पोलीस
स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलीसांना मानवंदना
अमरावती,
दि. 21 : देशात शांतता तसेच कायदा वा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे
काम पोलिस करतात. देशाच्या रक्षणासाठी लढतांना गत वर्षभरात कर्तव्य बजावत असतांना हौतात्म
पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांना आज पोलीस स्मृतीदिनानिमित्त येथील पोलीस मुख्यालयातील
कवायत मैदानात आयोजीत विशेष कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. गत वर्षात देशातील सर्व
राज्यात पोलीस दलातील 377 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. यावेळी त्या
सर्वांचे स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात
आली.
शहिद पोलीस उपनिरीक्षक संजय चौगुले यांच्या पत्नी श्रीमती
विजयालक्ष्मी चौगुले या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर
मिना, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, पोलीस आयुक्त अविनाश बारगळ, पोलीस उपायुक्त विक्रम
साळी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड, लक्ष्मण
डुमरे, पूनम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
फैरी झाडून मानवंदना
मैदानातील शहीद स्मृतीस्तंभास प्रथम श्रीमती चौगुले यांनी
पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनतर पोलीस दलातील उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी
हुतात्मा वीर जवानांच्या स्मरणार्थ शहीद स्मृतिस्तंभास पुष्षचक्र अर्पण करून श्रद्धांजली
वाहली. वीरगती प्राप्त झालेल्या 377 जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायती दरम्यान
करण्यात आले. वीर जवांनाना अभिवादनासाठी परेड सलामी देण्यात आली.बंदुकीच्या तीन फैरी
हवेत झाडून वीरांना मानवंदना देण्यात आली. सुत्रसंचालन पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन
ठोसरे यांनी केले.
हुतात्मा दिन साजरा करण्याबाबतची माहीती यावेळी देण्यात
आली. लद्दाख येथे 21 ऑक्टोबर 1959 रोजी देशाचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस
दलाच्या 10 शिपायाच्या तुकडीवर चिनी लष्कराने हल्ला केला. या तुकडीने त्यांच्याशी लढा
देतांना प्राणाची आहुती दिली. पोलीस दलाने या वीरांचे स्मारक उभारले. या वीर जवानांची
आठवण म्हणून संपुर्ण देशभर पोलीस प्रशासनातर्फे 21 ऑक्टोबर हा दिवस हतात्मा दिन म्हणून
पाळला जातो.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा