सोमवार, २ मार्च, २०२६
मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती शाखेमार्फत करण्यात आले आहे. पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/192792/
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी #होळी तसेच #धुलीवंदन निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. होलिकापूजन तसेच प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, अशा शुभेच्छांसह राज्यपाल श्री. देवव्रत यांनी नागरीकांना होळी व रंगोत्सव साजरा करताना #पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहनही केले आहे.
रविवार, १ मार्च, २०२६
द दी चादर शहिदी समागम कार्यक्रमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ
हिंद दी चादर शहिदी
समागम कार्यक्रमात
हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ
नवी मुंबई, (विमाका) दि.
०१ : हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाविकांना दोन दिवस वैद्यकीय सेवा
देण्यात आली. देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची
माहिती नवी मुंबईचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी दिली.
यावेळी ६० पेक्षा जास्त लोकांनी
रक्तदान केले असून,
किरकोळ त्रास झाlलेल्या १७ रुग्णांना सेवा
देण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री गुरु तेग बहादुर साहेब जी
दरबारमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी तसेच मोफत चष्मा वाटपाचे नियोजन
करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबईचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत
जवादे यांनी दिली.
श्री गुरु तेग बहादुर यांच्या
शहिदी समागमनिमित्त खारघर नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी भव्य
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून येणाऱ्या
भाविकांसाठी उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी व्हील चेअर
तसेच ने-आण करण्यासाठी ई-व्हेहिकल उपलब्ध करण्यात आली. वातावरणात गारवा रहावा
म्हणून मिस्ट वेहिकलचा वापर करण्यात आला. येथे येणाऱ्या भाविकांसाठी ५० वैद्यकीय
तज्ज्ञ १०० पॅरामेडिकल स्टाफ सेवेसाठी उपलब्ध होता. येथे मोफत औषध पुरवठा करण्यात आला.
सर्जरी, दंत विशेष तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच आपात्कालीन पथकाची स्थापना करण्यात आली. याठिकाणी
रक्तदान शिबिरही सुरू आहे. मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी,
फिजिओथेरपी सेवा, हाडवैद्य विशेषतज्ज्ञ, कॅन्सर
स्क्रिनिंग, स्त्री रोग
विशेषतज्ज्ञ, कान नाक, घसा
तज्ज्ञ मेडिकल, पॅरामेडिकलचे १००
स्टाफ येथे उपलब्ध आहेत. थेलेसिमीया या आजाराबद्दल येथे प्रबोधन करण्यात
येत आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश
गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा
‘हिंद-दी-चादर’ समागम
कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश
नवी
मुंबई, दि. २८ (विमाका):- गृहमंत्री अमित
शाह यांनी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः
लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली. ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.
कार्यक्रमस्थळी
सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी विनामूल्य
भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ ठिकाणी सुरू असलेल्या लंगरमध्ये हजारो
स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. भाई जैताजी लंगर सेवा, राधास्वामी ब्यास लंगर सेवा,
बाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवा, संत सेवालाल
महाराज लंगर सेवा, बाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवा, भगवान झुलेलालजी लंगर सेवा, भाई मतीदासजी लंगर सेवा
या आठ सेवादार लंगरमध्ये पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतला, तर दुसऱ्या दिवशी हा प्रतिसाद अधिक वाढला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या समागम कार्यक्रमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या
पावन उपस्थितीत कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरू होते. “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल”च्या जयघोषात भाविकांनी
दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत घेतला.
लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि
मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः
लंगर सेवा देत या परंपरेचा सन्मान केला.
‘हिंद-दी-चादर’ समागमातून सामाजिक ऐक्य आणि
एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.
श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे मानवतेसाठी अद्वितीय बलिदान आजही प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
श्री गु
रू तेग बहादुर साहिबजी यांचे मानवतेसाठी अद्वितीय बलिदान आजही प्रेरणादायी
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी
धर्मस्वातंत्र्य आणि मानवाधिकारांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या काळातही
प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सतराव्या शतकात
अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहून श्री गुरु तेग बहादुर साहिबांनी भारताच्या
सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करणे आणि
त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच या समागम
कार्यक्रमाची खरी प्रेरणा आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गुरु नानक देव
यांना वंदन करत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शिकवणीचा उल्लेख केला.
प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा आणि
निर्भयता यांचा संदेश श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी दिला. त्यांच्या वचनांचा
समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये असून, त्यांच्या बलिदानामुळे
सिख धर्मातील शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली.
“कुणालाही घाबरवू नका आणि कुणालाही घाबरू नका” हा संदेश आजच्या
धावपळीच्या जीवनात अधिकच महत्त्वाचा ठरतो, असे नमूद करत
समाजात प्रेम, एकता आणि बंधुभाव जोपासण्याचे आवाहन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. हा ३५० वा शहिदी समागम कार्यक्रम सर्व
भाविकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त त्यांनी
व्यक्त केला.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण
मंत्री संजय राठोड, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा,
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री
माधुरी मिसाळ, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर
नाईक, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत
समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर रितू
तावडे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, आदी
उपस्थित होते.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य संपूर्ण
मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'हिंद की चादर'
म्हणून ओळखले जाणारे, मानवतेचे रक्षक आणि महान
त्यागी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांचा त्याग मानवतेच्या इतिहासातील गौरवपूर्ण
पर्व आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे बलिदान हे केवळ इतिहास नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. संस्कृती,
परंपरेच रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांनी
प्राणांची आहुती दिली. त्यांचे कार्य अतूट श्रद्धा आणि अतूट धैर्याचे उदाहरण आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्याकडे शस्त्रे
नव्हती, पण त्यांच्याकडे सत्य आणि करुणेची ताकद होती. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज
उठवून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. सच्चा धर्म तोच, जो दुसऱ्याच्या
धर्माचा आदर करतो आणि रक्षण करतो, असेही श्री.शिंदे यांनी
यावेळी सांगितले.
महाराष्ट्र आणि पंजाबच्या ऐतिहासिक संबंधांवर
प्रकाश टाकत नांदेड ही गुरु गोविंद सिंहजींची कर्मभूमी आहे, तर संत नामदेव
महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये फडकवली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी सांगितले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे विचार जनमानसात
पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी
सांगितले. आम्ही राज्यभरात डिजिटल रथांच्या माध्यमातून या महान बलिदानाची गाथा
घराघरात पोहोचवित आहोत. सिख, सिकलकर, बंजारा , लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन आणि भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय
या सर्व समाजांना एका सूत्रात बांधून श्री गुरु तेग बहादुर साहिबाजी यांचे कार्य व
विचार पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचा मानस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी
व्यक्त केला.
शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार ; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि
चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन
शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी
यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार ; नवी मुंबईत
त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार
– मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई, दि. १ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी
यांनी धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेली शहादत ही जगाच्या इतिहासातील
अद्वितीय घटना आहे. त्यांच्या बलिदानाची गाथा केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न
राहता ती पुढील पिढीपर्यंत पोहचली जावी. यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग
बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाणार आहे. तसेच नवी
मुंबई परिसरात त्यांच्या नावाने रुग्णालय उभारण्यात येईल, अशी
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम
समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग
बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिख समाजाचे
नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी १६७५ मध्ये
आपले शीश अर्पण करून शहादत दिली. त्यांच्या या बलिदानामुळे आज आपण स्वाभिमानाने
आपली श्रद्धा जोपासू शकतो. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ संपूर्ण
महाराष्ट्रात शहिदी समागम आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
हा कार्यक्रम केवळ शीख समाजापुरता मर्यादित नसून
सर्व श्रद्धावान नागरिकांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर, नांदेड आणि नवी
मुंबई येथे शहिदी समागम मोठ्या प्रमाणावर पार पडल्याचे सांगून देश-विदेशातून भाविक
मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि
पंजाब यांचे नातेही विशेष आहे. संत नामदेव महाराज महाराष्ट्रातून पंजाबमधील घुमान
येथे गेले. त्यांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत. तसेच गुरु गोविंद सिंग
महाराष्ट्रात आले आणि त्यांनी नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला. गुरु गोविंद सिंग
यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी शहादत दिली, असे उदाहरण
जगात क्वचितच आढळते.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात
– केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी मुंबई, दि. ०१ : “हिंद दी चादर” म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले
जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे केवळ शीख समाजासाठी नव्हे,
तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य
आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागाचा
सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनी केले.
अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम
समिती यांच्या वतीने नवी मुंबईतील खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री
गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात गृहमंत्री शाह
बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी
समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय
समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, राज्यस्तरीय समन्वय
समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचे महत्त्व विषद करताना केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, प्रत्येक गुरुद्वारा आणि प्रत्येक वस्तीपर्यंत ‘हिंद दी चादर’चा संदेश पोहोचविण्यासाठी बाबा हरनाम
सिंगजी यांनी मोठे कार्य केले आहे. राज्य शासनाने यापूर्वी नांदेड व नागपूर येथे
आयोजित केलेल्या ‘हिंद दी चादर’ महोत्सवाला
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नवी मुंबईतील कार्यक्रमात शीख बांधवांसह विविध
समाजघटकांचा मोठा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शीख समाजासाठी
सेवाकार्याची संधी साधत विविध प्रसंगी त्यांच्या परंपरा, श्रद्धा आणि
योगदानाचा गौरव केला आहे. त्याच धर्तीवर देशभर ‘हिंद दी चादर’
पर्वाचे आयोजन करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनी सांगितले.
यावेळी संत परंपरेचे स्मरण करताना त्यांनी
पोहरादेवी येथील सेवालाल महाराज तसेच संत नामदेव महाराज यांना वंदन केले. संत
नामदेव यांच्या रचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये झालेला आहे, ही भारतीय
संतपरंपरेच्या व्यापकतेची साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत रविदास
यांसारख्या संतांच्या विचारांनाही गुरु ग्रंथ साहेबमध्ये स्थान मिळाले आहे,
यावरून भारतीय अध्यात्माची सर्वसमावेशकता स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
नववे श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या
शहादतीचा विशेष उल्लेख करताना केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, अन्याय आणि
अत्याचारांविरोधात उभे राहून त्यांनी दिलेले शहिदत्व भारतीय इतिहासातील अत्यंत
प्रेरणादायी घटना आहे. “शीश दिया, पर सिर न झुकाया” हीच शीख
गुरुपरंपरेची ओळख असून भारताच्या अखंडतेचा तो आधार आहे.
शीख परंपरेतील नामजप, आराधना आणि लंगर यांचे महत्त्व अधोरेखित
करताना त्यांनी सांगितले की, या मूल्यांमधून समाजातील समरसता
आणि बंधुभाव दृढ होतो. गुरु गोविंद सिंग यांच्या काळात खालसा पंथाची स्थापना झाली
आणि धर्मरक्षणासाठी अद्वितीय त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली. त्यांच्या चारही
सुपुत्रांच्या शहादतीनेही या परंपरेला अमरत्व प्राप्त झाले, असे
त्यांनी नमूद केले.
आनंदपूर साहिबसारख्या पवित्र स्थळांचा उल्लेख करत
केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, अन्यायकारक फर्मानांसमोर न झुकता
गुरूंनी दाखवलेले साहस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. नववे
गुरु श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा संदेश
महाराष्ट्र शासन राज्यातील छोट्या-छोट्या गावांपर्यंत पोहोचवत आहे, याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.
भारताची संस्कृती ‘सर्व धर्म समभाव’ या तत्वावर आधारलेली आहे. ही परंपरा जपण्यासाठी शीख गुरूंनी केलेले योगदान
अमूल्य आहे. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहणे हीच खरी देशभक्ती असल्याचे
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यानंतरही देशाच्या सुरक्षेसाठी शीख
जवानांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला
बळकटी देण्यासाठी अशा ऐतिहासिक कार्यक्रमांची गरज आहे, असे
त्यांनी सांगितले.
यावेळी शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम
सिंग जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत
समाज यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री शाह यांना जफरनामा देऊन सत्कार करण्यात आला.
गुरु तेग बहादुरांच्या शौर्याची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
- ‘हिंद दी
चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी
समागम कार्यक्रमात ध्वनिचित्रफितद्वारे प्रधानमंत्र्यांनी दिला संदेश
गुरु तेग बहादुरांच्या शौर्याची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा
– प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी
खारघर, दि. १ : महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत.
गुरूंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे,
असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितद्वारे
दिला.
अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम
समिती यांच्या वतीने खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग
बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश ध्वनिचित्रफितीद्वारे
दाखविण्यात आला.
प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले की, गुरूंनी
त्यागाची पराकाष्ठा केली. त्या काळात समाजातील सर्व घटक एकत्र उभे राहिले. सत्य
आणि संस्कृतीसाठी ठाम राहण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. या सामाजिक एकतेच्या
महायज्ञात गुरु गोविंद सिंह आणि गुरु नानक नाम लेवा संगत यांची महत्त्वाची भूमिका
होती. आज देशाला पुन्हा सामाजिक एकतेची गरज असताना हा समागम आश्वासक ठरत असल्याचे
त्यांनी नमूद केले.
या यात्रेची सुरुवात गेल्या वर्षी नागपूर येथून
झाली. त्यानंतर तख्त श्री हजूर साहिब, नांदेड येथे कार्यक्रम पार पडला आणि आता
नवी मुंबईत हा समागम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या उपक्रमाद्वारे श्री
गुरु तेग बहादुर यांचा शौर्यपूर्ण इतिहास महाराष्ट्रातील हजारो गावांपर्यंत
पोहोचविण्यात आला आहे. या आयोजनाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र शासनाचे
अभिनंदन केले.
देशभरात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
बलिदानाच्या स्मरणार्थ मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असल्याचे सांगत हरियाणातील
कुरुक्षेत्र येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा अनुभव त्यांनी
सांगितला. केंद्र शासन गुरूसंबंधित प्रत्येक ऐतिहासिक प्रसंग राष्ट्रीय स्तरावर
साजरा करत आहे. ४००वा प्रकाश पर्व, स्मृतिचिन्ह, टपाल तिकीट आणि विशेष
नाण्याचे प्रकाशन, तसेच गुरु नानक देव यांचा ५५०वा प्रकाश
पर्व श्रद्धेने साजरा करण्यात आल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला.
साहिबजाद्यांच्या सन्मानार्थ ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची परंपराही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
शीख समाजासाठी राबविण्यात आलेल्या विविध
उपक्रमांची माहिती देऊन प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले की, करतारपूर साहिब
कॉरिडॉर विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला. श्री हेमकुंड साहिब यात्रेसाठी सुविधा
उभारण्यात आल्या. शीख संघटना आणि गुरुद्वारांशी संबंधित संस्थांना एफसीआरए अंतर्गत
सवलती देण्यात आल्या. शीख इतिहासाला अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक चर्चेत स्थान
देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानातील शीख बांधवांच्या सुरक्षेच्या
दृष्टीने आणि गुरु ग्रंथ साहिब यांच्या सन्मानासाठी सरकारने मिशन मोडमध्ये काम
केले. जम्मू-काश्मीरमधील शीख कुटुंबांसाठी पुनर्वसन पॅकेज लागू करण्यात आले, असेही त्यांनी
सांगितले.
शीख समाजाच्या श्रद्धेचा सन्मान आणि त्यांच्या
प्रगतीसाठी नवे मार्ग निर्माण करणे ही आमची जबाबदारी असून ही सेवा करण्याचे
आम्हाला सौभाग्य लाभले आहे,
असे नमूद करत त्यांनी नवी पिढी गुरूंच्या साहस आणि सत्याच्या
मूल्यांशी जोडली गेली पाहिजे, असे आवाहन केले. इतिहास केवळ
स्मरणात न ठेवता तो आचरणात आणणे हेच या समागमाचे उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री
मोदी यांनी सांगितले.
०००००
.jpg)



.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

