सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

विभागीय आयुक्तांनी दिली भ्रष्टाचार निर्मुलनाची प्रतिज्ञा

अमरावती, दि. 27 : केंद्रीय सतर्कता विभागाच्या वतीने संपूर्ण देशात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार निर्मुलन सप्ताह पाळण्यात येतो. यानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मुलनाची प्रतिज्ञा दिली. यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, सुरज वाघमारे, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, रविंद्र हजारे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. केंद्रीय सतर्कता आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण देशात भष्ट्राचाराविरुध्द आवाज सक्षम होण्यासाठी सप्ताह पाळण्यात येतो. भष्ट्राचाराविरुध्द लढणाऱ्या सर्व संबंधितांना एकत्र आणून जनप्रबोधन करणे व भष्ट्राचारामुळे पीडित असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना दिलासा देणे हे सप्ताहाचे उद्दीष्ट आहे. शासन व प्रशासनाच्या कारभारात नैतिकता व पारदर्शीपणा आणून अधिक संवेदनशीलतेने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द होण्यासाठी सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘देशाचा विकास सत्यनिष्ठेच्या संस्कृतीवर अवलंबून असतो’ या बोधवाक्यावर हा सप्ताह आधारित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा