शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

वैविध्यपूर्ण विषयांचे वाचन आपल्या दिनचर्येचा भाग बनवा - उपजिल्हाधिकारी मनिष गायकवाड

 











वैविध्यपूर्ण विषयांचे वाचन आपल्या दिनचर्येचा भाग बनवा

                                                                - उपजिल्हाधिकारी मनिष गायकवाड

अमरावती दि.15 (विमाका): ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार व विकास होणे आवश्यक आहे. यासाठी वैविध्यपूर्ण विषयांचे वाचन हे आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनवा. समाजमाध्यमांवरील माहितीच्या भडिमारात आपली वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने ‘वाचना’ला महत्त्व द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी  मनिष गायकवाड यांनी आज केले.

 डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. शासकीय विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. गायकवा़ड यांच्या हस्ते उत्कृष्ट वाचकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. वरिष्ठ पत्रकार अविनाश दुधे, जि. प. शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मढावी, ग्रंथालय सहायक संचालक अरविंद ढोणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

काळाची पावले ओळखून बदलणे गरजेचे  आहे. आज सर्वत्र माहितीचा पूर बघायला मिळत आहे. नवयुवकांमध्ये समाजमाध्यमांचा वापर वाढत आहे. यातून बरेचदा दिशाभूलही होते. यासाठी पुस्तकांसारखा विश्वसनीय स्त्रोत नाही. या काळात वाचन संस्कृती टिकून राहावी, यासाठी या प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  वाचनाने केवळ  ज्ञानकक्षाच रुंदावत नाही तर आयुष्यात योग्य मार्गाने जगण्याचे धडेही मिळतात. समाजमाध्यमांच्या अवलंबित्वापूर्वी आबाल वृद्धांना वाचनाची अविट गोडी होती. ती वृद्धिंगत करणे आजच्या युवकांची  जबाबदारी आहे. त्यासाठी ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमांच्या माध्यमांतून नवीन पिढीला विविध विषयांवरील पुस्तकांची ओळख होत असल्याचे श्री. गायकवाड यावेळी म्हणाले.

उत्कृष्ट वाचकांमध्ये डॉ.सतीश देशमुख, सेवानिवृत्त कर्मचारी अशोक कंझरकर, अभियंता वैष्णवी कोरडे, विद्यार्थी समीक्षा मुळे, पल्लवी गावंडे, स्नेहा चव्हाण, भावना गावंडे तसेच संदिप वर्घट यांना यावेळी पुस्तके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

वाचन प्रेरणादिनानिमित्त जिल्ह्यातील शाळामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. सक्षम ठाकरे (दर्यापूर), प्रज्ज्वल मोहोड (ब्राम्हणवाडा), अमनदिप जामनिक हे विद्यार्थी तर जान्हवी नंदेश्वर (शिवणी बु.), साक्षी टवलारे (अंजनगाव बारी) आणि चंचल कंटाळे (दर्यापूर) या विजेत्या विद्यार्थिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले.

विभागीय ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनीचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. डॉ. मढावी यांनी केले. संचालन प्रदीप चौधरी तर आभार श्री.ढोणे यांनी मानले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा