बुधवार, ३० मार्च, २०२२

अमरावती विभागातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांना ४२५ रिक्तपदांवर रोजगाराची संधी

 

अमरावती विभागातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांना

४२५ रिक्तपदांवर रोजगाराची संधी

अमरावती दि 30:  राज्यातील नामांकित नियोक्तांकडून प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम व यवतमाळ कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दिनांक  30 तसेच ३१ मार्च २०२२ रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजित केला आहे.

ऑनलाईन विभागीय रोजगार मेळाव्यात राज्यातील नामांकित कंपन्या आस्थापनांमध्ये ४२५ रिक्त जागेवर विभागातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळविण्याची संधी मिळणार आहे. रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आय. टी. आय. (सर्व शाखा)/ स्थापत्य, मेकॅनिक, ईलेक्ट्रॉनिक्स पदवीधर व पदविकाधारक तसेच इतर सर्वशाखीय पदवीधर असणा-या रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील सेवायोजन कार्डच्या (एम्पॉयमेंट कार्ड) युझरनेम व पासवर्डच्या माध्यमातून मेळाव्यात सहभागी होता येईल.

सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योजकांकडून ऑफलाईन वा ऑनलाईन पध्दतीने मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी विभागीय रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने ३१ मार्च २०२२ पर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभागी होण्याची प्रक्रियेसाठी एम्पॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजूकडील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर click करावे. येथे जिल्हा निवडून त्यातील AMRAVATI DIVISIONAL JOB FAIR मध्ये नमुद पात्रतेनुसार उपलब्ध पदासाठी अप्लाय करावे. त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल. अशा पध्दतीने इच्छुक उमेदवार या रोजगार मेळाव्यात सहभागी होवू शकतात. अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या ०७२१-२६६१९५० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

 

मंगळवार, २९ मार्च, २०२२

कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करावी

 

कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करावी

-                                                                        








                          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकुर   कामगारांची आरोग्य तपासणी व किट वाटप  शिबिराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

             नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

 

          अमरावती दि29: बांधकाम क्षेत्रात कामगार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची बाब आहे. जिल्ह्यातील सर्व कामगारांची नोंदणी प्रक्रिया गतीने पूर्ण करून  तालुक्याच्या ठिकाणी शिबिर घेण्याबाबत नियोजन करण्यात यावे असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुविधा व विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता आरोग्य तपासणी, माध्यान्ह भोजन, घरेलू कामगार नोंदणी, ई- श्रम कार्ड वाटप व अत्यावश्यक सुरक्षा किट वाटपाबाबत तिवसा येथे  शिबिराचे आयोजन करण्यात आले. कामगार विभाग, कामगार उपायुक्त कार्यालयाच्यावतीने आयोजित शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पुजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पाताई हांडे, उपसभापती शरद वानखेडे, पंचायत समिती सदस्य सत्तार मुल्ला, निलेश खुळे, कल्पना दिवे, तिवसा नगराधक्ष्य योगेश वानखेडे, तहसिलदार वैभव फरतारे, नोंदणी अधिकारी अविकांत चौधरी, संजय धुर्वे, अर्चना कांबळे, नियंत्रक संजय पांडे आदी उपस्थित होते.

              तिवसा तालुक्यात 5 हजार 634 कामगारांची नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाली असुन शिबीरात श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते 300 कामगारांना अत्यावश्यक किटचे वाटप करण्यात आले. यावेळी तिवसा तालुक्यात कामगारांसाठी माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत जेवणाच्या व्यवस्थेची त्यांनी माहीती घेतली. वीटभट्टी, बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना वेळेत व सकस जेवण देण्याबाबत श्रीमती ठाकुर यांनी निर्देश दिले.

नोंदणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करावे

        जास्तीत जास्त कामगाराची नोंदणी प्रक्रिया गतीने पुर्ण करण्यात यावी. नोंदणी प्रक्रियेबाबत तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. एकही कामगार नोंदणी प्रक्रिया व योजनांच्या लाभापासुन वंचित राहता कामा नये, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अत्यावश्यक किटमधील सांधनांचा कामगारांनी वापर  करावा

           सुरक्षा किट मध्ये कामगारांसाठी बॅटरी, हेल्मेट, चटई, जेवणाचा डबा, रबरी बुट, दोरी, हातमोजे, मास्क, जॅकेट, हेडफोन इत्यादी वस्तुंचा समावेश आहे. या सर्व साधनांचा सर्व क्षेत्रिय ठिकाणी वेळोवेळी उपयोग करावा. संरक्षणार्थ असलेल्या या साधनांचा उपयोग  करतांना कामगारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असा विश्वास श्रीमती ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केला.

           यावेळी दिपक बिसेन, दिनेश चवळे, कविता चौधरी, सलिम शहा, अंकुश मेश्राम यांना ई-श्रम कार्ड व नलिनी मेश्राम, अंजु गवळी, तुळशीराम माहोरे, सय्यद खलिम, किशन कोल्हाट व शंकर चाकरे यांना सुरक्षा किटचे वाटप श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

000000

 

विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी / तिवसा तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

विद्यार्थ्यांनी सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी

                                                          - ऍड. यशोमती ठाकूर

रासेयोच्या निवासी श्रम शिबीराला पालकमत्र्यांकडून भेट

 

         अमरावती दि 29:  विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्काराचे, सर्वधर्मसमभावाचे मूल्य रुजविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनच्या माध्यमातून केले जाते. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात सामाजिक सेवेची मूल्ये अंगिकारावी. जीवनात सेवा व त्याग या मूलमंत्राचा स्वीकार करून समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन जिल्हयाच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी येथे केले.

 

          कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत तिवसा तालुक्यातील शेंडोळा खुर्द येथे शासकीय  औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनच्या निवासी श्रम संस्कार शिबिराला श्रीमती ठाकूर यांनी भेट दिली.यावेळी त्या बोलत होत्या. 

 

               जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा आमले, तिवस्याच्या पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखेडे, तिवसा सरपंच मुकुंद पुनसे, शेंडोळा खुर्दचे सरपंच अर्चना चिकटे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक श्री देवतळे, मोझरीच्या प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विवेक पडोळे, शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र लोखंडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश साबळे, उपविभागीय अधिकारी डॉ.नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे आदी उपस्थित होते. 

 

                विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व, छंद, सवयी, दृष्टिकोन, जीवनावश्यक मुल्ये व क्षमता विकसीत कराव्या. अनुभव व जिज्ञासु वृत्तीची जोपासना करावी. रासेयोच्या माध्यमातुन शिकवण्यात येणारी शिस्तबद्धता अंगी बाणवावी. जीवनात यशस्वी होण्याचे हे सुत्र सर्वांनी आत्मसात करण्याबाबत श्रीमती ठाकुर यांनी विद्यार्थ्यांना सांगीतले.

    

               शिबिरात गुरुकुंज  मोझरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. दिनांक 27 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ग्रामस्वच्छता, स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन, प्रभात फेरी, अंधश्रद्धा निर्मुलन, सामुदायिक प्रार्थना, मानवी जीवनात संस्काराचे महत्व आदी विषयांवर व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य विवेक पडोळे यांनी दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

              भातकुली तालुक्यातील आष्टी येथील बीएसएफचे जवान शहिद कॉन्स्टेबल संजय जवंजाळ यांना कर्तव्यावर असतांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन श्रीमती ठाकुर यांनी त्यांना धीर दिला.

 

 

000000

 

 

वृत्त क्र.103

               तिवसा तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते 1 कोटी 20 लक्ष

                 रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन

 









           अमरावती दि 29: ग्रामीण भागातील विविध विकासकामे  पुर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकुर यांनी येथे दिली. तिवसा तालुक्यात आज विविध‍ विकासकामांच्या भूमिपूजन श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विविध भूमिपूजनांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका, रस्ता बांधकाम, रस्त्याचे काँक्रिटीकरण, स्मशानभुमी परिसराचे सौंदर्यीकरण आदी विकास कामांचा समावेश होता.

 

                 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त 42 लक्ष रुपयांच्या निधीतून विद्यार्थ्यांकरीता अभ्यासिका व वाचनालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन ऍड. श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरी दलितेतर योजनेअंतर्गत सार्वजनिक हिंदु स्मशानभूमीच्या 11 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या सौंदर्यीकरणांच्या कामाचे  भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तिवसा नगर पंचायत कार्यालय परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत अंदाजे 5 लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन व सिमेंट नाली बांधकामाच्या कामाचे अंदाजे 21 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तिवसा तालुक्यात योजनेअंतर्गत प्राप्त निधीतुन रस्त्यांच्या, नालीच्या कामाचे व परिसर सौदर्यीकरणा सारख्या विविध कामाचे भूमिपूजन  आज करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश वानखेडे, नगर परिषदेच्या उपाध्यक्ष प्रिया विघ्ने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप काळबांडे, नगरसेवक वैभव वानखेडे आदी उपस्थित होते.

00000

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

रक्तदान, रोगनिदान शिबीरासारख्या लोकोपयोगी कार्यक्रमातून स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली








 

रक्तदान, रोगनिदान शिबीरासारख्या लोकोपयोगी कार्यक्रमातून

स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली

                            आईच्या तेरवीतही जपले वेगळेपणा

 

अमरावती दि 25 (विमाका) :जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या तेरवी निमित्त अचलपुर तालुक्यातील घाटलाडकी, आसेगाव पुर्णा, कुऱ्हा, चमक खुर्द, शिरजगाव कसबा येथे रक्तदान शिबीर, रोगनिदान शिबीर व शववेटी वाटप करण्यात आली. यावेळी मोठया प्रमाणात युवकांनी रक्तदान करुन स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गेले तेरा दिवस विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करुन राज्यमंत्र्यांनी त्यांच्या आईच्या तेरवीचे वेगळेपण जपले.  

काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन झाले. तेरा दिवसांमध्ये अनेकांनी त्यांची सांत्वनपर भेट घेतली. तेव्हापासुन त्यांनी त्यांच्या आईंच्या आठवणींना उजाळा देत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.

 दररोजच्या किर्तनासह दिनांक 21 ते 26 मार्च पर्यंत ग्रामस्थांकरीता रोगनिदान व उपचार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान राज्यमंत्री श्री. कडू यांनी गावातील भिंती, वृक्ष, खांब व परिसराचे सुशोभिकरण केले. या उपक्रमात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले. त्यामुळे गावाच्या स्वच्छता व सौंदर्यात भर पडली. तेरविच्या दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. पाचशेपेक्षा अधिकांनी या शिबीरात रक्तदान  केले. याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकिय महाविद्यालय आणि गाडगे महाराज रक्तपेढीने सहकार्य केले. महिलांच्या कर्करोगाच्या निदान शिबिराचा लाभ येथिल महिलांनी घेतला.

शित शव पेटीचे वाटप

नोकरी किंवा कामानिमित्त दुर गावी असणारे आप्त पार्थिवाच्या दर्शनापासुन वंचित राहु नये, शित शव पेटीच्या अभावी अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तिच्या अंतिम दर्शनाला मुकावे लागु नये यासाठी कै. इंदिराबाई यांच्या स्मृति प्रित्यर्थ शिरजगाव कसबा, कुऱ्हा, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, आसेगाव पूर्णा, चमक गावांमध्ये शव पेटीचे वाटप श्री. कडू यांनी केले.

00000000

मंगळवार, २२ मार्च, २०२२

विभागीय आयुक्त कार्यालयात शहिद दिनानिमित्त अभिवादन

 






विभागीय आयुक्त कार्यालयात

शहिद दिनानिमित्त अभिवादन

अमरावती, दि. 23 (विमाका) : शहिद दिनानिमित्त क्रांतीकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त संजय पवार, सहा. आयुक्त (मागासवर्ग) विवेकानंद काळकर, तहसिलदार वैशाली पाथरे, श्री पेठे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनीही प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले.

00000

युवकांसाठी 24 रोजी रोजगार भरती मेळावा

 

युवकांसाठी 24 रोजी रोजगार भरती मेळावा

अमरावती दि.22 (विमाका): युवकांना रोजगार प्राप्त होण्याच्या उद्देशाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक 24 रोजी सकाळी अकरा वाजता संस्थेच्या एन.एस.सभागृहात शिकाऊ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात रेमंड, डेनिम, अद्वैक हाय टेक पुणे, युनी पोल शिकरापुर अहमदनगर, वेलमेड लॉकींग चाकण, मिंडा कॉरपोरेशन, टाटा असल आदी ठिकाणाहुन विविध कंपन्या येणार असुन आयटीआय उत्तिर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या भरती मेळाव्यास आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे संस्थेच्या प्राचार्या एम.डी.देशमुख यांनी केले आहे.

000000

रविवार, २० मार्च, २०२२

ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही - ॲड. यशोमती ठाकू

 

ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

                                                                       -        ॲड. यशोमती ठाकूर

तिवसा तालुक्यात  6 कोटी 50 लक्ष रुपये निधीतून

विविध विकासकामांचे भूमिपूजन










        अमरावती, दि.20 (विमाका) : जिल्ह्यातील ग्रामीण भाग औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हावा यासाठी बळकट व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळनासह इतर नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिवानखेड येथे दिली.

आज तिवसा येथील दिवाणखेड, मार्डी, चेनुष्ठा, जहागिरपुर, बोर्डा, आखतवाडा, धामंत्री, उंबरखेड, तारखेड, मोझरी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

विकासकामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे

दिवाणखेड येथे 11 लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, 20 लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंप कडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारधी वस्ती ते बळीराम महाराज मंदिरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. येथे व्यायामशाळा,वाचनालय, दिवाणखेड-परसोडा रस्त्याचे खडीकरण, काँक्रीटीकरण, नाला खोलीकरण आदींच्या कामासाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले.

कुऱ्हा येथे 1 कोटी 10 लक्ष रुपयांच्या निधीतून विकासकामे

कुऱ्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती, निवासस्थानाची दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, हरिजन वस्तीतील सौंदर्यीकरण, स्थानिक रस्त्याचे काँक्रीटीकरण, हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण आदी कामे 1 कोटी 10 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

चेनुष्ठा येथे 1 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

कुऱ्हा-चेनुष्ठा-बोर्डा येथे लहान पुलाचे बांधकाम, रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्याची सुधारणेच्या 1 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. पुलाची उंची योग्य असावी. पुलनिर्मितीचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

बोर्डा, आखतवाडा, उंबरखेड, मोझरी येथील रस्ता व पुलाच्या कामाचे भूमिपूजन

बोर्डा शिंदवाडी येथील 38 लक्ष रुपयांच्या  निधीतुन करण्यात येणाऱ्या कामाचे, आखतवाडा-धामंत्री रस्त्याचे 50 लक्ष रुपयांच्या निधीतुन मजबुतीकरण, उंबरखेड ते तारखेड रस्ता व नालीचे 36 लक्ष निधीतुन बांधकाम, दापोरी जावरा रस्ता व पुलाचे 1 कोटी 50 लक्ष निधीतुन बांधकाम व मोझरी ते शेंदूरजना बाजार रस्त्याचे मनरेगा अंतर्गत  मोझरी गावातील रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या  सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद बंधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आदी उपस्थित होते.

000000

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

 

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

 

अमरावती, दि. 11:- दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडित आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी इ. संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारीं पोस्टाद्वारे, dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com या संकेतस्थळावर किंवा व्यक्तीश: विभागीय आयुक्त

 कार्यालयात हजर  राहावे. तसेच उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपायांचे पालन करावे असे  विभागीय उपआयुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.

000000

 

 

गुरुवार, १० मार्च, २०२२

मत्स्यव्यवसाय विभागात कंत्राटी पद्धतीने पदभरती अर्जदारांनी 14 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे/आदिवासी भागात सांस्कृतीक संकुल बांधण्याच्या योजनेकरीता 21 मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावे

 

                                   मत्स्यव्यवसाय विभागात कंत्राटी पद्धतीने पदभरती

अर्जदारांनी 14 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती दि.:- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या तसेच मत्स्यबीज उत्पादन, मत्स्योत्पादन, सर्वेक्षण इत्यादी बाबींसाठी प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील माहितीचे संकलन करुन, संकलित केलेली माहिती ऑनलाईन उपलब्ध करण्याकरीता अमरावती विभागातील प्रादेशिक कार्यालयांतील मत्स्यव्यवसाय विभागामध्ये कंत्राटी पध्दतीने एकूण सहा डाटा एन्ट्री ऑपरेटर या  पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात येणार आहे. असे आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी कळविले आहे. या पदांचे नियुक्ती कार्यक्षेत्र अमरावती. अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी राहील. उमेदवारांनी त्यांचे अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात किंवा दिलेल्या ई-मेल द्वारे संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात सादर करुन अर्जाची एक प्रत प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग कार्यालयास व ई मेलवर सादर करावी. दि. 14 मार्च 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी 0721-2662801 या क्रमांकावर व pmmsy.rdcamravti@gmail.com  या मेल आयडीवर संपर्क साधावा असे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                   0000000

वृत्त क्र. 93                                                                दिनांक: 10 मार्च 2022

आदिवासी भागात सांस्कृतीक संकुल बांधण्याच्या योजनेकरीता

21 मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावे

अमरावती दि. 10:- आदिवासी उपयोजना क्षेत्र, आदिवासी उपयोजना बाहेरील क्षेत्र व माडा- मिनीमाडा क्षेत्र यामध्ये आदिवासी बांधवाकरीता सांस्कृतीक संकुल बांधणे हि योजना राबविण्यात येत आहे.

             त्याअनुषंगाने आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील चिखलदरा तालुक्यामधील व ओटीएसपी क्षेत्रामधील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकूली, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अचलपूर, अमरावती व तिवसा तालुक्यातील आदिवासी लोकसंख्या जादा प्रमाणात असलेल्या ग्रामपंचायतीकडून, नगरपालीकांकडून व नोंदणीकृत आदिवासी स्वयंसेवी पात्र संस्थांकडून शासन निर्देशाप्रमाणे आवश्यक त्या दस्तऐवजासह विहीत नमुन्यातील प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प धारणी येथे 11 मार्च 2022 ते 21 मार्च 2022  पर्यत सादर करण्यात यावे. तसेच ज्या गावांमध्ये ठक्कर बाप्पा योजनेतर्गत आदिवासी भवन या पुर्वी बांधण्यात आले असेल अथवा सदयस्थीतीमध्ये प्रस्तावीत असेल अशा गावांमधील प्राप्त प्रस्तावांचा विचार अन्य गावांमधील प्रस्ताव निकषाप्रमाणे प्राप्त न झाल्यास दुय्यम स्तरावर करण्यात येईल.

                प्रस्तावाचे अनुषंगाने प्रस्तावाचा विहीत नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी या कार्यालयामधून प्राप्त करुन घेण्यात यावे. अधिक संपर्क करीता दुरध्वनी क्र. 07226-224217 वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा धारणीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी  वैभव वाघमारे यांनी केले आहे.

                                                         0000000

वृत्त क्र. 94                                                                दिनांक: 10 मार्च 2022

 

   लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण कायद्याबाबत

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

 

              अमरावती दि 10: कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण कायदा व अंतर्गत तक्रार समितीच्या कामकाजाची कार्यपद्धती या विषयावरील कार्यशाळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात मंगळवारी झाली. त्यात महिला व बालक विशेष कक्षाच्या प्रादेशिक समन्वय अधिकारी प्रतिभा गजभिये यांनी मार्गदर्शन केले.

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, राज्य उत्पादन शुल्कच्या अधिक्षक श्रीमती अहेर, तहसिलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा महांडुळे, निकिता जावरकर, जिल्हा नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी, जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार, नायब तहसिलदार व्ही. आर. उगले, श्रीमती खंडोकर, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.

 

कामाच्या ठिकाणी स्त्रियांची लैंगिक किंवा कुठलीही छळवणूक होत असेल तर कार्यालयांतर्गत तक्रार निवारण समितीच्या माध्यमातुन तक्रारीचे निवारण होणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यरत महिलेने या समितीची कार्यपद्धती समजून घेणे गरजेचे आहे, असे श्रीमती गजभिये यांनी यावेळी सांगितले.  

 

कामाच्या ठिकाणी महिलांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी कार्यालयांतर्गत समिती स्थापित असणे आवश्यक आहे. तसा कायद्याचा उद्देश आहे. त्यानुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित असावी. अंतर्गत तक्रार निवारण समितीची कार्यप्रणाली, समस्या सोडविण्याची पद्धती याबाबत श्रीमती गजभिये यांनी यावेळी मार्गदर्शन केले. माधुरी सगणे यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्ह्यातील अंतर्गत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सदस्य व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                                                                 0000

बुधवार, ९ मार्च, २०२२

 

                           राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी

                              विद्यार्थ्यांनी 11 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती दि.8:- अनूसुचित जातीच्या (नैवबौध्दंसहीत) विद्यार्थ्यांनी देशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी सन 2021-22 या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुकत डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

               राज्यातील अनूसुचित जातीच्या नवबौध्द विद्यार्थ्यांसह 100 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. पात्र विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापिठ , संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक, तसेच वसतिगृह व भोजन शुल्क इत्यादी शुल्क रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलंग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता 12 वीत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांने पदवीत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आहे. या शिष्यवृत्ती करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती लाभ मिळणार नाही. या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत असला पाहीजे. तथापि पुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतात. परंतु त्यांच्या विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी न मिळाल्यास करण्यात येईल.

               या योजनेचा लाभ घेण्याबाबत अधिक माहिती, जाहीरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली प्रसिध्द झालेली आहे. संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 11 मार्च 2022 रोजी सांयकाळी 6.15 वाजेपर्यत swceda.nationalscholar@gmail.com  या ईमेल वर पाठवावे. अर्जाची प्रत समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड पुणे – 411001 येथे सादर करण्यात यावी, असे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे पुणे यांनी व प्रादेशिक समाज कल्याण उपआयुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

0000


                           बारावीच्या परीक्षेतील एकाच दिवशी येणाऱ्या

               दोन विषयांची परीक्षा विद्यार्थी 5 व 6 एप्रिलला देऊ शकतील

अमरावती दि. 9:-  इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक 4 मार्च पासुन सुरु झाली असुन वेळापत्रकाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 31 मार्च, 01 व 4 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दिड आणि दुपारी तीन ते सहा याप्रमाणे सकाळच्या व दुपारच्या सत्रात प्रत्येकी 3 तास या कालावधीची राहील. तसेच इयत्ता बारावीची सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. 1, 4 व 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक व दुपारी तीन ते दुपारी साडेपाच याप्रमाणे सकाळाच्या व दुपारच्या सत्रात प्रत्येकी 2 तास 30 मिनिटे या कालावधीची राहील हे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

              इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशत: बदलानुसार शनिवार दि. 5 मार्च 2022 रोजी होणाऱ्या  प्रथम व द्वितीय सत्रातील भाषा विषयाच्या परीक्षा मंगळवार दि. 5 एप्रिल 2022 रोजी  आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मूळ वेळापत्रकानुसार इयत्ता 12 वी माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. 31 मार्च 2022 आणि 1 व 4 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये सकाळ व दुपार सत्रात आयोजित करण्यात आलेली आहे. आणि दि. 5 एप्रिल 2022 रोजी पुर्नपरीक्षेची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी भाषा विषय आणि माहिती तंत्रज्ञान विषय एकत्रित घेतले असल्यास त्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी दिनांक 5 व 6 एप्रिल रोजी पुर्नपरीक्षेची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

0000000

             दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या आदल्या दिवशी पर्यंत आवेदनपत्र भरण्याची सुविधा

                        विद्यार्थी 14 मार्च पर्यंत ऑनलाईन आवेदन सादर करु शकतील

 

            अमरावती दि. 9: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च - एप्रिल 2022 मध्ये इयत्ता दहावी ची परीक्षा दिनांक 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहेत.

या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये. विलंब शुल्क माफ करण्यात यावे तसेच विद्यार्थ्याना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार सर्व संबंधित घटकांना विभागीय मंळामार्फत अवगत करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

                  इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 15 मार्च  पासून सुरु होत असल्याने या परीक्षेचे आवेदनपत्र नियमित शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने दि. 14 मार्च 2022  रोजी सकाळी 11 वाजेपर्यत भरण्याची सुविधा उपलब्ध राहील, त्यानंतर आवेदनपत्र भरणेसाठी संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे. मार्च - एप्रिल 2022 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज केलेल्या परंतू प्रस्तावामध्ये त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि 10 मार्च 2022 पर्यत त्रुटीची पुर्तता करुन दि. 12 मार्च 2022 पर्यत नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व दिलेल्या मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र भरावे. असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

0000000