मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

अमरावती आयटीआयचे नामकरण


                                          

अमरावती आयटीआयचे नामकरण

पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण

अमरावती, दि. 7 : अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन आणि दीक्षांत समारंभ घेण्यात आला.

यावेळी प्रविण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सहसंचालक प्रदीप घुले, सहायक संचालक रवींद्र लोखंडे, उपसंचालक संजय बोरकर, चेतन पवार आदी उपस्थित होते.

दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात आदित्य राठोड, संकल्प इंगळे, सूरज तायडे, प्रथमेश केवले, सुमिरन कराळे या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी, उद्योगात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन उद्योगांना गरज असलेले मनुष्यबळ तयार करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करीत आहे. त्यानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. आयटीआयमध्ये येणारा तरुण हा प्रामुख्याने गरजू असतो. त्याच्या ज्ञानासोबत त्याची आर्थिक सुबत्ता मिळावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत आहे.

भारत आज तरुणांचा देश आहे. आज इतर देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असताना आपल्या देशाने मनुष्यबळ पुरवठा करणारा देश म्हणून पाहिले जात आहे. आज जर्मनी देशात मनुष्यबळाची आवश्यकता असून तेथे मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. युवकांना जर्मन भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. भारत हा कौशल्य विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे युवकांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. पल्लवी वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. संजय बोरकर यांनी आभार मानले.

000000







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा