‘स्वच्छता ही सेवा पंधरवड्या’ निमित्त विभागीय आयुक्तालयात
टाकावू पासून कलाकृतींची निर्मिती प्रदर्शन
अमरावती, दि. 01 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती प्रित्यर्थ 2 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात ‘स्वच्छ भारत दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधी ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा म्हणून विभागात सर्वत्र राबविण्यात आला असून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमही या कालावधीत घेण्यात आले. या विषयावर आधारित वेस्ट टु आर्ट म्हणजे टाकावू वस्तूपासून निर्माण केलेल्या विविध कलाकृती, शोभेच्या वस्तूंचे प्रदर्शन विभागीय आयुक्त कार्यालयात आज भरविण्यात आले. सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांच्या हस्ते या प्रदर्शनचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय आयुक्तालायातील सर्व शाखांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनमध्ये आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी उर्त्स्फुतपणे सहभाग घेत त्यांच्याव्दारे पंधरवड्याच्या कालावधीत निर्माण केलेल्या विविध कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या.
कर्मचाऱ्यांनी निर्माण केलेल्या विविध कलाकृतींमध्ये टाकावू वस्तूपासून तयार केलेले घराच्या प्रवेशव्दारावरील तोरण, फ्लॉवर पॉट, पेन स्टॅन्ड, देवाचे मंदीर, फुलझाडांसाठी कुंड्या, वेस्ट नारळापासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, कॅलेंडर, प्रधानमंत्री सौर मोफत वीज योजना/ हरित उर्जेचा वापर याबाबत जनजागृतीची कलाकृती तसेच स्वच्छतेचा संदेश अधोरेखित करणाऱ्या विविध सुंदर कलाकृतींचा समावेश आहे.
आज भरविण्यात आलेल्या प्रदर्शन व स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छता व टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू निर्मितीसंबंधीचे महत्व कळण्यासाठी उपक्रम घेण्यात आला आहे. तसेच या प्रदर्शनीच्या स्पर्धेतून उत्कृष्ठ कलाकृती निर्मात्यांना विजेता म्हणून घोषित करुन 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरीत करण्यात येणार आहे. कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृतीसाठी ‘सेल्फी विथ थैला’ ही संकल्पना सुध्दा राबविण्यात येणार, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांनी यावेळी दिली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा