शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

 आरोग्य, पोषण आणि स्वच्छता यावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे

                                                                               -  अविश्यांत पंडा

निपाणी येथे अमृत कलश यात्रा

            अमरावती, दि.22 : 'मेरी मिट्टी, मेरा देश' अभियानांतर्गत जिल्ह्यात अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत मातीविषयी प्रेम आणि  देशभक्तीच्या भावनेसोबतच गावाच्या शाश्वत विकासासाठी आरोग्य,पोषण, स्वच्छता या तीनही विषयावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

       ग्रामपंचायत पिंपरी निपाणी येथे 'मेरी मिट्टी, मेरा देश' अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. पंडा बोलत होते.  श्री. पंडा यांच्या हस्ते 'सर्वांसाठी घरे ' अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मंजूर असलेल्या भूमीहिन लाभार्थ्यांना इ वर्ग जमिनीमधील नमुना आठ मालकीपत्राचे मोफत वितरण यावेळी करण्यात आले. सोबतच 'आयुषमान भारत' अंतर्गत गोल्डन कार्ड तर पोषण महासप्ताहाचे औचित्य साधत  गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना सकस आहार कीटचे वाटप करण्यात आले.

        अमृत कलशाचे मंगल पूजन करत पालखी, बैलगाडी, ढोल -ताशे, लेझिम पथक आणि टाळ मृदंगाच्या नादात, उत्साहाच्या वातावरणात गावातून अमृत कलश यात्रेची मिरवणूक काढत माती गोळा करण्यात आली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आदी महापुरुषांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांचा उत्साह लक्ष वेधून घेणारा होता.

        समारोपीय कार्यक्रमामध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पिंपरी निपाणी गावाला अमरावती विभागामधे द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांनी गावकर्‍यांचे कौतुक केले. यावेळी सरपंच योगिता रिठे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, महिला बालविकास अधिकारी विरेंद्र गलपट, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील मालखेडे, गटशिक्षणाधिकारी श्री. शेंडे, विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव , सामाजिक कार्यकर्ते सचिन रिठे, विशाल रिठे आदी उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश नाटकर यांनी केले .संचालन श्री.बरदिवे यांनी तर  व आभार  विठ्ठल जाधव यांनी मानले.

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा