सोमवार, २८ जून, २०२१

अमरावती विभागात खरीपाची साठ टक्के पेरणी पूर्ण

 

अमरावती विभागात खरीपाची साठ टक्के पेरणी पूर्ण

Ø  तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस पेरणीला वेग

Ø 75 ते 100 मिलीमिटर पावसानंतर पेरणीची शिफारस

           अमरावती, दि. 28 : अमरावती विभागात यावर्षीच्या खरीप हंगामात 60 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. विभागात सर्वाधिक पेरणी 87 टक्के वाशिम जिल्ह्यात झाली आहे. गेल्यावर्षी याचदरम्यान 73 टक्के पेरणी झाली होती. यावर्षी तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस पेरणीला वेग आला आहे.

खरीप हंगामासाठी शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे. पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. सर्वसाधारण खरीपाची पेरणी 75 ते 100 मिलीमिटर पावसाची नोंद झाल्यावर करण्याबाबत कृषी विद्यापीठांनी शिफारस केली आहे. अमरावती विभागात आतापर्यंत 184.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात बुलडाणा 136.7, अकोला 79.1, वाशिम 211.9, अमरावती 189.4 आणि यवतमाळात 257.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अमरावती विभागातील 56 तालुक्यांत 388 महसूल मंडळ समाविष्ट आहेत. यात 11 महसूल मंडळात 0 ते 25 मिमी, 25 मंडळात 25 ते 50 मिमी, 41 मंडळात 50 ते 75 मिमी, 38 मंडळात 75 ते 100 मिमी, तर 273 मंडळात 100 मिमीच्या वर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

अमरावती विभागात सरासरी 60 टक्के पेरणी झाली आहे. यावर्षीच्या 32 लाख 28 हजार 581 हेक्टरपैकी 19 लाख 53 हजार 845 हेक्टर क्षेत्रावर आजअखेर पेरणी झाली आहे. यात सोयाबीन 9.39 लाख, कापूस 6.87 लाख, तूर 2.56 लाख, मूग 20 हजार, उडीद 17 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी वाशिम जिल्ह्यात 87.1 टक्के, यवतमाळ 72.4, अमरावती 59, बुलडाणा 56.4, अकोला जिल्ह्यात 24 टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षी आजदरम्यान 23 लाख 41 हजार 569 हेक्टरपैकी 73 टक्के हेक्टरवर पेरणी झाली होती.

विभागात सर्वाधिक म्हणजे 76 टक्के कडधान्याची पेरणी वाशिम जिल्ह्यात झाली आहे. यात 516 हेक्टरवर तूर, 33 हेक्टरवर मुग, 12 हेक्टरवर उडीद आणि 8 हेक्टरवर इतर कडधान्याची पेरणी करण्यात आली आहे. 2 हजार 772 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आले आहे.

            अमरावती जिल्ह्यात 36 टक्के तृणधान्याची पेरणी करण्यात आली असून यात 30 हेक्टरवर भात, 45 हेक्टरवर ज्वारी, 65 हेक्टरवर मका या पिकांची पेरणी करण्यात आली आहे. 739 हेक्टर क्षेत्रावर तूरीची लागवड करण्यात आली असून या पिकाची टक्केवारी 66 टक्के आहे.

            तेलबियाच्या पेरणीमध्ये वाशिम जिल्ह्यात सरासरी 92 टक्के क्षेत्र व्यापले आहे. 2 हजार 773 हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात 2315 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आली आहे. पेरणीचा हा वाटा एकूण टक्केवारीच्या 56 आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2033 हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले आहे. आतापर्यंत 73 टक्के सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात 595 हेक्टरवर 27 टक्के सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. अमरावती येथे 1 हजार 669 हेक्टरवर 56 टक्के सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. विभागात एकूण 9 हजार 395 हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. विभागात सोयाबीन पिकाच्या पेरणीचा एकूण वाटा 62 टक्के एवढा आहे.

            कापूस आणि ऊसाची सर्वाधिक पेरणी वाशिम जिल्ह्यात झाली आहे. कापूस व ऊसाची पेरणी अनुक्रमे 92 व 34 टक्के झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3 हजार 687 हे वर कापूस पिकाने 83 टक्के क्षेत्र व्यापले असून 19 टक्के ऊसाची लागवड करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात 1184 हेक्टरवर 70 टक्के क्षेत्र कापूस तर 18 टक्के ऊसाचे लागवड क्षेत्र आहे. विभागात 6 हजार 873 हेक्टरवर कापूस पेरण्यात आला असून पेरणीची एकूण टक्केवारी 60 एवढी असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी कळविले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा