मंगळवार, ८ जुलै, २०२५
मृग बहारासाठी पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाकडून आवाहन
अमरावाती, दि. ८ :कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटा हा मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतक-यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची गरज आहे. ही बाब लक्षात घेता अमरावती विभागात प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना वर्ष 2024-25 व २०२५-२६ या दोन वर्षासाठी राबविण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली असून अमरावती विभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक प्रमोद लहाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अमरावती विभागात अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यात मृग बहार २०२४ मध्ये संत्रा, मोसंबी, लिबु, पेरू, डाळिंब, सीताफळ, चिकू या फळपिकाकरिता अधिसुचित क्षेत्रामध्ये योजना राबविण्यास अनुमती देण्यात आली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय डी) बंधनकारक राहील. तसेच पिक आणि फळपीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी मध्ये नोंद करणे अत्यावश्यक आहे. ई-पिक पाहणी मधील नोंद
व विमा उतरवलेले पीक यात विसंगती आढळल्यास सदर विमा अर्ज रद्द होईल, याची सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये (मृग बहार) पुढीलप्रमाणे आहे:
सदर ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे, या योजनेत खातेदाराचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत, मात्र भाडेपट्टीने शेती करणारा नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे, या योजनेंतर्गत केंद्र शासनाने त्यांचे विमा हप्ता अनुदान ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केले आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. योजनेतर्गत ३० ते ३५ टक्के पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असुन ३५ टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५०:५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे, या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण वगळता उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) ची मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम, मिळून प्रत्ती शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील. अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब) सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतक-यांनी ई- पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी शेतकऱ्याचे बैंक खाते आधार आधारित पेमेंट साठी लिंक असावे. केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षणाचे कवच लाभणार आहे.
योजनेत भाग घेण्यासाठी अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय खालीलप्रमाणे आहे पिक पेरु 3 वर्ष चिकू 5 वर्ष संत्रा 3 वर्ष मोसंबी 3 वर्ष डाळिंब 2 वर्ष लिंबु 4 वर्ष आंबा 5 वर्ष सिताफळ 3 वर्ष या प्रमाणे आहेत.
अमरावती विभागात ही योजना पुढीलप्रमाणे कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
जिल्हे, विमा कंपनीचे नाव व पत्ता आदींचा तपशिल पुढीलप्रमाणे:
अमरावती/अकोला: युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं, लि. १०३ पहिला मजला MAIDC, आकृती स्टार, सेन्ट्रल रोड अंधेरी (पूर्व)- मुंबई ४०००९३ टोल फ्री क्र. १८००:२२४०३०/१८०० २००४०३० ई-मेल contactus@universalsompo.com
बुलढाणा/वाशिम: बजाज अलियान्झ जनरल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे क्षेत्रीय कार्यालय ४ था मजला, टोवर नं.०७कॉमर झोन IT पार्क, सम्राट अशोक पथ, येरवडा जेल रोड, पुणे-४११००६ टोल फ्री क्र.१८००२०९५९५९ ई-मेल -bagichelp@bajajallianz.co.in
यवतमाळ: भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्चेज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई - ४०००२३ टोल फ्री क्र.१८००४१९५००४ दुरध्वनी क्र. ०२२-६१७१०९१२ ई-मेल-pikvima@aicofindia.com
तरी जास्तीत जास्त शेतक-यानी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बैंक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर विहीत मुदतीत विमा हप्ता भरुन सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसचालक अमरावती विभाग, अमरावती यांनी केलेले असून या योजनेबाबत अधिक माहीतीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे विभागीय कृषि सहसंचालक प्रमोद लहाळे अमरावती विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा