सिंचनाची कामे गतिने पूर्ण करावी
-
विशेष कार्यकारी अधिकारी विजयकुमार गौतम
नागरी सुविधा प्राधान्याने सोडवाव्या
अमरावती, दि. 25 : अमरावती जिल्ह्यातील
भातकुली तालुक्यातील निम्म पेढी प्रकल्पा अंतर्गत भूसंपादनाची कार्यवाही आणि संयुक्त
मोजणीची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी. तेथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत येणाऱ्या
समस्या जिल्हा परिषद, सिंचन विभाग व महसूल विभागाने समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने
सोडवाव्या. पुनर्वसन झालेल्या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्या
असे निर्देश विशेष कार्यकारी अधिकारी (जलसंपदा) विजयकुमार गौतम यांनी संबंधीत अधिकाऱ्याना
दिले. विभागातील सिंचन प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या बाबींचा आढावा घेण्यासाठी विभागीय
आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज बैठक आयोजीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय आयुक्त
पियुष सिंह, अपर जिल्हाधिकारी रामदास सिंध्दभटी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नरेंद्र
फुलझेले, मुख्य अभियंता रश्मी देशमुख, यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी प्रकाश दुबे, अमरावती
पुनर्वसन विभागाचे सुभाष दळवी, यवतमाळचे पुनवर्सन विभागाचे अशोक बिबे, अकोला सिंचन विभागाचे अमोल वसुलकर, वाशिमचे
कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे, , बुलडाणा भुसंपादन विभागाचे भुषण अहिरे, अमरावतीचे
मुख्य अभियंता अभय पाठक, अनिल बहादुरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बुलडाणा येथील
जिगाव प्रकल्पाअंतर्गत 219 कुटूबिंयांचे पुनर्वसन गतिने पूर्ण करावे. येत्या 15 नोव्हेंबर
पर्यंत त्याबाबतची पाहणी पुर्ण करुन जिगाव,
टाकळी, तपाळ, बेलाड येथील भुखंड वाटपाची कामे पुर्ण करावी. ही सर्व प्रक्रिया टप्याटप्याने व उद्दिष्टासह पूर्ण
करावी. येथील नागरी सुविधांच्या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता प्राप्त होण्यासाठी
आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. लोणार येथील वाटप झालेले भुखंड तात्काळ भूधारकांच्या
नावे करण्यात यावे असे निर्देश श्री. गौतम यांनी दिले. खडकपूर्णा व पेनटाकळी प्रकल्पाअंतर्गत विविध भुसंपादनाचे प्रस्ताव दाखल
असून त्या क्षेत्राबाबत भूसंपादनाची कार्यवाही सुरु असल्याची माहीती संबंधितांनी दिली.
वाशिम जिल्हातील
11 बॅरेजेस येथील भुसंपदानची प्रक्रिया पूर्ण झाली असून महावितरणाने 5 हजार विज जोडण्या
तात्काळ पूर्ण कराव्या. अकोला येथील कवठा बॅरेज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले परंतु तेथून
जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे सिंचनाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असल्याची
माहिती संबंधितानी दिली. यासाठीचा प्रस्ताव तयार करुन त्या बाबत पाठपुरावा करावा व राष्ट्रीय महामार्गात येणाऱ्या या रस्त्याचे गुणांकन करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात
यावी असे निर्देश श्री. गौतम यांनी दिले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा