गुरुवार, २६ डिसेंबर, २०२४

‘ग्लोबल ॲल्युमनी मीट 2024’ चे थाटात उद्घाटन महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे डॉ. अशोक घाटोळ * माजी विद्यार्थ्यांकडून सव्वा कोटीच्या ‘स्पंदन ऑडीटोरियम’ची निर्मिती

डॉ. अशोक घाटोळ * माजी विद्यार्थ्यांकडून सव्वा कोटीच्या ‘स्पंदन ऑडीटोरियम’ची निर्मिती अमरावती, दि. 26 : ज्या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आपण घडलो. त्या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे माजी कुलगुरु डॉ. अशोक घाटोळ यांनी आज येथे केले. हिरक महोत्सवी वर्षानिमित्त येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात माजी विद्यार्थ्यांचा जागतिक मेळाव्याचे (ग्लोबल ॲल्युमनी मीट 2024) आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाविद्यालयाच्या 1964 च्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी संशोधक प्रा. विजय इंगोले, माजी विद्यार्थी सज्जनसिंग चव्हाण (आयएएस), विकास सुरळकर (आयएएस), श्रीमती प्रेरणा देशभ्रतार (आयएएस), हेमंत कोठीकर (आयआरएस), आयआरबी मुंबईचे संचालक अजय देशमुख, जिओ-टीएम फोरमचे वरिष्ठ अधिकारी अनिकेत म्हाला, अस्पा बँड सन्सचे व्यवस्थापकीय संचालक रणजित बंड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण पातुरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष महल्ले आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या 1990 च्या माजी विद्यार्थ्यांनी सव्वा कोटी रुपयांचे स्पंदन ऑडीटोरियम बांधून संस्थेच्या इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधेत भर टाकून एक आदर्श स्थापित केला, याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे कौतूक केले. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. घाटोळ म्हणाले की, संसाधनांची कमतरता असून सुध्दा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली गुणवत्ता व दर्जा टिकून ठेवला आहे. त्यासाठी माझ्यासह, सन 1964 पासून ते आजपर्यंतच्या प्राचार्यांनी विशेष प्रयत्न करुन परिश्रम घेतले आहे. त्यामुळेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास शासनाची स्वायत्तता मिळाली आहे. महाविद्यालयाच्या गुणवान विद्यार्थ्यांमुळे तसेच नवीनतम उपक्रमांमुळे भविष्यात हे महाविद्यालय अभियांत्रिकी विद्यापीठ बनेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही राज्य, देश व जागतिक पातळीवर महाविद्यालयाचे नाव रोषण केले आहे. त्याचीच प्रचिती म्हणून 1990 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांसाठी सव्वा कोटी रुपयांचे सर्व सोयी-सुविधायुक्त स्पंदन ऑडीटोरियम तयार करुन दिले आहे. आज त्या ऑडीटोरियमचे उद्घाटन होत आहे, ही अतिशय गौरवाची बाब आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला. महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयाला आपले काही देणे आहे, या भावनेतून संस्थेच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. घाटोळे यांनी केले. जीसीओई संस्थेतून उर्त्तीण होऊन गेलेले अनेक विद्यार्थी विविध कार्यक्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे. काहीजण आयएएस, आयआरएस तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील नामांकीत कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या आयोजनातून त्यांच्या यशस्वी वाटचालीबाबत विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घ्यावे. माजी विद्यार्थ्यांनी सुध्दा आपल्या महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डिजीटल ग्रंथालय, इमारत बांधकाम, अत्याधुनिक लॅब निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन अन्य निमंत्रित मान्यवरांनी केले. यावेळी मान्यवरांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणी व प्रसंगांना उजाळा देत अभियांत्रिकी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण कसा केला यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी त्यांच्या यशस्वी जडणघडणीत महाविद्यालयाची महत्वपूर्ण भूमिकेसंदर्भात माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येऊन देशसेवा करावी. तसेच आपल्या मातृसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करावी. महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलन्स ची निर्मिती होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. प्राचार्य श्री. महल्ले यांनी माजी विद्यार्थ्यांकडून संस्थेला अपेक्षित असलेले सहकार्य व मदत याबाबत विस्तृत विवेचन केले. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक वर्ग, माजी विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पुजन, आराधना व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या जडणघडण व यशस्वी वाटचाल यासंबंधी लघु चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या विविध विद्याशाखा, यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा परिचय व उपक्रमाबाबत प्रा. नितीन पाठक यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. देश-विदेशातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक वर्ग व माजी प्राचार्य आदी ग्लोबल ॲल्युमनी मीट 2024 मध्ये सहभागी होते. आभार प्रदर्शन प्रा. माहेश्वरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा