सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

कृषि प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभावी नियोजन करा -खासदार डॉ. अनिल बोंडे

 अमरावतीत ‘विभागीय कृषि प्रदर्शनी’चे आयोजन

 

कृषि प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभावी नियोजन करा

                                      -खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. 31 : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, नैसर्गिक शेतीला वाव देणे, त्यांना शेतीविषयक नवनविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विभागीय कृषी प्रदर्शनीचे जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मेळघाट परिक्षेत्रात ‘ॲग्रो फॉरस्ट्री’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि आणि वनविभागाने प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय कृषि प्रदर्शनीच्या आयोजना संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय कृषि सह संचालक किसन मुळे, वनसंरक्षक जी. के. अनारसे, विभागीय वनाधिकारी एस.एस. करे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे, आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती ए.व्ही. निस्ताने आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. बोंडे म्हणाले की, शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढविणे, शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान व शेतीपुरक व्यवसायाबाबत माहिती होण्यासाठी यापूर्वी दरवर्षी जिल्ह्यात कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. पंरतू, मधल्या काळात कोरोनाच्या संकटकाळात कृषी महोत्सवाचे आयोजन होवू शकले नाही. यावर्षी जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे उद्देशाने कृषि प्रदर्शनीचे आयोजन होणे आवश्यक आहे. या प्रदर्शनीच्या नियोजनासाठी समिती स्थापन करण्यात यावी. नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन व कृषि विभागाने प्रदर्शनीसाठी निधीची तरतूद करावी. चार दिवस होणाऱ्या या कृषी प्रदर्शनीमध्ये कृषी मंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन, परिसंवाद, कृषी तज्ज्ञांच्या मुलाखती, कृषि विषयावर आधारित चर्चासत्र, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पशुसंवर्धन, शेती उत्पादनांचे विपणन आदी बाबी अंतर्भूत राहणार. प्रदर्शनीच्या ठिकाणी शेती, वनोपज उत्पादने, शेती अवजारे-यंत्रे, उपकरणे, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञान, कृषी बँका, महिला बचत गट, शेतीपूरक व्यवसाय उभारणी, कृषी विद्यापीठ मार्गदर्शन केंद्र आदींचे दोनशे स्टॉल्स उभारण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनीत नाफेड, मदर डेअरी, फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनाएजेशन, फेडरेशन आदींचे पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येऊन त्यांच्याव्दारे शेतीपूरक व्यवसायासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. मेळघाट परिक्षेत्रात ‘ॲग्रो फॉरेस्ट्री’ ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. याअंतर्गत तेथील आदिवासी शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीवर किंवा वनपट्ट्यावर मनरेगा योजनेतून मोह, जांभूळ, आंबा, निंब, सिताफळ, बांबू, शेवगा, सफेद मुसळी, चारोळी यासारख्या औषधी व अधिक वयोमान असणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. यातून वनांचे संरक्षण व वृध्दीकरण होईल तसेच वन पर्यटनालाही चालणा मिळून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्त्रोत प्राप्त होईल, असे खासदार डॉ. बोंडे यांनी बैठकीत सांगितले. ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी वनविभागाने पायाभूत आराखडा तयार करुन त्यानुसार नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे व जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित होणाऱ्या कृषि प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाव्दारे आवश्यक नियोजन व अनुषंगिक कामे करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.

00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा