मंगळवार, २० डिसेंबर, २०२२

मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत सूचना, आवेदनपत्रे सादर करण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

                                          मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे

आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखांबाबत सूचना

 

आवेदनपत्रे सादर करण्यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती दि. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च  2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेसवरुन भरावयाची मुदत दि. 2 डिसेंबर 2022 रोजी संपत असून विद्यार्थी हिताच्यादृष्टीने ऑनलाईन परीक्षा आवेदपत्रे भरण्यासाठी 3 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-

आवेदनपत्र सादर करण्याची निर्धारित मुदत संपल्यानंतर श्रेणी/तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसाचा कालावधी वगळून त्याअगोदर प्रतिदिनी रु. 50/- याप्रमाणे आकारण्यात येईल. तसेच  अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे, त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रती दिन रु. 100/- विशेष अतिविलंब शुल्क व तद्नंतरच्या 15 दिवसांकरिता व परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत  (दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत) रु. 200/- प्रमाणे अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारुन आवेदनपत्र स्विकारण्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.  

लेखी परीक्षा दि. 21 फेब्रुपरी 2023 रोजी सुरू झाल्यानंतर कोणत्याही नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, खाजगी विद्यार्थी, तुरळक व आय.टी.आय. विषय घेणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे स्विकारली जाणार नाहीत, यांची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

उच्च्‍ माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 50/- प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थी प्रमाणे) सोमवार दि. 19 डिसेंबर 2022 ते गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 पर्यंत राहिल. विशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 100/- प्रतिदिन, प्रतिविद्यार्थीप्रमाणे) शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 ते शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी 2023 राहील. अतिविशेष अतिविलंब शुल्क अंतिम मुदत (रु. 200/- प्रतिदिनी, प्रतिविद्यार्थीप्रमाणे) शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2023 ते सोमवार दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत राहील.

सदर आवेदनपत्र कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची Print Out व आवेदनपत्र जमा करण्याच्या  दिवसांपर्यंतचे अतिविलंग/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्क घेण्यात यावे. सदर शुल्क प्राप्त झाल्यानंतरच अर्ज ग्राहय धरण्यात येईल.

विभागीय मंडळाच्या परीक्षा शाखेने प्राप्त शुल्क व ऑनलाईन आलेली आवेदनपत्रे याची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे स्विकारण्याच्या तारखा व सर्व सूचनांचे परिपत्रक संबंधित उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांना सोबतच्या नमुन्याप्रमाणे (परिशिष्ट अ) विहीत प्रपत्रांसह पाठविण्यात यावे. तसेच संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे अतिविलंग/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कानुसार आवेदनपत्रे स्विकारावीत.

राज्यमंडळ कार्यालयाकडून अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र स्विकारण्याची मंजुरी दि.  21 फेब्रुवारी 2023 पर्यंत घेण्यात यावी. तसेच राज्यमंडळ कार्यालयाकडून परीक्षा सुरु होण्यापूर्वी मंजुरी देणे शक्य होईल अशा बेताने अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्काचे आवेदन पत्रांचे तक्ते राज्यमंडळाकडे सादर करण्यात यावेत. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सहसचिव तेजराव काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा