मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी जाहीर
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी जाहीर
secretary.stateboard@gmail.com संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती दि. 13 : फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.दहावी) च्या लेखी परीक्षांचा कालावधी शिक्षण मंडळाद्वारे जाहीर करण्यात आला आहे. तपशील पुढीलप्रमाणे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी ते मंगळवार, दि. 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी ते सोमवार दि. 17 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी, तोडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 24 जानेवारी 2025 ते दि. 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहे. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 3 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान होणार आहे.
उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय काही सूचना, हरकती असल्या त्या मंडळाच्या अधिकृत secretary.stateboard@gmail.com संकेतस्थळावर दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत या संकेतस्थळावर पाठवात्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.
शाळा/कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या परीक्षा प्रचलित पध्दतीनुसार आयोजित करण्यात येतील याची सर्व कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक व संबंधीत घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाद्वारे करण्यात आले आहे.
त्यानंतर अनुर्त्तीण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणत: जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल.
सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे राज्यमंडळ पुण्याच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा