बुधवार, ३ एप्रिल, २०१९

अनाधिकृत बोगस व बेकायदेशीर HT BT बियाणे विक्री बाबत सतर्कता बाळगावी


वृत्त क्र.79                                                                                                        दिनांक : 3  एप्रिल 2019

अनाधिकृत बोगस व बेकायदेशीर HT BT बियाणे
विक्री बाबत सतर्कता बाळगावी

अमरावती, दि. 3  :  लवकरच खरीप हंगामाची सुरुवात होत असून बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा बाजारत उपलब्ध होत आहे. आपल्या जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. येता खरीप हंगामात कापूस बियाण्याची खरेदी असतांना सतर्क असण्याची गरज आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये तणाचा होणारा त्रास, मजुरांची उपलब्धता व वाढती मजुरी असे वेगवेगळ्या अडचणी कापूस पिकामध्ये निर्माण झाल्या. याच गोष्टीचा गैर फायदा घेऊन राउुंड अप बी टी/एच टी बी टी/ बी जी-3 तणावरची बी टी विडगार्ड प्रकारच्या कापूस बियाणेची खाजगी व्यक्तीमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बियाणे अनाधिकृत असून, अशा बियाण्याच्या विक्रीला केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने (GEAC) प्रतिबंध घातलेला आहे.अशा अनाधिकृत,  बोगस व बेकायदेशीर बियाण्याचा पाकीटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण याचा उल्लेख नसतो व पाकीटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिलेले नसते. हे अनाधिकृत, बोगस व बेकायदेशीर बियाणे अवाजवी दराने विकुन व कोणत्याही प्रकारची पावती किंवा बिल न दिल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा बोगस व बेकायदेशीर बियाण्याची भैतिक व जनुकीय शुध्दता माहिती नसते तसेच किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बियाण्याचा वापरामुळे कापूस उत्पादनावर परिणाम होऊन आपल्या शेतीचे तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनाधिकृत मार्गाने खरेदी केलेले जनुकीय बियाणे पर्यावरण कायद्यातंगर्त कायदेशीर कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने अशा बियाण्याची लागवड शेतकरी बंधुसाठी पुढे कायदेशीर समस्या सुध्दा निर्माण करु शकते याची जाणीव ठेऊन कृषी निविष्ठांची खरेदी डोळसपणे अधिकृत मार्गानेच करण्याची दक्षता तमाम शेतकरी बंधु भगीनींनी घ्यावी.
आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सरकार मान्य बोलगार्ड व बोलगार्ड -2 तंत्रज्ञान युक्त बियाण्यामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधुंना विनंती करण्यात येते की कृषी विभागाच्या आदेशानुसार  शासन मान्य परवानाधारक विक्रेत्याकडूनच कापासाच्या अधिकृत बियाण्साची खरेदी करावी. जर एखादी व्यक्ती, कृषी सेवा केंद्र धारक बोगस व बेकादेशीर, शासन मान्यता नसलेल्या कापूस बियाण्याची विक्री करत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास त्याबाबत नजिकच्या तालुका कृषी कार्यालयात, कृषी विभाग, जिल्हा परिषद किंवा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर तक्रार करण्यात यावी.
कृषी विभाग, महाराष्ट्र बियाणे खरेदीचे निर्देश दिले आहेत. बियाणे पाकीटावर सरकार मान्य चिन्ह असल्याची खात्री करुन घ्यावी, बियाणे पाकीटावर सरकार मान्य बोलगार्ड व बोलगार्ड -2 चे चिन्ह सोबत दोन उभ्या गुलाबी रेषा तपासून घ्याव्या, बियाणे पाकीटावर कापसाच्या वाणाचे नाव, नंबर, बॅच नंबर व अंतीम मुदत तापासून घ्यावी, बियाण्याचे पाकीट सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करुनच खरेदी करावे, घेतलेल्या कापसाच्या बियाण्याला विकण्यासाठी कोणकोणत्या राज्यात परवानगी आहे  हे तपासून घ्यावे, विकत घेतलेल्या कापूस बियाण्याच्या पकीटाचे पक्के बिल न चुकता घ्यावे.
आपल्या तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष दुरध्वनी इ-मेल ,टोल फ्री क्रमांक, एस.एम. एस इत्यादीद्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती  विभाग, अमरावती यांनी केले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा