रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

वऱ्हा व साऊर या गावातील आपद्गग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप - पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर

 

वऱ्हा व साऊर या गावातील आपद्गग्रस्तांना

पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

शासन खंबीरपणे आपद्ग्रस्तांच्या पाठीशी

                                                                   









- पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर

अमरावती, दि. ३१: नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात जेवढे नुकसान झाले आहे तेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये, असा दिलासा पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला.

            जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ व   अतिवृष्टीमुळे  नागरिकांच्या घरांची पडझड व नुकसान झाले. नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराच्या  नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच शासनाकडून त्यांना मदत देण्यात आली आहे. त्या संबंधातील तिवसा व भातकुली तालुक्यातील  नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप आज पालकमंत्री श्रीमती ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

              वऱ्हाच्या सरपंच निलिमा समरीत, उपसरपंच अंकुश बाहतकर, जिल्हा परिषद सभापती पूजा आमले, तिवसा पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख, उपसभापती शरद वानखेडे, तिवस्याचे उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव आदी उपस्थित होते

            तिवसा तालुक्यातील  वऱ्हा येथील ५३ व साऊर येथील १७५  आपद्ग्रस्तांना धनादेशाचे वाटप श्रीमती ठाकूर यांनी केले. तिवसा तालुक्यातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे सोयाबीन कापूस व तूर या पिकांचे नुकसान झाले त्यासाठी 18 कोटी 60 लक्ष रुपये निधी  प्राप्त झाला असल्याची माहिती श्रीमती ठाकूर यांनी दिली. सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी, पंचनामे प्रक्रिया पूर्ण होताच नुकसानग्रस्तांना लवकरच  मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे श्रीमती ठाकूर यांनी इथे सांगितले.  वऱ्हा येथील शहीद कृष्णा समरीत सभागृहात  धनादेशचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती सदस्य कल्पना दिवे, निलेश खुळे, अब्दुल सत्तार उपस्थित होते.

साऊरच्या 175 लाभार्थ्यांना  धनादेश वाटप

भातकुली तालुक्यातील  साऊर येथील  175 लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 175 जणांच्या घराची पडझड व नुकसान झाले. पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होताच  अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. 21 लक्ष रुपये निधी साऊर येथील आपत्तीग्रस्तांसाठी देण्यात आले असून धनादेश वाटप श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

सरपंच दिलीप चव्हाण, उपसरपंच श्रीकांत बोंडे, ग्रामपंचायत सदस्य, तहसीलदार नीता लबडे ,लाभार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

0000000

शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेचा

शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

 

शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 29 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2021-22 ते पुढील तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. वातावरणातील आर्द्रता, गारपीट, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या   नुकसानीपासून विमा संरक्षणाद्वारे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखता यावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपात  केली आहे. विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.

फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आंबिया बहारातील विविध पिकांचा समावेश करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, केळी, पपई.  बुलडाणा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, व आंबा. यवतमाळ जिल्ह्यात संत्रा व केळी.  वाशिम जिल्ह्यात संत्रा, डाळिंब, पपई व आंबा आणि अकोला जिल्ह्यात संत्रा, मोसंबी व डाळिंब. या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.  

या योजनेअंतर्गत सन 2021-22 साठीचे पीकनिहाय कर्ज दर हे विमा संरक्षित रक्कम म्हणून ग्राह्य धरण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हे दर सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीसाठी कायम ठेवण्यात आले आहे. ही योजना वर्ष 2021-24 या तीन वर्षांमध्ये विमा कंपन्यामार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा निहाय विमा कंपनी व त्यांचा पत्ता आदी माहीती पूढील प्रमाणे आहेत.

अमरावती, वाशिम व यवतमाळ येथील विमा कंपीनीचे नाव रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, 5 मजला चिंतामणी अव्हेन्यु, विरानी औद्योगिक वसाहत जवळ गोरेगाव (ई). मुंबई 400063 ग्राहक सेवा क्र. 18001024088 असून दुरध्वनी क्र. 022-68623005 आणि ई –मेल rgicl.maharashtraagrl@relianceada.com हा आहे.

अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. पहिला मजला,एचडीएफसी हाऊस, 165-166 बॅकवे रिक्लेंमेशन, एच. टी. पारेख मार्ग चर्चगेट मुंबई -400020, टोल फ्री क्र. 18002660700, दुरध्वनी क्र. 022-62346234 असून ई- मेल pmfby.maharashtra@hdfcergo.com  हा आहे.

बुलडाणा जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, 20वा मजला, दलाल स्ट्रिट फोर्ट मुंबई -400023, टोल फ्री क्र. 18001165515 असून दुरध्वनी क्र. 022-61710912, ई- मेल pikvima@aicofindia.com आहे.

अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी खातेदारां व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपटीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. 35 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी  जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यांस अधिसूचित फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्र मया्रदेपर्यत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणतयाही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. आंबिया बहार सन 2020-21 मध्ये फळपिक निहाय योजनेचा लाभ  घेण्यासाठी मोसंबी, केळी, पपई साठी दि. 31 ऑक्टोबर पर्यंत, संत्रा पिकासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत, डाळिंबासाठी 14 जानेवारीपर्यंत, आंबा पिकासाठी 31 डिसेंबर ऑनलाईन अर्ज सादर करावे.

शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. योजनेबाबत अधिक माहितीकरीता www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषि विभागाचे विभागीय सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले आहे.

000

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

सिंचनाची कामे गतिने पूर्ण करावी - विशेष कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम








सिंचनाची कामे गतिने पूर्ण करावी

-                   विशेष कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम

नागरी सुविधा प्राधान्याने सोडवाव्या

 

अमरावती, दि. 25 : अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निम्म पेढी प्रकल्पा अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही आणि संयुक्त मोजणीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी. तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत येणाऱ्या समस्या जिल्हा परिषद, सिंचन विभाग व महसूल विभागाने समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने सोडवाव्या. पुनर्वसन झालेल्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्या असे निर्देश विशेष कार्यकारी अधिकारी (जलसंपदा) विजयकुमार गौतम यांनी संबंधीत अधिकाऱ्याना दिले. विभागातील सिंचन प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या बाबींचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज बैठक आयोजीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त पियुष सिंह, अपर जिल्हाधिकारी रामदास सिंध्दभटी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नरेंद्र फुलझेले, मुख्य अभियंता रश्मी देशमुख, यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी प्रकाश दुबे, अमरावती पुनर्वसन विभागाचे सुभाष दळवी, यवतमाळचे पुनवर्सन विभागाचे  अशोक बिबे, अकोला सिंचन विभागाचे अमोल वसुलकर, वाशिमचे कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे, , बुलडाणा भुसंपादन विभागाचे भुषण अहिरे, अमरावतीचे मुख्य अभियंता अभय पाठक, अनिल बहादुरे यांच्यासह  संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बुलडाणा येथील जिगाव प्रकल्पाअंतर्गत 219 कुटूबिंयांचे पुनर्वसन गतिने पूर्ण करावे. येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत त्याबाबतची पाहणी पुर्ण करुन  जिगाव, टाकळी, तपाळ, बेलाड येथील भुखंड वाटपाची कामे पुर्ण करावी.  ही सर्व प्रक्रिया टप्याटप्याने व उद्दिष्टासह पूर्ण करावी. येथील नागरी सुविधांच्या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. लोणार येथील वाटप झालेले भुखंड तात्काळ भूधारकांच्या नावे करण्यात यावे असे निर्देश श्री. गौतम यांनी दिले. खडकपूर्णा व पेनटाकळी  प्रकल्पाअंतर्गत विविध भुसंपादनाचे प्रस्ताव दाखल असून त्या क्षेत्राबाबत भूसंपादनाची कार्यवाही सुरु असल्याची माहीती संबंधितांनी दिली.

वाशिम जिल्हातील 11 बॅरेजेस येथील भुसंपदानची प्रक्रिया पूर्ण झाली असून महावितरणाने 5 हजार विज जोडण्या तात्काळ पूर्ण कराव्या. अकोला येथील कवठा बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले परंतु तेथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे सिंचनाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असल्याची माहिती संबंधितानी दिली. यासाठीचा प्रस्ताव तयार करुन त्या बाबत पाठपुरावा करावा व  राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या या रस्त्याचे    गुणांकन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश श्री. गौतम यांनी दिले.

                                                       000000 

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१



*_विविध पोलीस इमारतींच्या लोकार्पणासह ८३ गावे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन_*


*पोलीसांना आवश्यक सर्व सुविधा पुरविणार; पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी आवश्यक निधी देऊ*
- *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
* पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यास प्राधान्य 
*पोलिसांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही
* परतवाडा पोलिस ठाण्याला आवश्यक निधी देऊ


अमरावती, दि. २१ : जनतेच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. पोलिस आपले कर्तव्य चोखपणे बजावित असल्यामुळे आपण सुरक्षित वातावरणात राहतो. त्यामुळे पोलिसाप्रती कृतज्ञता म्हणून राज्य शासन हिताचे विविध निर्णय घेत आहे. पोलिसांच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते अचलपूर आणि सरमसपुरा येथील पोलिस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती आणि पोलिस वसाहत, चांदूरबाजार पोलिस ठाणे, शिरजगाव कसबा, पथ्रोट येथील नवीन पोलिस इमारती आणि पोलिस ठाणे, आसेगाव येथील पोलिस वसाहतींचा उद्घाटन आणि लोकार्पण, तसेच अचलपूर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ८३ गावे प्रादेशिक ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन दूरस्थ पद्धतीने करण्यात आले.
यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल दुरस्थ पद्धतीने उपस्थित होते, तर 
अचलपूर येथील कार्यक्रमाला जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, नगराध्यक्षा सुनिता फिस्के, विशेष पोलिस महानिरिक्षक चंद्रकिशोर मिना, पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, पोलिस गृहनिर्माणचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पोलीस ठाणे आणि निवासाच्या इमारती पूर्ण करण्याबरोबरच वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या पोलिसांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त होण्याच्या मार्ग मोकळा करण्यात आला आहे. पोलिसांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जनताभिमुख करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोरोनाकाळात पोलिसांनी अभूतपूर्व असे कार्य केले. त्यामुळे पोलिसांसाठी निधीची कमतरता पडू देण्यात येणार नाही. परतवाडा येथील पोलिस ठाण्यासाठी निधी देण्यात येईल.
संपूर्ण देशात निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचा असमतोल होत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या कठीण काळात साथ दिली, हीच साथ यापुढेही द्यावी.

पेयजल उपलब्धतेसाठी संपूर्ण राज्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सोय करण्यात येत आहे. प्रामुख्याने विदर्भातील खारपाण पट्ट्यात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. या संपूर्ण योजनांना निधी उपलब्ध करून देऊन योजना तातडीने पूर्ण करण्यात येतील.
जनतेने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या विनंतीला मान देऊन लवकरच अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर प्रति माणसी 55 लिटर पाणी उपलब्ध होईल. अचलपूर येथील पाणीपुरवठा योजनेला सपन धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याचा उद्भव चांगला असल्याने या योजना यशस्वी ठरतील. जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील 27 हजार गावातील प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था यंत्रणेच्या कामाचा व्याप जादा असल्याने अतिरिक पोलिस अधिक्षक देण्याची मागणी राज्यमंत्री श्री. कडू यांनी केली. आठपैकी सहा पोलिस ठाणे इमारती पूर्ण झाली असून उर्वरित दोन ठाण्यांसाठी निधी देण्याचीही मागणी त्यांनी केली. प्रबोधनकार विकास आराखड्यातून २५ कोटी दिल्यास शहराचा विकास होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले.


विशेष पोलिस महानिरिक्षक चंद्रकिशोर मिना यांनी आभार मानले.

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलीसांना मानवंदना

 

पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलीसांना मानवंदना

अमरावती, दि. 21 : देशात शांतता तसेच कायदा वा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पोलिस करतात. देशाच्या रक्षणासाठी लढतांना गत वर्षभरात कर्तव्य बजावत असतांना हौतात्म पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांना आज पोलीस स्मृतीदिनानिमित्त येथील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात आयोजीत विशेष कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. गत वर्षात देशातील सर्व राज्यात पोलीस दलातील 377 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. यावेळी त्या सर्वांचे स्मरण करुन  त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शहिद पोलीस उपनिरीक्षक संजय चौगुले यांच्या पत्नी श्रीमती विजयालक्ष्मी चौगुले या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, पोलीस आयुक्त अविनाश बारगळ, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, लक्ष्मण डुमरे, पूनम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

                                 फैरी झाडून मानवंदना

मैदानातील शहीद स्मृतीस्तंभास प्रथम श्रीमती चौगुले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनतर पोलीस दलातील उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी हुतात्मा वीर जवानांच्या स्मरणार्थ शहीद स्मृतिस्तंभास पुष्षचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहली. वीरगती प्राप्त झालेल्या 377 जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायती दरम्यान करण्यात आले. वीर जवांनाना अभिवादनासाठी परेड सलामी देण्यात आली.बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून वीरांना मानवंदना देण्यात आली. सुत्रसंचालन पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन ठोसरे यांनी केले.

हुतात्मा दिन साजरा करण्याबाबतची माहीती यावेळी देण्यात आली. लद्दाख येथे 21 ऑक्टोबर 1959 रोजी देशाचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 10 शिपायाच्या तुकडीवर चिनी लष्कराने हल्ला केला. या तुकडीने त्यांच्याशी लढा देतांना प्राणाची आहुती दिली. पोलीस दलाने या वीरांचे स्मारक उभारले. या वीर जवानांची आठवण म्हणून संपुर्ण देशभर पोलीस प्रशासनातर्फे 21 ऑक्टोबर हा दिवस हतात्मा दिन म्हणून पाळला जातो.

                                                          0000000















बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

विभागीय आयुक्त कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

 

                                     विभागीय आयुक्त कार्यालयात

महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

 

अमरावती, दि. 20 : 'रामायणा'चे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

 

00000

 

 

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त सीआरपीएफच्या सायकल रॅलीचे पालकमंत्र्यांकडून स्वागत

 




‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
निमित्त 

सीआरपीएफच्या सायकल रॅलीचे पालकमंत्र्यांकडून स्वागत

  अमरावती, दि. 18 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने आयोजीत एकतेचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीला शुभेच्छा देऊन आपण रॅलीत सहभागी जवानांचे मनोबल वाढवू. एकात्मतेचा संदेश देणाऱ्या ह्या रॅलीमुळे सर्वत्र सकारात्मक उर्जेचा संचार होणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सायकल रॅलीचे स्वागत करतांना जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी गौरवोद्गार काढले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (31 ऑक्टोबर) केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आज अमरावती येथील राजकमल चौकात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी या रॅलीचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. रॅलीचे नेतृत्व केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडंट डॉ.चेतन शेलोटकर करत असून, रॅलीत राहुल भसारकर, सेकंड कमांडर मुकेश कुमार, कमांडर संजय बमोला, मुख्य वैद्यकीय अधिकारी शैलेंद्रकुमार व जवानांचा सहभाग आहे. नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली ते गुजरात येथील केवडिया स्थित स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत रॅली आयोजित करण्यात आली आहे.  त्यानुसार या रॅलीने काल गुरुकुंज मोजरी येथून प्रस्थान केले. 31 ऑक्टोंबरला ही रॅली गुजरात मधील केवडीया येथे दाखल होणार आहे.

यावेळी  आमदार बळवंत वानखडे, महानगर पालीका विराधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली ठाकरे, संजय वाघ, अभिनंदन पेंढरी, नंदकिशोर कुईटे, सुरेश रतावा, मनोज भेले, हरिभाऊ मोहोड, वसंतराव साऊरकर, शोभा शिंदे, प्रदीप हिवसे, प्रशांत महल्ले, अनिल माधोगडीया, जयश्री वानखडे आदी उपस्थित होते.

   रॅलीच्या माध्यमातून शारिरीक आरोग्य राखण्याबाबत संदेश, युवकांमध्ये खेळाप्रती जागरुकता निर्माण करणारे, पर्यावरणाचे रक्षण, देशाची अखंडता, देशप्रेम निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मता राखण्याबाबत संदेश देण्यात येत असल्याची माहिती रॅलीत सहभागी जवानांनी दिली. ही सायकल रॅली बारा ते तेरा जिल्ह्यांमधून जाणार असून जवळपास अकराशे किमी अंतर पार करणार आहे. रॅलीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील 76 जवानांचा समावेश असल्याची माहिती रॅलीच्या आयोजंकांनी दिली.

000000

 

रस्ता दुरूस्ती,सुधारणांची कामे गतीने पूर्ण करावी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 








रस्ता दुरूस्ती,सुधारणांची कामे गतीने पूर्ण करावी

                   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

                              67 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन

 अमरावती, दि. 18 :जिल्ह्याच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. दळणवळण व वाहतूकीच्या दृष्टीने दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात यावी व प्रशासकीय यंत्रणेने ही कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत कॅम्प शॉर्ट मार्गावरील पंचवटी चौक ते राजपूत ढाबा चौकापर्यंतचे कॉक्रिंटीकरणाचे सुमारे 62 कोटी रुपये निधीच्या कामाचे भुमिपूजन व अमरावती-बडनेरा मार्गावरील हॉटेल गौरी इन ते पंचवटी चौक येथील रस्त्याची दुरूस्ती व सुधारणाचे अंदाजे 5 कोटी रुपये निधीच्या कामाचे भुमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

भूमिपूजन समारंभाला खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंत वानखेडे, महानगर पालिका विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव देशमुख, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड आदी उपस्थित होते.

यावेळी अधिक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी रस्ते सुधारणा कामाबाबतची माहिती श्रीमती ठाकूर यांना दिली. कार्यकारी अभियंता सुनिल थाटोंगे, अभियंता नितीन देशमुख, शाखा अभियंता संदिप ठाकुर आदी उपस्थित होते.

.

000000

 

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास 20 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ/दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी खासगीरित्या परिक्षा देण्यासाठी 27 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे

 

                           विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 व नुतणीकरणाचे अर्ज सादर करावे

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास

 20 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ

 

  अमरावती, दि. 12 : सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जातीसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, विजाभजसाठी मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी, इमावसाठी राजश्री शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व विमाप्र प्रवर्गासाठी व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात. या योजनेकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2020-21 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता योजनांचे अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच सन 2019-20 या वर्षातील नूतनीकरणाचे अर्ज नव्याने सादर (Re-Apply) करण्याकरीता सुध्दा मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व संस्था व महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलला 20 ऑक्टोबर पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी https:// mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात यावे,

तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जातील  संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून त्वरीत त्रुटीपुर्तता करुन घ्यावी. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून विहित वेळेत अर्ज भरुन घ्यावे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती माया केदार यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                   00000

वृत्त क्र. 127                                                                  दि.-12ऑक्टोबर 2021

                           

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी खासगीरित्या परिक्षा देण्यासाठी

27 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती दि. 12:- इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

             त्यानुसार सन 2022 मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नं. 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नियमित शुल्काने भरण्याबाबत मुदतवाढ देण्यात येत आहे. दिनांक 13 ते 27 ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन सादर करावे. 14 ते 28 ऑक्टोबर  विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन झेरॉक्स प्रत व मुळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावी.

               महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरावा, कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीचा सन 2021 चा निकाल जुलै ऑगस्ट मध्ये लागलेला असल्याने खाजगी नाव नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख 31 ऑगस्ट 2021 अशी ग्राह्य धरण्यात यावी, सदर बदल कोविडमुळे फक्त सन 2022 च्या परीक्षेपुरताच लागू राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या दवाखान्यातील प्रमाणपत्राची छायांकित प्रत प्रमाणित करुन अर्जासाबत सादर करावी. ऑनलाईन अर्ज सादर करतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्र. 020-25705207/25705271 संपर्क साधावा. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असे विभागीय सह सचिव यांनी कळविले आहे.

0000000

 

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

11 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

 

11 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

 

              अमरावती दि. 8 : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी  दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात सोमवार दि. 11 ऑक्टोबर  रोजी सकाळी 11 वाजता  विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या विभागीय लोकशाही दिनामध्ये स्वीकृत अर्ज असणाऱ्या अर्जदारांनी उपस्थित राहावे. लोकशाही दिनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.  

00000

 

 

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

कामगारांचे नियमबाह्य वेतन कपात करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा - कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश

 




कामगारांचे नियमबाह्य वेतन कपात करणाऱ्या

 कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा

-          कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती, दि. 07 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत कामगारांचे होणारे अनियमीत वेतन, वेतनातून कपात करण्यात येणारी रकम आणि कामगारांची नियमबाह्य करण्यात येणारी वेतन कपात अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कामगारांच्या वेतनातून कपात झाली असल्याचे आढळून आले आहे. वेतनासाठी कामगारांना अतिरिक्त व जादा रकमेची मागणी कंत्राटदार करत असतील, तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही. वेतनासाठी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे निर्देश  कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी कामगार विभागाला दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात कामगारांच्या कामकाजाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अधिक्षक अभियंता दिलीव खालंदे, कामगार आयुक्त श्रीकांत महाले, कामगार उपायुक्त नितीन पाटणकर,  जिल्हा कामगार अधिकारी राहूल काळे, कामगार अधिकारी श्री. देठे  यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना संबंधित आस्थापनांकडून नियमीत वेतन अदा केले पाहिजे. कामगारांकडून वेतनासाठी जादा रकमेची मागणी करणाऱ्या कंत्राटदार/ पुरवठाधारकाचे नाव काळया यादीत टाकण्याची आणि त्यांचे कंत्राट रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबधितांना दिले. तसेच कामगारांचे मागील वेतन तपासण्यात यावे. त्यामधे आढळलेल्या अनुशेषाची रकम त्या कामगारांना तत्काळ अदा करण्यात यावी. त्याबाबत कार्यवाही करण्यात यावी असे सांगितले.

श्री. कडू म्हणाले की, कामगारांच्या परिश्रमातून कंपनीचा तसेच संबंधित संस्थेचा विकास होत असतो. कामगार हा कंपनीचा अविभाज्य घटक असून त्याच्या कष्टाचा मोबदला व आवश्यक सुविधा पुरविणे हे कंपनीचे  काम आहे. बाह्य यंत्रणेद्वारे काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन विषयक समस्या सोडविण्यासाठी कंपनीने सकारात्मक असावे. तसेच त्यांना येणाऱ्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. 

000000