‘सेवा महिना’ अंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सेवा-सुविधांचा लाभ
· 16 ऑक्टोंबरपर्यंत विविध लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन
· विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी विशेष शिबिराचे आयोजन
· नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 25 : राज्यात 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ‘सेवा महिना’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शासनाच्या विविध कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना देणे तसेच योजनांचा लाभ घेण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सेवा महिना’अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सेवा महिन्यात एकूण 25 सेवांचा समावेश राहणार असून त्याअंतर्गत आधारकार्ड व पॅनकार्ड अपडेशन, आधारकार्ड व पॅनकार्डची नवीन नोंदणी तसेच नवीन मतदार नोंदणी करणे आदी सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात येत्या बुधवारी (ता.27 सप्टेंबर) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा विभागातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त (सामान्य प्रशासन) संजय पवार यांनी केले आहे.
नवीन आधारकार्ड काढणे व आधारकार्ड अपडेशन करण्याकरीता तसेच नवीन पॅनकार्ड काढणे व पॅनकार्ड अपडेशन करण्याकरीता ओळखीचा पुरावा (पॅनकार्ड/ राशनकार्ड/वोटरआय.डी./पासपोर्ट/
घरातील मुलगा/मुलगी यांच्या नवीन मतदार नांव नोंदणीकरीता जन्म पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टीफिकेट, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, घरातील नात्यातील (आई, वडील, भाऊ, वहीण) यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ट असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे जसे की, जन्म पुरावा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टीफिकेट, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला, माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला, पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स, लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील, असे श्री. पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सेवा महिन्यात मिळणाऱ्या विविध सेवा-सुविधा
या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.
यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.
सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याच्या व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा