मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

                                               

                                               भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम

यांना जयंती निमित्त अभिवादन

 

अमरावती, दि. 15 :- भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यावेळी उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, रमेश आडे, राजू फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, गिता वंजारी, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले. वाचन प्रेरणा दिना निमित्त यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडक महत्वपूर्ण पुस्तकांचे वाचन केले.

0000


गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

विभागीय आयुक्तालयात 14 ऑक्टोबरला विभागीय लोकशाही दिन

                      विभागीय आयुक्तालयात 14 ऑक्टोबरला विभागीय लोकशाही दिन

          अमरावती, दि. 10 :  विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आले आहे.

विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांचे तक्रार अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

                                                                00000

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०२४

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन

                                           

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन

वैद्यकीय महाविद्यालये आरोग्यसेवेची केंद्र ठरावीत

                         - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी


अमरावती ,दि.9 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज राज्यात 7 हजार 645 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. नागपूर व शिर्डी विमानतळाच्या कामांचे भूमिपूजन, स्क्रील सेंटर, तसेच नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यात अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

             जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, प्रताप अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे,  एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर आदी उपस्थित होते.

        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नव्याने निर्माण होणारे वैद्यकीय महाविद्यालये लाखो परिवारांचे सेवेचे केंद्र ठरणार आहे. या केवळ संस्था ठरणार नसून असंख्य परिवारांचे जीवन घडविण्याचा यज्ञ आहे. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 900 जागा निर्माण होणार आहेत. त्यामुळे आता राज्यभरात सहा हजार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध होतील. यामुळे दुर्गम भागात नव्या संधीची दालने उपलब्ध होतील. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून लाखो परिवारांना मोफत उपचार, तर जनऔषधी केंद्रातून स्वस्तात औषधे मिळत आहे. कर कमी करून हृदयरोग आणि कॅन्सरवरील औषधोपचाराचा खर्च कमी करण्यात आला आहे. या माध्यमातून गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

प्रत्येक नागरिकाला माफक दरात उच्च प्रतीची आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. केंद्र व राज्य शासनाने वैद्यकीय महाविद्यालयांकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, तसेच वैद्यकीय अधिकारी निर्माण व्हावेत यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यामुळे राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच आता येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थीही वैद्यकीय शिक्षणात अग्रक्रमी राहतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

                                                                    000000                        







--

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा

                                       



शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा

-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

*उत्कृष्ट रेशीम उत्पादकांचा सत्कार

अमरावती, दि. 7 : इतर नगदी पिकांपेक्षा रेशीम शेतीतून जादा उत्पन्न शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

नियोजन भवन येथे छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील उत्कृष्ट रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा रेशीमरत्न पुरस्कार 2023 चे वितरण करण्यात आले. यावेळी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील, खासदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कापसापासून ते तयार कपड्यापर्यंत साखळी निर्माण करण्यात येत आहे. बाजारपेठेतील विविध फॅशन्सप्रमाणे रेशीम वस्त्रांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कापसा पेक्षा जास्त उत्पन्न रेशीममधून मिळत आहे. रेशीमला असलेली मागणी आपण अद्यापही पूर्ण करू शकलो नसल्यामुळे शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविणे आवश्यक आहे. रेशीम शेती वाढल्यास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रेशीम खरेदीची व्यवस्था करण्यात येईल. याच धर्तीवर सोलापूर येथे केंद्र निर्माण करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, पाणी, खते, मार्गदर्शन आणि उत्पादीत मालाला भाव मिळाल्यास शेतकरी स्वयंपूर्ण होईल. त्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अल्पभूधारक शेतकरीही रेशीम शेती करू शकतो. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

000000

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते तंत्रनिकेतनमधील उत्कृष्टता, संगणक केंद्राचे उद्घाटन

                                        




 पालकमंत्र्यांच्या हस्ते तंत्रनिकेतनमधील

उत्कृष्टता, संगणक केंद्राचे उद्घाटन

अमरावती, दि. 7 : शासकीय तंत्र निकेतनमधील उत्कृष्टता केंद्र आणि अद्ययावत संगणक केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. यावेळी प्रविण पोटे पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय मानकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी, देशात नवीन शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कौशल्यपूर्ण युवक तयार करण्यात येणार आहे. यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी भर देण्यात येत आहे. जुन्या शैक्षणिक धोरणात उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य देण्यात येत नसल्यामुळे वेगळे प्रशिक्षण द्यावे लागत होते. आता सुरवातीपासूनच रोजगारक्षम युवक तयार करण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच युवकांना संगणकातील अत्याधुनिक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि थ्री डी प्रिंटींग उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. तंत्रनिकेतनमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी संस्थांमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच संशोधन केंद्रासाठी केंद्राने 272 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

अमरावती येथील तंत्रनिकेतनला अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला आहे. तातडीने अतिक्रमण काढून संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

000000

महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना तयार करणार

 








 महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना तयार करणार

-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

*महिला मेळाव्यात आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन

अमरावती, दि. 7 : घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मुर्त रूप येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

आज सायन्स स्कोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, प्रविण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्याला राजमाता मॉ जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या‍ विचारांचा वारसा लाभला आहे. या महिलांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. महिलांचा विकास हा शासनाचा अग्रकम आहे. त्यासाठी शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांची माहिती महिलांना माहिती व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. याठिकाणी भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना महिलांना बळ देणारी आहे. महिलांचे अर्ज पात्र झाल्यापासून त्यांना लाभ देण्यात येत आहे. ही योजना निरंतर सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात सहा लाखाहून अधिक लाभार्थी असलेली ही योजना आहे. थेट बॅंक खात्यात ही रक्कम देण्यात येत असल्यामुळे कमी वेळात ही योजना यशस्वी झाली आहे. यासोबत मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलिंडर, पिंक रिक्षा, बचतगटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन, तीर्थक्षेत्र आदी असंख्य योजना महिला सशक्तीकरण करण्यासाठी राबविण्यात येत आहेत.

अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहिण योजना यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांचे मानधन वाढविण्यात आले आहे. तसेच लाडकी बहिण योजनेचा प्रोत्साहन भत्ताही लवकरच दिला जाईल. ग्रामपातळीवर लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांनी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात लाडक्या बहिणी, उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अंगणवाडी सेविका, नवतेजस्विनी उद्योजिका, महिला बाल विकास विभागातील अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला बचतगटांना कर्ज वितरण धनादेश वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. डॉ. कैलास घोडके यांनी आभार मानले.

00000

अमरावती आयटीआयचे नामकरण


                                          

अमरावती आयटीआयचे नामकरण

पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण

अमरावती, दि. 7 : अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन आणि दीक्षांत समारंभ घेण्यात आला.

यावेळी प्रविण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक रवींद्र लोखंडे, उपसंचालक संजय बोरकर, चेतन पवार आदी उपस्थित होते.

दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात आदित्य राठोड, संकल्प इंगळे, सूरज तायडे, प्रथमेश केवले, सुमिरन कराळे या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी, उद्योगात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन उद्योगांना गरज असलेले मनुष्यबळ तयार करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करीत आहे. त्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. आयटीआयमध्ये येणारा तरुण हा प्रामुख्याने गरजू असतो. त्याच्या ज्ञानासोबत त्याची आर्थिक सुबत्ता मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत आहे.

भारत आज तरुणांचा देश आहे. आज इतर देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असताना आपल्या देशाने मनुष्यबळ पुरवठा करणारा देश म्हणून पाहिले जात आहे. आज जर्मनी देशात मनुष्यबळाची आवश्यकता असून तेथे मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. युवकांना जर्मन भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. भारत हा कौशल्य विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. पल्लवी वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. संजय बोरकर यांनी आभार मानले.

000000







पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतले श्री अंबादेवी, श्री एकविरा देवीचे दर्शन

 पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतले

श्री अंबादेवी, श्री एकविरा देवीचे दर्शन

अमरावती,  दि.  7 : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने श्री. पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, संस्थानचे विश्वस्त विलास मराठे ,मीनाताई पाठक, कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे , सचिव ॲड. दीपक श्रीमाळी,अशोक खंडेलवाल, शैलेश पोद्दार , राजेंद्र पांडे आदी उपस्थित होते.

 



00000

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ; प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन ; 9.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या निधीचे वितरण

                         बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली

                                                                                            - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी




Ø  प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन


Ø  9.5 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या निधीचे वितरण


Ø  नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता


Ø  23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा शुभारंभ


Ø  कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित


Ø  पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ


Ø  राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण


वाशिम, दि.5  -  बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाचे काम केले. समाजाने खुप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन, किसान सन्मान संमेलन तथा विविध विकास कामांचे लोकार्पण, लाभाचे वितरण झाले. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंग चौहान, मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा.अनुप धोत्रे, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.निलय नाईक, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.लखन मलिक, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.


बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. उद्गाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो. संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचे कौतुक करतो. संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री म्हणाले.


बंजारा समाजातील महापुरुषांनी देशाला खूप मोठे योगदान दिले. राजा लकी सिंग, संत सेवालाल महाराज, स्वामी हाती राम, संत रामराव बापू महाराजांसह अनेक संत, महंतांनी समाजाला निर्णायक नेतृत्व दिले व उत्तम मार्गदर्शन केले. केंद्र शासन या समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. राज्य शासनाने संत सेवालाल तांडा समृद्धी अभियान राबवून या समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.


नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्यादृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. आज शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण झाले हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.


महाराष्ट्र सरकारने ५० हजार करोड रुपयांच्या वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. अमरावती येथील नुकतेच टेक्सटाईल पार्कचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्तीला सशक्त करणारी योजना असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.  


संग्रहालयामुळे बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन घडेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नगारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन हा ऐतिहासिक व सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. खऱ्या अर्थाने पोहरादेवी येथे काशी उभी राहिली असून बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन होणार आहे. जगण्यासाठी भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजाने आपली संस्कृती जपली. आता त्यांच्या या संस्कृतीचे जतन संग्रहालयाच्यामाध्यमातून होणार आहे. संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 700 कोटीचा निधी वितरित केला आहे.


सबका साथ सबका विकास हे ब्रीद घेऊन चालणारे नरेंद्र मोदी यांनी संत सेवालाल महाराजांचे तत्व स्वीकारले आहे. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्याचे कार्य सुरू असून ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही. या योजनेतून राज्यातील २ कोटी पेक्षा अधिक महिलांना तीन महिण्यांचे सहाय्य वितरण करण्यात आले आहे. राज्य सरकार समाजातील शेतकरी, कष्टकरी, युवक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे राज्य सरकार हे आता आपले लाडके सरकार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.


बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट केला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा कायापालट केला आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरीता व त्याच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले आहेत. मोदीजींचे बंजारा समाजाशी एक घट्ट नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे पोहरागडाला भेट देणारे पहिले प्रधानमंत्री आहेत.


राज्याचा मुख्यमंत्री असताना रामराव बापूंनी मला पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी दिली होती. या ठिकाणी आज बंजारा विरासत संग्रहालय उभे राहिले आहे. मंदिराचा विकास झाला आहे. पाहिलेले स्वप्न आज आम्ही पूर्ण केले. मोदीजींनी किसान सन्मान योजना आणि राज्य शासनाने नमो किसान महासन्मान योजना आणली. या योजनांचे हप्ते प्रधानमंत्र्यांच्याहस्ते आज वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना  दिवसा वीज देण्याचे आश्वासन राज्य शासनाने पूर्ण केले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज पाच सौर उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल श्री.फडणवीस यांनी देखील प्रधानमंत्र्यांचे आभार मानले. 


विरासत संग्रहालय गौरवाचे प्रतिक - उपमुख्यमंत्री अजित पवार

बंजारा विरासत संग्रहालय हे बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा, वारसा, अस्मिता, इतिहास याचे गौरवशाली प्रतीक ठरेल. या संग्रहालयाच्या रूपाने एक वैभवशाली व भव्य वास्तू येथे उपलब्ध झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून निसर्ग पुजक लढवय्या बंजारा समाजाच्या संस्कृती, परंपरांचे सर्वांना दर्शन घडेल असा मला विश्वास आहे.


या संग्रहालयासह विकास आराखड्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 25 कोटी रुपये देऊन केली होती. नंतर श्री.फडणवीस यांनी 100 कोटीचा निधी जाहीर केला. त्यानंतर आता 700 कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.


बंजारा समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हावे - पालकमंत्री संजय राठोड

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पोहरादेवी येथे आगमन म्हणजे बंजारा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. देशातील या समाजाला राज्यघटनेच्या एका सूचित आणण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. देशभर बंजारा समाजाची संस्कृती व भाषा एकसारखी आहे. त्यामुळे बंजारा भाषेला संरक्षित करण्यासाठी तिचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा, असे पालकमंत्री म्हणाले.


बंजारा तांड्यांचा चतुरस्त्र विकास होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तांडा विकास महामंडळ स्थापन करण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. स्वदेश योजनेंतर्गत पोहरादेवीच्या विकासासाठी केंद्र शासनाची मदत आवश्यक आहे. यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या पाहिजे त्या प्रमाणात संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांत रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटीसह अन्य करांमध्ये सूट मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.


यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासन सातत्याने शेतकरी हिताचे उपक्रम राबवत आहे. सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन तेलाच्या आयात निर्यातीच्या दरात आवश्यक बदल करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधीक दर देऊन किमान आधारभूत किंमत ठरविली जात आहे. युरीया आणि डीएपीचे दर शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत, त्यामुळे यावर शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देते, असे श्री.चौहान म्हणाले.


केंद्रीय मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंग म्हणाले, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा प्रधानमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ होत आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत लींग वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. यामुळे वीर्याची मात्रा सुमारे २५० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप, गौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहे. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलांची कमी दरात निवड करणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.


विविध उपक्रमांचा शुभारंभ, लोकार्पण व लाभाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीस बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण केले व पाहणी केली तसेच बंजारा बांधवांशी संग्रहालयात संवाद साधला. मुख्य समारंभात 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला. सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या 5 व्या हप्त्याचेही वितरण केले. सुमारे 23 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.    


प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 1 हजार 920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित केल्या. पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.





















प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण ; बंजारा समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद

                              

                       प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण

                                           बंजारा समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद

वाशिम, दि. 5 : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.  

याप्रसंगी, प्रधानमंत्री मोदी यांनी नगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले.

श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थश्रेत्र विकास आराखड्यांतर्गत 723 कोटी रुपये खर्चून या तीर्थश्रेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या संग्रहालयात बंजारा समाजातील रुढी-परंपरा, पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक इतिहास आदीबाबत विविध कलाकृतींच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबीत केली आहे. याप्रसंगी प्रधानमंत्री महोदयांनी बंजारा समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि संतमहंत यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला. 

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.


                                                                    प्रधानमंत्र्यांचे स्वागत

आज सकाळी प्रधानमंत्री महोदयांचे हेलिकॉप्टरने वाईगौळ येथील हेलिपॅडवर आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड तसेच अपर पोलीस महासंचालक नवल बजाज, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी पोहरादेवी येथील जगदंबा मातेचे तसेच संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधींचे दर्शन घेतले.

                                                           00000