सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग
Ø महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाचा शतकोत्तरी
सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा
Ø अधिकारी व कर्मचारी यांना सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकाचे वाटप
अमरावती दि. 25 : महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने बहुजन समाजाला विवेकी पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग दिला. मनुष्याला विषमता, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी यापासून परावृत्त करून उच्च मुल्यांवर आधारित पर्यायी संस्कृती तयार करून दिली. जन्म, मृत्यू, विवाह अश्या सर्व संस्कारांचे विवेकीकरण करणे, निर्मिकाला सर्व लोक समान असल्याचा संदेश देणे हे सत्यशोधक समाजाच्या कार्याचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे बहुजन समाजाला शिक्षणाची प्रेरणा मिळत गेली, त्यामुळे आजही सत्यशोधक समाजाची तत्वे कालसुसंगत आहेत असे प्रतिपादन महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी केले.
महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे “आजच्या काळात सत्यशोधक समाजाचे महत्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते, यावेळी प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे बोलत होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सत्यशोधक समाजाचा मोठा प्रभाव पडला त्यामुळे बहुजनांना शिक्षण देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था उदयाला आल्या तसेच अनेक सुधारणावादी चळवळीचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात देखील सत्यशोधक समाजाच्या विचारांना स्थान आहे, त्यातूनच बहुजन कल्याणाच्या विविध योजना शासन तयार करीत आहे असे देखील शिरसाठे म्हणाले.
सत्यशोधक समाजाने पत्रकारिता, महिला शिक्षण अश्या क्षेत्रात देखील मोठे योगदान दिल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा.राजेश खवले यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी सत्यशोधक चळवळ जलास्याच्या माध्यमातून देश विदेशात पसरली आणि त्यातून शिक्षण चळवळीला हातभार लागला याचे सविस्तर विवेचन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे, लेखाधिकारी रश्मी तेलेवार, सहाय्यक लेखाधिकारी जयश्री बोदेले उपस्थित होते.
महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरी करताना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकाचे वाटप देखील करण्यात आले.
00000