मंगळवार, १० डिसेंबर, २०२४
विभागीय टास्क फोर्स समितीची सभा संपन्न योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
विभागीय टास्क फोर्स समितीची सभा संपन्न
योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करा
-विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 10 : शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहितकारी योजनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करुन विहित मुदतीत विकासकामे पूर्ण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागातील जिल्हा प्रशासनाला दिले.
विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय टास्क फोर्स समितीची सभा सोमवारी (ता.9 डिसेंबर) संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण उपायुक्त सुनील वारे, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे, कामगार विभागाचे उपायुक्त आदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तर समितीचे सचिव तथा विकास उपायुक्त राजीव फडके प्रत्यक्षरित्या यावेळी सभेला उपस्थित होते.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, गोर-गरीब जनतेला हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करुन दिल्या जाते. ग्रामीण व शहरी भागातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी त्यांच्याकडील प्रलंबित घरकुलासंदर्भात आढावा घेवून ती पूर्ण होण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. अतिक्रमण नियमानुकूलची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. नवीन लाभार्थ्यांच्या संदर्भात सर्वेक्षण, घरकुल मंजूरात व पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
या सभेत ग्रामीण भागातील पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, पंडीत दीनदयाल अर्थसहाय्य योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी मदत करणे, ग्रामविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास आदी विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करणे, मंजूर घरकुल पूर्ण करुन घेणे, अनुदान वितरीत करणे, नवीन लाभार्थ्यांसाठी सर्वेक्षण करणे इत्यादी महत्वपूर्ण मुद्दांबाबत आढावा घेण्यात आला आणि त्यानुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागातील एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी जबाबदारीपूर्वक उत्तम नियोजन करावे. तसेच योजनेंतर्गत जिल्ह्याला प्राप्त उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वंकष प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा