आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे
वाचविले प्राण,
100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले
जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली माहिती
अमरावती, दि.9: जिल्हयात पाऊस व पूरस्थितीमुळे विविध ठिकाणी
अडकलेल्या 16 व्यक्तिंना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तातडीने पोहोचून
सुखरुप बाहेर काढले, तसेच बडनेरा येथील 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले.
शहरातील बडनेरा व इतर भागात पावसाचे पाणी शिरले असता, जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी मोजा बडनेरा येथे पावसाच्या पाण्यात
अडकलेल्या 100 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढले. बडनेरा येथील झरी मंदीरात या सर्वांना
स्थलांतरीत करण्यात आले. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षाने आज
दिली.
तिवसा तालुक्यातील मोजा भिवापूर येथील तलावात 6 युवक अडकले होते. या
6 युवकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या चमुने बाहेर काढले. मोजा शिवणगाव येथे नदीला
पुर आल्यामुळे तेथील 30 लोक शिवणगाव येथे जाऊ शकले नाही, त्याकारणाने प्रशासनाने
त्यांची फत्तेपुर येथील समाज मंदीरात राहण्याची व्यवस्था केली. तिवसा तालुक्यातील
कोंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे कुऱ्हा ते आर्वी
या पुलावरुन पाणी जात असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक सध्या बंद करण्यात आली आहे.
भातकुली तालुक्यातील इब्राहिमपुर, बहादरपुर, दाढी, पेढी या गावांतील
नाला रस्त्यावरुन वाहत असल्याने यादरम्यान गावाशी संपर्क तुटला होता. बहादरपुर
येथे जाण्यासाठी निघालेल्या 9 नागरिकांना पुलावरुन पाणी वाहत असल्याने अलिकडच्या
खरबी या गावातील जिल्हा परिषद परिसरात निवारा देण्यात आला. आता तेथील परिस्थिती
सामान्य झाली असल्याची माहीती आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर-राजुरा रस्त्यावरुन दोन नाल्याच्या
प्रवाहामध्ये 8 इसम अडकले होते व येथील
त्रिवेणी संगम एकपाला मंदीरात 3 अडकलेल्या व्यक्तींना आपत्ती व्यवस्थापनाच्या
जवानांनी सुखरुप बाहेर काढले. अमरावती तालुक्यातील रोहणखेडा, पर्वतापुर,
शेवती या गावाचा पावसामुळे संपर्क तुटला
होता. तिवसा येथील मोजा ठाणाठुणी गावातील काही घरांमध्ये पाणी शिरले आणि येथील
शिवणगांवच्या सुर्यगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला होता. परंतु
आता तेथील परिस्थिती सामान्य झालेली आहे. मोजा जहागीरपुर येथील काही घरांमध्ये
पाणी शिरले त्याबाबत पंचनामे सुरु आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी
दिली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा