बुधवार, १ जुलै, २०२६

 



विशेष लेख                                                          

                         अन्नदात्याला आर्थिक आधार                                                                                                                         

 शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेती व त्यासंबधित पुरक व्यवसायावर अवलंबून आहे. अतिवृष्टी, अनियमित पाऊस, महापुर, दुष्काळ, नैसर्गिक संकटे आणि गारपीट यामुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याने, परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि अनेकवेळा शेतकऱ्यांना घेण्यात आलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ जाहीर केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हा आहे. 

यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (२०१७), महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (२०१९) आणि प्रोत्साहनपर लाभ योजना (२०२२) अशा विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र, कर्जमुक्तीनंतरही काही शेतकरी पुन्हा कर्जाच्या चक्रात अडकत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे केवळ कर्जमाफी न करता शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आर्थिक सक्षम करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज शासनाने व्यक्त केली आहे. 

या योजनेंतर्गत दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, वेळेवर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना वारंवार कर्जबाजारी होण्यापासून रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये शेती क्षेत्र अधिक सक्षम करणे, बँकिंग व्यवस्था मजबूत करणे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाय करणे यावर भर देण्यात आला आहे. 

कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (OTS) व प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी जे शेतकरी पात्र असणार नाहीत याबाबतच्या अटी व शर्ती ठरविण्यात आलेल्या आहेत. योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार असून, कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत कर्जखातेदार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

या योजनेचा आढावा घेणे, निकषात बदल करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जपुरवठा करणे हे सहकार विभागाचे प्रमुख कार्य असल्याने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या स्तरावर कृषी कर्जासाठी सहकार आधार सामुग्री संचयिका (सहकार स्टॅक) स्थापित करण्यात आले आहे.  

शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे कर्जाचा ताण कमी करून त्याला नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणे हे या योजनेचे मोठे उद्दिष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

 

                                                                   – विभागीय माहिती कार्यालय,

                                                                                        अमरावती 

 

******

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026








 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026

 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026

 


 



विधानभवन, मुंबई

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह विधिमंडळ सदस्य व विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
📍

 कर्जमुक्ती विशेष लेख

 

महाकर्जमुक्तीच्या पलीकडचा विचार


महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात काही निर्णय हे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नोंदले जात नाहीत, तर ते शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक ठरतात. राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ही अशाच प्रकारची योजना आहे. ही योजना केवळ कर्जमाफी देणारी योजना नसून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य, नव्याने पतपुरवठा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने नेणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिली जात आहे.

2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत शेतीचा पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रातील शेती आजही मोठ्या प्रमाणावर निसर्गावर अवलंबून आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, हवामानातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्चातील वाढ या अनेक कारणांमुळे शेतकरी वारंवार आर्थिक संकटात सापडतो. अशा परिस्थितीत कर्ज हा शेतीचा अविभाज्य भाग बनतो. परंतु जेव्हा हे कर्ज परतफेडीच्या क्षमतेपलीकडे जाते, तेव्हा त्याचे रूप आर्थिक विवंचनेत बदलते. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने यापूर्वीही विविध कर्जमुक्ती योजना राबवल्या होत्या. मात्र या वेळी शासनाने केवळ कर्जमुक्तीचा विचार न करता भविष्यात शेतकरी पुन्हा त्याच परिस्थितीत अडकणार नाही यासाठी व्यापक दृष्टीकोन स्वीकारला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेला देण्यात आले आहे, यालाही विशेष महत्त्व आहे. लोककल्याणकारी शासन, जलसंधारण, सिंचन व्यवस्था, ग्रामीण विकास आणि रयतेच्या हिताचा सातत्याने विचार करणाऱ्या अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या योजनेला त्यांचे नाव देऊन शासनाने इतिहासातील लोकाभिमुख परंपरेला अभिवादन केले आहे.

या योजनेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिची रचना. यापूर्वी अनेकदा असे होत असे की दोन लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नसे. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज दोन लाख दहा हजार रुपये असले तरी तो संपूर्णपणे अपात्र ठरत असे. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत होते. यावेळी शासनाने ही त्रुटी दूर केली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती शासनाकडून मिळणार आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्याचा आणि शेती उभी करण्याचा मार्ग खुला होणार आहे.

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान. अनेकदा चर्चेत केवळ थकीत कर्जदार येतात; मात्र वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक शिस्त राखणाऱ्या आणि प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे एकवेळ समझोता योजना अर्थात वन टाइम सेटलमेंट (ओटीएस). अनेक शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याने ते संपूर्ण कर्जमुक्तीच्या चौकटीत बसत नव्हते. आता अशा शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तातडीचा आर्थिक भार कमी होऊन त्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे.

मात्र या योजनेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिच्यामागील शासनाची व्यापक भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ही बाब स्पष्टपणे मांडली आहे की, वारंवार कर्जमाफी देणे हे अंतिम समाधान नाही. शेतकरी पुन्हा कर्जाच्या चक्रात का अडकतो, त्याचे उत्पन्न स्थिर का राहत नाही आणि शेती आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कशी होईल, याचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीच्या शिफारशींमधून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन सक्षमीकरणाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो शाश्वत शेतीचा. प्रत्येक शेतापर्यंत सिंचन सुविधा पोहोचणे, पाण्याचे सक्षम व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेती उत्पादन खर्च कमी करणे, योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि वेळेवर पतपुरवठा करणे या गोष्टींवर शासनाचा भर आहे. कर्जमुक्ती हा त्यातील एक भाग आहे; परंतु भविष्यात कर्जमाफीची गरजच भासू नये अशी परिस्थिती निर्माण करणे हा त्यामागचा मोठा उद्देश आहे.

राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून जवळपास ३६ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना मानली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश दिला आहे.

योजनेची अंमलबजावणीही पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. आधार प्रमाणीकरण, बँकांमधील माहितीची पडताळणी आणि तंत्रज्ञानाधारित प्रक्रिया यामुळे लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण, जिल्हा बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांमधील कर्जदारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून साधारणता लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या तपशीलाचे संकलन बँकामार्फत केले जाणार आहे.

आज महाराष्ट्रातील शेतकरी केवळ आर्थिक मदतीची अपेक्षा करत नाही, तर स्थैर्य, विश्वास आणि विकासाची संधी शोधत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ही त्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना शेतकऱ्याच्या तातडीच्या आर्थिक अडचणी दूर करेलच; पण त्याचबरोबर सिंचन, पतपुरवठा, तांत्रिक सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून भविष्यातील सक्षम कृषी व्यवस्थेची पायाभरणी करण्याचाही प्रयत्न करेल.

म्हणूनच या निर्णयाकडे केवळ कर्जमाफी म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. हा निर्णय शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाचे पुनरुज्जीवन, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आणि शेतीच्या शाश्वत विकासासाठी उचललेले एक धाडसी पाऊल म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देण्याची क्षमता या योजनेत आहे आणि म्हणूनच ही योजना महाकर्जमुक्तीच्या पलीकडे जाऊन शेतकरी सक्षमीकरणाची नवी दिशा ठरू शकते.

 

- प्रवीण टाके,

उपसंचालक (माहिती),

विभागीयमाहिती कार्यालय,