श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
'आत्मनिर्भर भारता'साठी कृषिविकासास प्राधान्य द्यावे
-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अमरावती, दि. २४ : देश सर्वार्थाने
आत्मनिर्भर होण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यास प्राधान्य देणे
अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख यांचा शेतीविकासाचा संकल्प
कृतीत आणण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समर्पित भावनेने प्रयत्न करण्याची गरज आहे,
असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कृषी
महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी
यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके,
अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यावेळी उपस्थित
होते .
कृषी शिक्षणात श्री शिवाजी शिक्षण
संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून राज्यपाल पुढे म्हणाले की, देशाचे
पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माझ्या मनात
प्रारंभापासूनच आदरभाव आहे. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात शेतीचा
एवढा अग्रक्रमाने विचार करणारे मंत्री आपल्याला लाभले हे देशाचे भाग्य आहे.
त्यांनी शेतीविकासाचा प्राधान्याने विचार केला. त्यांच्या विचारांचे मूल्य मोठे
आहे. ज्या काळात देश दुष्काळाचा मुकाबला करत
होता, त्या काळात कृषीविषयक कार्याला प्राधान्य देऊन पंजाबरावांनी शेती विकासासाठी
निष्ठेने प्रयत्न केले त्यातून देशात कृषी क्रांती घडून आली, असे कृतज्ञ उदगार
त्यांनी काढले.
कृषी क्षेत्रात जिओ टॅगिंगसारखे होणारे नवे
प्रयोग अत्यंत उपयुक्त आहेत, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर
काळात शेतकऱ्यांनी अविरत निष्ठेने केलेल्या कामगिरीमुळे देशाला उपासमारीचे संकट
भेडसावण्याची वेळ आली नाही. माझी स्वत:ची बांधिलकी शेतीशी आहे. त्यामुळे शेतीविषयक
संस्थांबाबत मला विशेष आस्था आहे, असे आवर्जून सांगून.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या जन्मगावी कृषी महाविद्यालय सुरू होण्यासाठी
आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. भाऊसाहेबांनी सुरू केलेली
ही संस्था भविष्यात अधिक विकसित व व्यापक व्हावी, तसेच शेती अध्ययनासाठी एक आदर्श प्रारूप
ठरावी, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त
केला.
विदर्भातील शैक्षणिक व कृषी विकासासाठी
संस्थेने बजावलेल्या कामगिरीचा गौरव खासदार श्रीमती राणा यांनी आपल्या भाषणात
केला. आमदार श्रीमती खोडके यावेळी म्हणाल्या की, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या
कार्यामुळेच आम्ही शिक्षण घेऊ शकलो. शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहण्याचा
दृष्टिकोन विकसित होण्याची गरज असून त्यात ही संस्था महत्वाचे योगदान देत आहे.
महापौर श्री. गावंडे यांचेही यावेळी भाषण झाले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी कार्यक्रमाचे
प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी कृषी अध्ययन आणि कृषीविकासासाठी भाऊसाहेबांनी
दिलेल्या योगदानाचा गौरव करताना संस्थेची आजवरची वाटचाल विशद केली. श्री. इंगोले
यांनी आभार मानले.
राज्यपालांची पापळ येथेही भेट
या
कार्यक्रमानंतर राज्यपाल महोदयांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे
भेट दिली. यावेळी त्यांनी भाऊसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याची पाहणी केली. भाऊसाहेबांच्या
कुटुंबातील सदस्य रजनी भीमराव देशमुख, कुसुमताई देशमुख, महेंद्र देशमुख, अनुप्रिता
देशमुख, विद्यानंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यपाल महोदयांनी भाऊसाहेबांच्या
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पापळ येथील श्री शिवाजी शिक्षण
संस्थेच्या शाळेला भेट दिली व संस्थेच्या नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेची
पाहणी केली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार प्रताप
अडसड, जिल्हाधिकारी पवनीत कौर, संस्थेचे सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप
इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा