गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी उमेदवारांकरिता रेडीमेट होजीअरी गारमेंट व्यवसायासाठी अर्थसहाय्य

 केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत

आदिवासी उमेदवारांकरिता रेडीमेट होजीअरी गारमेंट व्यवसायासाठी अर्थसहाय्य

 

·        मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 29 : धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत आदिवासी पुरुष/महिला समुह व बचतगटांना रेडीमेड होजीअरी गारमेंट करीता अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नि:शुल्क अर्ज मागविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने इच्छुक आदिवासी उमेदवारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयास अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठीचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाभर्थ्यांकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय धारणी या ठिकाणी तसेच नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती येथे उपलब्ध आहेत. मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या  उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेत. या योजने  संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी उपरोक्त नमूद कार्यालयातील विकास शाखेशी किंवा दूरध्वनी क्र.07226-224217 वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

या योजने अंतर्गत संबंधितांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची शासन निर्णयान्वये जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करुन पात्र, अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करतांना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी. अपंग, विधवा परितक्त्या, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी श्री यानथन यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

0000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ; नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ;

 नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 29 : जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती व इतर योजनाचे नविन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन प्रणालीवर भरण्याची प्रक्रिया कार्यन्वीत झाली आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

 

आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ दिला जातो. ही योजना प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत येत असलेल्या सर्व शासकिय, निमशासकिय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयात राबविली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक सत्र 2023-24 साठी https://mahadbtmahait.gov.in ही प्रणाली नोहेंबर 2023 पासुन कार्यान्वीत झाली असुन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणेसाठी निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी नविन तथा नुतनीकरण अर्ज विहीत मुदतीत भरुन महाविद्यालय स्तरावर सादर करावे. यासाठी महाविद्यालयांनी सुचना फलकावर सुचना लावून वर्गामध्ये नोटीस फिरवून जनजागृती करावी. अनुसूचित जमातीचे विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेपासून वंचित राहील्यास याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधीत महाविद्यालयाची राहील, याची नोंद घ्यावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविधमहत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ; कोट्यवधी शेतक-यांना लाभाचे वितरणविविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याचीपायाभरणी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ; कोट्यवधी शेतक-यांना लाभाचे वितरण

विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी

-         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यवतमाळ, दि. 28 :  विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या  10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासप्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.  

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रू. व महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रू. चे वितरण, तसेच राज्यातील सुमारे पाच हजार कोटी रू. निधीतून रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजनतसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही  प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

 

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीलय नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार,डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, गत 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतक-यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी थेट हस्तांतरित करण्यात येत आहे. ग्रामीण विकासासाठी हर घर जल, पीएम किसान निधी, लखपती दीदी योजना, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण आदी विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला.

प्रधानमंत्र्यांनी भाषणाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. मराठी व बंजारा भाषेतही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

 

 मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मागील दशक देशासाठी सुवर्णकाळ ठरला असून त्याचे शिल्पकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. महिला, शेतकरी, गरीब आणि तरुण या समाजाच्या चार स्तंभांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले असून, ‘नेशन फर्स्ट’च्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत.   महाराष्ट्र संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासमवेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  शेतकरी सन्मान योजनेत 4 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, मोदी आवास योजनेत घरांमध्ये महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. साडेपाच लाख महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे   लक्ष्य आहे. त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा निर्धार आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी झाल्यापासून महिलांसाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू झाल्या. त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि कर्ज देण्यात आले आहे. पालकमंत्री श्री. राठोड, खा. गवळी, आमदार डॉ. धुर्वे यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना बंजारा समाजाची पगडी, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.

रस्ते व महामार्गांचे लोकार्पण

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध रस्ते, महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ व लाभ वितरण झाले. त्यात वरोरा - वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, वणी, तडाळी, पडोळी यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांना फायदा मिळेल. सुमारे 378 कोटी रू. निधीतून सलाईखुर्द - तिरोरा महामार्गावरील 42 कि.मी. काँक्रिटीकरणामुळे गोंदिया ते नागपूर प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात होऊन नागझिरा अभयारण्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. सुमारे 291 कोटी रू. निधीतून साकोली - भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचेही लोकार्पण झाले.

सिंचन प्रकल्प

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 683 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 6 प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पातून 2.41 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 1 हजार 180 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांमुळे 51 हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

रेल्वेसेवेचा शुभारंभ

अहमदनगर - बीड-परळी रेल्वे मार्गावर 645 कोटी रू. निधीतून न्यू आष्टी - अंमळनेर टप्प्याचे व अंमळनेर - न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. त्याचा लाभ बीड जिल्ह्यातील नागरिक व कामगार वर्गाला मिळेल. सुमारे 675 कोटी रू. निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा -कळंब  या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ झाला. त्यामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील होईल. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू झाली आहे.

 

महिला सशक्तीकरण अभियान

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 5.50 लाख महिला बचत गटांना 825 रू. कोटी फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त खेळते भांडवल देण्यासाठी 913 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली. आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी आयुष्मान कार्डचे वितरण होत असून, योजनेच्या 3 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कार्डचे वितरण करण्यात आले.  

 

इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभही झाला. त्यात येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यात येणार असून,  2.5 लाख लाभार्थ्यांना रु. 375 कोटींच्या पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.

 

पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता थेट बँक खात्यात

पीएम किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरित झाले. देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रुपयांचे, तसेच राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 1 हजार 969 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण करण्यात आले. नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यात राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 3 हजार 800 कोटी रुपयांचा लाभ मिळाला. 

 

०००







मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागातील ‘शिपाई’ पदाचा निकाल जाहीर

 नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागातील


‘शिपाई’ पदाचा निकाल जाहीर

 

निकाल पाहण्यासाठी dtp.maharashtra.gov.in संकेतस्थळ उपलब्ध

 

अमरावती, दि. 27 : नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील शिपाई (गट ड) संवर्गातील रिक्त पदांवर भरतीसाठी परिक्षा टाटा कंन्सलटन्सी सर्व्हीसेस (टिसीएस) या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने दि. 25 नोंव्हेबर, 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या पद भरतीचा निकाल, गुणवत्ता यादी व अनुषंगीक सूचना विभागाच्या dtp.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

सदर परिक्षेची गुणवत्ता यादी, शिफारसपात्र उमेदवारांची यादी तसेच अनुषंगिक सुचना नगर रचना विभागाच्या सर्व विभागीय कार्यालयास देखील उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. शिफारसपात्र उमेदवारांनी त्यांना नियुक्तीची शिफारस केलेल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रे पडताळणीची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना अमरावती विभागाचे नगर रचना सहसंचालक किं. सा. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केल्या आहेत.

0000

विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण उपलब्धतेसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान

 विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण उपलब्धतेसाठी

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान

 

तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन ;

प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यांना लाखोंचे बक्षिस

 

अमरावती, दि. 27 : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक , विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राज्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन होणार असून अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना गुणांकन देऊन विजेता घोषित करण्यात येईल. विजेता ठरलेल्या शाळांना लाखोंचे बक्षीस वितरण करण्यात येईल. अमरावती विभागातील अधिकाधिक शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाव्दारे करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत भौतिक सुविधांचे निर्माण या घटकांतर्गत लहान, मोठी बांधकामे या बाबींकडे लक्ष केंद्रीत होते. आता या अभियानाच्या कक्षा रुंदावण्यात आल्या असून अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याचा दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन/अध्यापन/प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास इत्यादी  अनेकविध घटकांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शाळेचा सर्वांगिण विकास होण्यासाठी उपरोक्त महत्वपूर्ण घटकांना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित सर्व शाळांना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

उपरोक्त घटकांची परिणामकारकरित्या अंमलबजावणी होण्यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा आयोजित करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुका, जिल्हा, विभाग व राज्‍य स्तरावर स्पर्धांचे आयोजन होणार असून प्रत्येक स्तरावर पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस संबंधित विजेता शाळांना प्रदान करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विजेत्या होणाऱ्या शाळांना तालुकास्तरावर पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे 3 लक्ष रुपये, 2 लक्ष रुपये, 1 लक्ष रुपये, जिल्हास्तरावर पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे 11 लक्ष, 5 लक्ष, 3 लक्ष, विभागस्तरावर पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे 21 लक्ष, 11 लक्ष, 7 लक्ष तर राज्यस्तरावर विजेत्या ठरणाऱ्या शाळांना पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस अनुक्रमे 51 लक्ष, 21 लक्ष, 11 लक्ष रुपये बक्षिसांचे वितरण केल्या जाईल.

 शासकीय व स्थानिक स्वराज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होण्याचे सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या अभियानाची बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा याप्रमाणे व्याप्ती राहील. अ गटात विद्यार्थी केंद्रीत उपक्रम व सहभाग (60 गुण) व ब गटात शाळेव्दारे आयोजित उपक्रम (40 गुण) याप्रमाणे अभियानाचे स्वरुप राहील. या अभियानात राज्यातील सर्व शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाव्दारे करण्यात आले आहे.

00000

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

अपघातग्रस्त खेळाडूंची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आस्थेने विचारपूस

अपघातग्रस्त खेळाडूंची पालकमंत्री चंद्रकांत पाटील

यांच्याकडून आस्थेने विचारपूस

 

अमरावती, दि. 22 : क्रिकेटच्या सामन्यासाठी यवतमाळला जाणाऱ्या युवकांच्या वाहनाला 18 फेब्रुवारीला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर चौफुलीवर भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या खेळाडूंची पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी बुधवारी (21 फेब्रुवारी) रेडियंट हॉस्पीटल व रिम्स हॉस्पीटल येथे जाऊन भेट घेतली. जखमींची आस्थेने विचारपूस करुन सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवावी, असे निर्देश  पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

अपघातातील मृतांना व जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रवि राणांनी यावेळी पालकमंत्र्यांना केली. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार रवि राणा, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0000 

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत आदिवासी उमेदवारांना अर्थसहाय्यसाठी अर्ज आमंत्रित

 केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत

आदिवासी उमेदवारांना अर्थसहाय्यसाठी अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 23 : धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत आदिवासी पुरुष/महिला समुह व बचतगटांना रेडीमेड होजीअरी गारमेंट करीता अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नि:शुल्क अर्ज मागविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने इच्छुक आदिवासी उमेदवारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयास अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठीचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाभर्थ्यांकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय धारणी या ठिकाणी तसेच नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती येथे उपलब्ध आहेत. मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या  उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेत. या योजने  संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी उपरोक्त नमूद कार्यालयातील विकास शाखेशी किंवा दूरध्वनी क्र.07226-224217 वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत 29 फेब्रुवारी 2024 राहील, याची सर्व  लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.

या योजने अंतर्गत संबंधितांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची शासन निर्णयान्वये जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करुन पात्र, अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करतांना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी. अपंग, विधवा परितक्त्या, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी श्री यानथन यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

0000

संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

 संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 23 : थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

        उपायुक्त गजेंद्र बावणे, रमेश आडे, हर्षल चौधरी, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी- कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

0000

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

1 मार्चला यवतमाळ येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

1 मार्चला यवतमाळ येथे पंडीत दिनदयाल

उपाध्याय रोजगार मेळावा            

अमरावती दि. 22: नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमुहांच्या माध्यमातुन चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती तर्फे येत्या 1 मार्चला यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            अमरावती विभागातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असतात. त्यांचाच भाग म्हणजे निवड जागेवरच On spot selection मोहीम रोजगार मेळाव्यामध्ये राबविण्यात येणार आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणा-या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरीता कंपन्याचे प्रतिनिधि प्रत्यक्ष उपस्थित राहुन उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी दिल्या जाईल.
            या मेळाव्यामध्ये गरजु विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविण्याकरीता
 https://tb.gy/eshvai या लिंकवर जाऊन निशुल्क आँनलाईन नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून आपली नोदंणी करावी.
            रोजगार मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदविण्यासाठी दि. 1 मार्च  रोजी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ जि.यवतमाळ येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो, व आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त द.ल. ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
 

००००

संविधान महानाट्याने आज महासंस्कृती महोत्सवाची सांगता

 संविधान महानाट्याने आज महासंस्कृती महोत्सवाची सांगता

अमरावती, दि. 22 : स्थानिक सायन्सस्कोर मैदानावर 18 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाची सांगता उद्या, दि. 22 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित संविधान या महानाट्याने होणार आहे. सायंकाळी 7 ते 10 या वेळात संविधान हे महानाट्य सादर होणार असून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या महानाट्याचे आजवर अनेक प्रयोग झाले आहेत.

               पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या वतीने चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महासंस्कृती महोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. 18 फेब्रुवारी पासून विविध सांस्कृतिक, कला, आणि संगीत कार्यक्रमांची मेजवानी अमरावतीकरांना मिळाली. गायक सुदेश भोसले, अनिरुद्ध जोशी, ऋषिकेश रानडे यांच्यासारख्या गायकांनी अमरावतीकर श्रोत्यांना रिझविले. महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कलावंतांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.

  महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गाजलेले संविधान हे महानाट्य महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून अमरावतीकरांना बघावयाची आज  संधी मिळणार आहे. तरी या महानाट्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महासंस्कृती महोत्सव आयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे.

00000

बुधवार, २१ फेब्रुवारी, २०२४

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

                                 पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार

                -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे

शहर पोलीस विभागाला हस्तांतरण ; प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण

 

अमरावती, दि.21 : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.

पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे, तुषार भारतीय यांच्यासह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, पोलीस उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे, कल्पना बारावकर व सर्व पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरीत करण्यात आलीत. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील नुतणीकरण करण्यात आलेल्या प्रशिक्षण सभागृहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते फीत कापून लोकार्पण झाले.

श्री. पाटील म्हणाले की, अमरावती पोलीस खात्याला जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अठरा चारचाकी व दहा दुचाकी वाहने खरेदीसाठी 2 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच दुचाकी वाहनांसाठी 8 लाख 30 हजार रुपये व सभागृहाच्या नुतणीकरणासाठी 12 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मंजूर निधीतून उपरोक्तप्रमाणे विभागाच्या बळकटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती, नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वेलफेअर फंड, सभागृहांची निर्मिती, अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पोलीसांच्या सन्मानाला कुणाव्दारेही ठेच पोहोचविली जावू नये, यासाठी पोलीसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नाही. मादक पदार्थांची विक्री व व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. ही किड समाजातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलीसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. पोलीसांच्या कुटुबिंयांना सर्व सोयीयुक्त निवासस्थाने उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या निवासस्थांनाची दुरुस्ती करण्यात यावी. समाजातील विघातक, गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पायबंद करण्यासाठी पोलीसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. दामिनी पथके अधिक सजगपणे कार्यान्वित करावित. कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला जे जे काही लागेल ते ते तुम्हाला पुरविण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

शहर पोलीस विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर सुमारे दोन कोटी 50 लक्ष रुपये निधीतून नवीन अठरा चारचाकी, दहा दुचाकी वाहनांची खरेदी तसेच अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण सभागृहाचे नुतणीकरण करण्यात आले आहे. याव्दारे पोलीस विभागाला गस्ती व गुन्हे शोध प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी सहाय्यता होणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती, साईनगर, बडनेरा एमआयडीसी, नांदगाव पेठ एमआयडीसी याठिकाणी नवीन पोलीस ठाणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प आदींसाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी पालकमंत्र्यांना केली.

0000



आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी - पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

                                





आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी

-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

अमरावती, दि.21 (जिमाका) : प्रशासनामार्फत नागरिकांना सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीमुळे आता नागरिकांना एका छताखाली महसूल विभागातील विविध कार्यालयांशी संपर्क साधता येणे, सोपे होणार आहे. प्रशासनात काम करताना आपल्याला जे हवे ते इतरांना मिळवून देण्याची क्षमता ठेवावी व त्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

 

             मोर्शी रोड, अमरावती येथील तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ .निधी पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, मनपा आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

             पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा आत्मा आहे. नागरिकांना विविध कामांसाठी तसेच कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी एका छताखाली महसूल विभागाची कार्यालये असल्यास नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होते. या दृष्टीने या प्रशासकीय इमारतीची निर्मिती सर्व नागरिकांसाठी सोयीची झालेली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये महसूल कार्यालय व तत्सम निगडित असलेल्या कार्यालयांचा समावेश आहे. इमारतीमध्ये असलेल्या कॉन्फरन्स हॉलमुळे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे वेळच उपलब्ध व्हावीत, यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असते. आता नागरिकांना घरी बसून सातबारा ऑनलाइन मिळतो. याप्रमाणे येत्या काळात नागरिकांना विविध शासकीय सुविधा अधिक सुलभतेने कशा मिळतील, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

              तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या मध्यभागी असलेल्या जागेवर डोमची निर्मिती करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. आगंतुकांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छ पाणी आदी सुविधा उपलब्ध असाव्यात. शासकीय कार्यालयामध्ये नियमितपणे स्वच्छता राखण्यात यावी. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, यासाठी प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सकारात्मकतेने काम करावे. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन येत्या काळात वाढविण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

 

तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीसाठी सर्व आवश्यक फर्निचर, साहित्य पालकमंत्री श्री. पाटील यांनी

  वेळेत उपलब्ध करून दिले. तसेच अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दहा कोटी रुपये मंजूर करून दिल्याबद्दल खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्री महोदय यांचे यावेळी आभार मानले. तसेच अमरावती जिल्ह्यात पीएम विश्वकर्मा योजनेतंर्गत 5 हजार प्रकरणे मंजूर झाली आहेत. राज्यामध्ये यात अमरावती जिल्हा आघाडीवर आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांचे अभिनंदन केले. मोझरी विकास आराखड्यातंर्गत मोझरी येथील इमारत पूर्ण झाली आहे. येत्या काळात मोझरी विकास आराखड्यातंर्गत पुढील कार्यवाही लवकर करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. बोंडे यांनी केली.

 

खासदार नवनीत राणा यांनी तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीसाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच अमरावती जिल्ह्यात चुर्णी तसेच वलगाव येथे तहसील कार्यालय निर्माण व्हावे, अशी मागणी केली. चुर्णी तालुक्यात 90 गावे येतात. तेथील नागरिकांना कामकाजासाठी चिखलदरा तहसील कार्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ जावून खर्च वाढतो. यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी चुर्णी आणि वलगाव येथे तहसील कार्यालय निर्माण व्हावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 

            आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनी तालुकास्तरीय प्रशासकीय इमारतीच्या निर्मितीमुळे नागरिकांची कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले. या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 14 कोटी खर्च करण्यात आले असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.

प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर महसूल, सेतू कार्यालय, मुद्रांक कार्यालय, लोक अदालत, तहसीलदार, भूमि अभिलेख तालुका निरीक्षक, तहसील कार्यालय, महसूल कार्यालय तसेच उपकोषागार कार्यालयाचा समावेश आहे. तसेच पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी, उपविभाग कार्यालय, तालुका निबंधक कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक वन कार्यालय, तालुका कृषी अधिकारी तसेच सभागृहाचा समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी श्री. भटकर यांनी मानले.

00000

 

 


मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

विभागीय आयुक्तालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

                                                       






                            विभागीय आयुक्तालयात

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

 

अमरावती दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उपायुक्त संजय पवार, श्री. जोशी, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालया समोरील राजमाता माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याला विभागीय आयुक्तांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000