचे प्रकाशन. दरवर्षी 27 फेब्रुवारीला, मराठी भाषा गौरव दिन समारंभाच्या वेळी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येते.
अनुदानात वाढ :
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्यांच्या 4 घटक संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या 7 साहित्य संस्थांच्या साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याकरिता आतापर्यंत या संस्थांना दरवर्षी प्रत्येकी 5 लाख रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. या अनुदानात वाढ करण्यात आली असून आता प्रत्येकी 10 लाख रुपये इतके अनुदान दिले जाते.
महाराष्ट्र राज्य विश्र्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 या सर्व खंडाचे काम पूर्ण झाले असून यामध्ये सुमारे 18 हजार 57 इतक्या नोंदीचा समावेश आहे. हा विश्वकोश शासनाच्या संकेतस्थळावर तसेच कार्ड, पेन ड्राईव्हच्या स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विश्वकोशाच्या नोंदीचे अद्यावतीकरण करण्याकरिता महाराष्ट्रातील विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांची मदत घेण्यात येत असून विषयनिहाय विविध 47 ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या ज्ञामंडळांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने विश्वकोशांच्या नोंदींचे अद्यावतीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आधुनिक कार्य पद्धतीने विश्वकोशातील नोंदी अद्यावत करण्यासंबंधी सर्व संबंधितांना विश्वकोश मंडळाकडून मार्गदर्शन करण्यात येते त्याकरिता वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.
संकलन :
विजय राऊत
विभागीय माहिती कार्यालय,
अमरावती
मराठी बोलीभाषेचे संवर्धन…
मराठी बोलीभाषेचे संवर्धन…
………
98वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना २०१२ चंद्रपूर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला होता. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही अंश यानिमित्ताने…
……
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्रेपन्नावे अधिवेशन ५ जानेवारी १९७९ रोजी चंद्रपूर येथे झाले होते. त्यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कथाकार प्रा. वामन कृष्ण चोरपडे हे होते. आणि स्वागताध्यक्ष श्रीयुत शांतारामजी पोटदुखे हे होते. त्यावेळच्या संमेलनात मी माझ्या एकदोन कविता वाचल्या होत्या. तेहतीस वर्षांनंतर आज दिनांक ३ फेब्रवारी २०१२ रोजी मी माझे अध्यक्षीय भाषण करायला उभा राहिलो आहे. खरे तर मी माझ्या घरी. माझ्या कुटुंबात परत आलो आहे. अशीच माझी भावना आहे. मी भाषेच्या घरात राहतो, भाषेच्या प्रदेशात माझा रहिवास आहे. हे घर खूप मोठे आहे. हा प्रदेश खूप विस्तीर्ण आहे. मी या घराच्या विविध दालनांमधून वावरतो. गवाक्षांतून बाहेर पाहातो. याच्या तळघरांतून आणि भुयारांतून हिंडत असतो. याची कित्येक दालने अजून मी पाहिलेली देखील नाहीत. परंतू माझे संचित मोठे आहे. याच घरात वावरलेल्या कित्येक महानभावांचे ते अक्षरसंचित आहे. तो माझा ठेवा आहे, मी काही थोडी टिपणे तेवढी काढलेली आहेत.
थोडा विसावा घ्यावा म्हणून मधून मधून मी माझ्या महाकाय पूर्वजांच्या तळहाताएवढ्या कोपऱ्यात येतो. या जागेजवळ एक अवाढव्य खिडकी आहे. तीमधून मी बाहेर डोकावतो. मी आत आणि बाहेर पाहण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. फार थोडे मला जमले आहे. माझ्या आतही एक जग आहे आणि त्यात सतत कोलाहल सुरू असतो. या कोलाहलातही एक शांत स्वर शोधण्याचा माझा प्रयत्न असतो, मी आता या क्षणी मी माझ्या आतल्या आणि बाहेरच्या कोलाहलासह आपणासमोर उभा आहे.
तेहतीस वर्षांनंतरचे चंद्रपूर पुष्कळच वाढले, विस्तारले आहे. सगळीच निमशहरे, शहरे, महानगरे आपले रूप बदलत आहेत. इतिहासातच झोपून गेल्यासारखे वाटणारे हे शहरही आता पापण्या उघडून इकडेतिकडे पाहू लागले आहे. श्रीमहाकाली, अचलेश्वर यांच्यानंतर सुपर थर्मल पॉवर प्लांट हे आधुनिक काळातले नवे देवालय इथे आलेले आहे. या रोपट्यातून निघालेले विजेचे हात दूरपर्यंत पोचलेले आहेत. शहरांत झगमगाट आहे, परंतु खेड्यांमध्ये, रानांमध्ये प्रकाशाचे थेंब पाझरत आहेत की नाहीत याबद्दल मी साशंक आहे. मधून मधून मला मात्र डोळ्यांमधले अंगार फुललेले दिसतात.
उन्हाचा, पावसाचा स्पर्श झाला नाही तर झाडेही वेडीवाकडी वाढत जातात, तेथे माणसांचे काय. याच शहराच्या रस्त्यांवरून माझे बालपण चालत गेले आणि याच शहरात मला केव्हातरी कवितेच्या कीटकाचा दंश झाला. महाकाली, त्या देवीच्या पलिकडच्या अजस्त्र पाषाणमूर्ती माझ्या कवितांमध्ये प्रतिमा म्हणून येऊ लागल्या. तेव्हाच्या योगभ्रष्ट या प्रदीर्घ कवितेत मी लिहिले होते: चांदा हे शहर अमुकसाठी प्रसिद्ध असून तमूकसाठी अप्रसिद्ध असले तरी येथे दर चैत्र पौर्णिमेला महाकालीची मोठी यात्रा भरते.
त्यावेळी महाकालीचे जे मला जाणवले होते तेही लिहिले
महाकाली.
जळते डोळे.
जळते हास्य.
जळते. उघडे नागडे नृत्य.
हे नृत्य विध्वंसाचे नाही, सर्जनाचे आहे. विध्वंसापेक्षा सर्जनावर माझा जास्त विश्वास आहे. समाजाची जुनाट खिळखिळी झालेली संरचना नष्ट केली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी नवी आणि अधिक उत्तम अशी संरचना उभारली पाहिजे हे मी त्यावेळच्या ‘माझ्या लोकांचा आकांत’ या कवितेत लिहिले होते. अर्थात माझ्या लोकांचा आकांत अद्याप मावळला नाही. अजूनही दूरवर पसरलेल्या अरण्यांमधून दुःखितांचे विव्हल स्वर वाऱ्यावरून माझ्यापर्यंत पोचतात.
जोवर मराठीच्या विविध बोली बोलल्या जात आहेत, प्रमाण मराठीत शिक्षित लोक आपले व्यवहार करीत आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा बहुसंख्येने आहेत तोपर्यंत मराठी भाषा टिकून राहण्याचे उपाय करणे शक्य आहे. मराठीला पर्याय म्हणून इंग्रजीची (आणि माहिती तंत्रज्ञानाची, इलेक्ट्रॉनिक्सची) निवड करण्याचा विकल्प आपण ठेवतो तेव्हाच मराठीचे स्थान दुय्यम कसे आहे हे आपण दाखवत असतो. या विषयांचा स्वीकार करूनही मराठी हा विषय अनिवार्य असलाच पाहिजे असे धोरण आखले पाहिजे आणि त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. गेली काही वर्षे मराठीची गरज कशी नाही याचा वृत्तपत्रांतून प्रचार करण्यात गेलेली आहेत, विशेषतः विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधल्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर मराठी नको या मताचा प्रभाव टाकण्यात आलेला आहे. पुढे तर प्रश्नच नाही. भाषेचा किंवा साहित्याचा बाराही लागू नये अशीच व्यवस्था केलेली आहे. आपण पहिलीपासून दहावीपर्यंत मराठीचा आग्रह धरलेला आहे.
अकरावीपासून मराठी विषय सोडला तरी चालेल अशी व्यवस्था केलेली आहे. हे योग्य नाही. लोकांनी ते रोखायला हवे आहे. कुठलेही विषय घ्या, पण एक विषय मराठी हा असलाच पाहिजे असा लोकांनी आग्रह धरायला पाहिजे, आणि शासनानेही विचार करायला पाहिजे. जी मुले अकरावी-बारावीला मराठी विषय घेतात त्यातही काही बीएला जातात आणि मराठी साहित्य हा विषय घेतात. बीएससी, बीकॉमकडे जाणाऱ्यांना मराठी साहित्य हा विषय घेण्याची संधीच आपण नाकारलेली आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या यांच्याकडे बहुसंख्य विद्यार्थी जातात. त्याच्या अभ्यासात भाषा नाही आणि साहित्यही नाही. म्हणजे मराठी वाचवण्याची सगळी जबाबदारी बीएला जाणाऱ्या मूठभर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आपण टाकलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे.
काही थोडे लोक मराठीचे अध्ययन करतात. बाकीच्यांना मराठीशी काही देणेघेणे नाही. ही वस्तुस्थिती भाषेच्या, साहित्याच्या संस्कृतीच्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाच्याही दृष्टीने चांगली नाही. भाषेपासून, साहित्यापासून मुलांना तोडून टाकता आणि मराठी भाषेचे काय होईल, मराठी साहित्याचे काय होईल अभी चिंता करता. ही विसंगती आहे. मी असे सुचवतो आहे की आपण अन्य विद्याशाखांमध्येही साहित्य हा विषय ठेवावा.
प्रमाण मराठीचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात कुशल वापर आणि मराठीच्या बोलीचे संवर्धन या दोन्ही बाबतीत शासनाच्या भाषाविभागाने भरीव काम केले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक बोली आहेत. वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, डांगी, मालवणी, कडाळी, झाडी, डांगणी, माणदेशी मराठवाडी, भिलोरी, पोवारी, गोंडी, इत्यादी. आजच्या मराठी साहित्यात या विविध बोलींमधले लेखन केले जात आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता या साहित्यप्रकारांतील लेखनात बोलींचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. दलित, भटक्या विमुक्त, आदिवासी जाती-जमातीमधून आलेल्या लेखकाच्या स्वकथनांतून त्या त्या प्रदेशाशी, व्यवसायाशी, समाजगटाशी निगडित बोली आलेली आहे.
उदाहरणार्थ लक्ष्मण माने यांच्या उपरामध्ये कैकाडी बोली, रुस्तुम अचलखांब यांच्या गावकीमध्ये जालना परिसरातील बोली, दादासाहेब मल्हारी मोरे यांच्या गबाळमध्ये मिरज-जत परिसरातील कुडमुडे जोशी जमातीची बोली, शरणकुमार लिंबाळे यांच्या अक्करमाशीत अक्कलकोट परिसरातील बोली, लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्यामध्ये लातूर परिसरातील संतामुच्चर जमातीची बोली, रावजी राठोड यांच्या तांडेलमध्ये नांदेड परिसरातील बंजारा बोली, भगवान इंगळे यांच्या ढोरमध्ये जामखेड परिसरातील बोली, योगीराज बागूल यांच्या पाचटमध्ये वैजापूर परिसरातील ऊसतोडीच्या कामगारांची बोली अशा कितीतरी बोली मराठी साहित्यात आलेल्या आहेत. बोलीबरोबर ती बोली बोलणाऱ्यांची संस्कृतीही अशा कथनांतून व्यक्त होते. या बोलीचा आणि प्रमाण मराठीचा सांधा जोडण्याचे काम विद्यापीठातील मराठीचे, समाजशास्त्राचे आणि सांस्कृतिक मानवशाखाचे प्राध्यापक करू शकतात; नव्हे, ते त्यांनी करावे असे मी सुचवतो.
भारतासारख्या कृषिप्रधान देशावर आर्थिक जागतिकीकरणाचा किती गंभीर विपरीत परिणाम होतो याविषयी वंदना शिवा यांनी लिहिले आहे: आर्थिक जागतिकीकरणामुळे बीज-बियाणे उद्योगाचे केंद्रिकरण, जागतिक व्यापारी प्रतिष्ठानांचा (ग्लोबल कार्पोरेशन्स) कृषिव्यवसायात प्रवेश, कीटकनाशकांचा वाढता वापर, वाढत चाललेली कर्जे, निराशा, त्यामुळे लहान शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या गोष्टी घडत आहेत. भांडवल गुंतवणारी कार्पोरेट-नियंत्रित कृषिव्यवस्था अस्तित्वात येते आहे. अशा स्थितीत गरीब शेतकरी टिकून राहणे अशक्य झाले आहे. जागतिकीकरणात निर्यातीला प्राधान्य आहे. त्यामुळे शेतकरी अन्नधान्य पिकवण्याऐवजी निर्यात करता येईल अशी पिके घेऊ लागले आहेत. उत्पादनखर्चात वाढ झाल्यामुळे कर्ज काढण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. पाहिजे तसे उत्पन्न झाले नाही किंवा भाव मिळाले नाहीत तर शेतकरी बुडतो, तो वैफल्याने ग्रासला जातो.
जागतिकीकरणाच्या अवस्थेत इंग्रजीसारख्या एकाच भाषेत संज्ञापन आणि ज्ञानव्यवहार होत असेल तर इतर भाषा बोलणाऱ्यांचे आणि त्यांच्या भाषांचे भवितव्य काय हा प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची, राजकारणाची, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या व्यवस्थापनाची, ज्ञानाची, अनुवादाची, संगणकाची, इंटरनेटची आणि मोबाईल फोनची, भाषा आहे. ती ग्लोबल लैंग्वेज आहे. थोडक्यात ती जागतिकीकरणाची भाषा आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत इंग्रजी भाषेला अत्यंत महत्त्व आलेले आहे. पूर्वी ब्रिटिश वसाहती असलेल्या देशांतच नव्हे तर जगाच्या सर्वच खंडांतील देशांमध्ये ती शिकली, बोलली, लिहिली जाते आहे. तथापि पूर्वी वसाहती असलेल्या देशांवर तिचा अधिक प्रभाव आहे. घानासारख्या आफ्रिकन प्रजासत्ताकात इंग्रजी भाषेला प्रथम क्रमांकाचे स्थान आहे. राज्यकारभाराची, व्यापाराची, शिक्षणाची तीच भाषा आहे. जागतिकीकरणाच्या अर्थकारणामुळे विकसनशील देशांच्या अर्थकारणावर जसे विपरीत परिणाम होत आहेत तसेच ते भाषांच्या बाबतीतही होतील का अशी चिंता अनेक देशांतील भाषातज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. इंग्रजीमुळे राष्ट्रीय भाषांचे, प्रादेशिक भाषांचे, बोलींचे अस्तित्व मिटून जाईल काय या प्रश्नाने जगभरातील विचारवंत अस्वस्थ झालेले आहेत. कारण तशी काही चिन्हे वास्तवात दिसत आहेत.
भारतामध्ये भाषांची विविधता आहे. आसामी, उड़िया, उर्दू, कब्रड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाली, पंजाबी, बंगाली, बोडो, मणीपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, हिंदी या प्रमुख भाषा आहेत. हिंदी ही उत्तरप्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, हिमाचल प्रदेश, आणि राजधानी दिल्ली व केंद्रशासित प्रदेश यांची अधिकृत भाषा आहे. इंग्रजी भाषेचा सहभाषा म्हणून स्वीकार केलेला आहे. राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी आणि हिंदी या भाषांना विशेष महत्त्व आहे. प्रादेशिक भाषांना राज्यभाषेचा दर्जा असला तरी सर्वच राज्यांमध्ये इंग्रजी ही भाषा सार्वजनिक व खासगी क्षेत्रांमध्ये उपयोगात आणली जाते. या मान्य प्रादेशिक भाषांखेरीज अन्य भाषाही आहेत महाराष्ट्रात मराठीच्या बोलींखेरीज भिली, गोंडी, कोरकू, वारली या भाषा आहेत. या मराठीच्या बोली नसून स्वतंत्र भाषा आहेत आणि त्या भाषांमध्ये त्या भाषक समुहांचे सांस्कृतिक संचित आहे.
आज आपण सगळेच पूर्वी न अनुभवलेल्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहोत. सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्पन्न झालेल्या संभ्रमाच्या मुद्रा पाहतो आहोत. गावे, शहरे बदलत आहेत. पुष्कळदा असे वाटते की आपण अवाढव्य अशा बाजारपेठेतून हिंडतो आहोत. आजच्या या स्थितीत संस्कृती, भाषा, साहित्य यांचे भवितव्य काय या प्रश्नाने आपण अस्वस्थ आहोत. याशिवायही अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत. स्पेस मिळाली की आपण प्रश्न मांडायला लागतो. काही वेळा आपल्याला अशी स्पेस तयार करावी लागते. झाडीपट्टी रंगभूमी ही अशा स्पेसचे उत्तम उदाहरण आहे. उर्वरित महाराष्ट्राला कितपत कल्पना आहे कोण जाणे. झाडीपट्टीची दंडार ही परंपरेने चालत आलेली लोककला आहे. दंडार म्हणजे हातात डहाळी घेऊन केलेला नाच असा एक अर्थ दिलेला आहे. म्हणजे हे सृजनाचे नृत्य आहे. जंगलात, निसर्गात राहणाऱ्या लोकांचा निर्मितीचा उत्सव, आता सर्वत्र पसरलेल्या जंगलात कार्पोरेट हत्ती शिरून उच्छाद मांडायला सिद्ध झालेले आहेत.
साम्राज्यवाद नष्ट झाला आहे. परंतु साम्राज्ये आपल्या डोळ्यांसमोर आकार घेत चालली आहेत. जागतिकीकरण हे या साम्राज्याचे नाव आहे. या साम्राज्यात आधुनिकता आणि समृद्धी यांची आमिषे दाखवली जातात, परंतु प्रत्यक्षात सामाजिक दुभंगलेपण आणि सांस्कृतिक मागासलेपण यांचे पोषण केले जाते. व्यक्तीचे बाहेरच्या जगाशी असलेले संबंध, बाजारपेठेचा प्रभाव आणि त्याच्याशी निगडित उपभोक्तावादी संस्कृती आणि धार्मिकता व धर्मजातीवाद यांचा उदय या तीन गोष्टींचा अनेक विचारवंतांनी परामर्ष घेतला आहे. व्यक्तीच्या दृष्टीने सामाजिक प्रश्न महत्त्वाचे राहिलेले नाहीत. सार्वजनिकतेच्या ठिकाणी वैयक्तिकता आलेली आहे. व्यक्ती स्वतःच्या प्रश्नांमध्ये जास्त गुंतून गेली आहे. बाजारपेठेचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी अप्राप्य अशा वस्तु व्यक्तीच्या हाताशी आलेल्या आहेत असा आभास तयार केला जातो. परंतु व्यक्तीची वास्तविक स्थिती आणि तिच्या निवडीला केले जाणारे आवाहन यांत विसंगती तयार होते. वस्तूंमध्येच सर्वस्व आहे. खरा आनंद आहे असे वाटणे. वस्तूंनी झपाटले जाणे अशी एक मानसिक अवस्था तयार होते. आर्थिक क्षमता नसल्याने बहुसंख्यांना त्या मिळवता येत नाहीत.
सर्वसामान्य माणसांच्या सुखदु:खाची हायस्ट्रीट फिनिक्सच्या मोराला काही पर्वा नसते तो चमचम दिव्यांचा पिसारा फुलवून दिमाखात उभा असतो. जयंत पवार यांची ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ ही कथा जागतिकीकरणावरचे, मुक्त बाजारपेठेवरचे नवमध्यमवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यात पडलेल्या दरीवरचे एक प्रखर भाष्य आहे.
जागतिकीकरण ही भिन्न भिन्न आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचारप्रवाहांना सामावून घेणारी संज्ञा आहे. जागतिकीकरण ही एक अवस्था आहे आणि सिद्धांतही आहे. वर्तमानकाळात जागतिकीकरण या शब्दात विविध अर्थच्छटा दडलेल्या आहेत. उदाहरणार्थ: मुक्त बाजारपेठ, आर्थिक उदारीकरण, राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक जीवनावर पाश्चात्य धारणांचा प्रभाव, पश्चिमीकरण किंवा अमेरिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, इंटरनेट क्रांती, जागतिक एकात्मता, इत्यादी. जागतिकीकरणाची ही अवस्था एक अपूर्ण अवस्था आहे. भांडवलशाहीचा हा पुढचा टप्पा आहे. वाफेवर चालणारी जहाजे, टेलिग्राफ, टेलिफोन, रेल्वे ही भांडवलशाहीची संचार साधने होती. प्रगत भांडवलशाहीला संगणक, उपग्रहांवर अधारित दृक-श्राव्य माध्यमे, भ्रमणध्वनी, द्रुत आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक ही संचार-संज्ञापन साधने मिळालेली आहेत. समाजवैज्ञानिकांच्या मते जागतिकीकरण या संज्ञेत सामाजिक अस्तित्वाशी निगडित स्थल आणि काल या संकल्पनांतील मूलभूत बदलांचा निर्देश आहे.
वसंत आबाजी डहाके,
ज्येष्ठ साहित्यिक,
अमरावती.
मराठी साहित्यात लीळाचरित्राचे स्थान
मराठी साहित्यात लीळाचरित्राचे स्थान
मराठी साहित्याचा प्रांत अतिशय समृद्ध आणि सशक्त आहे. मराठी साहित्याला दीर्घ आणि प्राचीन अशी परंपरा लाभली आहे. आज इतर भाषांमधील जी साहित्य संपदा आहे त्यामध्ये मराठी साहित्य कुठेही मागे नाही. उलट मराठी साहित्याने आपले भावविश्व अतिशय व्यापक केलेले असून जागतिक साहित्याला तोडीस तोड साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. समाजातील सर्वच अंगांना स्पर्श करण्याचे कार्य मराठी साहित्याने केले आहे. कविता,कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारांनी मराठी साहित्य बहरलेले आहे. प्रामुख्याने वैचारिक आणि ललित अशा दोन्ही प्रांतात मराठी साहित्याची मुशाफिरी दिसून येते.
या दोन्ही प्रांतात अतिशय विपलु असे लेखन मराठी भाषेत आढळून येते. मराठी साहित्याचा मागोवा ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपण बाराव्या शतकात जाऊन पोहोचतो. बारावे शतक हे मराठी साहित्याच्या दॄष्टीने सुवर्णकाळ होय. याच काळात मराठी साहित्य गंगेचा उगम झालेला दिसून येतो. मराठीचा पहिला लिखित स्वरुपातील ग्रंथ लीळाचरित्र याच काळात लिहिल्या गेला. गद्य निर्मितीचा पाया या ग्रंथाने घातला. याप्रमाणेच धवळे हे आद्य काव्य देखील याच काळात रचल्या गेले. इथून सुरु झालेला मराठी आणि गद्य आणि पद्य साहित्याचा प्रवास अविरतपणे अद्यापही सुरुच आहे. मराठीच्या आरंभकाळाला सुवर्णयुग असे म्हटल्या गेले आहे कारण मानवी जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारा आद्य ग्रंथ लीळाचरित्र एक मानदंड ठरला. पुढे ‘ज्ञानेश्वरी’ सारखे महाकाव्य असेल किंवा नरेंद्राचे ‘रुक्मिनी स्वयंवर’ हे काव्य असेल यांनी मराठी साहित्याला श्रीमंती प्राप्त करुन दिली आहे.
या ग्रंथांचा आदर्श पुढे ठेवतच आजतागायत शेकडो ग्रंथ मराठी भाषेमध्ये निर्माण झाले. महानुभाव साहित्याचे तर मराठी भाषा श्रीमंत करण्यात फार मोठे योगदान आहे. महानुभावांनी मराठी साहित्याला साडेसहा हजार ग्रंथ दिले आहेत. एवढया मोठया प्रमाणात एकाच संप्रदायाने ग्रंथ निर्मिती करावी हे जगाच्या पाठीवर कुठेच घडलेले नाही. महानुभाव साहित्याशिवाय मराठी भाषेचा इतिहास अपूर्णच राहील. एवढे महत्वपूर्ण साहित्य या संप्रदायाने मराठी भाषेला दिलेले आहे. आधुनिक काळात देखील महानुभाव साहित्याची निर्मिती सुरुच आहे. आधुनिकतेशी महानुभाव साहित्याने जुळवून घेतले आहे. संशोधना सोबतच आधुनिक काव्यात चितपरिचीत असलेले कथा, कादंबरी आणि काव्य प्रकार देखील महानुभाव साहित्यिक हाताळत असून ते मराठी साहित्याच्या प्रांतात आपला ठसा उमटवित आहेत- असे असले तरी लीळाचरित्राचे मराठी साहित्यात आगळे वेगळे स्थान आहे हे मान्य करावेच लागेल.
लीळाचरित्र ग्रंथ कसा तयार झाला याविषयी अत्यंत उद्बोधक माहिती आहे. श्रीचक्रधर स्वामींच्या प्रयाणानंतर त्यांचे पट्टशिष्य नागदेवाचार्य व इतर भक्तमंडळी रिद्धपूरला श्रीगोविंदप्रभूंच्या सेवेसाठी येऊन राहिले. स्वामीच्या विरहाचे दुःख सर्वांच्याच अंतःकरणात भरलेले होते. नागदेवाचार्य तर श्रीगोविंदप्रभूंची सेवा आटोपल्यानंतर एकांतात बसून स्वामींच्या लीळांचे स्मरण करीत असतं. हे केवळ विरह दुःखाचे ओवले-पोवलेपण नाही.आचार्य कशाचे तरी निरंतर स्मरण करीत असतात. हे चाणाक्ष म्हाइंभटांच्या लक्षात आले. एके दिवशी त्यांनी नागदेवाचार्यांना विचारले ‘भटो: तुम्ही निरंतर काइसयाचे मनन करीत असा, तुम्हासी केव्हळीही मननावेगळेया न देखो:’ यावर नागदेवाचार्यांनी उत्तर दिले. ‘मी नेहमी स्वामींच्या लीळा मनन करीत असतो. स्वामींच्या सान्निध्यात मी जेव्हा हिरवळीला होतो, तेव्हा एके दिवशी त्यांनी मला तेथून रिद्धपूरला पाठविले. मी जायला निघालो, तेव्हा सर्वज्ञांनी मला म्हटले, वानरेया: एथोनि निरोपीले विचारशास्ञ: अर्थशास्ञ: तयाचे श्रवण: मनन: निदिध्यसन करावे: तेही एक स्मरणचि कीं गा: एथीची चरित्रे आठविजेति: आइकीजेति: तेही एक स्मरणचि कीं गा:’ असे निरुपण सर्वज्ञांनी मला त्यावेळी केले होते.
म्हणून त्यावेळी रिद्धपूरला म्हणजे येथे श्रीप्रभूंच्या सान्निध्यात असताना श्रीप्रभूच्या ज्या खेळक्रीडा पाहिल्या त्या सर्वांचे मी निरंतर स्मरण करीत असतो.’ ‘‘मी जैलागुनी अनुसरलां तैलागुनी मज देखता जीया सर्वज्ञांचीया लीळा वर्तलीया तीया मी आवांकीतेचि असे: जै मज पवाड नसे: सर्वज्ञांच्या सेंवादास्यालागी कव्हणीकडे जाए तरी जीए भक्ते सर्वज्ञांजवळि असेति त्याते एऊनि पुसे: आन मी अनुसरलां नव्हता तै बाइसादेखत जिया लीळा वर्तलीया तीया मीया सर्वज्ञाते पुसीलीया: आन सर्वज्ञे प्रसंग परांत नीरुपीले इतिहास तेही आवांकीत असे: आन सर्वज्ञे जे नीरोपीले परावर नीरुपन तेही आवांकीतूची असे: आन अळजपुरीहून सर्वज्ञे बीजे केले तेथौनि प्रतिष्ठानापर्यंत जीया लीळा वर्तलिया तीया सर्वज्ञे प्रसंगे भक्तापरिवारात सांगीतलीया तीया आठवीतूचि असे: आन सर्वज्ञे जै एकांकी राज्य केले तीया लीळा: सर्वज्ञे प्रसंगे भक्ताप्रती नीरुपीलीया: तीयाही आठवितूचि असे: आन सर्वज्ञे द्वापरिचीया लीळा: श्रीप्रभूचीया लीळा प्रसंगे भक्ताप्रति नीरुपीलिया तीयाही आठवितुची असे:’’
आपण कशाचे मनन करीत असतो याचा वृत्तांत नागदेवाचार्यांकडून ऐकल्यावर दूरदर्षी प्रज्ञावंत म्हाइंभटांच्या मनात एक विचार स्फुरला व तो त्यांनी ताबडतोब बोलूनही दाखविला. आचार्यांना ते म्हणाले, भटो तुम्हासी सर्वज्ञांचा वरु: म्हणौणि सर्वज्ञे नीरोपीले ज्ञान: शास्त्र ज्ञात: सर्वज्ञे जीया केलीया सांगितलीया तीया तुम्हासि आठविताति: तरि आता श्रीचरणा सन्निधानी आम्हांसी: आन पुढे जो सर्वज्ञांचा मार्ग होइल त्यासि तवं इतुके शास्त्र न धरे: तरि सर्वज्ञांचिया लीळा तुम्ही सांगा आन मी लीहिन:’ भटी म्हणीतले: ‘हो कां: लिहीले मार्गासी उपयोगा जाईल: सर्वज्ञाते मार्गाची प्रवृत्ती असे: कां पाः सर्वज्ञे म्हणीतले: शास्त्र घेइजे: मग काळे करुनी उपयोगा जाये:’
लीळाचरित्राच्या रुपाने स्वामींच्या आठवणी लिहून काढण्याचा विचार ज्यावेळी म्हाइंभटांना स्फुरला तो क्षण मराठी साहित्याच्या दृष्टीने अपूर्व क्षण होता यात शंका नाही. या आठवणी लिहून काढण्याचे प्रयोजन जरी महानुभाव पंथा पुरते मर्यादित असले तरी त्यामुळे महाराष्ट्र,मराठी भाषा व मराठी साहित्य यांची म्हाइंभट व नागदेवाचार्य या दोन्ही पंडितांकडून कशी अनमोल सेवा घडली हे आपणास आज अनुभवाला येते.
पुढे नागदेवाचार्यांनी आठवणी सांगायच्या आणि म्हाइंभटांनी त्या लिहून काढायच्या असे ठरले. ‘मग माहिभटी लेखन आरंभीले: भट माहीभट वाजेश्वरी वीजन करीत: ऐसे अवघे भटोबासी लीळा कथन केले: ते माहीभट सा मासा लीहिले:’ आणि अशारितीने सहा महिण्यात लीळाचरित्राचा कच्चा खर्डा तयार झाला. लीळाचरित्राचा खर्डा तयार झाल्यावर त्यातील मजकूर यथार्थ असावा, त्यात कोणतीही चूक किंवा कमी अधिकपणा राहू नये म्हणून ज्या विद्यमान व्यक्तींचा त्यात संबध आला होता त्यांच्याकडून त्या मजकुराची खात्री करुन घेणे आचार्यांना आवश्यक वाटले.
म्हणून म्हाइंभटांना त्यांनी म्हटले, माहीभटो जै मी सर्वज्ञाते अनुसरलां नाही तै बाइसां अवीद्यमान जीया लीळा वर्तलीया तिया तयाचीये अनुभवीचीया तयाते पुसावीया: जानोचेया अनुभवीचीया जानोते पुसावीया: नाथोचीये अनुभवीचीया नाथो ते पुसावीया: येल्होचीये अनुभवीचीया येल्होते पुसावीया: एये जीयाचाची परी ज्या ज्या ज्याचिये अनुभवीचीया लीळा त्या त्यासि पुसाविया: श्रीप्रभूचा सन्निधानी जे भक्त होते त्याचीये अनुभवीचीया लीळा त्याते पुसावीया:’ मग म्हाइंभटांनी आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे गावोगावी फिरुन स्वामींच्या लीळा गोळा केल्या व पुन्हा त्या नागदेवाचार्यांना दाखविल्या व शके ११९७ मध्ये लीळाचरित्र हा ग्रंथ तयार केला.
म्हाइंभटांनी लिहिलेल्या लीळाचरित्राची एकच प्रत होती. लीळाचरित्र म्हाइंभटांनी बाळबोध लिपीत लिहिले होते. त्यावेळी त्याच्या प्रतिलिपी तयार केल्या नाहीत. ही प्रत नागदेवाचार्यांजवळ होती. त्यांच्या निधनानंतर ती बाइदेवबासाकंडे व नंतर कवीश्वरबासाकंडे आली व त्यांच्याजवळ असतांनाच खालशाची धाड आली व त्यावेळी ही आद्य प्रत नाहीशी झाली. सिद्धांते हरिबास व धाकटे सोंगोबास यांच्या अन्वयस्थळात ‘आन तिन्ही रुपेचरित्रे महाइभटीचि केली परि ते लीळासंबंध खालसाचिया धाडीसी नाहीचि जाले:’ असा स्पष्ट उल्लेख आहे. पुढे लीळाचरित्रावर अनेक पिढीपाठ तयार झाले. हे सर्व पाठ लिपीबद्ध होते.
खालशाच्या धाडीत मुळ प्रत नष्ट झाल्यावर त्याच्या पुर्नलेखनाचे काम प्रथम कमळाइसाची शिष्या हिराइसा हिने केले. हिराइसाला एकछंदी प्रज्ञा होती. त्यामुळे एकदा ऐकलेले तिच्या डोक्यात पक्के बसतं असे. तिने लीळा सांगितल्या व पाटकुले मालोबास यांनी लिहून काढल्या. हे पुर्नलेखनाचे काम शके १२३२ मध्ये झाले.
महानुभावांनी अचाट साहित्य निर्मितीचे काम करुन महाराष्ट्र वाङ्eय इतिहास समृद्ध केला आहे. महाराष्ट्राबाहेर पंजाब, काश्मीर, उत्तप्रदेश, आंध्रपदेश किंबहुना अफगाणिस्थान, काबुल- कंदहार पर्यंत महानुभावांनी मराठी भाषा पोहोचविली. सोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीला सर्वदूर नेले. महानुभाव विचारधारा असलेले साहित्यिक आधुनिक साहित्यात संचार करीत असून ते मराठी साहित्य विश्वाला दमदार साहित्यकृती देत आहेत. याची दखल मराठी साहित्य विश्वाने घेणे आवश्यक आहे. काव्यातील अभंग, गझल अशा प्रकारांचा देखील वापर महानुभाव साहित्यिक करीत आहेत. कलगीतुरा याचा देखील अंतर्भाव महानुभाव साहित्यिकांनी केला आहे.
अशाप्रकारे मराठीच्या आरंभकाळी एक सशक्त आणि परिपूर्ण साहित्य निर्मिती करुन मराठी साहित्य निर्मितीचा पाया घालणाऱ्या महानुभाव साहित्यिकांनी आधुनिक काळात देखील आपली साहित्य निर्मिती सुरुच ठेवली असून महानुभावीय विचारधारेच्या ग्रंथ निर्मितीसोबतच इतरही अनेक ग्रंथांची निर्मिती करुन आपली देखील नाळ आधुनिक साहित्यासोबत जुळलेली आहे हे दाखविण्याचा एक उत्तम प्रयत्न या साहित्यिकांनी केला आहे. भविष्यात हा प्रवाह अधिक जोमाने प्रवाहित होत जाईल यात कुठलीच शंका नाही.
प्रा. डॉ. किरण वाघमारे,
सहायक प्राध्यापक
मोबाईल क्र. : ९८५०९०२१५४
--
अभिजात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ! जैसी हरळांमाजी रत्नकिळा। कि रत्नांमाजि हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा। भाषा मराठी।।
अभिजात मराठीचे स्वतंत्र विद्यापीठ!
जैसी हरळांमाजी रत्नकिळा।
कि रत्नांमाजि हिरा निळा
तैसी भाषांमाजी चोखळा।
भाषा मराठी।।
अशा शब्दात सार्थ अभिमानाने गौरवण्यात आलेल्या मराठी भाषेला दोन हजारांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असल्याचे विविध पुराव्यांवरून निर्विवादपणे सिद्ध झाले आणि अभिजात भाषा म्हणून तिच्या दर्जावर अखेर गेल्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राजमान्यतेची मोहर उमटली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने मराठी भाषा ही प्राचीन, समृद्ध व श्रेष्ठ असल्याचे योग्य ते दाखले, साहित्य परंपरेची माहिती व इतर दस्तावेज केंद्र सरकारला सादर केले. त्यांची वस्तुनिष्ठता सिद्ध झाल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली दहा वर्षे सुरू असलेल्या लढ्याला यश आले आणि आपल्या मराठीच्या मुकुटात अभिजात भाषा म्हणून श्रेष्ठत्वाचे एक सुंदर मोरपीस खोवले गेले.
मराठीवर प्रेम करणाऱ्या साऱ्यांना अभिमान वाटावा असा हा क्षण. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त केल्यामुळे मराठीचा गौरवशाली समृद्ध इतिहास व तिचे सांस्कृतिक वैभव आता जगभर पोहोचेल, असा विश्वास मराठीजनांच्या हृदयात निर्माण झाला आहे. मराठीला अभिजात दर्जा प्राप्त होणे हा गौरव तर आहेच पण त्यासोबतच ती संवर्धित व वृद्धिंगत करण्याची मोठी जबाबदारीही सर्व घटकांची आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा विभाग संबंधित विद्यापीठांच्या स्थापनेपासूनच आहेत. परंतु स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ मात्र राज्यात अस्तित्वात आले नव्हते. इतर राज्यांचा विचार केला तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अशी विद्यापीठे फार पूर्वीच स्थापन केली गेलीत.
प्रादेशिक अस्मिता जपण्यासह भाषेचा निरंतर विकास व ती वृद्धिंगत व्हावी यासाठी १९८१ ते २०१२ या कालावधीत तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषा विद्यापीठांची स्थापना झाली व त्या माध्यमातून सर्व शाखांचे शिक्षण त्या राज्याच्या भाषेत तेथे देण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र विद्यापीठ नसल्याची खंत भाषाप्रेमींना जाणवत होती. त्यातून मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे ही लोकभावना प्रबळ होऊ लागली. महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठाची मागणी तशी जुनीच. १९३३ मध्ये नागपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात यावर प्रथमच चर्चा करण्यात आली व त्यानंतर १९३९ च्या साहित्य संमेलनात साहित्यिक व भाषेचे अभ्यासक मराठी भाषा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आग्रही असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मराठी ही केवळ लोकव्यवहार व साहित्यनिर्मितीची भाषा म्हणून मर्यादित न ठेवता ती ज्ञानभाषा व आधुनिक तंत्रज्ञानाची भाषा म्हणून विकसित करण्याची गरज प्रतिपादित होत असताना त्या दृष्टीने या भाषेसाठी समर्पित स्वतंत्र विद्यापीठ गरजेचे होते. महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता व मुळात अभिजातच असलेली मराठी जपायची तर तिचा इथून पुढला प्रवास मराठीसाठी समर्पित विद्यापीठातून व्हावा यावर सर्व साहित्यिक व मराठीप्रेमींचे एकमत होते.
या लोकभावनेची दखल घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीचे बीजारोपण केले. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने जुलै २०२३ मध्ये सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात येऊन या प्रयत्नांना गती देण्यात आली. या समितीने अवघ्या दोन महिन्यात सर्वसमावेशक तपशील व अहवाल राज्य शासनास सादर केला. त्या आधारावर मराठी भाषा विद्यापीठ अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठी भाषा विद्यापीठ कुठे स्थापन करावे असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यासाठी वऱ्हाडातील रिद्धपूरशिवाय अधिक योग्य अशी दुसरी जागा कोणती असणार? रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखली जाते. अकराव्या शतकापासून नवे पंथ व भक्तिमार्ग उदयास येत होते. श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकात महानुभाव पंथाची स्थापना केली. जातिनिरपेक्षता आणि अहिंसा हे या पंथाचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात महानुभाव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पंथाचा उत्तरेकडे दिल्ली व पंजाबपर्यंत प्रसार झाल्याचे अभ्यासक सांगतात.
श्री गोविंद प्रभू महानुभाव पंथाचे आद्यपुरुष व श्री चक्रधर स्वामींचे गुरु. त्यांचे वास्तव्य रिद्धपूर येथे होते. ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक म्हणून ओळखले जातात. महानुभाव पंथाच्या प्रारंभिक अनुयांपैकी एक व मूळचे मराठवाड्यातील रहिवासी असलेले म्हाइंभट श्री चक्रधरांच्या पहिल्या भेटीतच प्रभावित झाले. स्वामींच्या विचारांनी प्रेरित होऊन म्हाइंभट्ट कायमचे रिद्धपूर येथे स्थायिक झाले. त्यांनी चक्रधर स्वामींचे विचार व शिकवणुकीचे आयुष्यभर अनुसरण केले.
श्री चक्रधर स्वामींच्या आदेशाने म्हाइंभट्टानी इसवी सन १२७८ मध्ये 'लीळाचरित्र' हा मराठी भाषेतील पहिला पद्यग्रंथ रिद्धपूरच्या पावनभुमीत लिहिला. (या ग्रंथ लेखनाच्या कालनिश्चितीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.) विशेष म्हणजे या पंथाने मराठी भाषेला त्यांच्या साहित्यात प्रथम व मोलाचे स्थान दिले. महानुभावांच्या सांकेतिक लीपींबाबतही अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. स्वामींच्या उत्तरागमनानंतर महाराष्ट्रभरातील त्यांचे सर्व शिष्य रिद्धपूरला आलेत.
श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र व कार्याच्या स्मरणार्थ तसेच त्यांचे शिष्य व महानुभाव पंथियांना त्यांचे मार्गदर्शन व सहवास लाभत राहावा यासाठी म्हाइंभट्ट यांनी लीळाचरित्राची निर्मिती केली. त्याच काळात श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंद प्रभू, श्री नागदेवाचार्य, केशिराज, म्हाळसा यांच्या प्रतिभेला अंकुर फुटलेत. स्मृतिस्थळ, गोविंद प्रभू चरित्र, दृष्टांत पाठ इत्यादी ग्रंथ येथे निर्माण झालेत. आद्य प्राचीन कवयित्री महदईसा यांनी या भूमित धवळे रचले. ज्याला 'महदंबेचे धवळे' म्हणतात. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी कथा व काव्य निर्मिती केली.
कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, शास्त्रीय ग्रंथ, व्याकरण, भाषा विज्ञान, लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाङ्मय निर्मिती रिद्धपूर येथे झाली. त्या काळी मराठी भाषेतून तत्त्वज्ञानाची शास्त्रशुद्ध मांडणी करणारा महानुभाव पंथ अधिक नावारूपास आला व त्यातूनच 'मराठी वाङ्मयाचीही काशी' अशी रिद्धपूरची ओळख निर्माण झाली. खऱ्या अर्थाने मराठी वाङ्मयीन साहित्याची क्रांती येथे घडून आली. या साहित्यातून आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक पट उलगडला व समाजाला नवी दिशा देण्याचे महान कार्य रिद्धपूर येथून सुरू झाले व मराठी भाषेची नाळ रिद्धपूरशी जोडल्या गेली.
मराठी भाषेच्या समृद्ध होण्यात महानुभाव पंथाचे मोठे योगदान आहे आणि त्यास रिद्धपूर साक्षी राहिले आहे. मराठीचा अधिक सखोल अभ्यास, संशोधन व भाषेच्या संवर्धनासाठी या विद्यापीठाची मोलाची भूमिका असणार आहे. विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ.अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात ते प्राध्यापक होते. मराठी व इंग्रजी विभागाचे प्रमुख व अधिष्ठाताही ते होते. साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक असलेले डॉ. आवलगावकर यांचे मध्ययुगीन साहित्य, लोकसाहित्य व समीक्षा या विषयांवर प्रभुत्व आहे.
मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये त्यांचा समावेश होता. शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अनेक वर्षांचा त्यांना अनुभव असून, त्यांची अनेक पुस्तके आणि काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. डॉ. आवलगावकरांचे व्यापक अनुभव व शैक्षणिक नेतृत्व विद्यापीठाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल यात शंका नाही
मराठी भाषा विद्यापीठात वैविध्यपूर्ण व बहुभाषिक शिक्षण कसे मिळेल व येथील विद्यार्थी त्याच्या आयुष्यात रोजगारासाठी कसा सक्षम होईल याकडे प्रामुख्याने विद्यापीठाने काटेकोर नियोजन केले आहे. अभिजात मराठी भाषा व साहित्यात येथे स्वतंत्र पदवी व पदविका घेता येणार आहे. मराठीचे लेखन व संवाद कौशल्याधारित अल्पावधीचे अभ्यासक्रम येथे असणार आहेत. शासन दरबारी इंग्रजीचा सर्रास वापर होतो, त्या ऐवजी मराठीला प्राधान्य देत मराठीचा वापर वाढावा यासाठी विशेष अभ्यासक्रमासह मराठी साहित्याचे अध्ययन व अध्यापन यावर विद्यापीठाचा भर असणार आहे. यासाठी इतर राज्यातील विद्यापीठांची कार्यपद्धती, अभ्यासक्रम व त्याचे उपयोजन आदींची सविस्तर माहिती घेण्यात येत आहे.
परदेशातील साहित्याचे अनुवाद मराठीत व येथील मराठी साहित्य जगभरात अनुवादित स्वरूपात उपलब्ध करता यावे यासाठी अनुवादावर आधारित शिक्षण, इतर भाषेतील साहित्य व मराठी साहित्याचा तौलानिक अभ्यास या विषयांवर येथे अभ्यासक्रम असणार आहे. आपल्या देशात लिपी स्वरूपातील महत्वपूर्ण दस्तावेज खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून अनेकांचा अद्याप अर्थबोध झालेला नाही. अशा लिपींचा अभ्यास व संशोधन करून देशाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक दस्तावेज जतन करण्याच्या उद्देशाने लिपी आधारित अभ्यासक्रम येथे असणार आहे. मराठीचा सर्वसमावेशक अभ्यासक्रम विकसित करण्यात येत आहे. उपयोजित कले अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखा व सर्व क्षेत्रांना साहित्याशी जोडणाऱ्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे.
रिद्धपूर येथील विद्यापीठासाठी सुमारे ६० एकर जागा संपादन करण्याबाबत शासनाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षापसून येथे काही अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत व्यवस्थापकीय परिषदेने मंजूरी दिली असून शासनाकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. विद्यापीठाच्या उभारणीसाठी शासनाने ४ कोटी २५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला असून त्यातील अंदाजे १ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, कार्यालय व सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. उर्वरित प्रस्तावित निधीतून विद्यापीठासाठी आवश्यक त्या सर्व बाबी म्हणजे ग्रंथालय, संदर्भ ग्रंथ कक्ष, अभ्यासिका आदींची निर्मिती करण्यात येणार आहे.
अभिजात मराठीच्या संवर्धनासह तिचे भाषिक सौष्ठव जपून ती अधिकाधिक समृद्ध व्हावी यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून एक नवे पर्व सुरू झाले आहे. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात, 'जगातील सर्व प्रगल्भ भाषांना जे साधलं ते मराठीलाही साधता येईल. फक्त आपला विश्वास हवा, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायभाषेच्या क्षमतेवर.
अभिजात मराठीचा अभ्यास, संशोधन व विकास करता यावा यासाठी उभारण्यात आलेल्या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर असंख्य हृदयात हा विश्वास दृढ झाला आहे!
श्रीमती पल्लवी धारव
सहायक संचालक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
नागपूर.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)