शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

*#थेटप्रसारण*

 *📍 विधानभवन, मुंबई*


*#थेटप्रसारण*

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती…*

*#LIVE*


*खालील लिंक्सद्वारे थेट प्रसारण पाहा..*


X (Twitter) –  https://x.com/MahaDGIPR/status/2027260495061995591?s=20 


Facebook – https://www.facebook.com/share/v/17VhfPRKxV/ 


YouTube – https://youtu.be/dEDFOpB94z8

विशेष लेख मायबोलीत बोलू या! चला… मराठीतच बोलू या!! मराठी भाषा गौरव दिन

 विशेष लेख

मायबोलीत बोलू या! चला… मराठीतच बोलू या!!

मराठी भाषा गौरव दिन

फेब्रुवारी 26, 2026



 

मराठी भाषा हजारो वर्षांच्या इतिहासाने समृद्ध आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर आपल्या संस्कृतीचे, ऐतिहासिक परंपरेचे आणि सृजनशीलतेचे जिवंत प्रतीक आहे. ‘माय मराठी’ या संकल्पनेत तिचे शुद्ध, प्रमाण आणि अभिजात रूप जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विविध उपभाषांनी वाढवलेले तिचे वैविध्यही महत्त्वाचे आहे.

          मराठी ही उपभाषांनी समृद्ध झालेली भारतातील एक प्रमुख भाषा आहे.मातृभाषा आपले अस्तित्व असते. बोलीभाषा माणसाची अस्मिता असते. प्रत्येक बोलीत तिचा वेगळा रंग, वेगळी लय आणि वेगळे चैतन्य तसेच लोकजीवनाचे प्रतिबिंब सामावलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना जगातील एका अभिमानास्पद भाषेला आपण ‘माय मराठी’ म्हणतो, याचा आत्मीय अभिमान बाळगण्याचा हा दिवस आहे.

          हा दिवस प्रत्येक मराठी माणसाने व्यवहारात, शिक्षणात, प्रशासनात, माध्यमांमध्ये आणि दैनंदिन संभाषणात मराठीचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा संकल्प करण्याचा आहे.

मराठी भाषा गौरव दिन : २७ फेब्रुवारी

          वि. वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी, म्हणजेच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी साहित्य आणि भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

          २१ जानेवारी २०१३ रोजी मराठी भाषा विभागाने अधिकृतपणे या दिनाची घोषणा केली. तसेच ३ ऑक्टोबर रोजी राज्यात ‘अभिजात मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. तर दरवर्षी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतनिमित्त १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. राज्यभरात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम, वाचन उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दोन्ही दिवसांत राज्यभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

          मराठी भाषेचा गौरव करण्याबरोबरच तिच्या संवर्धनासाठी आणि विस्तारासाठी चिंतन करण्याची ही संधी असते. चला, यावर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना मराठीला समृद्ध करणाऱ्या उपभाषांचा वाटा समजून घेऊया.

विविध उपभाषांचा समृद्ध वारसा

          महाराष्ट्रात विविध बोलीभाषांचा विपुल वापर आढळतो. नाथ, महानुभाव आणि वारकरी संत परंपरेतील संतांनी प्राचीन काळापासून विविध बोलींचा वापर करून मराठी भाषेला अधिक व्यापक केले. आपण सर्वांनी आपल्या बालपणी चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकली आहे…तुम्हाला माहिती आहे, श्री चक्रधर स्वामींनी ही गोष्ट आठशे वर्षांपूर्वी रुसलेल्या एका मुलीला सांगितल्याची नोंद लीळाचरित्रात आहे. कविश्रेष्ठ कालिदास, शूद्रक यांच्या शाकुंतल, मृच्छकटिक या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठी बोली भाषेत आहेत.

          वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, मालवणी, कोल्हापुरी, मराठवाडी, नागपुरी, झाडीबोली, खानदेशी, गोंडी, बंजारा, कोलामी अशा असंख्य उपभाषा मराठीच्या समृद्ध परंपरेचा भाग आहेत. प्रत्येक उपभाषेला स्वतंत्र ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.

          जशा अनेक उपनद्या मिळून नदी अधिक विशाल आणि समृद्ध होते, तशाच या उपभाषांनी मराठी भाषेला गोडवा, विस्तार आणि ऊर्जा दिली आहे.

          उदाहरणार्थ, वऱ्हाडी ही अत्यंत प्रभावी उपभाषा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीता’ मध्ये वऱ्हाडी भाषेचा प्रभावी वापर दिसतो. त्यांनी संपूर्ण गावगाडाच मराठीत मांडला आहे.तसेच संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनांमधूनही वऱ्हाडीचा सहज आणि प्रभावी उपयोग आढळतो. आचार्य प्र.के.अत्रे यांनी गाडगेबाबांच्या वऱ्हाडी संबोधनाचे जाहीर कौतुक केले आहे.

          कोकणी व मालवणी बोली त्यांच्या खास गोडव्यासाठी ओळखल्या जातात, तर कोल्हापुरी बोली तिच्या रांगड्या ठसक्यासाठी प्रसिद्ध आहे. झाडीबोली आणि गोंडी भाषेच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन झाला आहे. झाडीबोलीतील नाटकांची परंपरा महाराष्ट्राला ज्ञात आहे. खानदेशी आणि अहिराणी भाषेचा गोडवा बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून प्रत्ययास येतो.

          उपभाषांवर प्रादेशिक प्रभाव असतो. उदाहरणार्थ, कोकणी मराठीवर कन्नडचा प्रभाव जाणवतो. ‘अक्का’ हा मोठ्या बहिणीसाठी वापरला जाणारा गोड शब्द कन्नड-तेलुगू भाषांमधून मराठीत रूढ झाला आहे. वऱ्हाडीमध्ये, झाडीबोलीत हिंदीचे, तर अहिराणीमध्ये गुजरातीचे अनेक शब्द सहजपणे मिसळलेले दिसतात. खरे तर हीच भाषेची खरी ताकद आहे—स्वीकारण्याची आणि समृद्ध होण्याची!

मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास

          उपभाषांनी मराठीला अधिक व्यापक आणि अभिव्यक्तिपूर्ण बनवले आहे. राज्य शासनाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखक आणि साहित्यिक यांचा सन्मान करण्याचे निर्देश दिले आहेत.

          भाषाविषयक स्पर्धा, परिसंवाद, व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्राचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जात आहे. मराठीचा प्रशासनिक, शैक्षणिक आणि सामाजिक वापर वाढवणे ही काळाची गरज आहे.

          शासन प्रयत्नशील आहेच; परंतु, सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी विविध बोलीभाषांचा अभ्यास करून त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. भाषेचे संवर्धन हे केवळ धोरणातून नाही, तर व्यवहारातून होते.

मराठीचा वापर वाढवू या!

          ‘उपभाषांनी समृद्ध झालेली माय मराठी’  हा विचार मराठीच्या सर्वांगसुंदरतेची जाणीव करून देतो. भाषा ही आईसारखी असते—विशाल, सामावून घेणारी आणि ममत्वाने ओथंबलेली.

          महाराष्ट्रात येणारा कोणताही व्यक्ती या भाषेचा गोडवा अनुभवतो आणि सोबत घेऊन जातो. ‘तुम्हाला मराठी येते म्हणजे तुम्ही मराठी आहात’ हा या भाषेचा उदात्त बाणा आहे.

त्यामुळे आज मराठी भाषा गौरव दिनाला जागतिक स्तरावर मराठीचा सन्मान टिकवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी..

·         मराठी माध्यमातील शिक्षणाचा प्रसार

·         मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे

·         आधुनिक माध्यमांवर मराठीत अभिव्यक्त होणे

·         दैनंदिन व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर

              ही अत्यावश्यक पावले आहेत.

दिवंगत कवीवर्य डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी मराठीच्या सामर्थ्याचे सुंदर वर्णन केले आहे—

मराठीची प्रतिभा, ज्ञानेश्वरीत समावते

ग्रामगीता गाथाही, मराठीतच मावते

लावणीतून मराठीचे, सौंदर्य ओसंडते

शौर्य आणि औदार्य, पोवाड्यातून सांडते

मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले

गाडगेबाबा मराठीतच जन्म घेऊन गेले

अमृताशी पैज जिंकते, मराठी बोली

आभाळाची उंची जिच्यात, समुद्राची खोली

साऱ्यांनी मराठी हुंकारावर डोलावे

मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे..!

चला… मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया, मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलूया..!

0000

 प्रवीण टाके, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर 

 

विशेष लेख-श्री गुरु तेग बहादुर साहिब जी- ‘हिंद दी चादर’

 


श्री गुरु तेग बहादुर साहिब जी- ‘हिंद दी चादर’

          श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या नावाने गौरविले जात. धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर साहिबजी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.

          01 एप्रिल 1621 रोजी, अमृतसर येथे श्री गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म वडील गुरु हरगोबिंद आणि माता नानकी देवी यांच्या कुटुंबात झाला. 1664 मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांनाही गुरु पदवी प्राप्त झाली होती. गुरु तेग बहादूर यांचे मूळ नाव ‘त्यागमल’ होते. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘तेग बहादूर’ म्हणजेच ‘तलवारीसारखा धैर्यवान’ हे नाव दिले. ते अतिशय शांत, ध्यानशील आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्य, संपत्ती, मान नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत केले. धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा देत असताना त्यांना दिल्लीतील चांदणी चौकातील तुरूंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी ध्यान करत, ईश्वराचे स्मरण करण्यास प्राधान्य दिले. मानवधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना गुरू तेग बहादुर शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करूणा आणि धैर्य या मुल्यांचा संदेश दिला. त्यांची अनेक भक्तिगीते गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी आनंदपूर साहिब हे पवित्र स्थळ स्थापन केले. जे आजही शीख धर्मातील अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते. केंद्र शासनाने 2022 मध्ये त्यांची 400 वी जयंती देशभर साजरी केली होती. त्यांनी देशाला साधे आणि गहन तत्वज्ञान दिले व सुमारे 57 शबद (भक्तिगीते) आणि 57 सलोक (उपदेशपर पदे) रचले. या रचनांमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि परमेश्वरावर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या सर्व रचना गुरु ग्रंथ साहिबच्या शेवटच्या भागात आहेत.

‘जो नर दुःख में दुःख नहीं मानें,

सुख सनेहु अरू भय नहीं जा कै, कांचन माटी मानै,

लोभ मोह अभिमान न ता कै, हरख सोग नहीं जा कै

जो नर दुःख में दुःख नहीं मानै’

          म्हणजेच जो मनुष्य दुःखात असला तरी दुःखी होत नाही, जो सुखात असला तरी अहंकार करत नाही, ज्याच्यासाठी सोने आणि माती समान आहेत, जो लोभ, मोह, अभिमान, आनंद आणि शोक यांपासून मुक्त आहे तोच खरा ज्ञानी आहे. अशा अनेक भावपूर्ण आणि मानवी जीवनाचा सार सांगणाऱ्या रचना त्यांनी केल्या आहेत. श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचे जीवन निर्भयता, धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक आहे.

          हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या साहिबजीच्या शहिदीला 350 वर्षे पूर्ण होत झाल्यानिमित्त महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादुर साहिबजी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.

          नुकतेच 7 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक व सामाजिक संघटनांसह श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना आदरांजली अर्पण करण्यात येऊन सामाजिक, प्रबोधनात्मक व जागृतीपर कार्यक्रम संपन्न झालेत.  याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त संकेतस्थळाचे आणि गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण झाले.

नांदेड येथे मुख्य कार्यक्रम

          ‘हिंदी दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा 25 जानेवारीला या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहून श्री गुरु तेग बहादुर यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी या सहा समाजातील देशभरातील सर्व संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते, गणमान्य व्यक्ती, समाजबांधव एकत्र येऊन श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या पावन स्मृतींना नमन करुन त्यांचा धर्मरक्षण, सहिष्णुता आणि एकात्मतेचा-मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचविणार आहे. या शहिदी समागम कार्यक्रमातून हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कर्तृत्व आणि विचारांचा परिचय जनतेला होणार आहे.

0000

विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

 


गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

महापारेषणच्या ऊर्जा प्रकल्पांची उभारणी गतीमान करा





 महापारेषणच्या ऊर्जा प्रकल्पांची उभारणी गतीमान करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 26 : राज्यात 2029-30 पर्यंत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होऊन अनेक उद्योग कार्यान्वित होणार आहेत. उद्योगव्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी ऊर्जा मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले ऊर्जा प्रकल्प निर्धारित वेळेपेक्षा आधी पूर्ण व्हावेतयासाठी महापारेषणशी संबंधित प्रकल्प उभारणीचा वेग वाढवावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महापारेषणच्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवालऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामहापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताअपर मुख्य सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह टाटा पॉवरजेएसडब्ल्यूआवाडासीमेन्स आदी उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील ऊर्जेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी महापारेषणशी संबंधित 13 पैकी 9 महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा तपशीलवार आढावा यावेळी घेण्यात आला. प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून आवश्यक ते प्रशासकीय निर्णय तातडीने घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सध्या राज्यात 37 हजार 682 मेगावॅट वीज उपलब्ध असून2035 पर्यंत ही गरज वाढून 80 हजार 197 मेगावॅटपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वाढत्या औद्योगिक आणि नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने प्रकल्पांची वेळेपूर्वी पूर्तता होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

            प्रकल्प उभारणीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असूनउद्योग क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन नियोजन करण्यात येत आहे.पुढील काळात राज्यात आवश्यकता असलेल्या वीजेपैकी 25% वीज निर्मिती सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून होणार असून या हरित ऊर्जेमुळे पर्यावरण जतनास देखील मोठा हातभार लाभणार आहे. यासह उदंचल जलविद्युत निर्मिती (पीएसपी )द्वारे जवळपास सहा टक्के वीज निर्मिती होईल.

या प्रकल्पांचा आढावा :

            महापारेषण संबंधित नवीन प्रकल्पाच्या उभारणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये आवाडा उद्योग समूहाशी संबंधित नांदेड व लातूर जिल्ह्यातील 400 मेगा वॅटजेएसडब्ल्यूच्या सोलापूर जिल्ह्यातील सातशे मेगावॅटटाटा पॉवर संबंधित नांदेड जिल्ह्यातील 1500 मेगावॅटजेएसडब्ल्यूचा अकोला जिल्ह्यातील 500 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पनांदेड जिल्ह्यातील 500 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प आणि लातूर जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पआवाडा संबंधित जालना जिल्ह्यातील 500 मेगावॅट व धाराशिव जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पधुळे जळगाव जिल्ह्यातील 850 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प व धाराशिव बीड जिल्ह्यातील दोनशे पन्नास मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

        वीज क्षमता वाढीसाठी सौर ऊर्जापवन ऊर्जाहायब्रीड ऊर्जा प्रकल्प

वीज निर्मितीच्या विविध स्त्रोतांतून ऊर्जा निर्मितीसाठी टॅरिफ-आधारित स्पर्धात्मक बोली (टीबीसीबी) लागू झाली आहे. "टीबीसीबी माध्यमातून निधी गुंतवणूक होत असल्याने "पुढील ३५ वर्षांसाठी वार्षिक टॅरिफ महसूल निर्माण होईल. जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जाईल.

महापारेषण ही देशातील सर्वात मोठी राज्य ट्रान्समिशन युटिलिटी आहेज्याची ट्रान्समिशन क्षमता १,४०,००० एमव्हीए पेक्षा जास्त आहे.

क्षमता वाढीसाठी सौर ऊर्जापवन ऊर्जाहायब्रीड ऊर्जा निर्मिती प्रकल्पपारंपारिक जलविद्युत निर्मिती प्रकल्प याद्वारे अक्षय्य ऊर्जाचा वाटा २०२३ मध्ये ३०% वरून २०३० पर्यंत ६०% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.यातून खासगी उद्योगकडून टॅरिफ-आधारित स्पर्धात्मक बोलीद्वारे सुमारे ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करून महाराष्ट्र २.५ गिगावॅट राउंड-द-क्लॉक अक्षय्य ऊर्जा क्षमता विकसित करण्याची प्रकल्प उभारले जात आहेत.




'महावितरणने उत्पन्न वाढीसाठी

'आयपीओआणून 'कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अंमल करावा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        एमएसईबी सोलर अ‍ॅग्रो पॉवर लिमिटेड कंपनीचे कार्यान्वयन सुरू करावे

·         महावितरणच्या पुनर्रचित आराखड्याचे सादरीकरण

मुंबईदि. २६: ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करून तोट्याकडून नफ्याकडे वळावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत कंपनीने आपल्या कारभारात कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अंमल करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेऊर्जा विभागाने एमएसईबी सोलर अ‍ॅग्रो पॉवर लिमिटेड कंपनी निर्माण केली आहे. नवीन कंपनीमुळे कृषी क्षेत्राच्या दायित्वापोटी सध्या तोट्यात असलेल्या महावितरण कंपनीचे विभाजन झाल्यामुळे कंपनी नफ्यात आलेली दिसेल. या कंपनीचे कार्यान्वयन सुरू करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

कृषी क्षेत्राच्या राज्य शासनाच्या हमीची रक्कम कंपनीला येणाऱ्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्यात यावी. नवीन सोलर ॲग्रो पावर लिमिटेड कंपनीला ठराविक मर्यादेपर्यंत आणि कालावधीसाठी शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येईल. त्यानंतर कंपनीला स्वतःच्या उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे लागतील. जेणेकरून भविष्यात शासनाकडे निधी मागणीची वेळ येणार नाहीअसेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

भांडवली बाजारात कंपनीने आयपीओच्या माध्यमातून प्रवेश केल्यास मोठ्या प्रमाणावर समभाग धारकांकडून गुंतवणूक होऊन कंपनीसाठी निधी उपलब्ध करता येईल. सध्या कंपनीची ७६ हजार १८९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ५९ हजार ५२७ कोटी रुपये कृषी क्षेत्राशी सबंधित आहेत. कंपनीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आर्थिक पुनर्रचनेची गरज आहे. शासनाकडून हमी स्वरूपात असलेल्या ३२ हजार ६७९ कोटी देण्याबाबत टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात यावीअसेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भारत सरकारच्या प्रस्तावित योजनेनुसार राज्य शासन जीएसडीपीच्या (सकल राज्य देशांतर्गत उत्पादन) ०.५ टक्के रक्कम महावितरणला मिळण्यासाठी प्रयत्न करावे. प्रस्तावित पुनर्रचना योजनेच्या अंमलबजावणीनंतर निधी मागण्याची आवश्यकता राहणार नसल्याने शासनाची बचत होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कार्यवाही पूर्ण करावी.

बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवालअपर मुख्य सचिव (वित्त) ओ . पी गुप्ताअपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्लामहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा तसेच संचालक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी सादरीकरण केले. 

 

विदर्भातील वैद्यकीय सुविधांना मुख्यमंत्र्यांचे बळ

 लेख… दिनांक:२६.२.२०२६

विदर्भातील वैद्यकीय सुविधांना मुख्यमंत्र्यांचे बळ
आरोग्य आणि समृद्धीचा निकटचा संबंध आहे. घरात एखादी व्यक्ती आजारी असेल, तर तिच्या उपचारांच्या खर्चाने सवर्सामान्य माणूस पार कोलमडून जातो. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूणच वैद्यकीय क्षेत्राला दिलेल्या बळामुळे गरजूंना वैद्यकीय उपचार सहज शक्य झाले आहेत. राज्यातील जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी विविध योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यभरात आणि विदर्भात राबविल्या जात आहेत. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा आणि कुणीही उपचाराशिवाय राहू नये, असा मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न आहे.
गेल्या दहा वर्षात राज्यासहच विदर्भाचेही चित्र पार बदलले आहे. सुंदर रस्ते, मेट्रो, पर्यटनस्थळांचा विकास यासहच विदर्भातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस विशेष प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच नागपूर आणि विदर्भातील अन्य मोठ्या शहरांमध्ये सीमेवरील राज्यांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. ‘दवाखाना आपल्या दारी’ सारख्या उपक्रमाममुळे आरोग्य सेवा दुर्गम भागात लोकांना त्यांच्या दारात मिळू लागली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढवितानाच मोठ्या शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी २०१५ साली नागपुरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केल्याने आजववर लाखो गरजूंना त्याचा लाभ घेता आला.
नागपुरातील सर्वात जुने शासकीय रुग्णालय असलेल्या मेयोचा कायापालट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्य प्रवेशद्वारापासून आकस्मिक विभागापर्यंत रुग्ण आणि नातेवाईकांना जाण्यासाठी निःशुल्क इ रिक्षा, नेत्र विभाग, रक्तपेढी यांच्या स्वतंत्र रुग्णवाहिका यामुळे रुग्णांची मोठी सोय येथे झाली आहे. लवकरच येथे सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर ऑप्थेलमोलोजी स्थापन होणार आहे. त्यामुळे डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधिक उपकरणांद्वारे उपचार होऊ शकतील.
मे़डिकलचा कॉर्पोरेट लूक
मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या मेडिकलला कॉर्पोरेट लूक येत असून, आता रुग्णांच्या नातेवाईकांसाठीही येथे निवारा केंद्र उभारली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील वैद्यकीय सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. रोबोटिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, बहुमजली पार्किंग प्लाझा, रुग्णांच्या आप्तांचीही काळजी या सुविधा मेडिकलची वैशिष्ट्ये ठरल्या आहेत. मेडिकलमध्ये दररोज हजारो रुग्ण येत असले, तरी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कोणतीच सोय नव्हती. त्यामुळे हे आप्त या परिसरातच दिवस अन रात्र काढायचे. मुख्यमंत्र्यांनी नेमके हे हेरले आणि आता या परिसरात तब्बल ११ निवारा केंद्रे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. या केंद्रात पंखे, गरम पाणी, प्रसाधन गृह, खुर्च्या अशा आवश्यक सुविधा असणार आहेत. प्रत्येक केंद्राची क्षमता २०० असल्याने एकाचवेळी किमान २२०० लोक येथे राहू शकतील.
मेडिकलमध्ये गेल्या दीड वर्षांपासून रोबोटिक सर्जरी सुरू असून, आतापर्यंत शेकडो शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. रोबोटिक प्रणालीद्वारे गायनिक, युरोलॉजी आणि हृदयविषयक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. याशिवाय, कान-नाक-घसा विभागात CO₂ लेझर प्रणाली बसवण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कमी होतो आणि जखमा लवकर भरतात.
मेडिकलमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा असल्या तरी बरेचदा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय रुग्ण येत नाहीत. त्यामुळेच आता पेईंग वॉर्ड वाढविण्यात येत आहे. अशा ८० खोल्या आता येथे उपलब्ध आहेत. यापैकी काही वातानुकूलित खोल्या आहेत.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर येथे बोन मेरो ट्रांसप्लांट युनिट सुरू करण्यात आले आहे. त्याचा लाभ सिकलसेल, थेल्सेमिया व अन्य रुग्णांना होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने एनटीपीसीने या प्रकल्पासाठी अथर्साह्य दिले. तसेच न्युक्लिक एसिड टेस्टिंग सेंटरमुळे एचआयव्हीसारख्या आजारांचे लवकर निदान होईल. अशा प्रकारचे केंद्र सुरू करणारी एम्स ही मध्य भारतातील पहिलीच सरकारी संस्था आहे.
अहेरीत महिला रुग्णालय
गडचिरोली जिल्हा म्हणजे मागास, दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशीच ओळख, पण पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची ही ओळख पुसून टाकण्याचा नुसता संकल्पच केला नाही, तर तसे निर्णय घेतले. कमालीची अंधश्रद्धा आणि त्यामुळे आजारांसाठी तंत्र मंत्रावरच विसंबून राहणाऱ्या या परिसरातील महिला व बालकांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अहेरी येथे खास महिलांसाठी रुग्णालय सुरू करण्यात आले. १०० खाटांच्या या रुग्णालयात नवजात विशेष कक्ष (एसएनसीयु) सुरू करण्यात आला आहे. अहेरी, भामरागड,
एटापल्ली, सिरोंचा आणि मुलचेरा या पाच तालुक्यांसहच परिसरातील महिलांसाठी हे रुग्णालय वरदान ठरले आहे. मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह, लेबर रुम, सोनोग्राफी, एक्स रे, रक्त साठवणूक केंद्र अशा आवश्यक सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे रुग्ण आणि एक आप्त यांना दोन्हीवेळचे जेवण, नाश्ता, चहा देखील निःशुल्क आहे. माता आणि बाल मृत्यू रोखण्यासाठी हे रुग्णालय वरदान ठरू शकते. फक्त नागपूरच नव्हे तर विदर्भात अन्यत्रही अशा अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळू लागल्याने सुदृ्ढ आणि समृद्ध प्रदेशाचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
अविनाश महालक्ष्मे

 

कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणक प्रणालीव्दारे प्रस्ताव आमंत्रित

            अमरावती, दि. २६ : महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी करण्यात येतो.

            या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in येथे ‘कृषी पुरस्कार टॅबमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            यानुषंगाने इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गट आदींनी त्यांचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने उपरोक्त नमूद संकेतस्थळावर सादर करावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रासिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

            या पुरस्कारांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीचा डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. हे पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांचा गौरव करण्यात येतो.

            यापूर्वी या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. या प्रक्रियेमुळे अर्जदारांना वेळ व आर्थिक खर्च सहन करावा लागत होता. प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत असल्याने प्रक्रिया क्लिष्ट ठरत होती.

            सदर ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविण्यात येणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता व विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे.

            ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करता येणार असून छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्टाचा खर्च वाचणार आहे. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची गरज भासणार नाही. तसेच अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन पाहता येणार असल्याने प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे, असेही कृषी विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.