आंबिया बहार 2023-24 मधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लकरच मिळणार
हवामान आधारित फळपिक विमा योजने अंतर्गत 814 कोटीची नुकसान भरपाई
अमरावती, दि, 3 : शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, या हेतूने राज्यात हवामान आधारित फळ पिक विमा योजना राबविण्यात येते.कमी जास्त पाऊस, कमी जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचे वारे, अवेळी पाऊस, गारपीट अश्या विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. या बाबीचा विचार करून राज्यात आंबिया बहार मध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई या 9 फळपिकांसाठी महसूल मंडळ स्तरावर हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते.या योजनेंतर्गत सुमारे 1 लाख 96 हजार 387 विमा अर्जदारांना 814 कोटीची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
हवामान केंद्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते. यात 35 टक्के पर्यंत एकूण विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण 5 टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरते असते. 35 टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाढीव वाटा 50 टक्के असतो. आंबिया बहार 2023-24 मधील राज्य शासनाची एकूण विमा हप्ता रु. 390 कोटी होता, त्यापैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये 344 कोटी हे शासनाने मंजूर केले असून ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाचे दुसरे अनुदान विमा कंपन्यांना प्राप्त होईल तसेच या आंबिया 2023-24 हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेले नुकसान भरपाई रु. 814 कोटी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत जमा करण्यात येणार आहे.
विमा कंपनी निहाय सविस्तर माहिती पुढील प्रमाणे:
भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत 63 हजार 558 हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित आहे.यानुसार 60 हजार 606 विमा अर्जदारांना रु.369.99 कोटी निर्धारित नुकसान भरपाई देय होणार आहे.रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 85 हजार 163 विमा अर्जदारांना रु.216.65 कोटी निर्धारित नुकसान भरपाई मिळणार तर एच.डी.एफ.सी.इर्गो कंपनीकडून 50 हजार 617 विमा अर्जदारांना रुपये 235.59 कोटी.नुकसान भरपाई देण्यात येणार आहे,अशी माहिती कृषी आयुक्तालय पुणे चे संचालक विनयकुमार आवटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा