‘कौंडण्यपूर’ व ‘माताखिडकी’ला ब दर्जासाठी एकत्रित प्रस्ताव देण्याचे निर्देश
पर्यटन विकास आराखड्याच्या पहिल्या
टप्प्यात रिध्दपूरचा समावेश
-
पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर
अमरावती,दि.9: महानुभाव पंथाची काशी श्री क्षेत्र
रिध्दपूरचा जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखडयाच्या
पहिल्या टप्प्यात समावेश करुन कामांना सुरुवात करावी. आवश्यक मुलभूत सुविधा तिथे प्राधान्याने
पूर्ण कराव्यात. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर
आणि अमरावती शहरातील माताखिडकी देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी एकत्रित प्रस्ताव
सादर करावे, असे निर्देश महिला व बालविकास
मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
जिल्हयाची पर्यटन विकास आढावा बैठक आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. वरुड-मोर्शीचे आमदार देवेंद्र
भुयार, दर्यापुरचे आमदार बळवंतराव वानखेडे, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रतापराव अडसड,
माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पियुष सिंह, उपायुक्त
किरण जोशी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पर्यटन विकास महामंडळाचे विवेकानंद
काळकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे, कार्यकारी
अभियंता शरद थोटांगे, विभावरी वैद्य आदी उपस्थित होते.
रिध्दपूर येथे पर्यटन विकासासाठी मुलभूत सुविधांचा
प्रस्तावात प्राधान्याने समावेश असावा. ज्यात प्रामुख्याने ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत,
स्मशानभूमी, कब्रस्तान, अत्याधुनिक बसस्थानक, कवायतींची मैदाने, ग्रंथालये, रस्ते यांचा
समावेश असावा. रिध्दपूर येथील थिम पार्क, विद्युत रोषणाई, बहुउद्देशिय सभागृहाची निर्मिती
इत्यादी सर्व विकासकामांसाठी 22 कोटी 32
लक्ष निधीला प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. अंदाजे 10 कोटी निधीतून प्रसाधन गृहे,
शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्मितीची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी
तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. धाबेरी, पाळा, माताखिडकी,
काटसुर आणि मातृग्राम या स्थळांचा रिध्दपूर प्रस्तावात समावेश करावा, असेही निर्देश
त्यांनी दिले.
सासु सुनेच्या
विहीरीचे सौंदर्यीकरण
याच परिसरात सासु-सुनेची विहीर हे प्रसिध्द स्थळ
आहे. महानुभाव पंथात आख्यायिका लाभलेल्या या विहीरीचे जतन करण्याच्या उद्देशाने या
विहीरीची देखभाल व आसपासच्या परिसराचे सौंदर्यीकरण व विहीरीकडील प्रवेशद्वार सुशोभित
करण्यात यावे, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. सालबर्डी, अंबाडा, गव्हाणकुंड,
बेडापुर क्षेत्र विकसीत करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे, असेही त्यांनी
सांगितले.
शेंडगाव
विकास आराखड्यातील कामे पूर्ण करा
संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ शेंडगावचा पर्यटनदृष्ट्या
विकास करण्यासाठी 18 कोटी 63 लक्ष एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
त्याअंतर्गत तेथे गाडगेबाबांचे जीवनपट उलगडणारे कलादालन, ग्रामसफाई अभियान प्रशिक्षण
केंद्र आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे. गाडगेबाबांचे जन्मगाव शेंडगाव व कर्मभूमी
आमला या स्थळांचा एकत्रित विकास करताना तेथील कामांची सांगड घालून ही स्थळे विकसित
करावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा