मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

प्रदर्शन सहाय्यक हर्षदा गडकरी यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

 प्रदर्शन सहाय्यक हर्षदा गडकरी यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

अमरावती दि. 30 : अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहाय्यक हर्षदा गडकरी यांना सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्ती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला सहाय्यक संचालक अपर्णा यावलकर अध्यक्षस्थानी होत्या. सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त श्रीमती गडकरी यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला बुलढाणा येथील जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती सहाय्यक विजय राऊत, पल्लवी धारव, लेखापाल विजया लोळगे, वरिष्ठ लिपिक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, सुनील काळे लिपिक दिनेश धकाते, वैशाली ठाकरे, कॅमेरामन नितीन खंडारकर, कुमार हरदुले, छायाचित्रकार मनीष झिमटे, वाहनचालक रवींद्र तिडके, विजय आठवले, गणेश वानखेडे, सुधीर पुनसे, संदेश वाहक दिपाली ढोमणे आदी उपस्थित होते.

श्रीमती गडकरी यांच्या निरोप समारंभानिमित्त कार्यालयातील सहकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या, तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्रीमती गडकरी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. विश्वनाथ धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी धारव यांनी आभार मानले.

00000

दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक समितीपुढे आलेली प्रकरणे तातडीने निकाली काढावी

 

दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक

समितीपुढे आलेली प्रकरणे तातडीने निकाली काढावी

                                        -विभागीय आयुक्त पीयूष सिंह

 

अमरावती दि. 30 : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीपुढे असलेल्या सर्व प्रकरणाचा तपास गतीने पूर्ण करावा. दाखल प्रकरणांबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रकरणे निकाली काढावी. दाखल झालेल्या प्रकरणातील गुन्ह्याची नोंद, तपास, चौकशी योग्य रितीने करण्याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेत आज दक्षता व नियंत्रण समितीची बैठक झाली त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

बैठकीला अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे शशिकांत सातव, पोलीस आयुक्त कार्यालयाचे लक्ष्मण डुंबरे, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, अकोला येथील उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, अकोला पोलीस अधिक्षक कार्यालयातील मोनिका राऊत, बुलडाणा येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाचे श्रवण दत्त, प्रादेशिक उपायुक्त सुनिल केदार, अमरावतीच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, पाचही जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहायक आयुक्त, जिल्हा सरकारी अधिवक्ता आदी उपस्थित होते.

               अमरावती शहरी व ग्रामीण मिळून दाखल एकूण अकरा प्रकरणांपैकी चार प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून सात प्रकरणांचा तपास सुरु आहे. अकोला येथे दाखल दहा प्रकरणांपैकी पाच प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून पाच प्रकरणांचा तपास सुरु आहे. यवतमाळ येथील चार, बुलडाणा येथे तीन, वाशीमच्या दोन प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. यवतमाळ येथील पाच, बुलडाणाची आठ, आणि वाशीमची बारा प्रकरणांची तपासणी सुरु असल्याची माहीती संबधितांनी दिली. तालुकास्तरीय आढावा घेण्याकरीता जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती स्थापन केल्याबाबतचा अहवाल संबधितांनी तात्काळ सादर करावा. जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीने नियमीत स्वरुपात आढावा घ्यावा असे निर्देश पीयूष सिंह यांनी दिले.

                                                                0000000

                  

 

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

सजगता बाळगा; लसीकरण पूर्ण करून घ्यावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला

 

            सजगता बाळगा; लसीकरण पूर्ण करून घ्यावे

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 27 : कोविड रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले धोका संपलेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून, प्रशासन व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. तथापि, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी, तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानेही आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांची स्क्रिनिंग आदींबाबत सूचना केल्या आहेत. राज्य शासनाकडूनही याबाबत पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तथापि, गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रभावी लसीकरणासाठी जिल्ह्यात मोहिम हाती घेण्यात आली आहे. ठिकठिकाणी शिबिरे होत आहेत. अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन लसीकरण करून घ्यावे.

  प्रशासनानेही या पार्श्वभूमीवर रूग्णालयातील सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी. सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे पालन सर्वत्र व्हावे. पुन्हा साथ येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न व नियमपालन करणे आवश्यक आहे. यादृष्टीने प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी लसीकरण मोहिमेबरोबरच सातत्याने जनजागृतीपर उपक्रमही राबवावेत, असे आवाहनही  पालकमंत्र्यांनी केले.

                        000

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत लाभार्थ्यांना धनादेश वाटप - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत लाभार्थ्यांना धनादेश वाटप

 

 

गरजूंना सहायता योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

 





-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 27 : वंचित घटक, गरीब, आपद्ग्रस्त आदींसाठी शासनाकडून अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासनाच्या या विविध योजनांचा लाभ गरजूंना वेळेत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. 

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये मदत, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना मदतीचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, वंचित घटक, गरीब, आपद्ग्रस्त आदींना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने सहायता योजनांसाठी प्राप्त अर्ज वेळेत निकाली काढून गरजूंना न्याय मिळवून दिला पाहिजे. एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.  पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे सहाय्य योजनेचा निधी तत्काळ प्राप्त झाला, असे तहसीलदार श्री. काकडे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत नया अकोला येथील सविता मकेश्वर, पुसदा येथील छाया वानखडे,नांदगावपेठ येथील सुमित्रा भोपडे, यावली शहीद येथील रजिया बानो सौदागर, नांदगावपेठ येथील रूपा यादव, अर्चना गजभिये, डिगर गव्हाण येथील पूनम ढोके, माहुली जहांगीर येथील सारिका खंडारे यांना मदतीचे वाटप झाले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सहाय्य योजनेत शिराळा येथील अर्मळ कुटुंब, माहुली जहांगीर येथील काळकर कुटूंबाला मदतीचे वाटप यावेळी झाले.

 

000

गुरुकुंज उपसा सिंचन योजनेतून 18 हजार एकर जमिन सिंचनाखाली येणार, सिंचन वाढून कृषी उत्पादकतेत भर पडेल - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 









गुरुकुंज उपसा सिंचन योजनेतून 18 हजार एकर जमिन सिंचनाखाली येणार

सिंचन वाढून कृषी उत्पादकतेत भर पडेल

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती दि. 27 : गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे 18 हजार एकर जमिन सिंचनाखाली येणार असून, परिसरातील कृषी उत्पादकता वाढेल व शेतक-यांचे जीवनमान उंचावणार आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली, त्यानिमित्त मोझरी येथील दास टेकडी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, तहसीलदार वैभव फरतारे, माजी जलसंपदा अधिक्षक अभियंता रमेश ढवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी पूर्वीपासून निरंतर प्रयत्न होत आहेत. माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांनी 1984 मध्ये शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी या उपसा सिंचन योजना प्रकल्पाची मागणी केली. परिसरातील शेतीत पाणी पोहोचून शेतकरी बांधवांना बारमाही सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी, असे त्यांचे स्वप्न होते. त्याची पूर्ती या योजनेच्या साकारण्यातून होत आहे. योजना पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत विविध तांत्रिक अडचणींवर मात करण्यात आली. त्यानुसार उर्ध्व वर्धा सिंचन प्रकल्प योजनेंतर्गत गुरुकुंज उपसा सिंचन योजना साकारण्यात येत आहे. या योजनेमुळे गुरुदेवनगर, मोझरी, शेंदोळा (खु.), विचोरा, मालेगाव, फत्तेपूर, शिवणगाव, कोळवण, शेंदुरजन (बु.), शेंदुरजन (खु.), अनकवाडी, रघुनाथपूर, रंभापूर, पाळवाडी,  काडगव्हाण, अदमपूर, धोटे, व-हा, भांबोरा, वाठोडा, मालधूर, शिरजगाव आदी 22 गावांना व सुमारे सात हजार 109 हेक्टर शेतीला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली असून, विंचोरी येथे उपकालव्याद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे. लवकरच इतर कामही पूर्ण होईल.

                        पूरक व्यवसायांनाही चालना देणार

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, शेतीसोबत पूरक व्यवसायही वाढीस लागावेत, असे प्रयत्न होत आहेत जेणेकरून सिंचनाने कृषी उत्पादकता वाढण्याबरोबरच उत्पन्नाचे पर्यायी मार्गही उभे राहतील. सुमारे 7 हजार 109 हे. लाभक्षेत्र असलेल्या या प्रकल्पासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यावरून पाणी उचल होणार आहे.

  

000000

                                                                                                                 

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या

समाधीस्थळाला राज्यपालांचे अभिवादन

 






गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे

समाधीस्थळ व प्रार्थना मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

 

अमरावती, दि. 24 :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे शांतीस्थान महासमाधीला आज भेट दिली. यावेळी महासमाधीवर त्यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच येथील प्रार्थना मंदिरालाही भेट दिली.

समाधीस्थळावरील शांतता व पावित्र्य मनाला संमोहित करणारे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी ही भूमी पावन झालेली आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाने आपल्या मनात तेवत ठेवावी. हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल, असे श्री कोश्यारी यावेळी म्हणाले. 

    महापौर चेतन गावंडे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव जनार्दन बोधे, श्रीमती निवेदिता चौधरी, अध्यात्म विभाग प्रमुख डॉ राजाराम बोधे तसेच जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे, तहसिलदार वैभव फरताडे, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ आदी यावेळी उपस्थित होते. 

    अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळामार्फत राज्यपाल श्री कोश्यारी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित गद्य-पद्य ग्रंथ संपदा, ग्रामगीता तसेच शाल, श्रीफळ देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. 

                                                                00000

राज्यपालांची पापळ येथेही भेट

 











राज्यपालांची पापळ येथेही भेट

            या कार्यक्रमानंतर राज्यपाल महोदयांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी भाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याची पाहणी केली. भाऊसाहेबांच्या कुटुंबातील सदस्य रजनी भीमराव देशमुख, कुसुमताई देशमुख, महेंद्र देशमुख, अनुप्रिता देशमुख, विद्यानंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.

            राज्यपाल महोदयांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पापळ येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेला भेट दिली व संस्थेच्या नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी पवनीत कौर, संस्थेचे सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

'आत्मनिर्भर भारता'साठी कृषिविकासास प्राधान्य द्यावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

                         

                         




















'आत्मनिर्भर भारता'साठी कृषिविकासास प्राधान्य द्यावे                                                                                                                            

                                                                                                      - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

अमरावती, दि. २४ : देश सर्वार्थाने आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख यांचा शेतीविकासाचा संकल्प कृतीत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समर्पित भावनेने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

 

            येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यावेळी उपस्थित होते .

 

कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात शेतीचा एवढा अग्रक्रमाने विचार करणारे मंत्री आपल्याला लाभले हे देशाचे भाग्य आहे. त्यांनी शेतीविकासाचा प्राधान्याने विचार केला. त्यांच्या विचारांचे मूल्य मोठे आहे. ज्या काळात देश दुष्काळाचा मुकाबला करत होता, त्या काळात कृषीविषयक कार्याला प्राधान्य देऊन पंजाबरावांनी शेती विकासासाठी निष्ठेने प्रयत्न केले त्यातून देशात कृषी क्रांती घडून आली, असे कृतज्ञ उदगार त्यांनी काढले.

 

कृषी क्षेत्रात जिओ टॅगिंगसारखे होणारे नवे प्रयोग अत्यंत उपयुक्त आहेत, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्यांनी अविरत निष्ठेने केलेल्या कामगिरीमुळे देशाला उपासमारीचे संकट भेडसावण्याची वेळ आली नाही. माझी स्वत:ची बांधिलकी शेतीशी आहे. त्यामुळे शेतीविषयक संस्थांबाबत मला विशेष आस्था आहे, असे आवर्जून सांगून. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी कृषी महाविद्यालय सुरू होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. भाऊसाहेबांनी सुरू केलेली ही संस्था भविष्यात अधिक विकसित व व्यापक व्हावी, तसेच शेती अध्ययनासाठी एक आदर्श प्रारूप ठरावी,  असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

            विदर्भातील शैक्षणिक व कृषी विकासासाठी संस्थेने बजावलेल्या कामगिरीचा गौरव खासदार श्रीमती राणा यांनी आपल्या भाषणात  केला. आमदार श्रीमती खोडके यावेळी म्हणाल्या की, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्यामुळेच आम्ही शिक्षण घेऊ शकलो.  शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्याची गरज असून त्यात ही संस्था महत्वाचे योगदान देत आहे. महापौर श्री. गावंडे यांचेही यावेळी भाषण झाले.

 संस्थेचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कृषी अध्ययन आणि कृषीविकासासाठी भाऊसाहेबांनी  दिलेल्या योगदानाचा गौरव करताना संस्थेची आजवरची वाटचाल विशद केली. श्री. इंगोले यांनी आभार मानले.

                                    राज्यपालांची पापळ येथेही भेट

            या कार्यक्रमानंतर राज्यपाल महोदयांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी भाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याची पाहणी केली. भाऊसाहेबांच्या कुटुंबातील सदस्य रजनी भीमराव देशमुख, कुसुमताई देशमुख, महेंद्र देशमुख, अनुप्रिता देशमुख, विद्यानंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.

            राज्यपाल महोदयांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पापळ येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळेला भेट दिली व संस्थेच्या नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी पवनीत कौर, संस्थेचे सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  

०००००