शुक्रवार, ११ जुलै, २०२५
पालकमंत्र्यांकडील तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी *20 तक्रारींवर झाली सुनावणी
अमरावती, दि. 11 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध ठिकाणी आलेल्या निवेदनांवर जिल्हाधिकारी यांनी आज सुनावणी घेतली. यात तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागांना सुचना केल्या. तसेच नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या.
पालकमंत्री श्री. बावनकुळे आणि त्यांच्या पालकमंत्री कार्यालयात नागरिक भेटी देऊन समस्यांबाबत निवदेन सादर करतात. या तक्रारींवर संबंधित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभागाप्रमुखांना उपस्थित राहिल्याने थेट निर्देश देऊन तक्रारीच्या अनुषंगाने नागरिकांचे समाधान करण्यात आले. यावेळी परिविक्षाधिन अधिकारी कौशल्या, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
आज झालेल्या तक्रारींमध्ये पर्यावरणाची शपथ सर्व शाळांमध्ये देण्यात यावी, यासाठी सर्व शाळांना निर्देश द्यावे. असदपूर बुडीत क्षेत्रातील व्यावसायिकांना मदत करून त्यांच्या व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागवावे. तसेच असदपूर-अमरावती बस सेवा नियमित सुरू करण्यासाठी विभागनियंत्रकांना सूचना देण्यात येणार आहे. फ्रेजपूरा येथील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची आवश्यकता आहे. त्यानुसार योग्यवेळी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. हनुमान मंडळासाठी लिजवर जागा आवश्यक असल्याने त्यांनी नोंदणीकृत ट्रस्टद्वारे अर्ज करावा, यावर जिल्हास्तरावर गतीने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
मेळघाटातील वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रभुदास भिलावेकर यांनी केली. याबाबत वन कायद्यानुसार सर्व परवानगी घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. तसेच मेळघाटात अवैध धंद्यांवर तातडीने कार्यवाही करावी. आवश्यकता भासल्यास तडीपारीची कार्यवाही करावी. त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा, असे निर्देश दिले. मेळघाटातील खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेसची स्थिती प्रादेशिक परिवहन विभागातर्फे तपासण्यात येतील. यात आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात येतील. यासोबत आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याबात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा