बुधवार, २८ मार्च, २०१८


रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा
                                                       - पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
        
         अमरावती, दि. 27 : वैद्यकीय सेवा पत्करतांना डॉक्टरांनी गोर-गरीब रुग्णांची सेवा करण्याची शपथ घेतली असते. तुमच्या वैद्यकीय सेवेमुळे एखाद्या रुग्णाला जीवनदान मिळवून देणे, यासारखे इतर कुठलेही पुण्य काम असून शकत नाही. यामुळे रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे, असे मत पालकमंत्री प्रवीण- पोटे  यांनी व्यक्त केले.
           शनिवार 24 मार्च रोजी, येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित आरोग्य संजीवनी-2018’ स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.  प्रारंभी कार्यक्रमात पालकमंत्री मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
        श्री पोटे पाटील म्हणाले, देशात राज्यात अनेक गोर-गरीब जनता आहे. गरीब परिस्थितीमुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे अशा रुग्णांना डॉक्टरांनी वैद्यकीय विनामुल्य सेवा द्यावी. एखाद्या रुग्णाला तुम्ही केलेल्या उपचारामुळे जीवनदान मिळू शकते, यासारखे पुण्य काम कुठलेही असू शकत नाही. रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा मानून गोर-गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवावी, असे आवाहन ही त्यांनी केले. पालकमंत्र्यांनी सुंदर स्नेहसंमलनाचे आयोजन केल्या निमित्य आयोजनकांना शुभेच्छा दिल्या.
     यावेळी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टॉफ, अधिपरीचारिका, सफाईकामगार यांचा पालकमंत्र्यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहसंमेलना प्रित्यर्थ तयार केलेल्या पुस्तिकेचा पालकमंत्र्यांचे हस्ते विमोचन झाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरोग्य क्षेत्राची निगडीत अधिकारी-कर्मचारी आरोग्य विभाग संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
000000

लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा-2012
पॉक्सो कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी
                       -किशोर रोही
* पॉस्को जुवेनाईल जस्टीस कायदया विषयी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

                  अमरावती, दि. 26 : लैंगिक गुन्हयांपासून मुलांचे संरक्षण 2012 (Protection of Children from Sexual Offences Act 2012- POCSO) हा कायदा, कायदेशास्त्रातील एक क्रांतीकारी पाऊल आहे. लैंगिक गुन्हयांपासून मुलांचे संरक्षण कायदा आल्यामुळे कायदेशास्त्रात एक इतिहास रचलेला आहे. न्यायमंडळांनी पॉक्सो कायदयाची प्रभावी अमंलबजावणी करुन लैगिंक गुन्ह्यांत बळी पडलेल्या मुलांचे पुनवर्सन करावे, असे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किशोर रोही यांनी सांगितले.
                 रविवार, 25 मार्च रोजी येथील पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे अमरावती विभागातील पॉक्सो कायदयाचे न्यायाधीश बाल न्याय मंडळाचे न्यायाधीशांकरीता पॉक्सो  आणि जुवेनाईल जस्टीस कायदयासंबंधी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
                  यावेळी आंतरराष्ट्रीय न्याय मिशनचे संचालक मर्वीन मेलो, प्रबोधिनीचे संचालक संजय बाहेकर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे, प्रा. वर्षा देशमुख, बाल कल्याण समितीचे संचालक संजय सेंगर, जिल्हा सरकारी अभियोक्ता परिक्षीत गणोरकर, प्रा. ज्योती खांडपसोले यांचेसह विभागातील न्यायाधीश तसेच सामाजिक संस्थाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.   
                    श्री रोही म्हणाले, भारतीय दंड संहिता अंतर्गत स्त्रिया बालकांवर होणारे छळ, अन्याय, लैगिंक छळ इत्यादी बाबतीत जी तरतूद करण्यात आलेली होती त्यामध्ये काही ना काही उणिवा असल्यामुळे याचा फायदा आरोपी घेत होते. पॉक्सो कायदा अस्तित्वात आल्याने या सर्व बाबीवर अंकुश लागला आहे. पॉक्सो कायद्याच्या अंमलबजावणीवर देखभाल करण्याचे  काम महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला सोपविण्यात आले आहे. लैंगिक गुन्हयांपासून संरक्षण हा कायदा पास होण्याअगोदर भारतीय दंडविधान संहिता (IPC) कलम 375, कलम 376, कलम 366, कलम 377, कलम 354 तसेच बाल न्याय अधिनियम कायदा 2006 यांच्या आधारे मुलांवरील लैंगिक गुन्हयांचा तपास केला जात होता. दिल्लीत घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेने समाजमन नव्याने खडबडून जागे झाल्यावर तसेच महाराष्टातील चंद्रपूर आणि ठाणे जिल्हयातील अशा घटनांमुळे या विषयावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पहिल्यांदाच देशभर असंतोष उसळला. परिणामी भारताच्या बलात्काराबाबतच्या कायद्यात बदल करण्यात आला.
                    मुलांच वय, पूर्ण विकसित झालेले शरीर आणि मन लक्षात घेता लैंगिक गुन्हयांचे त्यांच्यावर होणार परिणाम अधिक गंभीर, त्यांच्या व्यक्तीमत्वावर, भविष्यावर दूरगामी परिणाम करणारे असतात याचे भान नव्हते आणि म्हणूनच मुलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुलांवरील लैंगिक अत्याचारा बद्दल स्वतंत्र कायदा असायला हवा अशी मागणी लावून धरली होती. ही मागणी लैंगिक गुन्हयांपासून मुलांचे संरक्षण बील 2011 मध्ये राज्यसभेत मांडले गेले. राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत मे 2012 मध्ये मंजूर झाल्यावर भारत सरकारच्या वतीने 19 जून 2012 रोजी राष्ट्रपतींनी पॉस्को कायदयावर शिक्कामोर्तब केले.
                   लैंगिक गुन्हयांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 हा मुलांना लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि मुलांचा वापर अश्लील साहित्य बनविण्यासाठी करण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी केला गेला. गुन्हा नोंदविणे, पुराव्याची नोंद करणे, गुन्हयाचा तपास आणि सुनावणी अशी कायद्याची संपूर्ण प्रक्रिया बाल स्नेही असेल याची काळजी घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर खटले शक्यतो निकालात निघावेत या दृष्टीने न्यायालयाची तरतूदही केली गेली. भारतीय संविधानात आणि भारतीय दंडविधान संहिते नमूद कलमान्वये बालकांवर झालेल्या अत्याचार संबंधी पारदर्शक न्याय अशा प्रकरणात बळी पडलेल्या मुलांचे पुनवर्सन प्रभावीपणे होण्यासाठी पॉस्को कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असेही श्री रोही यांनी यावेळी सांगितले.
                   प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना प्रा. वर्षा देशमुख म्हणाल्या की, लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या मुलांना न्याय मंडळाकडून न्याय आणि त्यांचे पुनर्वसन व्यवस्थितरित्या होण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. पॉस्को आणि जुवेलीयन जस्टीस कायदया अंतर्गत सुसंगत कारवाई करण्यासाठी व्हीजीलन्स अधिकारी यांनीसुध्दा तत्परतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                     राज्यात कार्यरत असणाऱ्या स्टेक होल्डर यांच्या भूमिकेविषयी श्री. सेंगर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पॉस्को जुवेनाईल जस्टीस कायदा अस्तित्वात आल्यापासून बाल लैंगिक शोषण विरोधी मंचातर्फे मुलांसोबत काम करणाऱ्यासाठी बाल हक्क, मुलांवरील लैंगिक  अत्याचाराविषयी, पॉस्कोच्या महत्वाच्या तरतूदी या विषयावर पोलीस, बाल सुरक्षा पथक, बाल कल्याण समितीचे सभासद, मुलांच्या निवासी संस्थामधील काळजीवाहक तसेच मुलांच्या प्रश्नावर काम करणारे कार्येकर्ते, पालक शिक्षण यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. बाल कल्याण समितीच्या भूमिके विषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
                       श्री. गणोरकर यांनी पॉस्को कायदा आणि जुवेनाईल जस्टीस कायदयाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या मुलांच्या बाबतीत प्रत्येक तपास यंत्रणांनी बाल स्नेही वातावरणात तपास निरीक्षण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
                     प्रा. ज्योती खांडपसोले यांनी बाल हक्क संरक्षण आयोगाचे कामकाजाविषयी माहिती दिली. पॉस्को आणि जुवेनाईल जस्टीस कायदयाच्या अमंलबजावणी आणि कायदयाची अधिक प्रमाणात सुधारणेमध्ये शासनाची भूमिका सविस्तर विषद केली.
                      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आंतरराष्ट्रीय न्याय मिशनचे समन्वयक सुमीत उन्नी यांनी केले. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी राजश्री कोलखेडे यांनी सर्वांचे आभार मानले. या एक दिवसीय प्रशिक्षणासाठी पॉस्को कायदयाचे बाल न्याय मंडळाचे न्यायाधीश, जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, अनिल गवई, संरक्षण अधिकारी प्रज्ञा भिमटे तसेच बाल लैंगिक विरोधी काम करणारे सामाजिक संस्थांचे कायकर्ते उपस्थित होते.
                           
*******
          

महिलांनी उद्योग उभारुन इतरांना रोजगारक्षम करावे
                                  -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

* ‘अस्मिता योजनामहिला बचत गटाव्दारे राबविणार
* महिला किसान सशक्तीकरण परियोजना,
श्रीमती सुमतीबाई सुकळीकर उद्योगीनी योजनांव्दारे महिलांचे सक्षमीकरण

अमरावती, दि. 24 : महिलांचा सर्वांगिण विकास सक्षमीकरणासाठी  शासन अनेक उपक्रम राबवित आहे. महिला बचत गटांनी स्वत:चा उद्योग उभारुन आर्थिक स्थैर प्राप्त करणे आवश्यक आहे. यासाठी महिलांनी लघु गृह उद्योग उभारुन आपल्या क्षेत्रातील इतर महिलांना रोजगार मिळवून द्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज केले.
                     महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सांयन्स कोअर मैदानावर आयोजित विकास गंगोत्रीया महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री यांचे हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, धामनगाव रेल्वे पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे यांचेसह जि.. सदस्य तसेच चौदाही तालुक्याचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
                     श्री. पोटे-पाटील म्हणाले, महिला बचत गटाव्दारे उत्पादीत मालास बाजारपेठ मिळावी तसेच मालाची मागणी वाढावी या हेतूने राज्यात विविध स्तरावर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून महिला बचत गटाव्दारे तयार केलेल्या उत्पादनांची ओळख जगपातळीवर होत आहे. जिल्ह्यात सुध्दा अशाप्रकारच्या प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने महिला बचत गटाव्दारे निर्मित उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ मिळण्यासाठी तालुक्याच्या जिल्हयाच्या ठिकाणी स्टॉल्स जागेची उपलब्धता करुन द्यावी.
                      महिला उद्योजकांविषयी दाखले देऊन ते पुढे म्हणाले, महिला उद्योजक सक्षम होण्यासाठी एमआयडीसीमध्ये महिलांसाठी भूखंडाचे आरक्षण लागू करण्यात आले आहे. महिलांना उद्योग उभारणीसाठी पाच लाखापासून ते एक कोटीचे कर्ज वितरण अल्प व्याजदरात बँकेव्दारे करण्यात येत आहे. 60 संख्या असलेल्या महिला बचत गटास 35 टक्के अनुदान सुध्दा राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी उभे आहे. महिलांनी जास्तीत जास्त उद्योगांची उभारणी करुन ग्रामीण भागातील अधिकाधिक महिलांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहनही श्री. पोटे-पाटील यांनी यावेळी केले.
                     खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, महिलांना घरात येणाऱ्या पैशाची बचत करण्याची सवय असते. कुटुंबाची खरी प्रगती महिलांच्या काम करण्यातून पैश्याच्या बचतीतून होत असते. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती साधावयाची असल्यास जिल्हा प्रशासनाने महिला बचत गटांव्दारे निर्मित उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ मिळवून द्यावी. राज्य शासनाच्या अस्मिता योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सॅनीटारी नॅपकीन महिला किशोरवयीन मुलींना पुरविण्याचे काम महिला बचत गटाव्दारेच करण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.
                     मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांचा कृषी क्षेत्रामध्ये सहभाग वाढविण्यासाठी तसेच त्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्याकरीता शासनातर्फे महिला किसान सशक्तीकरण परियोजना (MKSP) योजना राबविण्यात येत आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. श्रीमती सुमतीबाई सुकळीकर उद्योगीनी महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या बचत गटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येते. या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महिलांनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून तसेच कठीण परिश्रम करुन सहकार्य करावे. शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा. महिला किशोरवयीन मुलींसाठी अल्प दरात सॅनीटारी नॅपकीन पुरविण्यासाठी असणाऱ्या अस्मिता योजनेत सुध्दा बचत गटांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
                     कार्यक्रमानंतर पालकमंत्री महोदय मान्यवरांनी महिला बचत गटाव्दारे लावण्यात आलेल्या स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली.
                     महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान ( उमेद ) आणि विकास गंगोत्री या अभियाना विषयी प्रकल्प संचालक के. एम. अहमद यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आभार प्रदर्शन प्राजक्ता राऊत यांनी केले. यावेळी विभागातून मोठया संख्येने महिला मंडळी उपस्थित होत्या.