शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५
जमिनीचे आरोग्य सुधारत, उत्पादन वाढीसाठी नैसर्गिक शेती करा -जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेचे आवाहन * जिवाणू संघाची उपयोगिता व उपलब्धतेबाबत जनजागृती
अमरावती, दि. 28 : जागतिक स्तरावर सुरक्षित अन्नपदार्थांचा प्रश्न भेडसावत असताना, शेतीमालासाठी होणारा रासायनिक कीटकनाशकांचा 95 टक्क्यांहून अधिक वापर ही एक मोठी चिंता आहे. रासायनिक निविष्ठांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला असून मानवी आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक (जैविक व सेंद्रीय) निविष्ठांचा वापर वाढवून 'रेसिड्यु फ्री' शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी जिवाणू संघाचा उपयोग शेती व शेतीपिकांच्या उत्पादन वाढीसाठी करावा, असे आवाहन जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेव्दारे करण्यात आले आहे.
अमरावती शहरात जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा, कृषि संकुल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड (पिन कोड ४४४६०२) येथे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या जीवाणू संघांची उपलब्धता करण्यात आली आहे. प्रयोगशाळेला संपर्क करण्यासाठी ०७२१-२५५०३७२ संपर्कक्रमांक दिला आहे.
या प्रयोगशाळेत पुढीलप्रमाणे जैविक निविष्ठा उपलब्ध आहेत. नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू : रायझोबियम, अझॉटोबक्टर, स्फुरद (फॉस्फरस) विरघळविणारे जिवाणू, पालाश (पोटॅश) विरघळविणारे व वहन करणारे जिवाणू, द्रवरूप जिवाणू संघ: वरील नमूद तिन्ही जिवाणू एकत्रित असलेले द्रावण आदींचे उत्पादन शासनाने ठरवून दिलेल्या दरांनुसार व नियमांनुसार वैयक्तिक शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या प्रयोगशाळेव्दारे महाविद्यालयीन विविध शाखेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जिवाणु उत्पादनाबाबत व त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विस्तृत माहिती व प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात येते.
100 मिली बॉटल 50/- रुपये, 250 मिली बॉटल 110/- रुपये तर 500 मिली बॉटल 210/- रुपये या शासकीय विक्री दराप्रमाणे जिवाणूसंघाचा विक्री दर आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खालावत चालला आहे. तिचे आरोग्य सुधारवयाचे असेल तर नैसर्गिक (जैविक व सेंद्रीय) निविष्ठांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रीय घटकांचे प्रमाण सुधारण्यात मदत होते. जिवाणू संघाच्या वापराचा दुरगामी, शाश्वत, अनुकूल परिणाम मृदा, जल, मानवी व इतर जैव परिसंस्थेवर होतो. जैविक निविष्ठांचे बहुआयामी फायदे आहेत. जैविक खतांचा वापर वाढवल्यास जमिनीचे आरोग्य सुधारते आणि उत्पादन खर्चात कपात होते. याचे फायदे केवळ शेतीपुरते मर्यादित नसून ते पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहेत.
जैविक खतांचे फायदे :
जैविक खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमीन भुसभुशीत होते व उत्पादन क्षमतेत वाढ होते, जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे भौतिक फायदे आहेत. जैविक खतामुळे जमिनीतील अन्नद्रव्य धरुन ठेवली जातात, दुबार पेरणीसाठी उपयुक्त नत्रसाठा शिल्लक राहतो, जमीनीचा सामु (pH) नियंत्रणात राहतो, याप्रमाणे रासायनिक फायदे आहेत. जैविक फायद्यांचे सांगावयाचे झाल्यास सुक्ष्म जिवांमार्फत सेंद्रीय घटकांचे विघटन होते, प्रदुषणकारक घटकांचे विघटन होते. तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी झाल्याने उत्पादन खर्च कमी होतो. धान्याचा दर्जा सुधारून पिकाचे उत्पादन वाढते. रसायनांचा वापर टाळल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते आणि मानवी आरोग्य सुधारते.
सेंद्रिय (जैविक) शेतीला चालना देण्यासाठी आणि रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत तयार होणारी जैविक खते आपल्या शेतीसाठी वापरावीत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून जैविक प्रयोगशाळेच्यावतीने करण्यात आले आहे. नैसर्गिक शेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना शाश्वत शेती, उत्तम उत्पादन आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळवण्याचा मार्ग सुकर होईल.
जमिनीचे आरोग्य सुधारणे व उत्पादन वाढीसाठी नैसर्गिक शेती करा -जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेचे आवाहन * जिवाणू संघाची उपयोगिता व उपलब्धतेबाबत जनजागृती
अमरावती, दि. 27 : आज जागतिक स्तरावर सुरक्षित अन्नपदार्थांचा प्रश्न भेडसावत असताना, शेतीमालासाठी होणारा रासायनिक कीटकनाशकांचा ९५ टक्क्यांहून अधिक वापर ही एक मोठी चिंता आहे. रासायनिक निविष्ठांच्या अति वापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला असून मानवी आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक (जैविक व सेंद्रीय) निविष्ठांचा वापर वाढवून 'रेसिड्यु फ्री' शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी जिवाणू संघाचा उपयोग शेती व शेतीपिकांच्या उत्पादन वाढीसाठी करावा, असे आवाहन जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेव्दारे करण्यात आले आहे.
अमरावती येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा, कृषि संकुल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड (पिन कोड ४४४६०२) येथे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या जीवाणू संघांची उपलब्धता करण्यात आली आहे. प्रयोगशाळेला संपर्क करण्यासाठी ०७२१-२५५०३७२ संपर्कक्रमांक दिला आहे.
या प्रयोगशाळेत पुढीलप्रमाणे जैविक निविष्ठा उपलब्ध आहेत. नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू : रायझोबियम, अझॉटोबक्टर, स्फुरद (फॉस्फरस) विरघळविणारे जिवाणू, पालाश (पोटॅश) विरघळविणारे व वहन करणारे जिवाणू, द्रवरूप जिवाणू संघ: वरील नमूद तिन्ही जिवाणू एकत्रित असलेले द्रावण आदींचे उत्पादन शासनाने ठरवून दिलेल्या दरांनुसार व नियमांनुसार वैयक्तिक शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या प्रयोगशाळेव्दारे महाविद्यालयीन विविध शाखेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जिवाणु उत्पादनाबाबत व त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विस्तृत माहिती व प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात येते.
100 मिली बॉटल 50/- रुपये, 250 मिली बॉटल 110/- रुपये तर 500 मिली बॉटल 210/- रुपये या शासकीय विक्री दराप्रमाणे जिवाणूसंघाचा विक्री दर आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खालावत चालला आहे. तिचे आरोग्य सुधारवयाचे असेल तर नैसर्गिक (जैविक व सेंद्रीय) निविष्ठांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रीय घटकांचे प्रमाण सुधारण्यात मदत होते. जिवाणू संघाच्या वापराचा दुरगामी, शाश्वत, अनुकूल परिणाम मृदा, जल, मानवी व इतर जैव परिसंस्थेवर होतो. जैविक निविष्ठांचे बहुआयामी फायदे आहेत. जैविक खतांचा वापर वाढवल्यास जमिनीचे आरोग्य सुधारते आणि उत्पादन खर्चात कपात होते. याचे फायदे केवळ शेतीपुरते मर्यादित नसून ते पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहेत.
जैविक खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमीन भुसभुशीत होते व उत्पादन क्षमतेत वाढ होते, जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे भौतिक फायदे आहेत. जैविक खतामुळे जमिनीतील अन्नद्रव्य धरुन ठेवली जातात, दुबार पेरणीसाठी उपयुक्त नत्रसाठा शिल्लक राहतो, जमीनीचा सामु (pH) नियंत्रणात राहतो, याप्रमाणे रासायनिक फायदे आहेत. जैविक फायद्यांचे सांगावयाचे झाल्यास सुक्ष्म जिवांमार्फत सेंद्रीय घटकांचे विघटन होते, प्रदुषणकारक घटकांचे विघटन होते. तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी झाल्याने उत्पादन खर्च कमी होतो. धान्याचा दर्जा सुधारून पिकाचे उत्पादन वाढते. रसायनांचा वापर टाळल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते आणि मानवी आरोग्य सुधारते.
सेंद्रिय (जैविक) शेतीला चालना देण्यासाठी आणि रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत तयार होणारी जैविक खते आपल्या शेतीसाठी वापरावीत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून जैविक प्रयोगशाळेच्यावतीने करण्यात आले आहे. नैसर्गिक शेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना शाश्वत शेती, उत्तम उत्पादन आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळवण्याचा मार्ग सुकर होईल.
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागम नागपूर येथील कार्यक्रमासाठी सर्वोतोपरी सहकार्य -जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 27 : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य केल्या जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज नागपूर येथील कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सुलजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी राज्य शासनाच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यात नागपूरसह नांदेड आणि नवी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शहिदी समागमाचे शिख समाजात विशेष महत्व आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना नागरिक मोठ्या प्रमाणावर जातील. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल. इतर जिल्ह्यामधून नागपूर येथे जाताना नागरिकांना वैद्यकीय आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रचारासाठी जिल्ह्यात चित्ररथ फिरविण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात होर्डींग आणि इतर माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने 5 डिसेंबर रोजी 400 नागरिकांचा जत्था येणार आहे. यानिमित्ताने वाहतुकीसाठी कोणतीही अडचण होणार नाही. यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात येणार आहे. त्यामुळे समाजाने यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. येरेकर यांनी केले.
नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली.
हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी शहिदी समागमाच्या चित्ररथाला हिरवी झेंडी
अमरावती, दि. 27 : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. नागपूर येथे 7 डिसेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी चित्ररथाचे जिल्ह्यात आगमन झाले. या चित्ररथाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, नानकराम अहुजा, ॲड. वासुदेव नवलानी, अमरज्योतसिंग जग्गी, रविंद्रसिंग सलुजा, डॉ. निख्खू खालसा, राजेंद्रसिंग सलुजा, राज छाबडा, दिनेश सचदेव, राजू मोंगा, सरनपालसिंग अरोरा, हरबक्श उपवेजा, सजिंदरसिंग उपवेजा, कुलदेवसिंग अरोरा, भजनसिंग सुलजा, विक्की अरोरा यांच्यासह विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आज सकाळी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350व्या शहिदी समागमानिमित्त डिजिटल चित्ररथाचे उत्साहपूर्ण वातावरणात जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चित्ररथाचे आगमन झाल्यानंतर मान्यवरांची यावरील चित्रफितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी या चित्ररथाला हिरवी झेंदी दाखविली. हा चित्ररथ जिल्हाभरात फिरून नागपूर येथील कार्यक्रमाबाबत जनजागृती करणार आहे.
बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५
‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ निमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. २६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ निमित्त हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहिदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील पाहता येईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
‘हिंद दी चादर’श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रचार-प्रसार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर, २४ जानेवारी २०२६ ला नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वरूप, अंमलबजावणी व राबविण्यात येणारे विविध उपक्रम याविषयी राज्यस्तरीय शहिदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
विभागीय आयुक्तालयात संविधान उद्देशिकेचे वाचन
अमरावती, दि. 26 : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
यावेळी अपर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त रविंद्र हजारे, संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 76 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मुल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाने जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केले असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना डॉ. सिंघल यांनी उजाळा दिला.
मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५
हिंद दी चादर: धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेचे कवच ! रामेश्वर नाईक समन्वयक, हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वां शहीदी समागम समिती महाराष्ट्र राज्य.
धर्म, राष्ट्र, आणि मानवतेसाठी जीव अर्पण करणाऱ्यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते. अशा तेजस्वी व्यक्तींच्या जीवनातून मानवतेचा प्रकाश झळकतो. त्या अमर गाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा म्हणजे हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांची आहे. ज्यांना संपूर्ण जग ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच म्हणून ओळखते. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरु हरगोबिंद साहिब हे शीख धर्माचे सहावे गुरु होते. त्यांच्या आईचे नाव माता नानकी देवी असे होते. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे बाल्यावस्थेतील नाव त्यागमल होते; पण युद्धभूमीवरील त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे वडिलांनी त्यांना तेग बहादुर म्हणजे ‘तलवारीसारखा धैर्यवान’ असे नाव दिले. बालपणापासूनच त्यांच्यात शौर्य, नम्रता आणि अध्यात्मिक चिंतन यांचा सुंदर संगम होता. त्यांनी सांसारिक किर्तीपेक्षा आत्मज्ञान आणि मानवसेवा हेच जीवनाचे खरे ध्येय मानले होते.
शीख गुरू परंपरा अडचणीत आली असताना गुरू शोधण्याचे काम श्री बाबा मखान शाह लबाना यांनी बाबा बकाला (अमृतसर) येथे याठिकाणी केले. ऐतिहासिक माहितीनुसार श्री बाबा माखनशहा लबाना यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिबजींना ओळखून ‘गुरु लाधो रे गुरू लाधो रे’ अशी घोषणा केली, आणि त्या क्षणापासून लबाना समाजाचे नाव शीख इतिहासात अजरामर झाले.
१६६४ मध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे शीख धर्माचे नववे गुरु झाले. त्यांच्या व्यक्तिमत्वात विलक्षण शांतता, करुणा आणि आत्मनिष्ठा होती. त्यांनी धर्माचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, धर्म म्हणजे आग्रह नव्हे, तर दुसऱ्याच्या श्रद्धेचा सन्मान करणे होय. त्यांनी भारतभर प्रवास करून समाजात मानवता, समता आणि सहिष्णुतेचे बीज रोवले. श्री आनंदपूर साहिब हे त्यांनी स्थापन केलेले पवित्र ठिकाण असून आजही ते शीख धर्माचे केंद्रस्थान आहे.
त्या काळात जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. या संकटाच्या वेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ते म्हणाले होते, ‘जर माझ्या बलिदानामुळे या निरपराधांच्या श्रद्धेचे रक्षण होणार असेल, तर तेच माझे सर्वोच्च धर्मकर्म ठरेल.’ हे शब्द केवळ त्यागाचे नव्हते, तर संपूर्ण मानवतेच्या रक्षणाची घोषणा करणारे होते.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना आग्रा येथे कैद करून दिल्ली येथे आणण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात आली. पण त्यांनी तत्वांशी तडजोड करण्यास नकार दिला. १६७५ मध्ये चांदणी चौक दिल्ली शीशगंज येथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या पाठीमागे केवळ शीख अनुयायी नव्हते; तर त्यांच्या सोबत अनेक समाज उभे होते. विशेषतः सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी समाजांनी या संघर्षात आपले मोलाचे योगदान दिले. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयाला गुरूजींच्या आत्मसन्मानासाठी आणि गुरूनिष्ठेसाठी शहीद झाले. हे समाज सेवाभाव, साहस आणि श्रद्धेसाठी ओळखले जातात.
लबाना, बंजारा, सिखलीकर समाजांनी श्री गुरू तेग बहादुर साहिबजींचा धर्माचे रक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण हा शिकवणीचा संदेश दूरवर पोहोचवला.
त्यांच्या व्यापारी व भ्रमणशील जीवनशैलीमुळे भारताच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. आजही संपूर्ण देशामध्ये या प्रदेशांमध्ये या समाजाचे लोक भक्ती, सेवा आणि साहसाची परंपरा जिवंत ठेवून आहेत.
श्री गुरु तेग बहादुरजींनी शिकवले की धर्म म्हणजे प्रेम, समता आणि सेवा. ते सांगतात की, धैर्य तलवारीत नसते, ते सत्यात असते.
त्यांनी ‘‘न को बैरी, न ही बेगाना, सगल संग हम को बन आई’’ या गुरू वाणीच्या रचनेत त्यांनी सर्वधर्म समभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे. याचा अर्थ ‘माझ्यासाठी कोणीही शत्रू नाही, परका नाही कारण सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे.’
त्यांची ५७ भक्तिगीते आणि ५७ सलोक (उपदेशपर पदे) गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. प्रत्येक ओळ सत्य, संयम आणि मानवतेचा संदेश देते. त्यांचा विचार समाजाला नवजीवन देतो. ते सांगतात की, धर्म ही मानवतेतील भिंत नसून पूल आहे; श्रद्धा हा संघर्ष नसून सहजीवनाचा प्रवाह आहे. त्यांनी आपल्या बलिदानाने धर्माचे रक्षण म्हणजे इतरांच्या श्रद्धेचा सन्मान करण्याचा संदेश जनमानसात पोहोचवला. त्यांच्या बलिदानाने मानवाधिकारांचे मूलतत्व अधोरेखित झाले आहे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव हे विठोबाचे परम भक्त होते. त्यांचे आध्यात्मिक कार्य पंजाब पर्यंत पोहचले आणि तेथील लोकांसाठी ते ‘भगत’ बनले. संत नामदेवांनी शीख धर्म प्रसारात महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांना भगत नामदेव म्हणून ओळखले जाते. शीख धर्माच्या पवित्र श्री गुरू ग्रंथ साहिब या शीख पवित्र धर्मग्रंथात संत नामदेव यांची ६१ पदे समाविष्ट आहेत. जी त्यांच्या एकेश्वरवाद, समानता आणि भक्तीचे प्रतिबिंब आहे. संत नामदेव यांनी आपल्या भक्तीच्या शिकवणुकीच्या माध्यमातून शीख धर्मावर खोलवर प्रभाव टाकला आहे. पंजाबमधील घुमान (गुरूदासपूर) या गावी संत नामदेवांचे मोठे स्थान आहे. तेथील लोक त्यांना बाबाजी म्हणून ओळखतात. अशाप्रकारे संत नामदेव यांनी महाराष्ट्र आणि पंजाब यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडली.
देवा पापछळे कांपते मेदिनी
दैसाचिने भारे वाटली अवनी
अधर्म प्रवर्तला माहितळी
ऐसे पापे कळी थोर आला...
असे म्हणत संत नामदेवांनी देशाटन केले. उत्तर भारतात भक्तीमार्गाचा प्रसार केला. या त्यांच्या प्रवासात शेवटी ते पंजाबात २० वर्ष स्थिरावले. याठिकाणी त्यांना पंजाबात बोहरदास, जल्ला, लध्दा, कंसो असे अनेक शिष्य मिळाले. ज्याठिकाणी संत नामदेव तप करायचे, त्याला ‘तपियाना साहिब’ म्हणून ओळखले जाते.
शीख धर्माचे दहावे गुरू श्री गोविंद साहिबजी यांची कर्मभूमी ही महाराष्ट्रातील श्री हुजूर साहिब नांदेड ही असून याठिकाणी त्यांनी सर्व शीख बांधवांना उद्देशून, ‘सब सिक्खन को हुकम है गुरू मान्यो ग्रंथ साहिब’ असा उपदेश दिला होता. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने (नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड) या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत राज्यभर प्रचार, प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे संकेतस्थळ आणि गुरु तेग बहादुरजींच्या बलिदानावर आधारित गीताचे लोकार्पण नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान झाले. शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोह्याल, सिंधी असे विविध समुदाय या प्रसंगी एकत्र येऊन हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचा संदेश घराघरांत आणि जनमाणसांत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत.
आजही त्यांच्या शहिदीचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत आहे. आणि जोपर्यंत या भूमीवर मानवतेवर प्रेम करणारा एकही मनुष्य आहे, तोपर्यंत ‘हिंद दी चादर’ अमर राहील.
– रामेश्वर नाईक
समन्वयक,
हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वां शहीदी समागम समिती महाराष्ट्र राज्य.
श्री गुरु तेग बहादुर – 'हिंद दी चादर'
श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना 'हिंद दी चादर' या नावाने गौरविले जात. धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर साहिब जी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
एप्रिल १६२१ मध्ये अमृतसरमध्ये श्री गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म वडील वडील गुरु हरगोबिंद आणि माता नानकी देवी यांच्या कुटुंबात झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांनाही गुरु पदवी प्राप्त झाली होती. गुरु तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय
शौर्य दाखवले त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग बहादूर म्हणजेच तलवारीसारखा धैर्यवान हे नाव दिले. ते अतिशय शांत, ध्यानशील आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्य, संपत्ती. मान नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत केले. धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा देत असताना त्यांना दिल्लीतील चांदणी चौकातील तुरूंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी ध्यान करत, ईश्वराचे स्मरण करण्यास प्राधान्य दिले. मानवधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत
असताना गुरूतेग बहादुर शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करूणा आणि धैर्य या मुल्यांचा संदेश दिला. त्यांची अनेक भक्तिगीते गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी आनंदपूर साहिब हे पवित्र स्थळ स्थापन केले. जे आजही शीख धर्मातील अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते. केंद्र शासनाने २०२२ मध्ये त्यांची ४०० वी जयंती देशभर साजरी केली होती
त्यांनी देशाला साधे आणि गहन तत्वज्ञान दिले व सुमारे ५७ शबद (भक्तिगीते) आणि ५७सलोक (उपदेशपर पदे) रचले. या रचनांमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि परमेश्वरावर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या सर्व रचना गुरु ग्रंथ साहिबच्या शेवटच्या भागात आहेत.
'जो नर दुःख में दुःख नहीं मानें,
सुख सनेहु अरू भय नहीं जा कै, कांचन माटी मानै,
लोभ मोह अभिमान न ता कै, हरख सोग नहीं जा कै
जो नर दुःख में दुःख नहीं मानै'
म्हणजेच जो मनुष्य दुःखात असला तरी दुःखी होत नाही, जो सुखात असला तरी अहंकार करत नाही, ज्याच्यासाठी सोने आणि माती समान आहेत, जो लोभ, मोह, अभिमान,
आनंद आणि शोक यांपासून मुक्त आहे तोच खरा ज्ञानी आहे. अशा अनेक भावपूर्ण आणि मानवी जीवनाचा सार सांगणाऱ्या रचना त्यांनी केल्या आहेत.
त्यांच्या शडीद समागमास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अल्पसंख्यांक विभाग आणि श्री गुरूतेग बहादुर साहिब जी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच या कार्यक्रमांच्या आयोजनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी 'हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब यांच्या ३५०व्या शहिदी समागमनिमित्त संकेतस्थळाचे आणि गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेनिमित्त शीख, सिकलिगर, बंजारा, लबाना, मोडियाल, सिंधी हे सहा समाज एकत्र आले होते आणि हा कार्यक्रम जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती आणि शासन एकत्रितरित्या काम करीत आहे. त्यांच्या बलिदानाचा इतिहास राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, तहसील, शहर, जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात गुरू तेग बहादुरांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.
श्रद्धा मश्राम/विसंअ
श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई दि. १३ : ‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन जानेवारी महिन्यात नांदेड येथे करण्यात आले असल्याची माहिती ‘हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम’ राज्यस्तरीय समितीने दिली आहे.
श्री गुरू तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरू आहेत. मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना ते शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंदी दी चादर श्री गुरू तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, २१ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तर, जानेवारीमध्ये नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचा मुंबई येथील कार्यशाळेने शुभारंभ करण्यात आला होता. श्री गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा आणि हौतात्म्याचा इतिहास सर्वदूर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे. तहसील, शहर जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात श्री गुरू तेग बहादूर यांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.
या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती सोहळ्यानिमित्त शिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे गुरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडणार आहे. श्री गुरू तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
आला हिवाळा, तब्बेत सांभाळा… हिवाळ्यातील आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 24 : हिवाळ्यात हवेत आर्द्रतेत घट येते, तापमान घसरते आणि जास्तीत-जास्त वेळ घरात राहण्यामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढते. हिवाळ्यातील काही सामान्य आजार आणि त्यांना टाळण्यासाठीच्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. त्या पाळण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
हिवाळ्यात सर्दी, फ्लू, नोरोव्हायरस, ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार सामान्यत: दिसून येतात. थंडी सहन करणे कठीण होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन इतर आजारांचा धोका वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत.
सर्दी :
सर्दी म्हणजे श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला झालेला विषाणू संसर्ग. यामध्ये घसा बसणे, खोकला, शिंका, नाक गळणे आणि हलका ताप येणे या लक्षणांचा समावेश होतो. सर्दी हिवाळ्यात सामान्यत: होण्याची शक्यता असते, आणि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच सर्दी होऊ शकते.
इन्फ्लुएन्झा (Flu) :
इन्फ्लुएन्झा विषाणूंमुळे होणारा फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये सर्दीच्या लक्षणांबरोबरच ताप, थकवा, अंगदुखी, खोकला आणि छातीत कोंडल्यासारखे वाटणे अशी तीव्र लक्षणे दिसतात. लहान मुलांना या आजारापासून अधिक सावध राहणे आवश्यक आहे.
नोरोव्हायरस (Gastroenteritis) :
नोरोव्हायरस एक अतिशय संसर्गजन्य जंतू आहे ज्यामुळे गॅस्ट्रोएन्टेरायटिस (उदर संप्रेरक) होतो. यामध्ये मळमळणे, उलट्या, अतिसार आणि पोटातील मुरड यासारखी लक्षणे दिसतात. गंभीर स्थितीत हा आजार होऊ शकतो.
ब्रॉन्कायटिस :
ब्रॉन्कायटिस हा श्वसनमार्गाचा दाह होतो, जो विषाणूंच्या संसर्गामुळे होतो. यामध्ये दीर्घकाळ खोकला, छातीत अस्वस्थता आणि हलका ताप येण्याची लक्षणे असतात. हिवाळ्यात ही लक्षणे असू शकतात, त्यामुळे त्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
न्युमोनिया :
न्युमोनिया हा फुफ्फुसांतील हवेच्या पिशव्यांमध्ये सूज येण्याचा आजार आहे, जो बॅक्टेरिया, विषाणू किंवा फंगस मुळे होतो. यामध्ये कफ, ताप, श्वास घेताना त्रास आणि छातीत दुखणे अशी लक्षणे दिसतात.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :
१. हातांची स्वच्छता : सॅनिटायझर्सचा वापर करा किंवा हात साबणाने 20 सेकंद धुवा.
२. माणसांचा निकटसंपर्क टाळा : आजारी व्यक्तींच्या संपर्कात येण्याचे टाळा.
३. रोगप्रतिकारशक्ती बळकट करा : संतुलित आहार, पुरेशी झोप, आणि नियमित व्यायाम करा.
४. श्वसनसंस्थेचे आरोग्य सांभाळा : खोकताना तोंड आणि नाक झाकून घ्या.
५. भरपूर पाणी प्या : शरीराची आर्द्रता योग्य ठेवा.
६. स्पर्शाची योग्य पद्धत : चेहऱ्याला हात लावण्याचा टाळा.
७. आजारी असाल तर घरीच राहा : त्यातल्याच लक्षणांपासून इतरांना बचाव करा.
८. पृष्ठभागांचे निर्जंतुकीकरण करा : जिथे अन्न शिजवले जाते अशा ठिकाणी स्वच्छता राखा.
९. धुराच्या संपर्कात येणे टाळा : तंबाखूच्या धुरासारख्या हवेतील प्रदूषकांपासून वाचण्याचा प्रयत्न करा.
हिवाळ्यातील विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी चांगल्या स्वच्छतेच्या सवयींचे पालन आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची आहे. हिवाळ्यात या उपाययोजना करून नागरिकांनी आपले आरोग्य राखावे, तसेच आजारी असलेल्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात येणे टाळावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेंद्र आसोले यांनी केले आहे.
सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५
रब्बी हंगाम 2025 : अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा · शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन
अमरावती दि. 24: राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत ‘पीकस्पर्धा योजना’ राबविण्यात येत आहे. या पिक स्पर्धेत विभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वंचित / दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम 2023 पासून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2025 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -
रब्बी पीक अंतर्गत ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पिके पिकस्पर्धेत असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, याप्रमाणे पात्रतेचे निकष राहतील.
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर आहे. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकालानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार.
स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु. 300/- प्रवेश शुल्क तर आदिवासी गटासाठी रक्कम रु.150/- प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेत विजेता ठरलेल्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण व आदिवासी गटात तालुकापातळीवर पहिले, दुसरे व तीसरे अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपये बक्षीस दिल्या जाणार. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार, दुसरे 7 हजार, तीसरे 5 हजार रुपयांचे बक्षीस दिल्या जाणार. तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार व तीसरे बक्षीस 30 हजार रुपयांचे दिले जाणार.
दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी या पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पिकस्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार -मुख्यमंत्री फडणवीस
मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार
-मुख्यमंत्री फडणवीस
· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
मुंबई, दि. 24 : मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध पायाभूत प्रकल्पांची कामे आगामी पाच वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबईच्या पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण जोडणीला वेग देणार, अनेक महत्त्वाचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार आहेत.
मुंबईतील वरळी डोम येथे इंडियाज् इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाईट नेशन्स (आयआयएमयूएन) आयोजित ‘यूथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सी-लिंकचा वर्सोवा-दहिसर-भाईंदरपर्यंत विस्तार, दहिसरकडील नवीन लिंक रोड, फ्री-फ्लो ब्रिजेस, तसेच विविध टनेल प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. सध्या मुंबईतील 60 टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावर असल्याने या क्षेत्राला पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बीकेसी ते इतर भागांना जोडणारे बोगदे, नवीन लिंक रोड नेटवर्क, ओव्हर एक्स्प्रेसवे कनेक्शन आदी प्रकल्पांमुळे शहरातील प्रवासाचा सरासरी वेग मोठ्या प्रमाणात वाढेल. मुंबईत पूर्णत: बोगदे रस्ते तयार करण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षात मेट्रोचे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि वापरण्यास सोपी बनेल. ‘मुंबई वन’ हा एकात्मिक मोबिलिटी अॅप नागरिकांसाठी वन-स्टॉप सोल्युशन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पालकांमध्ये खासगी शाळांविषयी आकर्षण वाढल्याने शासकीय व महानगरपालिका शाळांची संख्या कमी होत आहेत असे चित्र समोर आले. परंतु वास्तवात परिस्थिती बदलत आहे. महानगरपालिकांच्या शाळांना आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत नेण्याचा संकल्प असून मुंबई महानगरपालिकाकडे ती क्षमता आहे. शासकीय शाळांना योग्य प्रशिक्षण, अध्यापन पद्धती आणि पायाभूत सुविधा दिल्यास त्या खासगी शाळापेक्षा सरस ठरतील, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
लोकशाही अधिक सक्षम आणि सर्व समावेशक करण्यासाठी युवांचा सहभाग अत्यावश्यक आहे. आजच्या लोकशाहीत युवा नागरिक फक्त दर्शक नसून स्वतःचे मत असलेले महत्त्वाचे स्टेकहोल्डर्स आहेत. युवांच्या मतांना स्थान दिल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पर्यावरण बदल ही केवळ पुस्तकी चर्चा नसून वास्तवातील मोठी समस्या आहे. आपण हवामान बदलाचा अनुभव घेणारी पहिली पिढी आहोत आणि त्याबद्दल काहीतरी करू शकणारी शेवटची पिढी आहोत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रदूषणाची सर्वात मोठी कारणे असतात, त्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो संपूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. पुढील टप्प्यात सार्वजनिक वाहतुकीला पूर्णपणे शून्य-उत्सर्जनच्या दिशेने नेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक वर्षे मुंबईचे सांडपाणी थेट समुद्रात सोडले जात होते, मुंबईसारख्या महानगराचा 100 टक्के सीवेज समुद्रात टाकला जाणे योग्य नाही. त्यामुळे नियम तयार करून आता संपूर्ण मुंबईत सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स उभारत आहोत. पुढील वर्षापर्यंत 100 टक्के ट्रीटेड पाणीच समुद्रात सोडले जाईल. त्याचबरोबर धारावीच्या पुनर्विकासात 30 टक्के क्षेत्र पूर्णपणे अनडेव्हलपेबल ठेवले जाणार असून त्यामुळे प्रचंड प्रमाणात ओपन आणि ग्रीन स्पेसेस निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५
23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा * राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ
अमरावती, दि. 20 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025चे आयोजन दि.23 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 37 जिल्ह्यातील 1 हजार 423 जिल्हा मुख्यालयाच्या केंद्रावर करण्यात आले आहे. या परीक्षेच्या आयोजनाच्या कार्यवाही संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
पेपर एकसाठी 2 लाख 3 हजार 334 उमेदवार व पेपर दोनसाठी 2 लाख 72 हजार 335 उमेदवार असे एकूण 4 लाख 75 हजार 669 उमेदवार महाटिईटी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या परिक्षार्थींची संख्या आहे. पेपर एक साठी 571 परीक्षा केंद्र आणि पेपर दोनसाठी 852 केंद्र अधिग्रहीत असून संपूर्ण वर्गखोल्या व परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सुरक्षा तपासणीसाठी मेटर डिटेक्टरच्या सहाय्याने फ्रिसकिंग केले जाणार आहे. तसेच परिक्षार्थींच्या आवेदनपत्राच्या मूळ डाटाबेसशी साधर्म्य तपासण्यासाठी बायोमेट्रीक व फेस रिक्गनीशन तपासणी करण्यात येणार आहे.
सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्र संचालकाच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याव्दारे लाईव्ह कास्टींगच्या माध्यमातून सर्व परीक्षा दालनांवर जिल्हा व राज्यस्तरावरून अत्यंत काटेकोरपणे सनियंत्रण ठेवले जाणार आहे. कनेक्ट व्ह्यिूव प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कक्ष यांचेकडे हॉटलाईनचे फोन उपलब्ध असतील सदर सुविधेमार्फत आवश्यकतेनुसार संबंधितांशी संपर्क साधला जाईल व या फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमितपणे केंद्रसंचालकासाठी विविध सूचना एकाचवेळी निर्गमित करता येतील. दिलेल्या सूचनांचे (Broadcast) संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे. जेणेकरून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासार्हता कायम राहून परीक्षा शिस्तबध्द पद्धतीने घेण्यात येईल.
परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थी/उमेदवारांनी परीक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचना व माहितीचे अवलोकन करावे, असे परिषदेतर्फे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
<
अमरावती, दि. 19 : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी डॉ. सिंघल यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर आयुक्त अजय लहाने, उपायुक्त रविंद्र हजारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५
लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र राज्याच्या प्रगतीचे आधारस्तंभ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन व युनिडो यांच्यात हेतुपत्र वाटप
मुंबई, दि. 18 : उद्योजक स्वतःच्या कष्टातून उद्योग उभारतात, तंत्रज्ञानाची जोड, विकासाला चालना, आधुनिक साधने यांची उपलब्धता करून दिल्यास हे उद्योजक चमत्कार घडवू शकतात. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लघु आणि मध्यम उद्योग असून हे क्षेत्र राज्याच्या प्रगतीचे आधारस्तंभ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (युनिडो) यांच्यात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि इनोव्हेशन क्षेत्रातील सहकार्यासाठी हेतुपत्र (लेटर ऑफ इंडेट) वाटप करण्यात आले, या करारामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वीकाराला गती मिळणार असून, विशेषतः एमएसएमई उद्योगांना जागतिक स्पर्धात्मकतेकडे नेण्यास मोठी मदत होणार आहे.
युनिडो ही जागतिक स्तरावर टिकाऊ आणि समावेशक औद्योगिक विकासाला पाठबळ देणारी प्रमुख संस्था आहे. तर इंडिया एसएमई फोरम (आयएसएफ) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे प्रशिक्षण, आउटरीच आणि उद्योग स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कार्यरत आहे. दोन्ही संस्थांच्या अनुभवाचा लाभ महाराष्ट्राला तंत्रज्ञान-आधारित औद्योगिक वाढीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्यातील औद्योगिक क्षेत्र कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, एव्ही/व्हीआर, ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4.0 सारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर युनिडोच्या तांत्रिक ज्ञानाचा आधार घेत महाराष्ट्रात डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मजबूत परिसंस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, पुणे येथे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा प्रस्ताव असून महत्त्वाच्या औद्योगिक क्लस्टर्समध्ये क्षेत्रनिहाय "स्पोक सेंटर्स" उभारले जाणार आहेत.
या संरचित मॉडेलमुळे मोठ्या उद्योग आणि एमएसएमई यांच्यातील डिजिटल दरी कमी होईल, औद्योगिक व्हॅल्यू चेन मजबूत होईल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. तसेच राज्याच्या इनोव्हेशन-ड्रिव्हन आणि टिकाऊ आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांना मोठी गती मिळणार आहे.
महाराष्ट्र शासन व जीएएमई करारामुळे सूक्ष्म उद्योगांना मोठा दिलासा; रोजगारनिर्मितीला वेग मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रुनरशिप (जीएएमई) यांच्यात वर्षा निवासस्थानी सहकार्य करार झाला, यामुळे राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) क्षमता वाढवण्याला मोठा वेग मिळणार आहे. या करारामुळे विशेषत: सूक्ष्म उद्योगांचे सबलीकरण, रोजगारनिर्मिती आणि जिल्हास्तरीय उद्यमशीलता इकोसिस्टम सक्षम होणार आहे.
जीएएमई ही ज्युनिअर अर्चिव्हमेंट इंडिया सर्व्हिसेस (जेएआयएस) अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय पातळीवरील उद्यमशीलता बळकटीकरण संस्था असून भारताला नोकरी शोधणाऱ्यांपासून नोकरी निर्माण करणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याचे तिचे ध्येय आहे. महाराष्ट्रात सुमारे 50 लाख एसएसएमई उद्योग असून त्यापैकी 99% सूक्ष्म उद्योग आहेत. बहुतांश उद्योग पाचपेक्षा कमी कामगारांवर चालतात. यामुळे आर्थिक गती आणि रोजगारनिर्मिती मर्यादित राहते.
या कराराद्वारे उद्योग विभाग आणि जीएएमई मिळून कोहोर्ट-आधारित बिझनेस ॲक्सेलरेटर कार्यक्रम राबवणार आहेत. यामुळे उद्योजकांची व्यवसाय क्षमता, बाजारपेठ समज, व्यवस्थापन आणि स्पर्धात्मकता वाढेल. सूक्ष्म उद्योगांना लघु व मध्यम पातळीवर नेण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्याने प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढेल. जिल्हा उद्योग केंद्रे आधुनिक पद्धतींनी सक्षम केली जातील. प्रत्येक जिल्ह्याचा स्थानिक उद्योग नकाशा तयार करून त्या त्या भागातील संधी ओळखल्या जातील. युवांसाठी कौशल्य-विकास, तर महिलांसाठी उद्योजकतेतील सहभाग वाढवण्याचे कार्यक्रम राबवले जातील. विविध जिल्ह्यांतील यशस्वी उद्योजकांना समोर आणून अधिकाधिक नागरिकांना उद्योजकतेकडे प्रेरित करण्यात येईल. त्याचबरोबर महाविद्यालये, बँका, उद्योगसंस्था, कॉर्पोरेट्स आणि माध्यमांच्या सहभागातून उद्योजकांना मार्गदर्शन, कर्जसहाय्य आणि बाजारपेठेतील संधी उपलब्ध होतील.
या करारामुळे महाराष्ट्र स्टेट इंटरप्रेनुअरशीप मिशनला (एमएसईएम) या करारामुळे अधिक बळ मिळणार आहे. स्थानिक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी जीएएमई कडे देशातील विविध मॉडेल्सचा अनुभव असल्याने महाराष्ट्रात त्याचा फायदा थेट उद्योगांना मिळणार आहे.
या कराराच्या वेळी उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन, जीएएमई संस्थेचे संस्थापक रवी वेंकटेशन, अध्यक्ष केतुल आचार्य, माजी प्रधान सचिव (उद्योग) विनेश जैरथ, मिशन डायरेक्टर लेफ्टनंट कमांडर योगेश भावसार (निवृत्त) तसेच नागपूर उद्यमशीलता मिशन कोर ग्रुपचे शशिकांत चौधरी, दुष्यंत देशपांडे आदि उपस्थित होते.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती
· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण
· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ
मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत या अभियानात विविध संस्था जोडले जात आहेत.
शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व मधून मुंबईत राबवण्यात आलेल्या ‘सुविधा केंद्र’ उपक्रम एक आदर्श मॉडेल ठरत आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त भागीदारीत सुरू झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीत मोठे परिणाम साधले आहेत. सध्या मुंबईत २३ केंद्रे कार्यरत असून, लवकरच २४ वे केंद्र सुरू होणार आहे. मुंबईत आणखी २ केंद्रे बांधकामाधीन असून ७ केंद्रांचे प्रस्ताव प्रगतीपथावर आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एचएसबीसी आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही योजना पुढील काही वर्षांत अधिक विस्तारणार आहे.
शहरातील झोपडपट्टी आणि वंचित वस्त्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणाऱ्या स्वच्छता सुविधा देण्याचे उद्दिष्ट या केंद्रांमागे आहे. ५.५ लाख नागरिकांना आतापर्यंत याचा प्रत्यक्ष लाभ झाला असून, आरोग्यदृष्ट्या देखील हे मॉडेल उपयुक्त ठरत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
सुविधा केंद्रे ही स्वच्छतेच्या शाश्वत व्यवस्थेची महत्त्वपूर्ण कडी आहेत. पंतप्रधानांच्या स्वच्छता मोहिमेसाठी ही मदत अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात आणखी सुविधा केंद्रे सुरू करावीत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या महानगरात स्वच्छता ही केवळ सोयीची बाब नाही, तर सन्मानाचा प्रश्न आहे. ‘सुविधा केंद्र’ मॉडेलने सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उत्तम काम कसे होते याचे उदाहरण निर्माण केले आहे. हे केंद्रे शहराच्या आरोग्यसुरक्षेत मोठे योगदान देत आहेत. या सुविधा सेंटरमध्ये उत्तम सुविधा, लोकांचा सहभाग, वर्तणूक बदल, आर्थिक आणि पर्यावरण टिकाव आणि कार्यक्षम संचालन यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे सर्व अत्यंत उल्लेखनीय असून शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श ठरू शकते. नागरिकांनी केंद्रांचा सक्रिय वापर करावा.”
सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५
भरती परीक्षेच्या निकालानंतर किमान चार दिवसात नियुक्तीपत्र द्यावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणा सादरीकरण बैठक
मुंबई, दि. 17 : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार 75 टक्के पदोन्नती देण्याचे निर्देशही दिले. नागरिक केंद्रित, जबाबदार आणि सुशासनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा करण्यात येत असून या सुधारणांमध्ये प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग नोंदवित आपला ठसा उमटवावा, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वर्षा निवासस्थानी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणा (गुड गव्हर्नन्स री इंजीनियरिंग) बाबत सादरीकरण बैठक झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री फडणवीस आढावा घेताना निर्देशित करीत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पदोन्नती हा प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. शासकीय सेवेत असताना पदोन्नती मिळाल्यानंतर मिळालेली जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे दरवर्षीचा आढावा घेत जानेवारी अखेरपर्यंत विभागांनी 75 टक्के पदोन्नती देण्याची कार्यवाही केली पाहिजे. या बाबीवर विभागांचे 'रँकिंग' करण्यात यावे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रशासकीय सुधारणांमध्ये मागे पडलेल्या विभागांनी गतीने कार्यवाही पूर्ण करीत विभागाचे कार्य ठळकपणे अधोरेखित करावे. प्रत्येक विभागाने रिक्त पदांच्या संख्येनुसार आपले मागणी पत्र द्यावे, तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेत, त्यांची क्षमता वृद्धी करावी.
शासनाच्या प्रत्येक विभागाने नियुक्ती नियम अद्ययावत करावे. बिंदू नामावली तपासून अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. ही सर्व प्रक्रिया राबवितांना कालमर्यादेचे पालन करावे. विभागाने नियुक्ती नियम अद्ययावत करताना संबंधित पदाला सद्यस्थितीत आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्यानुसार करावे. जेणेकरून भविष्यात या नियमांमध्ये तातडीने बदल करावे लागू नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
नागरिकांना सर्व सेवा विनाविलंब, सहजपणे उपलब्ध होण्यासाठी आपले सरकार 2.0 पोर्टल कार्यान्वित करण्यात यावे. राज्यात असलेले आपले सरकार केंद्र, सेतू केंद्र यांचे सक्षमीकरण करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सुचित केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सर्व विभागांच्या प्रशिक्षण संस्था एका छताखाली आणण्यात याव्यात. या प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून नियमित प्रशिक्षणाचा प्रभावी कार्यक्रम राबविण्यात यावा. सद्यस्थितीत आवश्यकतेनुसार विभागांनी प्रशिक्षण घेण्यात यावे. प्रशासनाच्या सुधारणांमध्ये विभागांनी आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत अप्पर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा आणि समग्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल यांनी सादरीकरण केले. बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (प्रशासकीय सुधारणा) राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) इकबाल सिंह चहल, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते.
कोठा येथे साडी निर्मिती उद्योग उभारणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी *मेळघाटातील रस्त्यासाठी मार्ग काढणार *मदर डेअरीचे दोन दूध संकलन केंद्र सुरू करणार
अमरावती, दि. 17 : मेळघाटातील आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. कोठा येथील संपूर्ण बांबू केंद्रात बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यात येत आहेत. येत्या काळात या ठिकाणी पाच कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
धारणी तालुक्यातील कोठा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आज कार्यक्रम पार पडला, यावेळी कांचन गडकरी, संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष डॉ. निरुपमा देशपांडे, योगेश बापट आदी उपस्थित होते.
श्री. गडकरी म्हणाले, आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांचा विकास व्हावा, समाजात स्थान मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आदिवासींमध्ये कौशल्य असून त्यास प्रशिक्षणाची जोड देणे आवश्यक आहे. संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबूच्या सुबक वस्तू तयार करण्यात येत असून जगभरातील 60 देशांमध्ये या वस्तू पोहोचल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्यापर्यंत चालून आला पाहिजे, अशा वस्तू निर्मिती करण्यावर भर द्यावा. आज विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. याचा उपयोगही करून घेणे आवश्यक आहे. कोशाच्या साडीला जगभरात मागणी असून यासाठी पाच कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात येईल. प्रकल्पासाठी आवश्यक असणारा दोन कोटी रुपयांचा स्वनिधी संस्थेसाठी देणगी देण्यात येणार आहे. तसेच तीन कोटी रुपयांचे केंद्राचे सहकार्य देण्यात येईल. साडी निर्मितीसाठी आवश्यक ते प्रशिक्षणही उपलब्ध करून देण्यात येईल.
मेळघाटातील रस्त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे. रस्त्यांच्या विकासाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. देशातील महामार्गाचे काम एशियन बँक करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे काम कशा पद्धतीने करण्यात येईल, याची माहिती घेण्यात येईल. मेळघाटातील युवकांच्या शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय होईल. तसेच मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलनासाठी धारणी आणि अन्य एका ठिकाणी केंद्र उभारण्यात येईल. यातून दररोज नगदी पैसे मिळण्यास मदत होईल.
यावेळी श्री. गडकरी यांच्या हस्ते कारागीर हाटचे विमोचन करण्यात आले. डॉ. निरूपमा देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. योगेश बापट यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गरजू कुटुंबांना गॅस शेगडीचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी 'युनिटी पदयात्रा' उत्साहात संपन्न
अमरावती, दि. 17 : भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 2025 हे वर्ष 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. 'मेरा युवा भारत' (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत या सोहळ्याचे औचित्य साधून, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त (31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 'सरदार@ 150 अभियान') देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज जिल्हास्तरीय 'युनिटी पदयात्रा'चे आयोजन मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथे करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, , महानगरपालिका अमरावतीचे उपआयुक्त नरेंद्र वानखेडे, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी, राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारी पथनाट्ये आणि सांस्कृतिक नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली, तसेच उपस्थितांनी आत्मनिर्भर भारताची शपथ घेतली. त्यानंतर, मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथून सुरू झालेली ही 'सरदार@ 150' पदयात्रा इर्विन चौक मार्गे मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहातून परत महाविद्यालयाकडे मार्गस्थ झाली.
मेरा युवा भारत अमरावती, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, तसेच एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक, होमगार्ड, भारत स्काऊट गाईड आणि विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकवृंद, हजारो विद्यार्थी व स्वयंसेवक या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकात्मता आणि 'एक भारत, आत्मनिर्भर भारत' चा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बी-बियाणे उत्पादक कंपन्यानी नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती करणे ही मागणी आहे. बी-बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशियाई बी-बियाणे परिषद-२०२५ च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताची बी-बियाणे बाजारपेठ ही जगातील वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. आज ती सुमारे ७.८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली असून २०३० पर्यंत जवळपास १९ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्राझीलनंतर भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे आणि भारतात वापरल्या जाणाऱ्या ९५ टक्के पेक्षा जास्त बियाण्यांचे उत्पादन देशांतर्गत होत असल्याने हा उद्योग थेट ‘मेक इन इंडिया’ला हातभार लावत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आशियाई बी-बियाणे परिषद-२०२५ चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, आशिया पॅसिफिक सीड असोसिएशनचे अध्यक्ष श्री.टेकवोंग, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एम. प्रभाकर राव, फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय राणा, आशिया पॅसिफिक सीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक फ्रँकलिन सिओ, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष वैभव काशीकर आणि फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राजू राठी तसेच विविध देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. निकृष्ट व अनधिकृत बियाणे विक्रीवर नियंत्रणासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी-बियाणे कायदा आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रात बागायती पिकांना गुणवत्तापूर्ण रोपसामग्री मिळावी यासाठी तीन क्लीन प्लांट सेंटर स्थापन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. #AsianSeedCongress2025 #ASC2025
स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ति संग्रामात अमुल्य योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे व कमल तलावाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर, दि.16 :- मराठवाडा मुक्ति संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. तसेच महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. त्यांचे हे योगदान अमुल्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
क्रांती चौक येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे, तसेच ऑनलाईन पद्धतीने ऐतिहासिक कमल तलावाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह मराठवाडा मुक्ति संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण जीवन व्रतस्थ होते. स्वामी विवेकानंदाप्रमाणेच तरूणाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी देशभक्ती जागृत केली. भारत स्वतंत्र झाल्या नंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्याकरीता जवळपास 13 महिन्यांचा कालावधी लागला. या कालावधीत मराठवाडा निजामाच्या इस्टेटचा भाग होता. रजाकारांच्या संपूर्ण अन्यायाची पराकाष्टा झाली होती, त्याच्याविरुद्ध एक मोठा रणसंग्राम उभा झाला होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्यात नेतृत्व करुन हैदराबाद, मराठवाड्यात स्वतंत्र अस्मितेची ज्योत पेटवली. त्यातून अनेक तरुण, महिला या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी झाले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या स्वतंत्र संग्राम सेनानींच्या हाकेला प्रतिसाद देत सैनिकी कारवाई केली आणि त्यातून मराठवाडा मुक्त झाला. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948 हा होता. दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो. या लढ्यात भरीव योगदान दिलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्वामी रामनंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडिलगेकर यांचा यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी ऐतिहासिक कमल तलावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहरातील पर्यटन स्थळांमध्ये कमल तलावामुळे भर पडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कमल तलावाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वत: तिकीटाची खरेदी करून कमल तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचे जाहिर केले.
येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटन
येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका): आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचारात वापर, संशोधन अशा विविध प्रकारे चालना दिली असून येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
येथील सातार तांडा भागातील श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, श्रीयश प्रतिष्ठानचे बसवराज मंगरुळे,सचिव संगिता मंगरुळे, रुग्णालय अधीक्षक डॉ. परेश देशमुख, अधिष्ठाता स्वाती इटगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय जीवनपद्धतीस अनुकूल व निसर्गाशी साधर्म्य सांगणारी ही उपचार पद्धती वेदांमध्ये आयुर्वेद या नावाने सांगण्यात आली आहे. आजाराच्या लक्षणांवर नव्हे तर मुळाशी जाऊन आयुर्वेदात उपचार केले जातात. ही उपचार पद्धती शाश्वत उपचार पद्धती आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीचा जगभरात वापर वाढत आहे. भारतात आयुर्वेद उपचार पद्धतीने उपचार घेण्यासाठी अनेक लोक येत आहेत. आयुर्वेदाने या जगाला विज्ञाननिष्ठ उपचार पद्धती देऊन शल्यचिकित्सा पद्धतीही दिली आहे.
कोविड काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पूरक औषधांमध्ये आयुर्वेदीक औषधींचा सर्वाधिक समावेश होता. केंद्र सरकारमार्फत या उपचार पद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रशिक्षित वैद्य तयार करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांना चालना दिली जात आहे. आगामी दशकात भारत हा जगातली प्रमुख अर्थव्यवस्था बनून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ पहात आहे. 2047 पर्यंत आपला देश आर्थिक महासत्ता झालेला असेल. मराठवाड्यातही आपण उद्योग क्षेत्राला पाठबळ देत असून इलेक्ट्रिक व्हेईकलची कॅपिटल म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख निर्माण होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





































