प्रधानमंत्री
पिक विमा योजना
३१
जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे
अमरावती दि. 28 (विमाका) : नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा
संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास
प्रोत्साहन देणे, यासाठी अमरावती विभागातील सर्व जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा
योजना खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये राबविण्याबाबत येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह ३१ जुलै २०२२ पर्यंत
प्रस्ताव सादर करावे.
भात, ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबिन, कापूस
पिकांचा या खरीप हंगामात समावेश करण्यात आला आहे.
बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी,
पत्ता- मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, २० वा मजला, दलाल
स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- ४०००२३ ई-मेल pikvima@aicofindia.com टोल फ्री क्रमांक
१८००४१९५००४ आहे. अकोला जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी
लि. पत्ता- माणिकचंद आयकॉन, ३ रा मजला, प्लाट नं. २४६, सी विंग, बंडगार्डन, पुणे
४११००१ ई-मेल customersupportba@icicilombard.com टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२
आहे. ह्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत राज्यात सन 2022-2023 साठी
सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पिक कर्ज
दराप्रमाणे पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील
अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक
आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २
टक्के, रब्बी हंगामासाठी १.५० टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित
ठेवण्यात आला आहे.
या वर्षीच्या खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा
योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी
संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक के.एस. मुळे यांनी केले आहे.
००००
वृत्तक्र. 199 दिनांक: 28 जुलै, 2022
अनुसूचित
जाती व नवबौध्द शासकीय निवासी शाळांची
‘स्वच्छ
विद्यालय’ पुरस्कारासाठी निवड
अमरावती दि. 28 (विमाका) : स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमीत्त ‘स्वच्छ भारत,स्वच्छ विद्यालय’ या अभियानाअंतर्गत सन २०२१- २०२२चा
स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार जिल्ह्यातील, अंजनगाव सुर्जीच्या पांढरी खानमपुर
येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा व दर्यापुर तालुक्यातील
सामदा कासमपुर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा या दोन शाळांची
निवड जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
निवड समितीने या निवासी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी
केली. शाळा तपासणीदरम्यान वॉटर, हॅडवॉशिंग विथ सोप, बिहेवियर चेंजेंस अॅन्ड कॅपॅसिटी
बिल्डींग, टॉयलेट्स, ऑपरेशन अॅन्ड मेनटेनन्स, कोविड-१९ व फोटोस या बाबींची प्रश्नावली
व प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामधून जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी
सर्वसाधारण श्रेणीमधून एकुण ८ शाळांची व उपश्रेणीमधून एकुण ३० शाळांची निवड करण्यात
आली.
अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यातील गोरेगाव खुर्दची अनुसूचित
जाती मुलींची शासकीय निवासी शाळेची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असुन
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्हयातील आर्णि
तालुक्यातील (भंडारी नाथ), अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेची निवड करण्यात
आली आहे.
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयातर्फे
शालेय स्वच्छतेसंबंधीत पाच विविध बाबीवर निवड निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार
जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या तसेच समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या
सर्व शैक्षणिक संस्थांनी सदर पुरस्काराकरीता ऑनलाईन सहभाग नोंदविला होता.
विद्यार्थ्यांचे विकासाकरिता विविध स्पर्धांचे आयोजन व
स्पर्धांमध्ये सहभाग याच मुळे शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच
भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ विद्यालय
पुरस्काराकरीता निवड झाली अशी, माहिती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त
सुनिल वारे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा