गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

मराठी साहित्य संमेलनांची समृद्ध परंपरा

मराठी साहित्य संमेलनांची समृद्ध परंपरा साहित्य हे ललित कलांमधील अतिशय महत्त्वाचे निर्मितीमाध्यम होय. साहित्याचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजाचे प्रतिबिंब जसे त्यात उमटत असते, तसेच व्यक्ती आणि समाजाच्या भावना आणि विचारांना वळण देण्याचे कार्यही साहित्य निर्विवादपणे करीत असते. एकप्रकारे साहित्याने आजवर मानवी समाजाचे अंतरंगच अभिव्यक्त केले आहे. विवेक आणि विकारांच्या नाना तऱ्हा आणि त्यांचे कालपरत्वे बदलते संदर्भ साहित्याने अधोरेखित केले आहेत. त्यामुळेच मानवी सभ्यता अनेक पातळ्यांवर अधिक परिणामकारक बनली. मराठी साहित्य संस्कृतीची आजवरची परंपराही यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची एक समृद्ध परंपरा आहे. अलीकडेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. भारतीय भाषांमध्ये आजवर संस्कृत, तामीळ, मल्याळम, कानडी, तेलगू आणि उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता. मराठी भाषेची प्रदीर्घ परंपरा असल्याचे अनेक पुरावे रंगनाथ पठारे समितीने केंद्र सरकारकडे सादर केले होते. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यात पुढाकार घेतला आणि तिचे अभिजातपण शिक्कामोर्तब केले, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मराठी साहित्याची पायाभरणी ही चक्रधर स्वामी आणि एकूण महानुभव साहित्यिक आणि संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, मुक्ताबाई, संत तुकाराम, संत चोखाबा आणि त्यांचा परिवार इत्यादींच्या लेखनातून झाली. या साहित्यातूनच व मराठी भाषेतून खरे म्हणजे वैश्विकता अभिव्यक्त होत आली आहे. सर्व भेदाभेदांना अमंगळ ठरवून विश्वाच्या कल्याणासाठीचे 'पसायदान' मराठी भाषेतून अभिव्यक्त झाले आहे. तसेच कवी नरेंद्र आणि इतर अनेक कवींच्या कवितेतून मराठी बाणेदारपणाही व्यक्त झाला आहे. मध्ययुगीन, आधुनिक आणि समकाळात विविध प्रकारे मराठीमधून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, कौंटुबिक जाणिवांची अभिव्यक्ती होत आली आहे. शिवाय वर्गीय, वर्णीय, लिंग जाणिवांसोबत परिघाबाहेरील व आदिम ठरवल्या गेलेल्या समुहजाणिवा देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्णतेने मराठी साहित्यात प्रतिबिंबित झाल्या आहेत. प्राचीन परंपरा कवेत घेत जागतिकीकरणकरणाचा वेध घेत मराठी साहित्य समृद्ध अशी वाटचाल करीत आहे. या परंपरेविषयी निश्चितच आपल्या अभिमान आहे. आज बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेचा उच्चरवाने उद्घोष सुरू असतानाच जगाच्या विविध भागांमधील अनेक भाषा मृतप्राय ठरत आहेत. तर काहींची स्थिती चिंताजनक असल्याचे अनेक अभ्यास पुढे येत आहेत. अशा काळात भाषांचा गौरव, मातृभाषांविषयीची जबाबदारी अशा बाबींना प्रकर्षाने महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थात आपल्या भाषेविषयी आदर आणि अभिमान बाळगत असतानाच तिच्या अस्तित्त्वाबाबत आणि भवितव्याबाबतची सजगता बाळगून भविष्यवेधी कृतिशील क्रिया-प्रक्रियांना वेग आणणे, ही त्या त्या भाषेतील साहित्यिक, भाषा अभ्यासक आणि पर्यायाने एकूणच संपूर्ण भाषिक समाजाची जबाबदारी असते. त्यादृष्टीने जे विविध प्रयोग आणि कृती करावयाच्या असतात. त्याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षांपासून संपन्न होणारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने होत. या संमेलनाची सुरुवात १८७८ सालापासून झाली.आजवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून ९८ वे संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी,२०२५ या कालावधीत दिल्ली येथे संपन्न होणार आहे. संत साहित्य, नाट्यशास्त्र आणि लोकसाहित्य या विषयांच्या गाढ्या अभ्यासक असणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. विविध चर्चासत्रांतून अनेक मान्यवर साहित्यिक सहभागी होणार आहेत. विविध आयामांनी दिल्ली - महाराष्ट्राचे नाते अधोरेखित केले जाणार आहे. एकूणच मराठी साहित्याच्या वाटचालीकडे दृष्टिक्षेप टाकता मराठी भाषिक समाजातील पूर्व परंपरा, देशीयता आणि वास्तवाचे संदर्भ अभिव्यक्त होत असतातच जागतिक पातळीवर बदलत चालेलेल्या वैश्विक जाणिवांना सुद्धा व्यक्त करणे आवश्यक असते. शिवाय जागतिकीकरणाच्या काळात प्रदेशाच्या सीमा रेषा गळून पडल्या असून मराठी भाषिक व्यक्ती विविध राज्यांत आणि विविध देशात आज आपले शौर्य, पराक्रम आणि कर्तृत्व गाजवत आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा पार्श्वभूमीवर दिल्ली येथे संमेलन आयोजित होत आहे,ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. संमेलनांच्या माध्यमातून तेथील मराठी भाषिक समूहाला आपलेपणाची अनुभूती देणे, त्यांच्या भावविश्वाला आणि विचार विश्वाला साद घालणे, हे महत्त्वाचे कार्य साध्य करता येणार आहे. त्यांची आव्हाने समजून घेत त्यांना आपले अनुभव व्यक्त करण्यास प्रेरणा व संधी उपलब्ध करून देणे, हे देखील अशा संमेलनातून शक्य होणार आहे. विविध चर्चासत्र, कविसंमेलन या माध्यमातून अभिव्यक्त करण्यास एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. महाराष्ट्राबाहेर राज्यात संमेलन आयोजित होत असताना त्या राज्यातील भाषेतील साहित्यिक विविध प्रवाहांमध्ये नेमके काय लिहीत आहेत, मराठी व इतर भाषेतील साहित्य अभिव्यक्तीत कुठली समानता वा न उमटलेल्या बाबी जाणवतात का? किंवा कुठले भाषिक प्रयोग सुरू आहेत, यांबाबत देखील चर्चा अपेक्षित आहे. त्यातून साहित्यिक मूल्य आणि प्रतिभा यांवरही चर्चा करता येण्यास वाव मिळू शकतो, असे वाटते. मराठीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आज विविध साहित्य प्रकारात उत्तम लेखन होत आहे. महाराष्ट्रातील जीवन जाणिवा त्यातून प्रकर्षाने व्यक्त होत आहेत. काही साहित्यकृती त्या पलीकडील अनुभवविश्वसुद्धा अभिव्यक्त करीत आहेत. मात्र, अद्यापही वैश्विक पटलावर सर्वांना आपलेपणाचा अनुभव देणारी, वैश्विक जाणिवा व्यक्त करण्यासाठी लिहित्या लोकांना भरपूर अवकाश खुला आहे, हे भान निश्चितच मराठी लेखकांना येण्यास मदत होईल, असे प्रकर्षाने वाटते. रंगनाथ पठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी ज्या प्रकारचा अवकाश आणि चिंतन मांडते, ते आजच्या काळात महत्त्वाचे आहे. विविध सामाजिक ओळखींमध्ये स्वत:चे अस्तित्त्व शोधून व्यक्ती आपल्या मानवी सभ्यतेच्या विशालपटाकडे नजरअंदाज करतो. त्याच्या सर्व अस्मिताकेंद्री आविर्भावाच्या पलीकडे जाऊन त्याने विचार केला तर माणसाला दुसऱ्या माणसाशी आपले असणारे अतूट नाते जोडता येऊ शकते, याची एक जाणीव ही कादंबरी व्यक्त करते. वृथा अभिमानाच्या पलीकडे असणारे माणूसपणाचे दर्शन घडवते. या कादंबरीतील समाज-संस्कृतीतील संदर्भ वगळून सुद्धा आपल्याला त्यातील वैश्विक जाणिवा जाणवतात. वर्तमान काळातील व्यक्तीच्या अस्तित्त्वाचे विविध संदर्भ हे मर्यादित न राहता वैश्विक मानवी सभ्यता आणि संघर्षाचे नाट्यरूप अभिव्यक्त करत असल्याची जाणीव विविध साहित्यातून होत असल्याची चर्चा या संमेलनाच्या निमित्ताने निश्चित होईल. मात्र, तरीही मराठीतील साहित्यिक अभिव्यक्तीला समकालीन बदलांचे संदर्भ टिपण्यात अद्यापही मर्यादा असल्याचे नोंदविणे गरजेचे वाटते.जागतिक बाजारपेठ, विज्ञान-तंत्रज्ञान, सांस्कृतिक बहुविधता अशा अनेक पातळ्यांवर बदल होत आहेत. त्याचा अनुभव अलीकडील पिढी घेत आहे. मात्र त्याचे प्रभावी चित्रण मराठी साहित्यातून अद्याप फारसे आलेले नाही. त्यांच्या जीवनानुभवांना भिडेल असे साहित्य निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तरच मराठी साहित्य या नव्या पिढीला आपलेसे वाटेल. शिवाय ते जेव्हा अन्य भाषांमध्ये जाईल तेव्हा इतरांही त्यात आपले माणूसपण सापडेल. आशिया खंडातील जपान आणि दक्षिण कोरिया ज्या प्रकारे आपले दर्जेदार साहित्य इंग्रजीमध्ये नेण्यासाठी विशेष काळजी आणि कष्ट घेतात, त्याप्रमाणे मराठीतील साहित्य जागतिक पातळीवर जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे. अलीकडे दक्षिण कोरियातील हान कांग यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या कादंबऱ्या महत्त्वाच्या आणि दर्जेदार आहेतच पण सोबत त्यांच्या देशातून भाषांतरावर देण्यात येणारा भर देखील महत्त्वाचा आहे. म्हणून मराठीतील साहित्याची गुणवत्ता अधिक परिणामकारक करणे, त्यातून वैश्विकता अभिव्यक्त करणे हे जसे साहित्यिकांचे काम आहे, तसेच त्यांचे साहित्य जागतिक पटलावर भाषांतरांद्वारे सहज उपलब्ध करून देण्यात समाज आणि राज्यसंस्थांचे कामही महत्त्वाचे आहे. साहित्यिकांना राजाश्रय मिळाला तर या बाबींना निश्चितच वेग येईल, असा विश्वास वाटतो. मात्र त्याबाबतीत उदासीनता आणि कूपमंडूकता आपल्याला ग्रासली आहे का, याबाबत मराठी भाषेचे चाहते म्हणून आपण चिंतीत होणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर जे साहित्य वैश्विक जाणिवा व्यक्त करते, त्यातील बरेच साहित्य हे संबंधित लेखकांनी आयुष्यभर केलेल्या साधनेचे फळ आहे. बरेच साहित्यिक कमी लिहितात. ज्या विषयवर लिहायचे आहे, त्याविषयावर सखोल अभ्यास करतात, चिंतन करतात. नोट्स काढतात. अनुभव घेतात. निरीक्षण करतात. केवळ प्रतिभा आहे म्हणून एकटाकी लिहित नाही. प्रतिभेसोबत अभ्यास आणि सरावसुद्धा साहित्यात महत्त्वाचा आहे. प्रतिभेच्या लहरीवर लेखन करून ते थांबत नाहीत. प्रतिभा जेवढी महत्त्वाची तेवढीच साधनासुद्धा महत्त्वाची असते. त्यादृष्टीने मराठी साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून वैश्विक जाणिवा अभिव्यक्त करण्यासाठी वेळ द्यावा, अभ्यास करावा, हे आवश्यक आहे. मराठी साहित्यात यादृष्टीने बदल होण्याची आवश्यकता जशी आहे, तशीच भाषेचा आलेल्या नवनव्या माध्यमांमधून आणि नवनवीन प्रयोगांतून अभिव्यक्ती सशक्त करणे देखील आवश्यक आहे. तंत्रज्ञान विकासाच्या गती बरोबर आपल्या भाषेला साजेसे अद्ययावत तंत्रज्ञानाकुल करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठीचे गंभीर प्रयत्न फारसे सुरू नाहीत. मराठी भाषिक आज जगभरात विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि स्वतःच्या उद्योग व्यवसायात सहभागी आहेत. मात्र ते सुद्धा भाषिक जबाबदारी विसरून जात आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आपल्या ज्ञान कौशल्याचा स्वत:च्या मातृभाषेसाठी उपयोग त्यांनी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. भाषेच्या आणि साहित्याच्या विकासाची जबाबदारी ही केवळ साहित्यिकांची नाही. त्यांनाच त्याचा कंत्राट दिला आहे, असे समजून इतर मराठी जण आपल्या भौतिक संपन्नतेसाठी स्पर्धात्मक जीवनाची कास पकडून भाषिक जोखीम टाळून जे बेजबाबदारपणे वागतात, आणि केवळ साहित्यिकांकडून अपेक्षा ठेवतात, ते योग्य वाटत नाही. करिता प्रत्येक मराठी भाषिकाने आपला भौतिक विकास करण्यासोबत आपल्या ज्ञान कौशल्यांचा, उपलब्ध साधनांचा आपल्या भाषेसाठी उपयोग करणे, तोही जाणीवपूर्वक नि अत्यावश्यक असल्याचे जाणवते. भाषा शिक्षणाबाबत आणि भाषेचा वारसा पुढील पिढीत जाण्याबाबत आपण सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ‘शिवाजी महाराज जन्माला यावेत, मात्र ते दुसऱ्यांच्या घरात’, अशी जी वृत्ती वाढत आहे, ती आपल्या भाषेच्या स्वाभिमानाबाबत आणि त्याबाबतच्या आपल्या पोटतिडकीबाबतही खरी म्हणावी अशी आपली स्थिती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मराठी भाषिक नव्या पिढीने नव्या जगात वावरताना आपल्याला भाषिक वारशात सर्व काही परिपूर्ण तयार बाबी मिळाव्यात, अशा अपेक्षा ठेवणे सुद्धा फारसे योग्य वाटत नाही. त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनातील वेळ आणि श्रम देऊन भाषेला जपले पाहिजे. तिचे पोषण नवीन पर्यावरणात केले पाहिजे. आपल्या भाषेच्या गौरवशाली इतिहासाचे कथन करण्यापेक्षा नव्या भाषिक आव्हानांमध्ये त्यांची स्थिती ओळखून स्वकष्टाने तिला घडवले पाहिजे. समाजमाध्यमे आणि इतर अन्य प्रकारांमध्ये नवथर तरुणाईला रुचेल, पचेल, झेपेल अशा स्वरुपात भाषिक उपयोग करण्यासाठी लेखन केले जावे. त्यादृष्टीने नवनवीन प्रयोग केले जावेत. त्यासाठी हे साधने हाताळणाऱ्या तरुणाईने पुढकार घेऊन अभिव्यक्ती करावी. जुन्या पिढीने अशा नव्या पिढीतील प्रयत्नांकडे सकरात्मक प्रतिसादातून बघितले पाहिजे. त्यासाठी स्वत:ची सत्तास्थाने सोडून नव्या पिढीला मुक्त अवकाश उपलब्ध दिला पाहिजे. मराठी साहित्य, चित्रपट, संगीत इत्यादींमधून काही चांगले प्रयत्न खचितच होत आहेत, मात्र तरीही त्यांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. मराठीतील लिहिणारी नवी पिढी आता जागतिक आहे. त्यामुळे त्याचे भवितव्य उज्ज्वल आणि समृद्धच असणार आहे, याची खात्री वाटते. त्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची पायाभरणी करणारीच म्हणावी लागतील. संमेलनातून भाषेच्या विकासाबाबत व तिला ज्ञानभाषेत परिवर्तित करण्याबाबत या व विविध ठिकाणी आयोजित होणाऱ्या विविध मराठी साहित्य संमेलनातून चर्चा व्हावी आणि मराठी भाषिक समुहाला प्रेरणा मिळून त्याचे कार्यकृतींमध्ये परिवर्तन घडावे, ही अपेक्षा आहे. ज्ञानदेव साहित्याचे अंतिम ध्येय अधोरेखित करताना मायमराठीला आशीर्वाद मागतात.... म्हणोनि अंबे श्रीमंते | निज जनकल्पलते | आज्ञापी माते | ग्रंथनिरुपणीं | नवरसीं भरवी सागर | करवी उचित रत्नांचे आगर| भावार्थाचे गिरिवर | निपजवी माये| साहित्यसोनियाचिया खाणी | उघडवी देशियेचिया क्षोणी| विवेकवल्लीची लावणी | हों देइ सैंघ || संवाद फळनिधानें | प्रमेयाची उद्यानें | लावी म्हणे गहनें | निरंतर || पाखांडाचे दरकुटे | मोडी वाग्वाद अव्हांटे| कुतर्कांची दुष्टे | सावजे फेडी || ये म-हाटीचिये नगरीं | ब्रह्मविद्येचा सुकाळ करी| घेणें देणें सुखचि वरी| होतं देई या जगा || आपल्या देशाचे जबाबदार नागरिक होण्याला उपयुक्त अशा भावार्थ विषयांना अत्यंत रसाळपणे आपल्या साहित्यकलेने लोकांसमोर ठेवण्याचा अट्टाहास बाळगाणाऱ्या ज्ञानदेवांची अभिलाषा सर्व साहित्यिकांना लाभो आणि वाचकांनाही याच परतत्त्वाचा स्पर्श लाभो,ही ईश्वरचरणी प्रार्थना करते ! -डॉ सौ. मोना मिलिंद चिमोटे भ्र.क्र. (९४२२१५५०८८) प्राध्यापक व विभागप्रमुख तसेच अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती (संकलन- विभागीय माहिती कार्यालय, अमरावती)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा