शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांचा तपास विहित मुदतीत व्हावा -विभागीय आयुक्त पियूष सिंह




अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार
दाखल प्रकरणांचा तपास विहित मुदतीत व्हावा
-विभागीय आयुक्त पियूष सिंह

अमरावती, दि. 30 : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा तपास विहित मुदतीत करावा, तसेच हे प्रकरण तातडीने न्यायप्रविष्ठ करावे, असे विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी सांगितले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार तातडीने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येते. मात्र याचा तपास विहित मुदतीत होत नाही. त्यामुळे न्यायालयात आरोपींच्या बाजूने निर्णय होतात. आरोपींना जामिन मिळण्यासही मदत होते. हे टाळण्यासाठी गुन्हा दाखल होताच संबंधिताला अटक आणि तपास पूर्ण करणे गरजेचे आहे. तपास काम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले जात प्रमाणपत्र, साक्षीदार आदी बाबींची पुर्तता करावी.
मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, सेस फंड, अपंगांसाठी तीन टक्के निधी, रमाई आवास घरकुल योजना, शासकीय वसतीगृहासाठी शासकीय जमिन उपलब्ध करून देणबाबतच्या कार्यवाहीची माहिती घेतली.
000000


गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१९

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन





कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
Ø  बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या
सल्ल्यानुसार उपाययोजना करावी
अमरावती, दि. 28 : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 से. तापमान असतांना सामान्यत: गुलावी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधून बाहेर येत आहेत. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेल्या पतंगांचे मिलन होऊन त्यांनी अंडी टाकल्यांनतर 8 ते 10 दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बंधुनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कापूस पिकात त्वरीत किमान दोन फेरोमन सापळे लाऊन त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली/10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्के पेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे प्रोफेनोफॉस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 + ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 12.50 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
शेतकरी बंधुंनी पिकाचे नियमित निरीक्षण करुन कामगंध सापळ्यामधील पतंगाच संख्या व प्रादुर्भाव तसेच सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर (एक ते दिड महिण्यामध्ये) कापसावर असलेली बोंडाची संख्या व अपेक्षीत उत्पन्न यांचा अंदाज घेऊन कीड व्यवस्थापनाची वरीलप्रामणे उपाय योजना करावी. सरसकट सर्व शेतकरी बंधुनी कीड व्यवस्थापनाची उपाययोजना करु नये.
डिसेंबर 2019 नंतर कापूस पीक पुर्णत: काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन किडीचे जीवनच्रक खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे विभागीय कृषि सहसंचालक, सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल






जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याव्दारे पांदन रस्त्यांची पाहणी
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 27 : शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा, बीबियाणे शेतात ने-आण करणे सोईचे व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले. शेतकऱ्यांना पांदण रस्त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणींचे व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या पांदण रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस्थान व गडाची पाहणी केली. पिंगळादेवी येथील विकासकामांचा आढावा घेतला. मंदिराच्या विश्वस्थांशी चर्चा करुन पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. या देवस्थानचा दर्जा ‘क’ वरुन ‘ब’ होण्यासाठीचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रयत्न करण्यात येईल. मंदिराच्या खुल्या परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी येरला ग्राम पंचायतीला भेट देऊन तेथील पालकमंत्री पांदन रस्ते योजनेतून निर्माण करण्यात आलेल्या मौजा येरला ते खानापूर रस्त्यांची पाहणी केली. या पांदण रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मौजे येरला ते लाडकी या पांदण रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना केल्या.
पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे वरुड ते भंगारा, चिंचोली गवळी ते रसुलपूर कोपरा या पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील सर्व पांदण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी सार्व. बांधकाम विभागाच्या अभियंतांना दिल्या.
यानंतर त्यांनी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्याकडून पांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. पुढील कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाहणी दौऱ्यात संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी बांधव, गावकरी मंडळी उपस्थित होते.
00000

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा



विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा
अमरावती, दि. 26 : भारतीय संविधानाला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
विभागीय माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी सहायक संचालक गजानन कोटुरवार, माहिती सहायक विजय राऊत, श्रीमती पल्लवी धारव, स्वीय सहायक प्रदिप हिरुरकर, लेखापाल गजानन जाधव यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.
यावेळी प्रदर्शन सहायक हर्षदा गडकरी, वरिष्ठ लिपिक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, दिनेश धकाते, रूपेश सवई, वैशाली ठाकरे, नितीन खंडारकर, मनिष झिमटे, विजय आठवले, गणेश वानखेडे, रविंद्र तिडके, गजानन पवार, कोमल भगत आदी उपस्थित होते.
0000

संविधान दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन

संविधान दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात
संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन
अमरावती, दि. 26 : विभागीय आयुक्त कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
उपायुक्त प्रमोद देशमुख, तहसीलदार अनिल भटकर, वैशाली पाथरे उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी, तसेच नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्याच्या घटनेला यावर्षी 70 वर्ष पूर्ण झाले आहे. त्याअनुषंगाने भारतीय संविधानातील नागरीकांचे मुलभूत कर्तव्य नागरीकांना माहिती व्हावे, यासाठी 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत येत्या वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतील.
0000

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

ग्रामस्थांनी पर्यटन स्थळी रोजगार निर्मिती करावी

ग्रामस्थांनी पर्यटन स्थळी रोजगार निर्मिती करावी
                                            - विभागीय आयुक्त पियुष सिंह
अमरावती, दि. 22 : आमझरी येथे नव्याने सुरु झालेले निसर्ग पर्यटन संकुल व विकसित साहसी खेळ केंद्रामुळे पर्यटकांचा ओघ वाढत आहे. येथील ग्रामस्थांनी वनविभागाने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा वापर करुन पर्यटकांना आवश्यक सेवा पुरवावी व रोजगार निर्मिती करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा मधील गावीलगड परिक्षेत्रातील आमझरी येथील पुनर्जीवित केलेल्या निसर्ग पर्यटन संकुल व साहसी खेळ केंद्राचे उद्घाटन श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्री. शैलेश नवाल, भारतीय डाकसेवेचे मुख्य प्रबंधक डॉ. अजिंक्य काळे, उपवनसंरक्षक डॉ. सिवाबाला, विनोद शिवकुमार व विभागीय वन अधिकारी श्रीमती पियुषा जगताप व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपीलाल मन्नु धिकार उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. सिंह म्हणाले, साहसी क्रिडा खेळांच्या आयोजनातून संयुक्त व्यवस्थापन समिती लोकसहभागातून वनसंवर्धानाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे रोजगाराला चालना मिळणार आहे.                                      
जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणले की, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापुर्ण सेवा पुरवाव्यात. यामुळे ग्रामस्थांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. त्यांना पुर्णपणे वनांवर अवलंबून रहावे लागणार नाही. जागतिक मत्स्य दिनानिमीत्य वनखात्याने स्थानिक पातळीवर विकसीत केलेल्या ‘स्वर्ण महाशीर’ प्रजातीच्या माश्यांचे लोकार्पण आमझरी येथील स्थानिक तळ्यात करण्यात आले.
आमझरी येथील पर्यटन संकुलाचे आरक्षणाकरिता www.magiclmelghat.com या संकेतस्थळाबाबत सहायक वनसंरक्षक इंद्रजीत निकम यांनी माहिती देऊन उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला आमझरी येथील नागरीक, वन्यजीवप्रेमी उपस्थित होते.
000000  

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1804 कोटींची आवश्यकता










शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1804 कोटींची आवश्यकता
Ø केंद्रीय पथकासमोर परिस्थितीचे सादरीकरण
Ø सोयाबीन, कापूस, ज्वारीचे मोठे नुकसान
Ø बुलडाण्यात पिकांचे सर्वाधिक नुकसान
अमरावती, दि. 22 : गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील खरीप पिकांचे 72 टक्के नुकसान झाले आहे. यात सोयाबिन, कापूस, ज्वारी या प्रमुख पिकांसह भाजीपाला, हळदी आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामा आणि शासनाने निर्धारीत केलेल्या निकषानुसार एकूण सुमारे एक हजार 804 कोटी रूपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याची माहिती विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केंद्रीय पाहणी पथकाचे सदस्य डॉ. आर. पी. सिंह यांना दिली.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. शेतीतील परिस्थितीची केंद्राच्या पथकाकडून आज पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी विभागातील नुकसानीची माहिती घेतली. बैठकीला विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी केलेल्या सादरीकरणात नमूद माहितीनुसार विभागात खरीप हंगामातील लागवडीखालील 31 लाख 18 हजार 797 हेक्टर क्षेत्रापैकी 22 लाख 44 हजार 436 हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात सर्वाधिक सुमारे 91 टक्के नुकसान सोयाबीनचे झाले आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यात जवळपास पूर्णत: नुकसान झाले आहे, तर अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीचे 84 टक्के नुकसान झाले आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यात ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे, तर अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.  
विभागात कापसाचा पेरा सर्वाधिक आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यात कापसाचे जवळपास संपूर्णत: नुकसान झाले आहे. वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मोठे नुकसान, तर यवतमाळात अंशत: नुकसान झाले आहे. विभागात तुरीचे किरकोळ नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि हळदी पिकांचे 45 टक्के नुकसान झाले आहे. या पिकांचे अकोला जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. विभागातील चार हजार 32 हेक्टर संत्रा, चार हजार 464 हेक्टर इतर फळपिके असे एकूण आठ हजार 497 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांसाठी 18 हजार प्रतिहेक्टरप्रमाणे 15 कोटी 15 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची आवश्यकता भासणार आहे.
विभागाच्या पावसाच्या सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी ऑक्टोबर महिन्यात मासिक सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात सरासरी पावसाच्या दुप्पट पाऊस झाला आहे. ऐन पिक कापणीच्यावेळी आलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत मिळावी, अशी अपेक्षा करण्यात आली. शासनाच्या निकषानुसार मदतीसाठी आवश्यक असलेल्या 1804 कोटी रूपयांपैकी 439 कोटी रूपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे.
या बैठकीनंतर पथक पाहणीसाठी रवाना झाले.
00000


बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

कापुस पिकांवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन

कापुस पिकांवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन
अमरावती, दि. 20 : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 30 सें. तापमान असताना सामान्यात: गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतू यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधुन बाहेर येत आहेत. हिच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेल्या पतंगांचे मिलन होऊन त्यांनी अंडी टाकल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी याकिडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी बंधुंनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कापूस पिकात त्वरीत किमान एकरी दोन फेरोमन सापळे लावून त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली/10लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यापर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी ग्रॅम किंवा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएम, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्केपेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे, प्रोफेनोफॉस 40 टक्के अ सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 अ ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 1250 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 अ सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
शेतकरी बंधुंनी पिकाचे नियमित निरिक्षण करुन कामगंध सापळ्यामधील पतंगाची संख्या/प्रादुर्भाव तसेच सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर एक ते दिड महिन्यामध्ये कापसावर असलेली बोंडाची संख्या व अपेक्षीत उत्पन्न यांचा अंदाज घेऊनच कीड व्यवस्थापनाची वरील प्रमाणे उपाय योजना करावी. सरसकट सर्व शेतकरी बंधुंनी कीड व्यवस्थापनाची उपरोक्त प्रमाणे उपाययोजना करावी. डिसेंबर 2019 नंतर कापूस पीक पूर्णत काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन, किडीचे जीवनचक्र खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे विभागीय कृषि सहसंचालक, सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000



शिक्षक मतदार संघातील नोंदणी, विभागीय आयुक्तांचे आवाहन

शिक्षक मतदार संघातील नोंदणी, विभागीय आयुक्तांचे आवाहन
अमरावती, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात नव्याने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त हे शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे जिल्ह्यासाठी व उप विभागीय अधिकारी हे त्यांच्या उपविभागासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत दि. 23 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहेत.
प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर 2019 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असुन दि. 30 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहेत. त्यानंतर निरंतर मतदार नोंदणी (Continuous updation) चालू राहणार असून त्याअंतर्गत नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विहित कार्यपध्दतीनुसार निकाली काढण्यास पात्र असलेले सर्व दावे निकाली काढून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.
अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघातील सर्व मतदारांनी आवाहन पात्र शिक्षक मतदारांनी अद्यापपर्यंत मतदार नोंदणी केलेली नाहीत अशा मतदारांना त्यांचा सर्वसाधारण रहिवास असलेल्या संबंधीत तहसिल/उपविभागीय/जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली मतदार नोंदणी दि. 23 नोव्हेंबर 2019 ते दि. 9 डिसेंबर 2019 या कालावधीत करता येईल. ही मतदार यादी नव्याने तयार होत असल्यामुळे सर्व पात्र शिक्षकांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ तथा विभागीय आयुक्त, तथा मतदार नोंदणी अधिकारी अमरावती यांनी केले  आहे.   
0000



गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

पं. जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन


पं. जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन

अमरावती, दि. 14 : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी  उपायुक्त संजय पवार, प्रमोद देशमुख यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
00000




शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बळकटीकरणासाठी ‘कलम 10 ड’ अन्वये सुधारणा






नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बळकटीकरणासाठी
‘कलम 10 ड’ अन्वये सुधारणा
-         नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे

अमरावती, दि. 8 : नोंदणी व मुद्रांक विभाग हा जनतेच्या मालमत्ता व्यवहारांचे अभिलेखन करणे व मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात महसूल गोळा करण्याचे काम करतो. याअनुषंगाने प्रत्येक दस्तऐवजाची नोंदणी, मुल्यांकन निश्चिती, सत्यप्रती काढणे, दस्त नोंदीचा शोध घेणे व विवाह नोंदणी आदी कामाबाबत हा विभाग नागरिकांना सेवा देतो. या नागरी सेवा कामांमध्ये अधिक सुसुत्रता व पारदर्शकपणा निर्माण होण्यासाठी तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाची प्रभावी अमंलबजावणी होण्याच्या दृष्टीने ‘कलम 10 ड’ अन्वये सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, मनपा आयुक्त संजय निपाणे, नोंदणी उपमहानिरीक्षक सी. बी. भुरकुंडे, अमरावतीचे नोंदणी उपमहानिरीक्षक मोहन जोशी यांचेसह विभागातील सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी, लीड बँक मॅनेजर एन के. झा, बँक अधिकारी, सेवा पुरवठादार आदी यावेळी उपस्थित होते
श्री कवडे म्हणाले की, शासनास मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात मिळणाऱ्या महसूलाची चुकवेगिरी होवू नये व सर्व प्रकारच्या दस्तऐवजांवर मुद्रांक शुल्काची यथोचित वसुली होण्यासाठी मुद्रांक अधिनियमाच्या कलम 10 ड मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहे. यासंदर्भातील व्यवहाराचे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क वसून करण्याची जबाबदारी प्रशासकीय विभाग, बँका तसेच वित्तीय संस्थावर सोपविण्यात आली आहे. आज आयोजित कार्यशाळेत प्रत्येक व्यवहाराच्या दस्त नोंदणी व त्याअनुषंगाने वसूल करावयाची मुद्रांक शुल्क याविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आलेल्या प्रश्न व शंकाचे निरसन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आणि नोंदणी अधिनियम 1908 नुसार प्रत्येक दस्ताची नोंद करणे अनिवार्य आहे तसेच त्याअनुषंगाने नियमानुसार मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. मुद्रांक अधिनियमातील कलम 3, कलम 33, कलम 34 व कलम 10 ड अन्वये कायद्याच्या महत्वपूर्ण तरतुदीविषयी नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे.  नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 17 नुसार मृत्युपत्र वगळता रुपये शंभरच्या वरील किमतीच्या हस्तांतरणाच्या सर्व व्यवहाराच्या दस्तांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर कलम 49 अन्वये नोंदणी आवश्यक दस्तांची नोंदणी केली नसल्यास त्यामध्ये नमूद स्थावर मालमत्तेवर त्याचा कोणताही परिणाम किंवा असा अधिकार प्रदान करणाऱ्या कोणत्याही व्यवहाराचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही असे सूचीत केले आहे.
नोंदणी ऐच्छीक असलेल्या दस्तामध्ये मृत्युपत्र, कार्यकंत्राट, टीडीआर हस्तांतरणाचे दस्त, किवसन करार, हडपतारण, हक्कलेख निक्षेप, प्रतिभूती बंधपत्र, मुखत्यारपत्र इत्यादी दस्तांचा समावेश आहे. कार्यशाळेत मुद्रांक शुल्क भरण्याची पध्दत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ई चालन व्दारे अमर्यादीत रक्कमे पर्यंतचे मुद्रांक शुल्क भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. स्टॅम्प पेपर, फॅ्रकींग, ग्रास इएसबीटीआर, ई चलान  आदीव्दारे करण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क भरणामध्ये सुसुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी कलम  10 ड अनुसार सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती श्री. कवडे यांनी दिली.
कलम 10 ड नुसार वित्त संस्थेने करावयाची कार्यवाही, कलम 10 ड अन्वये प्राधिकृत अधिकाऱ्याने करावयाची कार्यवाही, ग्रास प्रणालीव्दारे प्राधिकृत अधिकाऱ्यास पुरविण्यात येणारा युजर आयडी व पासवर्ड, प्रत्येक मालमत्ता खरेदीचे बाजार मुल्य व दस्त नोंदणी शुल्क तसेच मुद्रांक शुल्क चुकविल्यामुळे शिक्षा व दंडाच्या तरतूदी, विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा याविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली.
00000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जमात प्रमाणपत्र तपासणीसाठी सूचना

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जमात प्रमाणपत्र
 तपासणीसाठी सूचना
अमरावती, दि. 8 : सन 2020-21 या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने प्रस्ताव कार्यालयास सादर करावयाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी जे सन 2020-21 शैक्षणिक वर्षाकरीता वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांनी आदी प्रमाण प्रणालीवर https://etribevalidity.mahaonline.gov.on वेबसाइटवर ऑनलाईन भरावा व त्यानंतर ऑनलाईन केलेल्या प्रस्तावाची प्रत सर्व मूळ पुराव्याच्या प्रतिसह आपले तपासणीचे प्रस्ताव शाळेमार्फत किंवा पालकांर्माफत परिपूर्ण प्रस्ताव दि. 15 नोव्हेंबर 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत या समिती कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावा.
तसेच विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांचे प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण व्हावी, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी या समिती कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आपले जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणासंदर्भात समिती कार्यालयाशी संपर्क साधून सदर प्रकरणाचा पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रृटी/चूक किंवा अपूर्णता राहू नये यांची दक्षत घेण्यात यावी, असे आवाहन सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती हे करीत आहे.
तसेच सन 2020-2021 या सत्रात व्यावसायिक अंभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मात्र समितीकडे यापूर्वीच प्रकरण दाखल करुन समितीकडे प्रकरण प्रलंबित आहेत, अशाही विद्यार्थ्यांनी या कार्यालयातील प्रबंधक शोभा चौहाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक (सं), अनुसूचित जमाती प्रमाणपत्र, तपासणी समिती, अमरावती यांनी केले आहे.
00000

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अप्रेन्टीशिप पखवाडा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
अप्रेन्टीशिप पखवाडा
अमरावती, दि. 7 :औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, अमरावती येथे ॲप्रेन्टीशिप पखवाडा दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या सभागृहात साजरा करण्यात येत आहे. या पखवाड्याअंतर्गत आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना शिकाऊ उमेदवारीबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यांत येणार आहे. यात MSRTC, MSEDCL, TATA MOTORS, RAYMOND, Amravati या आस्थापनांचे व्यवस्थापक प्रशिक्षणार्थ्यांना Apprenticeship Portal बद्यलची माहिती व पोर्टल वर ऑन लाईन नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती देणार असून जिल्ह्यातील आय. टी. आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ. एम. डी. देशमुख यांनी केले आहे.  
00000




विभागीय लोकशाही दिन 11 रोजी

विभागीय लोकशाही दिन 11 रोजी
अमरावती, दि. 7 : दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजे दि. 11 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. नागरिकांनी आपला तक्रारींसह लोकशाही दिनाला उपस्थिती रहावे, असे पीयूष सिंह, विभागीय आयुक्त अमरावती यांनी कळविले आहे.
00000