सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

बिबट्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

 बिबट्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

अमरावती, दि. 12 (विमाका): बिबट्याने मारलेल्या शेळ्यांवर उंदीर मारण्याचे औषध टाकणा-याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाही होत आहे.

 

याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्प सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक दिव्य भारती यांनी कळविल्यानुसार, दि. 6 डिसेंबर रोजी सेमाडोह परिक्षेत्रातील असेरी बिट वनखंड क्रमांक 169 मध्ये वन्य प्राणी बिबट नर आणि मादी रायपूर रस्त्यानजिक मृत अवस्थेत आढळून आले.

पुढील तपासात दोन मृत शेळ्याही दिसून आल्या. त्यापैकी एक शेळी अर्धवट खाल्लेली होती. या शेळ्या सेमाडोह येथील राजेश किशोरी तायवाडे (वय 45) यांच्या मालकीचे असल्याचे समजले. त्यानुसार दि. 8 डिसेंबर रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि पुढील दिवशी अचलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना एक दिवसाची वनकोठडी मिळाली. वनकोठडीत संबंधित व्यक्तीने बिबट्याने मारलेल्या शेळ्यावर उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचे कबूल केले आहे. त्याचप्रमाणे, उंदीर मारण्याच्या औषधाची पुडी आणि एक बाटली जप्त करण्यात आली आहे.

पुढील तपास मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक  कमलेश पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम व इतर कर्मचारी करत आहेत.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा