मंगळवार, ३१ जुलै, २०१८


खरीप हंगामामध्ये
सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

Ø  सोयाबीनवरील खोडमाशी, चक्रभुंगा व उंट अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रमाणित औषधांची फवारणी करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

अमरावती, दि.31 :  सध्या अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात जाऊन किडीचे सर्व्हेक्षण करुन त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. खोडमाशी किडीमुळे सुरुवातीच्या रोपावस्थेत शेंड्याकडील तीन पाने पिवळी पडलेले दिसतात किंवा पाने वाळलेले किंवा सुकलेले दिसतात. तसेच चक्रभुंगा किडीमुळे सोयाबीन झाडाचा शेंडा किंवा एखादी फांदी सुरुवातीला सुकलेली किंवा झुकलेली दिसते व त्या फांदीवर, खोडावर किंवा देठावर दोन चक्रकाप आढळून येतात. उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम पांढुरके किंवा पिंवळे पातळ कागदासारखे चट्टे आढळून येतात. उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम पांढुरके किंवा पिवळे पातळ कागदासारखे चट्टे आढळून येतात व नंतर पानावर गोल अनेक छिद्रे आढळून येतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास किडी संपूर्ण पाने फस्त करते फक्त खोड आणि शिराच शिल्लक राहतात. खोडमाशीच्या प्रादुर्भावमुळे 33 टक्के, चक्रभुंगा किडीमुळे 29 ते 83 टक्के तर उंटअळीमुळे 50 टक्के उत्पादनात घट येऊ शकते. या किडी आढळून आल्यास पुढीलप्रमाणे उपाययोजना त्वरीत कराव्यात.
आपल्या शेतात फक्त खोडमाशीचा प्रादुर्भाव असेत तर इथिऑन 50 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 12.5 मि. ली. किंवा इन्डॉक्सीकार्ब 14.5 एस. सी 607 मि.ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
फक्त चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव असेल तर इथिऑन 50 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा थायक्लोप्रिड 21.7 टक्के एस. सी 15 मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मि. ली. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 12.5 मि. ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
एकाच वेळी खोडमाशी, चक्रभुंगा व उंटअळी या तिन्ही किडीचा प्रादुर्भाव असेल तर क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली किंवा थायमिथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5 टक्के झेड सी. 2.5 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
जर फक्त उंटअळीचा प्रादुर्भाव असेल तर प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मी. ली किंवा इन्डॉक्सीकार्ब 14.5 टक्के एस. सी. 6.7 मि. ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. फवारावे. जैविक किटकनाशक बॅसिलस थुनिन्जीएन्सीस कुरस्टाकी 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
सुरुवातीला पेरणीनंतर 20-25 दिवसांनी शक्य असल्यास व कमी प्रादुर्भाव असल्यास 5 टक्के निंबोळी अकांची फवारणी करावी. वरीलप्रमाणे प्रमाण हे साध्या फवारणी पंपाचे आहे. पॉवर स्प्रेअरने फवारणी करावयाची असल्यास औषधाचे प्रमाणे तिनपट करावे. विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास उपरोक्त प्रमाणे उपाययोजना व औषधांची फवारणी करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक संशोधन केंद्राचे वरिष्ठ किटकशास्त्रज्ञ प्रमुख डॉ. अनिल ठाकरे आणि अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.   
000000

सोमवार, ३० जुलै, २०१८

शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविणार - गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील



शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविणार
-          गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील


गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतल्या शिक्षकांच्या अडचणी


अमरावती, दि.30 :  ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अविरतपणे शिक्षक करीत असतात. देशाच्या उज्वल भविष्यासाठी कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून घडते. असे महत्वपूर्ण काम करीत असतांना त्यांच्या कौटुंबीक व वैयक्तीक प्रश्न सोडवून मनोबल वाढविणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्र मानव विकासाचं केंद्र ठरण्यासाठी शिक्षकांचे सर्वच प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित सहविचार सभेत अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, शिक्षण उपसंचालक श्री. काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलीमा टाके, व्यवसाय शिक्षणाधिकारी, भाजपा पदाधिकारी दिनेश सुर्यवंशी, शिक्षण विभागाचे श्री. बोलके, श्री रोडे आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, शिक्षकांच्या गाऱ्हाणी व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या निवेदनांवर कार्यवाही जलद गतीने करावी. तसेच त्यांनी दाखल केलेल्या तक्रारींवर सकारात्मक तोडगा काढून तातडीने निपटारा करावा. शिक्षकांकडून प्राप्त होणाऱ्या निवेदनांवर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत अनुपालन अहवाल सादर करावा. तसेच अनुपालन अहवालाची एक प्रत संबंधीत तक्रारकर्त्याला द्यावी. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आताच्या शिक्षण प्रणाली मध्ये धोरणात्मक बदल करावयाचा असेल किंवा बदल सूचवायचा असल्यास तसा रितसर प्रस्ताव विभागास सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज आयोजित सहविचार सभेला सुमारे 300 शिक्षक उपस्थित होते. उपस्थित सर्वच पुरुष महिला शिक्षकांच्या निवेदनांवर मंत्री महोदयांनी चर्चा करुन त्यांचे समाधान केले. यावेळी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महानगरपालिका, नगरपालीका अधिनस्त असणाऱ्या शाळांचे शिक्षक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या निवेदनांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात स्वयंस्फुर्तीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदत करणाऱ्या 160 लोकांच्या ग्रुपचे गौरव व सत्कार करण्यात आला.


गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व उपाययोजना प्रशिक्षण संपन्न

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन व उपाययोजना
प्रशिक्षण संपन्न

अमरावतीदि.30 :  विदर्भ शेतकरी कृषिमाल प्रक्रिया उद्योग कंपनी शिरजगाव कसबा येथे गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण व उपाययोजना तसेच किटकनाशक हाताळणे या विषयावर एक दिवसीय प्रशिषण 25 जुलै, 2018 शनिवारी संपन्न झाले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मनोहरराव सुने होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक किरण बुधवत, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती शितल उके, तालुका कृषी अधिकारी चादुर बाजार व मंडळ कृषी अधिकारी संतोष वाघमारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अनुप देशमुख यांनी केले. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण व उपाय योजना या विषयावर सविस्तर मार्गदर्शन प्राध्यापक किरण बुधवत श्री. शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती यांनी केले. तसेच श्रीमती सितल उके तालुका कृषि अधिकारी चांदुर बाजार यांनी विविध योजनांची माहिती दिली. संतोष वाघमारे मंडळ कृषि अधिकारी यांनी किटक नाशक कशी हाताळणी या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रमोदभाऊ कुऱ्हाडे यांनी केले व आभार प्रदर्शन अशोकराव राऊत यांनी केले. या प्रशिक्षण वर्गास बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कृषिसहाय्यक गजेद्र मोहोड, आशिष मोहोड, हरुण सौदागर, ललीत कोठाडे, राजेश उमाळे, संदीप औतकर, राहुल तोटे, अर्चना इसळे, संगीता सरोदे, रजनी म्हाला व शेतकरी बंधु यांच्या सहकार्याने यशस्वी झाला. तसेच मंडळ कृषि अधिकारी यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानले.

सोमवार, २ जुलै, २०१८




उगवण नसलेल्या बियाण्यांची पाहणी करुन उपाययोजना करावी
                                                                                                            -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
* पीक आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आदेश
अमरावती, दि. 2 : संपूर्ण जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी उपयोगात आणलेली बियाणे उगवणक्षम असल्याबाबतची खात्री कृषि विभागाने करावी, शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता नसल्यास तात्काळ उपाययोजन करावी, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी यांनी दिले. जिल्ह्यातील पिक परिस्थितीचा आढावा, त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
 बैठकीत पालकमंत्री श्री. पोटे यांनी बियाण्यांची  बीज प्रमाणिकरणाच्या माहितीच्या आधारे नोंद घ्यावी. अशा शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे पुरवावे. बियाणे उगविली नसल्यास दुबार पेरणीची संधी घेता यावी, यासाठी तात्काळ उपाययोजना करावी, असे निर्देश कृषी विभागाला दिले. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते.
            उगवणक्षम नसलेल्या बियाण्यांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विज्ञान केंद्र आणि प्रादेशिक संशोधन केंद्राच्या बियाणे तज्‍ज्ञांनी तात्काळ पाहणी करावी. शेतकऱ्यांना आवश्यकता असल्यास पर्यायी बियाणे उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. रा्ष्‍ट्रीय कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान अभियानांतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमात 31 हजार 961 शेतकऱ्यांना बियाणे परमिट वाटप झाले आहे. यातून जिल्ह्यात 16 हजार 272 एवढी खरेदी झाली आहे. तालुका कृषि केंद्राकडे 913 परमिट उर्वरीत आहे. शेतकऱ्यांकडे बियाणे परमिट असूनही बियाणे मिळाले नाहीत, अशी समस्या उद्‌भवू नये. पेरणी क्षेत्राची नोंद अचूक होण्याकरीता खातेदारनिहाय याद्या कराव्यात आणि पेरणी क्षेत्राची माहिती घ्यावी, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
धारणी भागात युरिया खताचा वापर होतो. पावसाळ्यात खतांचा पुरवठा नियोजितरित्या करण्यात यावा. फवारणीच्या वेळी विशेष काळजी घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, तसेच किटकनाशके फवारणीच्या सदोष पंपावर बंदी आणण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांचे आवाहन
ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये बियाणे पेरले परंतू ते उगवलेच नाही, अश्या शेतकऱ्यांनी दुकान किंवा कृषी केंद्रातून बियाणे विकत घेतले आहे, त्या ठिकाणाहून देयकाची पावती आवर्जुन प्राप्त करुन घ्यावी.
पंचनामा करण्यासाठी आपला सातबारा, पेरेपत्रक, बियाणे खरेदीची पावती यासह लेखी तक्रार कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी किंवा पालकमंत्री यांना थेट भेटून अथवा संपर्क करुन तक्रार करावी. पंचनामा करताना शेतकऱ्यांनी पुरावा म्हणून फोटो कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष काढावा जेणे करुन भरपाई मिळण्यास अडचण होणार नाही.
प्रवीण पोटे-पाटील
पालकमंत्री, अमरावती
00000