इतिहासातून भावी पिढीने प्रेरणा
घ्यावी
-
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी
Ø अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराचे
वितरण
अमरावती, दि. 20 : सामान्यांच्या
जीवनाला आदर्शवत बनविण्यात इतिहासाचे मोलाचे स्थान आहे. रूढी, परंपरांना छेद देऊन अहल्यादेवींनी
समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांना आदराचे
स्थान आहे. विरांगणा अहल्यादेवींच्या कार्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
राजमाता अहल्यादेवी फाऊंडेशनच्या
वतीने आयोजित अहल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार
सुप्रिया सुळे, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, उपमहापौर कुसूम साहू, कमलताई गवई, सुरेखा
ठाकरे, वसुधाताई देशमुख उपस्थित होत्या.
श्री. कोश्यारी म्हणाले, राजमाता
अहल्यादेवी यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन इंदूरमध्ये कार्य केले. समाजासाठी कार्य करणाऱ्या
व्यक्तींना प्रांताची मर्यादा नसते. त्यांनी केलेले बद्रीनाथ मंदिराच्या पुनरूज्जीवनाचे
कार्य प्रशंसनीय आहे. त्यांच्या अशा विविध कार्यामुळे संपूर्ण देशभर त्यांच्याविषयी
पाठ्यपुस्तकात शिकविले जाते. महान व्यक्तींच्या कार्यातून आपण प्रेरणा घ्यावी. इतिहास
चांगल्या गोष्टी घेण्यासाठी असतो. समाजात दुही निर्माण करणाऱ्या बाबींपेक्षा गौरवशाली
इतिहास प्रेरणादायी ठरतो. त्यामुळे इतिहास कायम जिवंत राहतो.
आयोजकांनी विविध क्षेत्रात संघर्ष
करून यशस्वी झालेल्या महिलांचा गौरव केला आहे. हा गौरव इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
संकटांचा सामना करून जिद्दीने जिवनात यशस्वी होणाऱ्या महिला आदर्शवत ठरतात. प्रेम आणि
स्नेहाने समाजात एैक्य निर्माण होऊन समाज शक्तीशाली होतो. या समाजाने संषर्घशिल महिलांच्या
मागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही श्री. कोश्यारी यांनी केले.
कार्यक्रमात समाजसेविका श्रीगौरी
सावंत, सुधा चंद्रन (कला), छाया भट (क्रीडा), जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे (प्रशासन),
सुनिता निमसे (शेती उद्योजिका) यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते घोंगडी
आणि स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
फाऊंडेशनच्या सचिव माधुरी ढवळे
यांनी फाऊंडेशनची माहिती दिली. सुरेखा ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. पुरस्कार प्राप्त
सुनिता निमसे, वर्षा भाकरे, श्रीगौरी सावंत, सुधा चंद्रन, छाया भट यांनी मनोगत व्यक्त
केले.
सुरवातीला राज्यपाल यांनी अहल्यादेवी
यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. फाउंडेशनच्या वतीने राज्यपाल कोश्यारी
आणि श्रीमती सुळे यांचे घोंगडे आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. संतोष महात्मे
यांनी प्रास्ताविक केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा