बुधवार, १९ एप्रिल, २०२३

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू

 

समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू

 

अमरावती, दि. 17 : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग यांच्या शासन निर्णयानुसार  जिल्हा स्तरावर मुलां-मुलींचे प्रत्येकी १ वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. मुलांचे एक व मुलींचे एक अशा दोन वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू आहे.

सद्य:स्थितीत जमीन प्राप्त न झाल्यामुळे भाड्याच्या इमारतीमध्ये वसतिगृहे सुरू करण्यात येत आहेत.  १०० विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठीच्या २ वसतिगृहांकरिता साधारणत: २० हजार चौ.फुट परिपूर्ण बांधकाम असलेली तसेच, निवासी वापरासाठी सर्व सोयी-सुविधा असलेली इमारत भाड्याने घ्यावयाची आहे. इमारतीचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे ठरविण्यात येईल.

त्यानुसार स्थानिक इच्छुक जागामालकांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अमरावती, सामाजिक न्यायभवन पोलीस आयुक्तालयाचे मागे, चांदुर रेल्वे रोड, अमरावती (दूरध्वनी ०७२१-२६६१२६१) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

०००००००

 

सोमवार, १७ एप्रिल, २०२३

परतवाड्यात आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृहाची सुविधा निर्माण करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 













परतवाड्यात आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण

 

 

आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृहाची सुविधा निर्माण करणार

-          आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 

अमरावती, दि. 17 : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिथे जिथे वसतिगृहाची गरज आहे, तिथे ते पूर्ण करून देण्यात येईल. जुलैमध्ये याबाबतचा आराखडा पूर्ण होईल. त्यामुळे जिल्ह्यातून आवश्यक प्रस्ताव द्यावेत, असे

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी परतवाडा येथे सांगितले.

 

 

परतवाडा येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. एकच्या इमारतीचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते झाले. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चुभाऊ कडू, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, अपर आदिवासी विकास आयुक्त सुरेश वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

मंत्री श्री. गावित म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिकताना निवासाची सुविधा असावी म्हणून वसतिगृहे आवश्यक आहेत. त्यामुळे आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृह निर्माण करण्यात येतील. आमदार बच्चूभाऊ कडू यांनी अथक प्रयत्न करून या वसतिगृहासाठी जागा मिळवून दिली. त्यामुळे हे वसतिगृह पूर्णत्वास आले आहे. येथे

रस्त्याची सोयही केली जाईल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे, क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी  प्रकल्प निर्माण करण्यात येईल. घर नसलेल्या आदिवासी बांधवांना घर मिळवून दिले जाईल. येत्या दोन वर्षात सर्वांना घरे दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

सैन्यदलातील अग्निवीर, तसेच इतरही स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने वसतिगृहांत मार्गदर्शन केंद्रे विकसित करावीत, तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणही मिळावे, असे खासदार डॉ. बोंडे यांनी सांगितले. मेळघाटातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षकांची भरती असावी जेणेकरून ते आपल्या परिसरातील मुलांना त्यांच्या भाषेत शिकवू शकतील. पर्यायाने शिक्षणाचीही गुणवत्ता वाढेल, असे खासदार श्रीमती राणा यांनी सांगितले. 

 

आमदार श्री. कडू म्हणाले की, अनेक वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत आहेत. हे लक्षात घेऊन कायमस्वरूपी वसतिगृहासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला जागा मिळवण्यात अनेक प्रशासकीय अडथळे आले. ते दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. अखेरीस जागा मिळून काम पूर्ण झाले याचा आनंद आहे. आता शासनाने विभागीय स्तरावरही सर्व सुविधायुक्त वसतिगृहांची निर्मिती करावी. वसतिगृहापर्यंत चांगला रस्ता व वाचनालय व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

मेळघाटात मुलां-मुलींसाठी धारणी व चिखलदरा येथे आणखी शासकीय वसतिगृहांची आवश्यकता असल्याचे आमदार श्री. पटेल यांनी सांगितले. वनहक्क जमीन पट्टेवाटपही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

वसतिगृहाबाबत…

वसतिगृहाच्या इमारतीचे क्षेत्रफळ 1059.38 चौरस मीटर असून विद्यार्थ्यांसाठी वीस कक्ष उपलब्ध आहेत. वसतिगृहात वाचनालय, करमणूक कक्ष, स्वच्छतागृहे, गरम पाण्यासाठी सौर ऊर्जा उपकरणे, दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी, क्रीडा साहित्य आदी विविध सुविधा आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर पुस्तक खरेदी साठी साडेचार हजार रुपये रक्कम डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. गणवेशासाठी प्रति विद्यार्थी दोन हजार रुपये, सहलीसाठी दोन हजार रुपये व प्रकल्प किंवा प्रात्यक्षिकासाठी एक हजार रुपये तसेच निर्वाह भत्ता म्हणून प्रतिमाह 500 रुपये आधी सुविधा दिल्या जातात.

 

 

००००

 

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन

 






आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार  गावित यांच्या हस्ते

शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन

 

अमरावती, दि. १७: नवसारी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्रांगणात शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये ३६० विद्यार्थिनींना राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इमारतीमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १५ खोल्या व १ अभ्यासिका राहणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने १३ कोटी ३ लाख ११ हजार रुपये मंजूर केले आहेत.

खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकुमार, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या प्र. गृहप्रमुख गायत्री पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आदिवासी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. विद्यार्थिनींची डीबीटीची रक्कम वेळेत जमा केली जाईल. शैक्षणिक सुविधेसाठी विद्यार्थिनींना इंटरनेट सुविधा लवकरच पुरविली जाईल. वॉटर कुलर, वॉशिंग मशीन तसेच आवश्यक सर्व सुविधा वसतिगृहात पुरविल्या जातील. विद्यार्थिनींना इयत्ता बारावीपूर्वीच जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. यासाठी संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात येईल. यासाठी सुनिश्चित वेळापत्रकानुसार कार्यक्रम राबविला जाईल. विद्याार्थिंनींना  शैक्षणिक सत्रासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

00000

फासेपारधी समाजाच्या मुलांना सहजसुलभ व मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी उपक्रम - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 पारधी फासेपारधी समाजबांधवांच्या मेळाव्याला मोठा प्रतिसाद














फासेपारधी समाजाच्या मुलांना सहजसुलभ व मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी उपक्रम

                                                          - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 

अमरावती, दि. 17 : पारधी-फासेपारधी समाजाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येईल. मुलांना प्राथमिक शिक्षण सहज व सोप्या भाषेत आत्मसात होण्यासाठी  दृकश्राव्य माध्यमे व चित्रफीतींचाही अध्यापनात प्रभावी वापर करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज केले. 

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे पारधी फासेपारधी समाज जनजागृती मेळाव्याचा शुभारंभ करताना ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार रमेश बुंदीले, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकुमार, सामाजिक कार्यकर्ते रमेश मावस्कर, मतीन भोसले, सलीम भोसले, बाबूसिंग पवार यांच्यासह कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृह गर्दीने फुलून गेले होते.

आदिवासी विकास मंत्री श्री. गावित म्हणाले की, आदिवासी पारधी- फासेपारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलामुलींसाठी आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळेत शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. पालकांनीही आपल्या मुलांना आश्रमशाळेत राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. शिक्षणाच्या माध्यमातूनच भावी पिढी आपल्या पायावर उभी राहील. शासकीय नोकरी प्राप्त करु शकेल. शासनाद्वारे विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. शिष्यवृत्ती व शालेय साहित्य आदीसाठी अनुदान दिल्या जाते. सुसज्ज वसतीगृहात प्रवेश दिला जातो. शासनामार्फत मुलांना शालेय शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊ. त्यानंतर त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उदरनिर्वाह करता येईल.  येत्या महिनाभरात विशेष ॲप तयार करुन व्यवसाय प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांचा डेटा फीड करुन व्यवसाय उभारणीसाठी मदत करु, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मेळघाटसारख्या जंगल परिक्षेत्रात आदिवासींना वनोपज उत्पादनांच्या प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी मदत करण्यात येईल. फासेपारधी समाजबांधवांना जॉब कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड तसेच इतर दाखले मिळविण्यासाठी प्रकल्प कार्यालयात व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना इतरत्र कुठेही जाण्याची गरज राहणार नाही. फासेपारधी समाजबांधवांच्या तक्रारी व अडचणींचे तात्काळ निवारणासाठी 1800267007 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गावीत यांनी केले.

येत्या दोन वर्षांत सर्वांना घरे मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गरजूंनी घरकुल मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज सादर करावा. एकही आदिवासी बांधव घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही. बचतगटाच्या महिलांना शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात येवून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येईल. यासाठी बचतगटांच्या महिलांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारणीसाठी अनुदान देण्यात येईल. सर्व पारधी बेड्यांना पोहोचण्यासाठी बारमाही रस्त्यांची निर्मिती करण्यात येईल. ज्याठिकाणी वीज नाही त्याठिकाणी वीजेची जोडणी उपलब्ध करुन दिल्या जाईल तर ज्याठिकाणी वीजेची जोडणी अशक्य आहे अशा ठिकाणी सोलर प्रकल्पातून वीज उपलब्ध करुन दिल्या जाईल. तसेच समाजबांधवाना स्वतःचा व्यवसाय उभारता यावा, यासाठी  विभागाकडून गायी, म्हशी, शेळी-मेंढी यासारख्या दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार. कुक्कुटपालन सारखे तितर-बटेर पालनासाठी पोल्ट्री फार्मची निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावे, त्यास मंजुरी दिल्या जाईल. वनपट्टे,  अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात येईल. आपले जीवन सुखकर बनविण्यासाठी प्रत्येकाने शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन डॉ. गावीत यांनी केले.

खासदार श्री. बोंडे, खासदार श्रीमती राणा, आमदार श्री. राणा, आमदार श्री. अडसड, मतीन भोसले आदींची भाषणे झाली. बाबूसिंग पवार यांनी प्रास्तविक केले.

00000

मुलांना शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा - आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

 

मुलांना शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा

-          आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

बडनेरा येथे मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन

 

अमरावती, दि. 17 : आदिवासी, पारधी मुला-मुलींसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी समाज बांधवानीही आपल्या मुलांना शाळेत शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज बडनेरा येथे केले.

सार्वजनिक बांधकाम आदिवासी मंडळ, नागपूर आणि अमरावती तसेच सार्वजनिक बांधकाम आदिवासी उपविभाग, धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने बडनेरा येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेजवळील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवि राणा, आमदार प्रताप अडसड, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावनकुमार, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखडे, सामाजिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता गणेश रंभाड, अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे, उपविभागीय अभियंता श्रीकांत आवतकर, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेचे मुख्यध्यापक आर. जी काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            आदिवासी, पारधी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे, असे सांगून आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी मुलींना चांगल्या शिक्षणासह निवाऱ्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी येथे वसतिगृह उभारण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यामध्ये मुलांच्याही वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात येईल व लवकरच मुलांसाठीही वसतिगृह उभारण्यात येईल. आदिवासी, पारधी समाज बांधवांनी  मुलांना शाळेत पाठवावे. मुलांचे शिक्षण अर्ध्यावर सोडू नका. तुम्ही मुलांना शाळेत पाठविले तरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. शासनामार्फत मुलांना शालेय शिक्षणासोबत व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण देवू. जेणेकरुन त्यांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल.  समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर ॲकेडमी’ची स्थापना करुन त्यात स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच खेळात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांनाही क्रीडा प्रकारात मार्गदर्शन करण्यात येईल.

येत्या दोन वर्षांत सर्वांना घरे मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी गरजूंनी घरासाठी प्रशासनाकडे अर्ज सादर करावा. एकही आदिवासी बांधव घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही. बचत गटाच्या महिलांना शासनामार्फत प्रोत्साहन देण्यात येवून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी बचत गटांच्या वस्तूंच्या निर्मितीद्वारे महिलांनी आर्थिक स्वावलंबित्त्वासाठी प्रयत्न करावे. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शिक्षक व पालकांनी पुढाकार घ्यावा. मुलांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, यासाठी त्यांना इयत्ता पहिली व दुसरीमध्ये त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्यात येईल. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचा गुणवत्तात्मक विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करावा. यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या शिक्षकांना गौरविण्यात येईल. आश्रम शाळेजवळील रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही डॉ. गावित यावेळी म्हणाले.

आमदार रवि राणा म्हणाले, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची नितांत आवशकता होती. शिक्षणाची व निवाऱ्याची सोय एकाच ठिकाणी असल्यामुळे आता मुलींना शिक्षणांपासून वंचित रहावे लागणार नाही. येथे 144 विद्यार्थींनीच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 9 कोटी 83 लक्ष 42 हजार शासनाने मंजूर केले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी, पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत वसतिगृहाची निर्मिती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले . 

आदिवासी लाभार्थी व बचतगट यांना शासनांच्या विविध योजनाच्या लाभ देण्यासाठी आदेश व धनादेशाचे यावेळी वाटप करण्यात आले. यामध्ये लाभार्थ्यांना व्हिडिओ शुटिंग कॅमेरा, पीठ गिरणी, मंडप साहित्य, विहीर खोद कामासाठी क्रेन मशीन खरेदी करण्याकरिता अर्थसाह्य करण्यासाठी धनादेशाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक आर. जी. काळे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्राथमिक शिक्षक वंदना कुलट व आशिष जवंजाळ यांनी तर आभार प्राथमिक शिक्षक अकुंश गाडगे यांनी मानले.

00000

सोमवार, १० एप्रिल, २०२३

पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूसंपादन येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 












पी एम मित्रा टेक्सटाईल पार्कचे भूसंपादन येत्या पंधरा दिवसात पूर्ण होईल

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अमरावती, दि. 10 : ‘पीए मित्राटेक्सटाईल पार्कमध्ये अनेक मोठे उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून त्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर पडेल व  मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. पार्क उभारणीसाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचे काम पंधरा दिवसात पूर्ण व्हावे, असे निर्देश  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

 

पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्कच्या भूसंपादनासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत हे यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे, तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार श्वेता  महाले, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय,  प्र. जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विपीन शर्मा सभागृहात उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले की, पार्कसाठी गतीने जमीन संपादित होत आहे. या पार्कमुळे अनेक चांगले उद्योग अमरावतीत येतील. अनेक कंपनी येथे येण्यास इच्छुक आहेत. उद्योग विभागातर्फे याबाबत गुंतवणूकदारांची परिषद घ्यावी. तसेच वस्त्रोद्योग कंपन्यांसोबत सामंजस्य करार  होण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, अमरावती येथे 413.07 हे. जागेवर पीएम मित्रा पार्क प्रस्तावित आहे. पार्कसाठी 220 हे. भूमी संपादित झाली आहे. केंद्र शासनासोबत करार करण्यात येईल. पुढील 15 दिवसांत उर्वरित आवश्यक भूमी संपादित करण्यात येईल. कापसावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग येथे सुरू होतील. त्याचा लाभ कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, रिद्धपुर येथे मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी समिती 15 दिवसांत स्थापन करण्यात येईल. समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश करण्यात येईल. आता रिद्धपुर येथे थीम पार्कमध्ये सभागृह, कक्ष उपलब्ध आहेत. तिथे तत्काळ विद्यापीठाचे आवश्यक ते काम सुरू करावे. याठिकाणी अनेक अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी या विद्यापीठाचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.

 

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कबाबत:

‘पीएम मित्रा’ ही योजना देशातील तामिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या सात राज्यांतील सात शहरांमध्ये सुरु करण्यात आली असून त्याअंतर्गत वस्त्रोद्योगाचे पार्क उभारण्यात येतील. त्यात अमरावती शहराचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या फाईव्ह एफ व्हिजन (म्हणजे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) प्रेरित, पीएम मित्रा पार्क्स भारताला कापड उत्पादन आणि निर्यातीसाठी जागतिक केंद्र बनविण्याच्या सरकारच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे.

            सर्व उपयुक्त सुविधा, पुरेसा वीज पुरवठा, पाण्याची उपलब्धता आणि सांडपाणी विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, एक प्रभावी सिंगल विंडो सिस्टीम तसेच अनुकूल आणि स्थिर औद्योगिक वस्त्र धोरण तयार होणार आहे.

0000

मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची

रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार

           -  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अमरावती, दि. 10: रिद्धपुर ही संत गोविंदप्रभू, चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली अध्यात्मभूमी आहे. लीळाचरित्रासह अनेक महत्वाचे मराठी ग्रंथ येथे लिहिले गेले. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन रिध्दपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी समिती 15 दिवसात स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रिध्दपूर येथे केले.

रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाबाबत श्री. फडणवीस यांनी नियोजनभवनात बैठकीद्वारे आढावा घेतला व त्यानंतर श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी श्री गोविंदप्रभू राजमठ, श्री यक्षदेव बाबा मठ, सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्राला भेट दिली. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार, आमदार परिणय फुके, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. रणजीत कुमार शुक्ल, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्रभारी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, निवेदिता चौधरी यांच्यासह गोपीराज बाबा शास्त्री, मोहनदास महाराज, यक्षदेव बाबा बीडकर, बाभुळकर बाबा शास्त्री, वैरागी बाबा, कारंजेकर बाबा, वाईनदेशकर बाबा शास्री आदी मान्यवर उपस्थित होते.

पमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, रिद्धपूर ही महानुभाव पंथाची काशी आहे, तशीच ती मराठी भाषेचीही काशी आहे. विद्यापीठाचे काम पुढे नेण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या जागेत तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात येईल. विद्यापीठाच्या दृष्टीने आवश्यक सर्व बाबींसाठी निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जाईल.  

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री गोविंद प्रभू राजमठ येथे भेट देऊन दर्शन घेतले. मठातर्फे मोहनराज बाबा कारंजेकर यांनी त्यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे, श्री यक्षदेव महाराज मठ येथेही भेट देऊन दर्शन घेतले. मठातर्फे उपमुख्यमंत्र्यांचा गौरव करण्यात आला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातर्फे रिद्धपुर येथे सुरू केलेल्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी मराठी भाषा व तत्वज्ञान अध्ययन केंद्रालाही श्री. फडणवीस यांनी भेट दिली.

000000









 

भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे 125 वे जयंती वर्ष शासन साजरे करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे 125 वे जयंती

वर्ष शासन साजरे करणार

-         उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ø  शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात भाऊसाहेबांचे कार्य दीपस्तंभासारखे

Ø पापळ येथे कृषी महाविद्यालयाची निर्मिती आणि स्मृती केंद्रासाठी निधी देणार

 

अमरावती, दि 10 जिमाका:  भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी दीनदलीत, शेतकरी, शेतमजुर यांच्या शाश्वत विकासासाठी राबवलेल्या  संकल्पनेवरच शासनाची वाटचाल सुरु राहील अशी ग्वाही देतानांच या महान, दूरदर्शी व द्रष्ट्या नेत्याला आदरांजली म्हणुन त्यांचे  125 वे जयंती वर्ष शासनाच्यावतीने साजरे करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. 

 

शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकिय महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव  देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निमीत्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस बोलत होते.  याप्रसंगी  शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व समारंभाध्यक्ष  हर्षवर्धन देशमुख, खासदार अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार सर्वश्री प्रवीण पोटे, परिणय फुके, श्वेता महाले, प्रा.अशोक उईके,  संस्थेचे कोषाध्यक्ष दिलिपबाबू ईंगोले, संदीप जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. 

 

तत्पुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या पुण्यतिथी मिमित्त आदरांजली वाहिली.  तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व बालरोग विभागाची नवीन वार्ड इमारत आणि आकस्मिक दक्षता कक्षाचे उद्घाटन केले. 

 

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरवून कृषी व संलग्न क्षेत्रांना विकासप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले. देशाच्या कृषी क्षेत्रासाठी हे कृषी प्रदर्शन मैलाचा दगड ठरलेच शिवाय जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात भारताचे नवे पाऊल टाकण्याचे काम या प्रदर्शनाने केले. देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्याने काम केले पाहिजे यासाठी कृषी क्षेत्रात संशोधन करून शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी भाऊसाहेबांनी घेतलेले निर्णय मूलगामी परिणाम करणारे ठरले आहेत, असे श्री. फडणवीस म्हणाले.   

 

समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा विकास होणे महत्त्वाचे आहे आणि आपला महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याचे श्रेय भाऊसाहेबांसारख्या द्रष्ट्या नेत्याला  जाते. समाजातील गरीबी, जातीयता, अंधश्रद्धा समुळ नष्ट करण्यासाठी शिक्षण क्षेत्राची प्रगती करण्याचा विचार समोर ठेवून त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज हा वटवृक्ष शिक्षणाच्या विविध क्षेत्रात मानव संसाधनांची निर्मीती करणारे महत्वाचे केंद्र ठरत आहे. 

जातीप्रथा, अंधश्रद्धा निर्मुलन करणारे समाजसुधारणेचे भाऊसाहेबांचे कार्यही बहुमोल आहे. अत्यंत ज्ञानी, अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेल्या या नेत्याचे विचार आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी संस्थेने सुरु केलेल्या त्यांच्या स्मृती केंद्राच्या कामासाठी आवश्यक निधीची तरतुद करण्यात येईल. त्यांच्या जन्मस्थानी पापळ येथे कृषी महाविद्यालय निर्माण केले जाईल आणि संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.  

 

यावेळी खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून मेळघाटमधील रुग्णांना     ने-आण करण्यासाठी संस्थेला बस उपलब्ध करुन देण्याची तर आमदार सुलभा खोडके यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची व्यवस्था म्हणून धर्मशाळेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करुन निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.  

 

यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी नविन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या शिक्षण संस्थांच्या विचारांची देवाण-घेवाण शासनाने घडवुन आणावी, तसेच कृषी महविद्यालये सरसकट बंद करू नयेत अशी मागणी केली. 

 

कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर फुले तर आभार दिलिपबाबु ईंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य, कार्यकारणीचे पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.  

000000